दिशा भाग 24

Sharayu Asks Help From Aaditya


दिशा:- भाग 24

कॉफी पिताना शरयू ने घड्याळाकडे बघितले तर 7.30 वाजले होते. शांतपणे आदित्य कॉफी पित होता मध्येच एक नजर शरयू कडे बघत होता.
तिची चलबिचल चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
शेवटी तो म्हणाला, "चलायचे का शरयू हॉटेल ला?" शांततेला छेद करत तो म्हणाला.
"हो चल!" म्हणत शरयू ने सॅक खांद्याला अडकवली आणि निघाली.

मुंबईचे दमट वातावरणाची सवय असलेल्या शरयू ला पुण्यातील शांत, गार वातावरण आवडलं होतं. इथल्या वातावरणात एक आल्हाद दायक पणा होता.
त्या गर्दीत सुद्धा तिला बरच थंडगार जाणवत होते.

शांतपणे आदित्य सोबत ती चालतच निघाली होती.
ती शांतताही आपल्यासोबत काही बोलते आहे असे तिला जाणवत होते. बाजूला चालणारा आदित्य अत्यंत जवाबदार व्यक्तीआहे हे तिला जाणवत होते. ज्याप्रकारे आज त्याने शालिनी आई lला आदर, आपलेपणा दिला होता आणि अत्यंत नम्रतेने तो वागला होता त्यामुळे तिला त्याच्याबद्दल एक वेगळा आदर निर्माण झाला होता.

10 मिनिटात ते एका हॉटेल जवळ पोचले, बाहेरून तर ते खूप छान वाटले तिला. समोर गार्डन रेस्टॉरंट होते जिथे छानशी मंद अशी लायटिंग होती.
रिसेप्शन वर बुकिंग दाखवत आदित्य ने दोन्ही रूम च्या किल्ल्या घेतल्या आणि लिफ्ट ने तो दोघे वर गेले. पहिल्या मजल्यावर शेजारीच दोन्ही रूम होत्या.
आदित्य ने एक किल्ली तिला दिली आणि म्हणाला, "शरयू आपण जेवायला भेटू यात. तुला हरकत नसेल तर 8.30 ला खाली भेटायचे का की तू रूम वर जेवण मागावशील?"

"अरे नको.. मी येईल खालीच! 8.30 ला भेटू" असे म्हणत तिने लॉक ओपन करून रूम मध्ये गेली.

आत येताच तिने बॅग बेड वर ठेवली आणि बाथरूम गाठले. छान शॉवर घेऊन फ्रेश होऊन सिम्पलसा एक ब्लू रंगाचा वन पीस तिने घातला. हाय पोनी घालून आणि हलकासा पफ चेहऱ्यावर लावून ती तयार झाली. तिला वाटले की आदित्य रूम चा दरवाजा वाजवेल आणि तिला बोलवेल पण असे काही झाले नाही.
शेवटी 8.35 वाजता ती स्वतः खाली आली.
आदित्य तिची वाट बघत तिथे सोफ्यावर बसला होता, ती दिसताच उठून उभा राहिला.

"शरयू बाहेर गार्डन ला बसायचे का?"

"हो !"

आदित्य चे सगळे वागणे, तिला विचारणे तो सभ्यपणा तिला एक नवा अनुभव देत होता. सुशांत असताना कायम तोच ठरवायचा आणि ती सुद्धा त्याप्रमाणे करायची.

दोघे एका टेबलवर येऊन बसले, बाजूला मंद उजेड ती गार हवा सगळे खूप आल्हाददायक वाटत होते.
त्याने तिच्याकडे मेनू कार्ड दिले. तिचे आवडीचे जे काही होते ते त्याला सुद्धा चालणार होते.
मंचाव सूप, चीझ-चेरी-पायनापल, पनीर कडाई, रोटी आणि बिर्याणी अशी ऑर्डर तिने दिली.

"छान ऑर्डर दिली" तो म्हणाला तसे ती हसली .
"आदित्य, तू याआधी पुण्याला आला आहेस का?"

"हो बरेचदा आलोय. छान वाटते मला पुण्याला यायला. खूप मोठे आहे पुणे. अफाट पसरले आहे. मी पुण्यात अनेक ठिकाणी हिंडलोय. पण खरं सांगू शरयू, आज ज्या ठिकाणी आपण गेलो ते सगळं मी पहिल्यांदाच बघितले आहे."

शरयू ने त्याच्याकडे मान वर करून फक्त बघितले. त्याच्या नजरेतील तो प्रामाणिक पणा तिला भावत होता.

"आदित्य थँक्स!"
"कशाबद्दल?"
"आज ज्या प्रकारे तू आईशी बोलत होतास, ज्या पद्धतीने तिला आज तू एक आदर दिलास त्यासाठी."

"मला तुला तेच सांगायचे होते शरयू, की तुझ्या आईला भेटल्यावर त्या घरात असे वाटलेच नाही की आपण त्या अशा ठिकाणी आहोत.
त्यांना तुझ्या सोबतच नाही तर इतर मुलींशीही खूप प्रेमाने वागताना मी बघितले. त्या मुलीसुद्धा आई सोबत आदराने बोलत होत्या हे त्यांच्या वागण्यातून जाणवत होते. त्या तिथे आहेत हे मनाला पटतच नाही"आदित्य अत्यंत शांतपणे पण मनापासून बोलत होता.

"तेच तर ना आदित्य! मला तिला तिथून बाहेर काढायचे आहे. मला नको की आता तिने पुढचे आयुष्य तिथे काढावे तेही मी असताना"

"खरं आहे"

"आदित्य मला माझ्या आईजवळ राहायचे आहे"

"हो नककीच राहा पण तू तिथे जाऊ नकोस शरयू. तू आईला घेऊन मुंबईला चल. मला नाही वाटत की तू त्या जागी पुन्हा जावे"

"आदित्य, जोवर माझी आई तिथे आहे मी तिला भेटायला जाणार तिथे"

शरयू त्या जागी जाणार. तिथल्या घाणेरड्या नजरा तिला बघणार त्या कल्पनेनेही आदित्य शहारला.

"शरयू.."

"आदित्य मला तुझी मदत हवी आहे" त्याला थांबवत ती म्हणाली.

"मदत? ती कशी?"

"मी आईला खूप मनवले पण ती माझ्याकडे यायला तयार नाही आहे. तिला वाटते की तिच्यामुळे माझे आयुष्य खराब होईल शिवाय तिला या सगळ्या मुलींची काळजी आहे..तिचे म्हणणे हे आहे की मी आले तर सगळे लोक माझ्याशी नीट नाही वागणार. त्यातून सुशांत तसे वागला त्यामुळे तर तिला ते नक्की पटले आहे"

"हममं.."

"मला हवे आहे आदित्य की तू तिला माझ्या सोबत येण्यासाठी मनवावेस.."

"शरयू, आज तर मी त्यांना भेटलो आहे आणि मी जे एकदम कसे करू शकेन..?"

"नक्की करू शकशील..एक से भले दो.."

"हो पण त्या माझे ऐकतील ?"

"कदाचित.."

त्याने क्षणभर विचार केला आणि म्हणाला, "डन! कोशिश करने में क्या है ."

"ज्जे बात.." ती त्याला टाळी देत म्हणाली.

तोपर्यंत जेवण आले होते. दोघेही जेवणावर अक्षरशः तुटून पडले. जेवण झाले आणि तो तिला म्हणाला, "चल माझ्याबरोबर.."

ते दोघे चालत चालत हॉटेल पासून थोडेसे लांब आले आणि तो एका ठिकाणी थांबला. ते पानाचे एक पॉश शॉप होते.

"वाह..पान...! मला खूप आवडते" शरयू एका उत्साहात म्हणाली.
"हे माझे आवडते पान शॉप आहे. मी पुण्यात असलो की इथे येऊन हमखास पान खातो."

तो तिला शॉपच्या आत घेऊन गेला. शॉप चक्क एअर कंडीशन होते. पानाच्या असंख्य व्हरायटीज तिथे लावल्या होत्या. त्याने तिथल्या माणसाला एक फायर पान सांगितले.
"हे काय असते..?" शरयू ने भाभडे पणाने विचारलें.
"बघ गंमत.." तो हसत म्हणाला.
एक अक्षरशः जळत असलेले पान त्याला मिळाले आणि त्याने ते सहज तोंडात टाकले.
तो हे करत असताना तिचा चेहरा मात्र किंचित धास्तावलेला होता. त्याने हसत अजून एक पान द्यायला सांगितले.
जसे अजून एक फायर पान आले तसे तो शरयू ल म्हणाला, "उघड तोंड.."
ती किंचाळत नाही म्हणाली.
तसे तो मोठयाने हसला आणि म्हणाला, "घाबरु नकोस..मी आहे.."
हो नाही करता करता तिने पण भित भित फायर पान तोंडात टाकले आणि क्षणात ती पान रिलॅक्स होऊन खायला लागली.

"मग, जळले का तोंड..?" त्याने विचारले.

""अजिबात नाही आणि एक खात्री नक्की झाली "

"कसली.."

"हेच की ...जो मुलगा 2 मिनिटात मला फायर पान खायला मनवू शकतो तो उद्याच्या अख्या दिवसांत माझ्या आईला नक्की मनवू शकतो"

ती त्याच्याकडे बघत हसत हसत तिथून निघाली तरी तो तिच्या गुगली ने तिथेच क्लीन बोल्ड झाल्या सारखा उभा होता!

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all