Jul 04, 2022
प्रेम

दिशा भाग 5

Read Later
दिशा भाग 5
दिशा:- भाग 5

शालिनीचे तर आज काही न खातांच पोट भरलं होते, आज तिची शरयू जी फक्त विचारात होती ती प्रत्यक्ष तिला नजरेला दिसत होती. जिच्या साठी ती इतके वर्षे तडफडत होती ती तिची शरयु तिला शोधत आज ईथवर आली होती.आज तिने आयुष्यभर मनात असलेली सल, तिचं दुःख तिच्या शरयुसमोर व्यक्त केले होते आणि जणू तिचं सर्वस्व तिला मिळालं होतं.

भुकेने व्याकुळ शरयू पोहे खात असताना, शालिनी तिला डोळे भरून बघत होती आणि आज आनंदाने तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. शरयू ने नजरेनेच तिला काय झाले विचारले तसे शालिनी ने मान हलवत काही नाही असे म्हणले आणि दोन्ही हात पुढे करून शरयू च्या दोन्ही कानावरून आपली बोटं उतरवत तिची दृष्ट काढली तशी शरयू गोड हसली.

ती छोटी मुलगी जिने शरयू ला ताई म्हणले होते ती सुद्धा कौतुकाने दोघींकडे बघत होती.. तिचे ही डोळे पाणावले होते..ती मान खाली घालुन रडायला लागली तसे शालिनी ने तिला जवळ घेतले.
साहजिकच होते तिला सुद्धा तिची आई आठवत होते.

"सीमा बेटा, मी आहे ना..."

"हम्मम" सीमा रडत रडतच म्हणाली.

तिच्या त्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघून शरयु ला पण भरून आले...तिने आपल्या ताटातली जिलबी तिला भरवली.. .

तसे तिने थोड्या रडवेला तर थोडा हसरा असा चेहरा करत शरयू च्या हातून जिलबी खाल्ली.

शालिनी ला आपल्या मुलीचे कौतुक वाटले. तिच्या जवळ जात तिने शरयू ला परत घट्ट मिठीत घेतले.
मायलेकींचा हा आजचा सोहळा तेथील सगळ्याच स्त्रिया कौतुकाने बघत होत्या. हे असे या ठिकाणी बघायला मिळणे हे खरं तर कठीण होते.

मध्येच शरयू ला कॉल येत होते पण ती एकही कॉल उचलत नव्हती. सतत वाजणारा मोबाईल बघून शालिनी ने तिच्याकडे पाहिले तसे ती म्हणाली "अगं आई, माझ्या ऑफिस मधून आहेत...आज सुटीच्या दिवशी सुद्धा मला एकटीला सोडत नाहीत".

तसे शालिनी हसायला लागली आणि तिचे हसणे बघून शरयु सुद्धा हसू लागली.
त्या दोघींना पाहून सीमा जोरजोराने हसायला लागली.

ते हसणे इतके मोठ्याने झाले की खात असताना शरयू ला अचानक ठसका लागला तसं शालिनी ने पटकन उठून तिच्या पाठीवरून हात फिरवला, त्या मायेच्या ओथंबलेल्या स्पर्शाने शरयू न्हाऊन निघत होती.

आता एव्हाना बराच वेळ झाला होता दुपार टळून गेली होती शरयू ने घड्याळ पाहिले तर 4 वाजले होते तसे तिने आश्चर्याने शालिनी कडे बघितले "अगं आई, वेळ किती भुर्रकन उडून जातोय."

तिच्या प्रत्येक "आई" हाकेसारशी शालिनी सुखावत होती समाधानाने तिचा चेहरा उजळून निघाला होता.
"तुला जायचे असेल ना?"
"हो,उद्या सकाळी ऑफिस आहे"
तसे शालिनी चे डोळे पुन्हा भरून आले.
शरयू ला ते पाहवले नाही ती पटकन उठून आली आणि शालिनी च्या गळ्यात हात टाकून म्हणाली " मी जाणार आहे आई, पण एकटी नाही"
"म्हणजे?"
"तुला पण माझ्या सोबत यावे लागेल."
तसं शालिनी ला आश्चर्य वाटले, इथून बाहेर जाणे हे तिला माहीतच नव्हते.

"छे ! ते मला नाही जमणार बेटा आणि ते योग्य पण नाही. माझ्या सोबत तुला बघून तुझी बदनामी होईल"

"असं काही होत नाही, तू माझी आई आहेस हे सांगायला मला लाज का वाटावी?"

"असं नाही ग बाळा,जग खुप विचित्र आहे. तुझं जग हे वेगळं आणि माझंही वेगळं आहे तुझ्या जगात मला प्रवेश नाही"
"मग मी इथे राहावे का?" शरयू म्हणाली तसे शालिनी शहारली आणि जोरात म्हणाली "ही तुझी जागा मुळीच नाहीय. तू इथे नसावी तुला चांगले आयुष्य लाभावे यासाठी मी मनावर दगड ठेवला माझ्या आणि तुला लांब केले"

"हो ना, मग तूचं माझ्यासोबत येणार आहेस"

"तुला नाही समजणार गं शरयू! हा समाज आम्हाला खूप वेगळ्या प्रकारे वागवतो. तिथे आम्हाला जागा नाही आणि तुझी मान खाली जाईल हे मला मान्य नाही"

"माझी मान उलट गर्वाने ताठ झालीय अशी आई लाभून... ती का बरे खाली जाईल? मी म्हणजे तुझं जग आहे तर तू कोणाची पर्वा करतेस?"

"तुझं जग तर वेगळे असणार ना? उद्या तुला अजून नवीन लोक भेटणार...."

"नवीन नाही जुनीच लोक "असे म्हणत ती थोडी लाजली तसे शालिनी ने डोळ्यानेच तिला काय म्हणून खुणावले.

"माझं लग्न जमलंय माझ्या मित्रासोबत ! पुढल्या वर्षी आम्ही लग्न करतोय.दोन्ही घरी ते मान्य आहे " ती मान खाली घालत बोलली तसे शालिनी सुखावली.

शरयू ने मोबाईल मधील त्याचा फोटो शालिनी ला दाखवला तसे शालिनी आणखी आनंदी झाली की आपल्या मुलीचा संसार उभा राहणार.

शालिनी ने तिला घट्ट मिठी मारत तिचे अभिनंदन केले आणि पटकन तिच्यावरून 500 ची नोट उतरवून त्या मुलीला सांगितले की बाहेर भिकारी असेल तर देऊन टाक.

सगळे कसे आनंदी आनंद जाणवत होते... शरयू चा हट्ट तिला मोडवत पण नव्हता आणि तिला तिच्यासोबत जाता ही येणार नव्हते.

"आई तुला घेतल्याशिवाय मी जाणार नाही" ठामपणे शरयू म्हणाली आणि ठिय्या मांडल्यासारखी सोफ्यावर बसली.

"बाळा ऐक ना! जे शक्य नाही त्याचा हट्ट नको ना करु. तू भेटलीस सुखी आहेस आणि छान सगळं होणार आहे तुझं.. यापेक्षा मला आणखी काय हवे? तू जा मुंबईला वाटलं तर फोन कर, कधीतरी भेटू नक्की पण तू इथे वारंवार यायचे नाहीस" शालिनी पहिल्यांदा थोडं ठाम बोलली

शरयुचे डोळे पाणावले पण तरीही म्हणाली " तुला सांगितले ना मी एकटी जाणार नाही. या इथल्या आयुष्यातुन मला तुला बाहेर काढायचे आहे. ही माझ्या आईची जागा नाहीय, तिची जागा माझ्या सोबत आहे"

"शरयू संध्याकाळ होत आली आहे, तू निघ इथून आता. ही वेळ इथली भयंकर असते..मला नकोय तू कोणाच्या नजरेस पडायला " म्हणत शालिनी ने शरयू ची पर्स उचलून त्यात पैसे ठेवले आणि शरयू च्या हातात दिली.

शरयू ने भावुक होत आशेने आईकडे पाहिले पण शालिनी ला ठामपणे बघून ती रडवेली झाली. तिलाही मनातून कळत होते की ही इथे थांबायची वेळ नाही पण पाऊल समोर पडत नव्हते.

धावत जात तिने शालिनी ला घट्ट मिठी मारली, दोन्ही बाजूने अश्रू वाहत होते आणि हा नजारा बघून सगळेच रडायला लागले होते.

क्षणात शरयू बाजूला झाली आणि ठामपणे म्हणाली "आज मी जातेय आई, पण पुन्हा येईल ती तुला न्यायलाच येईल. तुझे ईथले वास्तव्य आता संपले आहे..माझे वाक्य नीट लक्षात ठेव...तुझे इथले वास्तव्य आता संपले आहे...!" आणि दरवाजाकडे निघाली.

तिचा अविर्भाव, ते ठामपणे बोलणे शालिनी अवाक होऊन बघतच राहिली. शरयू च्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघत असता शरयू ने वळून तिचे बिझनेस कार्ड शालिनीच्या हाती दिले. तिथला नंबर मोबाईल वर फीड केला आणि तिथून बाहेर पडली.

तिथून बाहेर पडत असताना तिला अनेक नजरा पाहात होत्या. त्या नजरांचे तिला काहीच सोयर सुतक नव्हते. ती तशीच त्या गल्यांमधून बाहेर पडली.

तिथून रिक्षा केली आणि सरळ स्टेशन ला आली. गाडी सुटायला अजून अर्धा तास होता. तिथल्याच एका कॅफे मधून तिने गरमागरम नेसकॉफी घेतली आणि तिच्या डब्यात शिरली.
तिच्या सीट वर बसून तिने फोन लावला.

"शरू, किती कॉल केले तुला... आय अँम जस्ट मिसिंग यु बेबी.."

सुशांत चा आवाज ऐकला आणि शरू खुदकन हसली.
"किती मिस केले मला?"

"खूप..! लवकर ये..मी स्टेशन वर पीक करायला येतोय तुला.."

"अच्छा.. आणि मग..?"

"मगं काय...छान पैकी डिनर आणि लॉंग ड्राईव्ह.."

"सुशांत, मला तुझ्या सोबत खूप काही बोलायचे आहे.."

"बोल ना..तसेही मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस ते.."

"नाही सुशांत, तुला नाही माहिती आहे..आपण भेटून बोलू.."
तिने फोन ठेवला तेव्हा गाडी हॉर्न देत प्लॅटफॉर्मवरुन हलत होती.

क्रमशः

©®अमित मेढेकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Amitt Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!