दिशा भाग 7

Sharayu Was Telling Her Mom About Behaviour Of Sushant
दिशा :- भाग ७

रात्रभर चित्रविचित्र स्वप्ने पाहून शरयू सकाळी उठली तीच प्रचंड थकलेली. काल पुण्याला गेलेली आणि त्याच्या २ दिवस आधी जोशी बाबांच्या गोष्टी यात तिचे स्वतःकडे दुर्लक्ष झाले होते पण याहून हि त्रासदायक होते ते सुशांत चे वागणे ... त्याचे कालचे बोलणे आणि वागणे ,सगळे तिला राहून राहून आठवत होते. तिने त्याच विचारात आवरायला सुरुवात केली. तेवढ्यात समोरून जोशी आई आली. "शरयू, बाबांना जाऊन आता ३ दिवस झाले आहेत. आता तू घरी कशाला थांबतेस उगाचच! घरी थांबली तर तुझं मन लागणार नाही. त्यापेक्षा तू जा ऑफिस ला. "
शरयू ने जांभई देत मान डोलावली पण आज तिच्यात अजिबात नेहमीसारखा तजेला तिच्या या आईला जाणवला नाही.

14 महिन्यांच्या त्या बाळाला जेव्हा पासून तिच्या हातात आले होते तेव्हापासूनच या आईने आपल्या जीवापाड तिला सांभाळले होते. तिच्या चेहऱ्यावरची एक एक रेषही जोशी आईला तिच्यातला बदल माहीती करून होती.
शरयू च्या डोळ्यातील दुःखाची कणव तिला जाणवत होती.

तिच्या हाताला धरून चालायला शिकवले होते तिने, प्रेमाने प्रत्येक घास भरवला होता. शरयू ची ही नजर तिचे काळीज हेलावत होते.

ती जवळ आली आणि हलकेच शरयू च्या डोळ्यावर हात ठेवून आणि नजरेत बघून म्हणाली " शरयू बेटा काय झालंय? मनात थैमान माजले आहे तुझ्या! तुझे डोळे बघ सगळे हेच सांगत आहेत."

आईचे हे शब्द ऐकताच शरयू ला भरून आले. ती लगेच आईला बिलगली आणि लहान मुलासारखे रडायला लागली.

आईने तिचा तो भर जरा कमी होऊन दिला आणि मग गालावरून हात फिरवत म्हणाली "बोलशील का बाळा?"

शरयू ने पुण्याला पोचल्यापासून, त्या गल्लीत तो माणूस भेटल्यापासून ते आईची पहिली भेट झालेले सगळे बोलणे.. ती छोटी सीमा एकूण एक गोष्टी आईला सांगितलं. आपण आईला यायला केलेला हट्ट सुद्धा सांगितला. त्यावर आईची प्रतिक्रिया सुद्धा सांगितली तसे जोशी आई हलकेच हसली.
यापैकी बरेच तिला अपेक्षित होते पण तरी काही तरी अजून वेगळे आहे हे तिचे मन तिला सांगत होते.

"शरयू इतकेच?"

तसं शरयू ने मान खाली घालुन सुशांत ची भेट ह्याबद्दल सांगितले. त्यानंतर त्याचे वागणे आणि तिची आईचा वेश्या या बद्दल केलेला वेगळा उल्लेख सगळं आईला सांगितले. त्यावरून त्याच क्षणात बदललेले वागणे ऐकून आईला सुद्धा धक्का बसला आणि आईच्या डोळ्यात एकदम पाणी आले..तरी शरयू ला सांभाळायला ती म्हणाली "बेटा, मी बोलते सुशांत शी, काळजी करू नकोस"

पण शरयू ची नजर शून्यात होती जणू तिच्यातील प्राण कोणी ओढून घेतंय.

आईने दिलासा दिल्यावर आणि खूप समजवल्यावर थोड्या वेळाने ती ऑफिस साठी बाहेर पडली.
टॅक्सी वाल्याला हात करून तिने पत्ता सांगितला, "कुलाबा"
टॅक्सी वाल्याने मीटर टाकला. मुंबईच्या रस्त्यांवरून टॅक्सी जात असताना शरयू फक्त बाहेर बघत होती. तिच्या मनात असलेले विचारांचे काहूर तिला स्वस्थ बसू देत नव्हते. आज ऑफिस मध्ये गेल्यावर सुशांत सोबत काय आणि कसे बोलावे हेच विचार तिच्या मनात येत होते.
कुलाबाच्या इन्फिनिटी टॉवर पाशी टॅक्सी थांबली. बिल देऊन ती बिल्डिंग मध्ये शिरली.

बिल्डिंग च्या आतल्या लोटस स्क्वेअर पाशी आल्यावर तिने चारही बाजूला नजर फिरवली. टॉवर मध्ये एकूण ८ लिफ्ट्स होत्या. तिला दिसले कि बी विंगच्या इथली लिफ्ट पाशी कमी लोक वेटिंग ला उभे होते. ती पटकन तिकडे गेली. २ मिनीटात लिफ्ट आली. आत शिरल्यावर लगेच बाविसावा मजल्याचे बटन तिने दाबले आणि शांतपणे उभी राहिली. लिफ्ट जवळपास भरली आणि अगदी शेवटच्या क्षणाला लिफ्ट चा दरवाजा बंद होण्याच्या आधी एक हात आला. दार उघडले आणि सुशांत आत आला. त्याचे लक्ष नव्हते पण शरयू ने एकदम आवाज दिला.
"हाय सुश ... !" त्याने मागे वळून पाहिले तसे त्याला शरयू दिसली. तिच्याकडे बघून पहिल्यांदा तो दचकला आणि काही न बोलता तसाच उभा राहिला. तो तिला पाहून न पाहिल्यासारखे पुढे बघायला लागला. त्याच्या आणि तिच्या मध्ये कोणीतरी उभे राहील याची खात्री करत तो लिफ्ट च्या दारापाशी अजून सरकला. तो असा का वागत आहे हे शरयू च्या लक्षात यायला लागले होते पण तिला तो असे वागू शकेल यावर विश्वास बसत नव्हता.

लिफ्ट २२ व्या मजल्यावर थांबली. तसा तो घाईघाईत ऑफिसमध्ये शिरला. त्याच्या मागोमाग ऍक्सेस कार्ड पंच करून ती सुद्धा आत शिरली.
सुशांत आणि शरयू ची ओळख हि २ वर्षांपासून ची. या ऑफिसमध्ये ती जेव्हा इंटरव्ह्यू देण्यासाठी आली होती तेव्हा सुशांत ने तिला गाईड केले होते. त्या दिवशीपासूनच दोघांची ओळख झाली होती. पहिले मैत्री मग घट्ट मैत्री आणि नंतर खूप खास मैत्री अशी त्यांची ओळख वाढत गेली होती. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. दोघांचा एकही दिवस एकमेकां च्या शिवाय जात नसे. दोघेही एकमेकांना भरपूर वेळ द्यायचे. या सगळ्या मधून त्याचे असे हे वागणे तिला खूप त्रास देणारे होते.

स्वतःच्या क्युबिकल मध्ये जाऊन तिने तिचा कंम्प्युटर चालू केला आणि निरर्थक काहीतरी टायपिंग चालू केले. ऑफिस मध्ये सगळे आजूबाजूला आले आणि त्यांच्या कामाला लागले पण हि तशीच बसून होती.

ती तीच्या जागेवरून पलीकडे दिसणाऱ्या सुशांतला फक्त बघत होती. तो चुकूनही एकदासुद्धा तिच्या कडे वळला नाही की त्याने पाहिले नाही. कालपर्यंत हाच सुशांत मध्येच तिला बघून कोणाचे लक्ष नाही हे बघत डोळा मारत होता तर कधी ओठांचा चंबू करत होता आणि आज काही तासातच तो तिचे अस्तित्व जणू नाकारत होता. तिला हे सगळे असह्य होत होते डोळ्याच्या कडा सतत ओल्या होत होत्या कोणाला कळू नये म्हणूनती फक्त टिश्यू ने ते टिपत होती.

सुशांत मध्येच उठून बॉस कडे गेला, त्याची आत बाहेर सुरूच होती आणि ही फक्त हे बघत होती. बघता बघता लंच ची वेळ झाली तसं ती पटकन उठून सुशांत च्या दिशेने गेली आणि म्हणाली "सुश, आपण लंच ला बाहेर जाऊयात का? " आणि त्याच्या हाताला स्पर्श करायला गेली तसे त्याने झटक्यात त्याने तिचा हात झिडकारला आणि रागात तिच्याकडे बघितले म्हणाला "डोन्ट टच मी" आणि सरळ चालता झाला.

आता मात्र तिचा बांध फुटला आणि ती बाजूच्या खुर्चीवर अक्षरशः कोसळली. तिच्या बाजूला असलेले तिचे कलीग सुद्धा बघत राहिले. हे प्रेमी युगुल आणि यांच्याबद्दल असलेल्या गोष्टी हे सगळ्याना ठाऊक होते त्यामुळे हे असे बघून त्यांनाही धक्का बसला.

चेहरा झाकून मुसमुसणाऱ्या शरयू ला बघून तिची मैत्रीण प्रीती ला खूप वाईट वाटले. ती लगेच पुढे होऊन शरयू ला पाणी पुढे केले तसे शरयू तिच्या गळ्यात पडून रडायला लागली.

ती का रडते आहे हे बघायला सगळे जमायला लागले तसे
तिने हाताला धरून शरयू ला वॉश रूम कडे नेले आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी मारले.

"शरयू काय झाले?"

शरयूच्या तोंडून शब्द फुटत नव्हते कारण हा धक्काच मुळी तिला सहन होत नव्हता की सुशांत तिच्याशी असे वागतोय!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all