Login

दिशा:- भाग 31

Sharayu Convince Her Mother To Leave That Place
दिशा:- भाग 31

"आज आई तुझे काहीच ऐकणार नाही मी. खूप झाले खूप दिवस ऐकले आता ऐकण्याचे दिवस नाही तर करण्याचे दिवस आहेत." शरयुचा ठामपणा पाहून आई थोडीशी हबकली पण तिला आपण या विषयापासून परावृत्त करू या विचाराने तिने तिला इतर काही गोष्टी सांगायला सुरुवात केली.

शरयू ते ऐकत होती पण तिचे लक्ष मात्र केवळ आईलान कसे बाहेर काढायचे त्याच्यावरती होते. तिच्या दृष्टीने आज निर्णय ठरला होता आणि म्हणूनच ती आली होती.

" आई तुझी बॅग भरती आहेस का?"
"शरयू असं नाही होत!"
" सगळं होतं!"
" अग, तू तुझं घर सोडून एकदम कुठेतरी जाऊ शकतेस का?"
" हो मी तर इथे यायला तयार होते. तूच नाही म्हणलीs"
" तुझी आणि माझी गोष्ट वेगळी नाही का शरयू ?"
"काही वेगळे नाही आहे. मी तुझी मुलगी आणि तू माझी आई आहे"
" किती हट्ट करते?"
" केलाच पाहिजे नाहीतर आई ऐकणार नाही ना"
"शरयू मला काही वेळ दे".
" खूप वेळ दिला आहे आता नाही देऊ शकत."
" मी अशी लगेच नाही येऊ शकत".

" ते चालणार नाही आई. माझे आयुष्य आहे आणि मला तुझ्याबरोबर घालवायचं आहे".

"तुझं म्हणणं योग्य आहे बाळा, पण मलाच कळत नाही आहे की कसं करू?"

" आई सगळ्या गोष्टींना उत्तर असते आपण शोधायचा प्रयत्न केला पाहिजे".

"ते तर करते ग पण सापडत नाही आणि सोडवत सुद्धा नाही ना".

" काय सोडवत नाही आहे? हे घर, हे लोक हा तुझा कम्फर्ट झोन आहे का? त्यातनं बाहेर पड आई माझ्या भावना समज! मला किती महत्त्वाचं वाटत आहे तू माझ्याबरोबर मुंबईला येणे!"

"फक्त एवढेच नाही ग शरयू! तुझं लग्न आधीच माझ्यामुळे मोडलय आता परत कुठल्या मुलांनी जर माझ्यामुळे तुला सोडले तर?"

शरयुने क्षणभर तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली,
"आई तुला सांगायचं राहिलं "
"काय ग ?"
"आदित्यने मला मागणी घातली लग्नाची!"
" काय सांगतेस? केवढी महत्त्वाची बातमी आणि तू आता सांगतीयेस मला?"

" अगं तुला मुंबईला नेऊन सांगणार होते पण तू ऐकलं नाही ना म्हणून सांगते आहे."

"मला तर आदित्या पहिल्यापासूनच आवडला...खूप गुणी मुलगा आहे तो"

"आणि बघ ना, त्याला सगळं माहिती असून सुद्धा त्याने लग्नाची मागणी घातली. आता तर तुला काळजी नाही ना?"
" नाही ग अजिबात नाही" आई हसत म्हणाली.
"मग आपण आता बॅग भरायची?" शरयू च्या नजरेत चमक होती.
" भरुयात! पण इथलं कोण सांभाळेल?" आईच्या चेहऱ्यावर छोटीशी आठी होती.
" इथले पण नीट मार्गी लावू! तू काळजी करू नकोस. पण आता तू मुंबईला चल.. आजच जायचं आहे! आत्ता लगेच!"
आई शांत राहिली.

"एक दिवस तर थांबू दे शरयू..मग जाऊ आपण*
" बरं! एवढे ऐकते तुझे आई.. उद्या जाऊ."

"तू असे कर ना शरय.."
"काय?"
"आदित्यला पण इथेच बोलून घे ना, मग आपण सगळेच एकत्रच मुंबईला जाऊ."

" आदित्य ऑलरेडी पुण्यात आला आहे. तो चाकणला आहे.आज रात्री येईल आम्ही जवळपास कुठेतरी राहू आणि उद्या सकाळी परत इथे येऊ.
पण उद्या मात्र काही कारण चालणार नाही. उद्या संध्याकाळी आपण इथून तिघही जण मुंबईला जात आहोत."
"ठीक आहे.."
" आणि कायमचे बरं का!"

आईच्या कृतकृत्य डोळ्यात पाणी अवतरले. मुलगी मोठी झाली होती हे नक्की !
आनंद मानावा की दुःख व्यक्त करावं याच्या पलीकडे आईच्या भावना आत्ता होत्या.
एक मात्र नक्की!
या जागेतून बाहेर पडायला तिचे मन तयार होत होते.

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all