दिशा भाग 23

Sharayu Take Aaditya To Meet Her Shaalini Aai


दिशा:- भाग 23

आदित्य सोबत बाईक राईड तिला आवडली होती. पहिल्या वेळी महाबळेश्वरला लोकेशन चेक करायला गेलेले होते आणि आता त्या NGOऑफिसला जाण्यासाठी पुन्हा एकत्र चालले होते.

तिथून बाहेर पडल्यावर शरयू मनाने खूप शांत फील करत होती. आदित्य च्या बाईकवर मागे बसून शरयू त्या मुंबईच्या गर्दीतून एक वेगळ्या प्रवासाला निघाली होती. शरयू आपल्या सोबत आपल्या बाईकवर आहे यातच आदित्य खूष होता, तिचे त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसणे त्याला आवडत होते. तिला सोडायला तिच्या सोसायटीच्या गेट पर्यंत आला तेव्हा तिने त्याला घरी चल असे ती म्हणाली पण त्याने कुठे मित्राकडे जायचे म्हणत नकार दिला.

ती घरी आली तीच एकदम रिलॅक्स मूड मध्ये.
आल्याबरोबर तिने आईला "काहीतरी मस्त खायला कर" अशी लाडिक ऑर्डर सोडली आणि रूम मध्ये गेली.
फ्रेश होऊन आरशासमोर आली आणि स्वतःला बघितले तर तिला तीच आज वेगळी जाणवत होती. चेहऱ्यावरची मरगळ कुठेतरी लांब पळून गेली होती त्याजागी नविन उत्साही शरयू तिला समोर जाणवत होती. तिच्या चेहऱ्यावर असलेले वेगळेच तेज तिला जाणवले.

आज तिला बाईक वर घडलेला किस्सा आठवला. ती बसत असताना पडत होती आणि पटकन आदित्य ने तिला सावरले होते. ते आठवले तसे ती खुदकन गालातल्या गालात हसली.

आवरून बाहेर आली तर टेबलवर आईने मस्त तिच्या आवडीचे चिझटोस्ट सँडविच आणि कॉफी बनवून ठेवली होती.

तिघी गप्पा मारत त्यांचे एव्हनिंग स्नॅक्स एन्जॉय करत होत्या. शरयू ने त्या दोघींना ऑफिसमध्ये काय बोलणे झाले आणि ती पुण्याला जाणार सोबत आदित्यही आहे हेही सांगितले.

रविवार उजाडला. सकाळी सकाळीच प्रीती दारासमोर उभी राहिली.
तसे आत्या म्हणाली " तू इथेच शिफ्ट हो कायमची...घरी नाही राहवत तर सामान घेऊन इथेच ये".

तसे आत्याला वाकुल्या करून दाखवत प्रीती हसली
रविवार त्या चौघींनी थोडे हिंडून फिरून, गमतीजमतीत घालवला.

सोमवारी ऑफिसमध्ये गेल्यावर कळले की आदित्य एका असाईनमेंट वर 3 दिवसांसाठी बाहेरगावी गेलाय. कामाचे लोड होतेच त्यामुळे गुरुवार कधी उजाडला हे कळलेच नाही.

गुरुवारी मात्र न राहवून शरयू ने आदित्य ला कॉल केलाच.
"हाय आदित्य!"
"बोल शरयू"
"तू कधी येणार आहेस? म्हणजे उद्या जायचंय ना आपल्याला"

"हो, मी इंटरसिटी चे बुकिंग केले आहे आधीच. मी आज रात्री येईल आणि उद्या सकाळी 6.30 वाजता आपण दादर स्टेशन ला भेटू "

"चालेल " म्हणत तिने कॉल कट केला.

सकाळी सव्वा सहा वाजता ती बॅग घेऊन दादर स्टेशन ला पोहचली. तिला तिकीट तर मेसेज केले होते पण आदित्य दिसेपर्यंत मन बेचैन होते.

गाडीची अनाउन्समेंट झाली. पुढच्या 10 मिनिटात गाडी येत होती आणि अजूनही आदित्य चा पत्ता नव्हता.

आता मात्र ती हवालदिल झाली. तिने फोन लावला तर फोन नॉट रीचेबल होता.
हा नक्की उठला नाही आहे अजून आणि ट्रेन मिस करतो आहे हे तिला एव्हाना कळून चुकले.

गाडी येताना दिसली आणि तिने हताशपणे तिची बॅग उचलली. तिला एकटीलाच प्रवासी करायला लागणार होता. गाडी प्लॅटफॉर्म वर शिरली आणि तेवढ्यात आदित्य सुद्धा त्याची बॅग घेऊन समोरून येताना दिसला.

"स्टुपिड" मनातल्या मनात ती म्हणाली.
"गुड मॉर्निंग.." त्याने तिला आल्या आल्या ग्रिट केले.

"हाय! मला वाटले येतो की नाही"
"अरे म्हणजे काय? तुला सांगीतले आहे तर मी येणारच!"

समोर थांबलेल्या डब्यात ते दोघे चढले.
गाडी फुल होती पण यांचे रिझर्व्हेशन होते त्यामुळे काही अडचण नाही आली.

त्यांच्या गप्पा सोबतीला खाणे आणि घाटात दारात उभे राहणे असा प्रवास सुरू होता.

10 वाजता पुण्याला गाडी पोचताच तिने कॅब बुक केली. यावेळी कुठे जायचे कसे ते तिला पूर्ण माहीत होते त्यामुळे तिला नवीन काही जाणवले नाही. पण आदित्य मात्र थोडा भांबावला होता.

कॅब थांबली तसे त्यातून उतरत तिने आदित्य ला सांगितले की आपल्याला पुढे थोडे चालत जावे लागेल.
तो एरिया,तिथले आजूबाजूचे वातावरण आदित्य साठी फार नवखे होते. अश्या ठिकाणी तो पहिल्यांदा आला होता तेही शरयू सोबत!
तिथल्या पुरुषांच्या शरयू कडे बघत असलेल्या नजरा त्याला मनातून बेचैन करत होत्या. त्याने पुढे होत शरयू चा हात धरला जणू तो सगळ्यांना सांगत होता आजूबाजूच्या लोकांना की, मी आहे तिच्या सोबत.

शरयू मात्र आपल्या विचारात चालत होती,आदित्य ने हात पकडला तेव्हा तिला थोडे वेगळे जाणवले पण त्याचा उद्देश लक्षात आला त्यामुळे हलकेच हसली.

शरयू ला दारात बघून तिची ती छोटी मानस बहीण आनंदाने शालिनी आईच्या नावाने आवाज देत ओरडलीच आणि पुढे झाली. तिने शरयू ची बॅग घ्यायला हात पुढे केला पण तिच्या मागे असलेल्या आदित्य ला बघून जागीच थांबली.

शालिनी आई लगबगीने आतून आली आणि शरयू ला बघून आनंदली. तिला जवळ घेत ती म्हणाली,"आलीस बाळा..ये बस.." तेवढ्यात तिच्या सोबतच्या आदित्य कडे ती दोन क्षण बघत राहिली.

"आई हा आदित्य, माझा मित्र" शरयू ने ओळख करून दिली.

"आदित्य, ही माझी आई" म्हणाली तसे आदित्य ने पुढे होत त्यांना नमस्कार केला.

शालिनी आई भारावली, तिला हे सगळे विसरून जमाना झाला होता.
"या ना आत या " म्हणत तिने दोघांनाही आत घेतले तोवर त्याच्यासाठी पाणी घेऊन ती छोटी पुढे आलीच.

"कशी आहेस?" तिला एक ड्रेस ची बॅग हाती देत शरयू ने विचारले. आपल्यासाठी ड्रेस आणला आहे हे बघून छोटीच्या डोळ्यात पाणी तरळले तसे शरयूने तिच्या खांद्यावर हात ठेवला.

शालिनी आईने आदित्य ची चौकशी केली, त्याच्याशी ती खूप आपुलकीने ती बोलत होती. त्या दोघांना खायला आणले त्यांचे आदरातिथ्य सुरू होतेच शरयू पण महाबळेश्वर ट्रिप बद्दल आईला सांगत होती. तीही कौतुकाने ऐकत होती, आदित्य हे सगळे बघून खूप अचंभित झाला होता. शालिनी आईचे वागणे,बोलणे, तिचे ते रूप बघून ती इथे कशी हा प्रश्न त्यालाही पडलाच होता.

ती जागा नक्कीच तिथे येण्या सारखी किंवा राहण्या सारखी नव्हती. अश्या ठिकाणी आदित्य कधीच आला नसता. हे फक्त शरयू होती जिच्यासाठी तो इथपर्यंत यायला तयार झाला होता.

शालिनी आई ज्याप्रकारे तिथल्या इतरही मुलींशी वागत होती यावरून ती खूप चांगली आहे हे त्याला जाणवलेच होते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या मुलीचा मित्र म्हणून कसलेही लेबल तिच्या चेहऱ्यावर त्याला जाणवले नाही हे फार समाधान कारक होते.
एकंदरीत त्याचे शालिनी आईबद्दल खूप चांगले मत निर्माण झाले होते.

गमती जमती सांगत गप्पा मारत वेळ कसा निघून जात होता हे कोणालाच काळात नव्हते.एव्हाना आदित्य ही त्यांच्याशी मोकळा वागायला लागला होता. सगळे वातावरण बदलून गेले होते,प्रत्येक जण एकमेकांशी आपुलकीने वागत होते.

शालिनी आईने मसालेभात, वांग्याची मसाला भाजी, पोळी, मिक्स कोशिंबीर असा साधाच पण छान स्वंयपाक केला. आदित्य आणि शरयू ला आग्रहाने जेवायला घातले.
आदित्य ने आपण कधी इथे जेवण करू असा विचार नव्हता केला पण शरयू ला आनंदात बघून आदित्य सुखावला होता.

आदित्य चांगला मुलगा आहे हे शालिनी आईच्या अनुभवी नजरेने ओळखले होते. सुशांत बद्दल तिला सीमा आईकडून कळले होते त्यामुळे ती काळजीत होती पण आता शरयू ला हसताना बघून तीही निश्चिंत झाली होती.

संध्याकाळ झाली तसे आईने विचारले"शरयू तुझ्या जाण्याचे काय?"

"मी कुठे जायला आलेय? मी दोन दिवस सुटी घेतली आहे आणि इथेच राहणार आहे"

तसे मात्र शालिनी आईचे हावभाव बदलले."शरयू तू इथे राहणार नाही आहेस! तुझी ही जागा नाही! ह्या मुलींचा नाईलाज आहे की त्यांना घर नाही पण तुझे तसे नाही आहे"

"हे माझ्या आईचे घर आहे, त्यामुळे मी इथेच राहणार" हट्टाने शरयु बोलली.

"नसते हट्ट नको आहेत मला बेटा, समजून घे जरा. इथले लोक आधीच तुझ्याकडे कसे बघतात मला माहित आहे. असल्या लोकांची नजर मला तुझ्यावर नको आहे" म्हणत तिने हेतुपुरस्पर आदित्य कडे पाहिले.

त्याला लक्षात आले की शालिनी आई आपल्याला काही सुचवते आहे तसे तो पटकन म्हणाला " शरयू आईचे ऐक ना! हे बघ आपण हॉटेल ला राहू जवळच कुठेतरी आणि सकाळी लगेच येऊ इथे. फक्त झोपायचा तर प्रश्न आहे ना"

शरयू ने एकदा त्याच्याकडे, एकदा आईकडे पाहिले. खट्टू मनाने का होईना पण आदित्य च्या बोलण्यावर मान डोलावली तसे हायसे वाटून शालिनी आईने नजरेनेच आदित्य lला "थँक्स" म्हंटले.

अंधार व्हायला लागला होता आणि तिथली वर्दळ ही वाढली होती. तसे शालिनी आईचा तात्पुरता निरोप घेत आदित्य सोबत शरयू तिथून बाहेर पडली.

जाणाऱ्या त्या दोघांना बघत शालिनी आईचे डोळे पाणावलेच, पोटाची मुलगी पण तिला आपण राहायला नाही म्हणालो याचे वाईट एक आईला वाटणारच होते.

आदित्य ने शरयू ला सोबत घेऊन एका जवळच्या कॅफे मध्ये बसला. शरयू शांत होती. त्यानेच दोन कॉफी ऑर्डर केल्या. शरयू फक्त बघत होती की हा मोबाईल वर काहीतरी करतोय. कॉफी आली तोवर ह्याचे काम झाले आहे असे सभाव चेहऱ्यावर तिला दिसले.

"डन!" तो बोलला.
"काय झाले?"
"आपले हॉटेल बुकिंग !"
"म्हणजे तू हे करत होतास?"
"दुसरे काय करणार? आपल्यासाठी जवळच एका हॉटेलला दोन रूम बुक केल्यात. तू सोबत आहे म्हणल्यावर मला नीट शोधावे लागणारच ना" तो तिच्याकडे बघत बोलत होता.

त्याच्या नजरेतली जवाबदरीची भावना, तो आपुलकीचा भाव तिला खूप वेगळा जाणवला .आज ज्या पद्धतीने तो शालिनी आईशी वागला तेही तिला खूप भावले होते. आपण ह्याला आईबद्दल सांगून चांगलेच केले हे तिला प्रकर्षाने जवळ तसे ती हसली.

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all