दिशा:- भाग 27

Sharayu Is Being Confused What Is Happening With Her.


दिशा:- भाग 27

शिवनेरी तासाभराने फूडमॉल ला थांबली तसे दोघेही खाली उतरले.
"काय खाणार शरयू तू?" आदित्य ने विचारले.
"नको, काही नको" शरयू ने उत्तर दिले.
"हे बघ आपल्याला मुंबईत पोचायला 11 तरी वाजणार आहेत. घरी जाऊन तेव्हा जेवणार आहेस का? त्यापेक्षा काही खाऊन घे आणि मग घरी गेल्यावर निवांत झोप" तिला समजावण्याच्या सुरात आदित्य बोलत होता.
त्याचे बोलणे तिला पटले तसे मान डोलवत तिने त्याला बर्गर आणि फ्राईज असे खाईन म्हणाली तसे तो ऑर्डर द्यायला मॅकडोनाल्ड मध्ये गेला.

तो जेव्हा ऑर्डर केलेलं मिळण्याची वाट बघत होता त्यावेळी कॉल वर कोणाशी तरी बोलत होता आणि लांबून शरयू त्याचे निरीक्षण करत होती.
पांढरा टी शर्ट, जिन्स आणि स्पोर्ट्स शूज असे साधेच कपडे घातलेला तो पण कोणाच्याही नजरेत भरेल असा दिसत होता. कॉल संपवत त्याने सहज तिच्याकडे पाहिले तर ती त्याच्याकडेच बघताना त्याला दिसली.
त्याने नजरेनेच काय असे विचारले तसे तिने पटकन नजर वळवली आणि मोबाईल हातात घेतला.

दोन मिनिटांत तो खायचे आणि पाण्याची बाटली घेऊन आला.
बस 20 मिनिटे थांबणार होती त्यामुळे दोघांनी उभ्या उभ्याच खाणे आटोपले.
ते झाल्यावर तो बाजूच्या स्टॉलवर गेला आणि त्याने 2 प्रकारच्या चिक्की घेतल्या.
"तुला चिक्की आवडते ?" शरयुने आश्चर्याने विचारले.
"मला नाही पण अदितीला फार आवडते. नाही नेली तर माझा जीव खाईल ती" बहिणीच्या आठवणीने त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

"ती तर समजूतदार वाटते.."

"तशी आहे पण तशी नाही पण"

"म्हणजे?"

"आहे समजूतदार पण माझ्यापेक्षा लहान आहे ना, त्यामुळे हट्टीपणा आहेच माझ्याजवळ. ती हट्ट नाही करणार तर अजून कोण करणार?" तो बोलत होता.

शरयू एकटी असल्याने तिला हा अनुभव नव्हता त्यामुळे ती फक्त ऐकत होती.

"शाळेत असताना तिला कायम दादागिरी करायची सवय होती आणि ती सुद्धा माझ्या जीवावर. कोणी काही बोलले की रडत येणार आणि मग मी ते सगळं निस्तरणार..त्यावर ही भाव खाणार.."
लहानपणीच्या आठवणीत गर्क होत तो बोलत होता. आज पहिल्यांदा तो स्वतःबद्दल काहीतरी तिच्याशी शेअर करत होता.

शिवनेरी निघायची वेळ होत असल्याने दोघेही सीटवर जाऊन बसले.
गाडी निघाली आणि आतले लाईट डिम झाले. खाऊन झाले होते, आत एसीचा गारवा त्यामुळे शरयू चा डोळा लागला आणि हलकेच तिची मान आदित्य च्या खांद्यावर टेकली तसे तिच्या जवळ सरकत त्याने तिला व्यवस्थित आधार दिला.

गाडीच्या प्रवासात किती वेळ गेला हे कळले नाही पण अचानक त्याचा आवाज आला "शरयू आपण पोचलोय दादर ला!उठतेस का?" तसे ती दचकून उठली. बघते तर ती पूर्णपणे त्याला रेलून झोपली होती. ती ओशाळली पण काहीच नाही असे दाखवत त्याने तिची सॅक घेत तो उभा राहिला. दोघेही खाली उतरले,
त्यांनी कॅब बुक केली. कॅब मध्ये पण दोघेही शांत होते. तिला घरी सोडून तो ही त्याच्या घराकडे गेला.

रात्री शरयू ला स्वप्न दिसत होते, एक मोठा डोंगर आहे आणि तिथल्या उंची वरून शरयू पडत आहे. त्याच वेळी एक हात येतोय आणि तिला वाचवतो आहे. ती मागे वळून बघत आहे पण तिला चेहरा दिसत नाही आहे. चेहरा फार पुसट आहे आणि त्या वातावरणात सगळे धूसर आहे.

या स्वप्न पाहण्यात तिचा खूप वेळ गेला. पहाटे उशिरा तिला झोप लागली. अलार्म वाजताच सकाळी नेहमीप्रमाणे आवरून ती ऑफिसमध्ये आली.
स्वागत करायला प्रीती होतीच. तिला पाहताच दोघी कॅफेटेरिया ला गेल्या. कॉफी आणि सँडविच खात शरयू ने तिला संपूर्ण पुणे ट्रिप, आदित्य ने आईला कसे मनवले आणि बाकीही सगळे इत्थंभूत सांगितले.

"किती फरक आहे ना सुशांत आणि आदित्य मध्ये?" ती बोलून गेली तसे शरयू ने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि बोलली " आहे ना पण मला आता कोणतही गुंतायचे नाही आहे".

तिचे फटकन उत्तर प्रीती ला अपेक्षित नव्हते.

"मला चालेल मात्र आदित्य!" ती सहेतुक शरयू ला म्हणाली तसे शरयू म्हणाली " गुड लक!" आणि तिथून बाहेर पडली. तिला तसे जाताना प्रीती बघतच राहिली.

थोड्या वेळाने शरयू काम करत असताना तिला मोठ्याने हसण्याचा आवाज आला तसे तिने वळून बघितले तर प्रीती आदित्य सोबत गप्पा मारत होती आणि मध्येच त्याला टाळी देत होती. का कोण जाणे पण तिला ते खटकले आणि ती उठून दुसरीकडे जाऊन बसली.

पण कामात तिचे आज मनच लागत नव्हते. तिची चिडचिड व्हायला लागली होती. राहून राहून ती आदित्य कडे काय करतो आहे म्हणून बघत होती. पण आज बराच वेळ आदित्य च्या टेबल जवळ प्रीती रेंगाळत होती.

आपली जवळची मैत्रीण प्रीती तिकडे काय करते आहे सारखे हा विचार करून तिला तिचा राग येत होता. स्वतःचं वागणं तिलाही कळत नव्हतं की आपल्याला काय होतं आहे.

दुपारच्या 4.30 वाजता ती एकटीच कॉफी प्यायला गेली. आपल्याच नादात ती बसली होती तेवढ्यात तिच्या समोर आदित्य येऊन बसला आणि त्याच्या हातात दोन कॉफी मग् होते.

त्याने स्माईल दिली पण शरयू ने फक्त त्याच्याकडे बघितले. तिच्या नजरेवरून काहीतरी बिनसले आहे हे त्याच्या लक्षात आलेच.
"शरयू अदिती ला मेल केला का?"
"हम्मम!"
"काही बोलणे झाले?"
"नाही!" ती तुटक वागतेय हे त्याला जाणवले.

"तुझी तब्येत ठीक नाही का?"

"का तुला का असे वाटले? का विचारतोस मला?"
तिचे चमत्कारिक वागणे आता मात्र आदित्य ला कोड्यात पडत होते तर मनातून आपण का असे वागतोय याबद्दल ती स्वतःला दोष देत होती. पण प्रयत्न करूनही तिला आज नॉर्मल वागत येत नव्हते.

प्रीती अचानक तिथे आली आणि शरयू कडे थोडं दुर्लक्ष करत आदित्य शी बोलायला लागली. आदित्य ही तिच्या बोलण्याला प्रतिसाद देत होता, शरयू आता मात्र चिडली आणि सरळ तिथून उठून निघून गेली.

"हिला काय झालंय प्रीती?" आदित्य ने शरयू तिथून गेल्यावर तिला विचारले.
"तिला आत्ता तर कळत नाही आहे, पण कळेल तिचे तिला हळूहळू."

"म्हणजे..?"
"म्हणजे तुला तरी कुठे काही कळतंय आदित्य..?"

"आता याचा अर्थ काय?"
" तो तुला शोधावा लागेल.."

"प्रीती तुला वेड लागलंय बहुतेक.."
"जे खरतर तुला लागायला हवे"

"तुझे बोलणें हे पूर्ण वेडेपणा सारखे आहे आणि त्यातून काही अर्थ निघत नाही आहे प्रीती.."

"मला बरेच अर्थ निर्माण होताना दिसत आहेत आदित्य..फक्त काही दिवस वाट बघावी लागणार"

त्याने क्षणभर तिच्याकडे रोखून पाहिले आणि तिला हात जोडत तो तिथून निघून गेला.

प्रीती हातातल्या मग सोबत खेळत गालातल्या गालात हसायला लागली.

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all