दिशा भाग 4

Shalini Continued Her Story Which Was Very New To Sharayu
दिशा:- भाग 4

कधीतरी वाटायचे की ती शशी आंटी परवडली पण ही बाई नको. या बाईला दया, माया,प्रेम काहीच नव्हते. हिला फक्त एकच शब्द कळायचा तो म्हणजे पैसा!
हिने दारावर खट खट केली की समजायचे माझी वेळ आली आहे. मग मन मारून सगळे सहन करायचे.

तिथेच एक माझ्यापेक्षा वयाने मोठी सपना दीदी होती. तेवढ्या वेळेपुरते मी तुला तिच्याकडे सोडायचे. तो मला नको असलेला व्यवहार उरकला की मी तुझ्याबरोबर परत वेळ घालवू शकायचे. ती तुला छान सांभाळायची. जीव होता तिचा तुझ्यावर!

माझ्यादृष्टीने ते फार वेदनादायक दिवस होते. सगळे कसे नको वाटायचे, फक्त तूच एक होतीस जो माझ्या जगण्याचा मोठ्ठा आधार होतीस.

अक्षरशः तिथे असताना वाटायचे पळून जावे, तिथून निघून जावे पण माझ्यापुढे कोणीच ओळखीचे दिसत नव्हते ज्याच्या कडे मी जाऊ शकेल आणि राहू शकेल.
माझ्या मनाचा कोंडमारा होत असताना एके दिवशी सपना दीदी ने मला विचारले" तू शरयू चे पुढे काय भवितव्य ठरवले आहेस?"
हा प्रश्न थोडा धक्कादायक वाटला कारण याचे माझ्याकडे उत्तर नव्हते.

तिने सांगितले "माझा भाऊ एका कंपनी मध्ये काम करतो. त्यांच्या साहेबांना मुलबाळ नाही. आपल्या शरयू साठी त्यांच्याकडे शब्द टाकू का?"

तिच्या बोलण्याने मी चरकले आणि पटकन नाही म्हणाले आणि तुला कवटाळून रडायला लागले.
माझे रडणे आणि आवेग पाहून सपना दिदीने तो विषय पुन्हा काढला नाही पण तो विषय माझ्या मनात घोळत राहिला. त्या वातावरणात तुझी कधी वाढ होईल, कसे संगोपन होईल? तुला कसे वळण लागेल?हे विचार मनात थैमान घालत राहिले.

शेवटी एके दिवशी माझा माझ्याच मनाशी कडेलोट झाला . मी दीदी कडे गेले आणि तिला विचारले "जोशी साहेबांकडे आपली शरयू चांगली राहील का?"

दीदी फक्त हसली आणि माझ्या खांद्यावर थोपटले. दुसऱ्या दिवशी तिचा भाऊ मला भेटायला आला, त्याने माझ्या मनात काय आहे हे विचारले.
मी त्याला स्पष्ट सांगितले " माझी शरयू कायम आनंदात राहिली पाहिजे.
त्याने खात्री दिली"जोशी साहेब हे उत्कृष्ट व्यक्ती आहेत आणि तिथे शरयू कायमच खुश राहील. "

मी काळजावर दगड ठेवला आणि सांगितले "मला माझ्या शरयू ला जेव्हा हवे तेव्हा भेटला आले पाहिजे" यावर त्याने नकारात्मक मान डोलावली आणि मला म्हणाला, "जोशी साहेबांना शरयू बद्दल सगळे माहिती आहे. ते तिला स्विकारायला, त्यांचे नाव द्यायला तयार आहेत फक्त त्यांची एकालच अट आहे की, ते जर शरयू ला तेव्हाच स्वीकारतील जेव्हा तू जे मान्य करशील की यापुढे तुला तिला कधीच भेटता येणार नाही.

मी मटकन खाली बसले! एकीकडे तुझं भविष्य तर दुसरीकडे माझा भावनिक आधार होता. कुठे जावे काय करावे काहीच कळत नव्हते.

तुला सोडण्याचे मन होईना. तुझ्याकडे पाहूनच तर जगत होते. पण सपना दिदी आणि तिच्या भावाने माझी समजूत काढली. त्यांनी मला हे समजावले की, जे माझ्या बाबतीत झाले ते शरयू च्या बाबतीत नाही झाले पाहिजे.

शेवटी मी तयार झाले.माझ्या सर्वोच्च त्यागाला! शिरीष गेला त्याचे एवढे वाईट नव्हते वाटले पण तू जाणार म्हणल्यावर माझ्यावर आभाळ कोसळले होते.

सगळ्या प्रोसिजर आणि सोपस्कार पार पाडून जेव्हा तू त्यांच्याकडे गेलीस तेव्हा फक्त 15महिन्यांची होतीस. माझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नव्हता.
तुझे भवितव्य महत्त्वाचे होते जे या वातावरणात, जागेत मला मातीमोल करायचे नव्हते.
मी जोशींना त्यावेळी एकदाच भेटले.ते दोघेही मला अत्यंत चांगले लोक वाटले. असे वाटले की त्यांच्याशिवाय तुला दुसरं कोणी सुखी ठेवणार नाहीत.
त्यांना हात जोडून नम्रपणे विनंती केली "माझ्या शरयुला सुखी ठेवा"
त्यांच्या हसण्यात आश्वासकता होती.
मी तुला त्यांच्याकडे सुपूर्त केले आणि खऱ्या अर्थाने एकटी झाली.

तू गेल्यावर माझ्या आयुष्यात अक्षरशः फक्त एकटेपण, त्रास, नैराश्य आणि दुःख इतकेच उरले होते.
तुझ्या दुसऱ्या वाढदिवसाला मुंबईला फोन करण्याचा तुझ्याशी बोलायचा खुप प्रयत्न केला पण तुझा साधा आवाज पण ऐकायला नाही मिळाला.
तू गेलीस ती कायमची हे कळून चुकले.

दुसऱ्या वाढदिवसाचा तुझा एक फोटो सपना ताईच्या भावाने मिळवला आणि म्हणून तोच हा एक फोटो तुझी आठवण म्हणून होता तो इथे लावला आहे."
तिथल्या फोटोकडे पाहत शालिनी म्हणाली.

इतकं संपूर्ण वेळ भूतकाळ ऐकणारी शरयू प्रचंड भावनिक होऊन मूकपणे रडत होती. जसे ते सांगणे थांबले तसे शरयू उठली आणि "आई" म्हणत शालिनी ला घट्ट मिठी मारून रडायला लागली.

त्या खोलीत असलेल्या शालिनी, शरयू, ती छोटी मुलगी आणि ज्या स्त्रीया होत्या त्या सगळ्यांच्या डोळ्यात न थांबणारे पाणी होते.

एक विचित्र प्रवास करत शालिनी इथवर आली होती आणि आज तिलाच शोधत शरयु इथवर आली होती. बराच वेळ रदण्यात गेल्यावर शालिनी ने शरयू ला विचारले "काल तुला हे कसे कळले?"

तसे शरयू म्हणाली " काल बाबा म्हणजे जोशी बाबा गेले आणि जाताना मला तुझ्याबद्दल सांगून गेले. मला अजिबात राहवले नाही आणि मी तुला शोधत इथपर्यंत पोहोचले."

तिच्या डोक्यावरून हात फिरवत शालिनी म्हणाली "तू आज आई म्हणली आणि मी भरून पावले.किती छान दिसतेस तू आणि तुझा आवाजही तितकाच छान आहे. या गोड आवजातून आई ऐकणे यापलीकडे दुसरे काहीच आनंददायी असू शकत नाही. "

शरयू "आई " म्हणत तिला बिलगून पुन्हा रडायला लागली.
त्या दोघींना एकमेकींच्या शेजारी बसवत कोणीतरी आतमध्ये गेलं आणि दोघींच्यावरून पैसे फिरवून दृष्ट काढून टाकली.

त्या कृतीने शरयू हलकेच हसली.

"आई मला खूप भूक लागली आहे, चल कुठेतरी खायला जाऊ"
"मी कशी येणार बाळा बाहेर ? त्यापेक्षा आपण इथंच काहीतरी मागवू" शालिनी म्हणाली

शरयू काहीच बोलली नाही, थोड्या वेळात कोणीतरी तिथे पोहे,पापड आणि जिलबी घेऊन आले.

आज तिथे खऱ्या आई बरोबर जेवताना शरयू चे पोट आणि मन दोन्हीही भरत होते.

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all