दिशा भाग 22

Sharayu Met Aditi For NGO Work
दिशा:- भाग 22

शरयू ने उत्साहात उभे राहत आदित्य चा हात एकदम पकडला आणि म्हणाली "खरंच असे काही करता येईल?"

तिच्या अश्या स्पर्शाने आदित्य थोडासा शहारला. काही क्षण त्या गोड अनुभवत तो तसाच उभा राहिला.

अजूनही आपण त्याचा हात पकडून आहोत हे शरयु च्या लक्षात आले नव्हते.

"आदित्य बोल ना! कधी भेटायचे तुझ्या बहिणीला? ती आपल्याला मदत करेल का?" ती पाठोपाठ प्रश्न विचारत होती.

आदित्य ने तिच्या आणि आपल्या हाताकडे पाहिले तेव्हा तिला ओशाळल्यासारखे झाले आणि तिने हळूच "सॉरी" म्हणत त्याचा हात सोडला.

काही झाले नाही असे दाखवत नेहमीसारखा स्माईल करत आदित्य म्हणाला " शरयू उद्या शनिवार आहे, आपल्याला हाफ डे काढता आला तर उद्या अदितीला आपण भेटुयात. शक्य झाल्यास तिच्या ऑफिसमध्ये जाऊ, चालेल का?"

"अदिती?" शरयू ने प्रश्नर्थक विचारले तर तो म्हणाला,
"माझी बहिण अदिती!"

तसे तिने मोकळी स्माईल दिली.

शरयू ने आनंदाने त्याला अंगठा दाखवत "येस" असे म्हणले आणि ती प्रीतीच्या दिशेने धावतच गेली.
जाऊन तिने प्रीतीला घट्ट मिठी मारली.
प्रीती ने काय झाले विचारले तेव्हा तिने आदित्य ने काय सुचवले आणि उद्याच्या भेटीबद्दल काय सांगितले हे ऐकल्यानंतर ती सुद्धा खूष झाली.

दुसरीकडे तिने तिच्या एच आर सोबत बोलून पुढील आठवड्यातील शुक्रवार आणि शनिवार अशी सुटी मंजूर करवून घेतली.

संध्याकाळी प्रीती आपल्या घरी गेली आणि शरयू तिच्या घरी. जाताना तिच्या मनात होतेच की शालिनी आईला काही सांगायचे नाही तर सरळ जाऊन धडकायचे.

घरी येताच ती आनंदात आहे हे आई आणि आत्या ला जाणवलेच. शरयूने पर्स सोफ्यावर फेकली आणि आईला गरगर फिरवत लहान मुलीसारखं सगळं सांगितलं जे आदित्य बोलला.

आईने तिला हसत प्रोत्साहन दिले. तिच्या तोंडून आदित्य हे नाव ऐकून आत्या मात्र सुखावली.

रात्री आदित्यच्या मोबाईल ची मेसेज ट्यून वाजली त्याने पाहिले तर शरयू चा "हाय" असा मेसेज होता.
"बोल शरयू" त्याने रिप्लाय दिला.
"सॉरी उशिरा मेसेज करतेय"
"वेलकम मॅडम ?"
"अदिती शी बोललास का?"
"नाही ती अजून आली नाही, बाहेरगावी गेलीय"

"मग आता कसे होईल? उद्याचा दिवस वाया जाईल का?" तिच्या मेसेज मध्ये काळजी वाटत होती.

"ती येईल सकाळपर्यंत, बोलेन मी तिच्याशी आणि उद्याचे भेटायचे नक्की करेल. काळजी करू नकोस" आदित्य ने रिप्लाय केला.
"थँक्स आदित्य" असा रिप्लाय करत ती निश्चिंत झाली.

आज सकाळीच महाबळेश्र्वर पासून मुंबई पर्यंतचा प्रवास करून पूर्ण दिवस तिने ऑफिस केले होते.
अती दमल्याने तिला लगेच झोप लागली.

सकाळी लवकर आवरून ती बाहेर आली तर अजून आत्या नि आई उठल्याच नव्हत्या. आज कधी नव्हे तर तिने तिघींसाठी कॉफी बनवली आणि टेबला lवर मग ठेवत आई आणि आत्याला हाक दिली.

शरयू ला कॉफी चे मग् आणलेले बघत दोघीही आश्चर्याने बघू लागल्या आणि कौतुकाने हसल्या.

त्यांना कॉफी दिली. त्यांनी कॉफी टेस्ट केल्यावर लगेच तिने विचारले "कशी झालीय कॉफी?"

"तशी थोडी स्ट्रॉंग झालीय पण चालेल मला. कधी नव्हे ते तू बनवली आहेस कॉफी" तिला चिडवायला आत्या म्हणाली पण शरयू चिडली नाही.

आई मात्र हसत म्हणाली,"छान झाली आहे" तसे आनंदाने हात हवेत फिरवत शरयू तिचे आवरायला गेली.

लवकर आवरून ऑफिसमध्ये आली. अजून प्रीती आली नव्हती आणि आदित्य दिसत नव्हता. तिने काम सुरू केले पण तिचे आज कामात सुद्धा मन लागत नव्हते.

कधी एकदा 2 वाजतात आणि आदित्य सोबत त्याच्या बहिणीला भेटायला जातेय असे तिला झाले होते.

आदित्य मात्र आज प्रचंड बिझी होता. त्याला जेवायलाही आज वेळ मिळाला नव्हता.तो दिसायचा आणि गायब व्हायचा. तिचे लक्ष सारखे घड्याळाकडे होते पण घड्याळ फार हळू हळू फिरत होते.

बरोबर 2 वाजता तो तिच्या डेस्क जवळ आला. ती तर आधीच सगळं आवरून बसली होती. तो आला तसे प्रीती ला बाय करत दोघे निघाले.

"शरयू तुला बाईक वर यायला काही हरकत नाही ना?"
"नाही. पण आधी आपल्याला एक ठिकाणी जायचे आहे"

"कुठे?"

ती काही न बोलता त्याला हाताला धरत कॅफेटेरिया मध्ये आली. कॉफी आणि सँडविच तिने त्याच्यासाठी ऑर्डर केले आणि म्हणाली "लंच नाही केलास निदान हे तरी खाऊन घे"

तिचा तो हुकमी स्वर त्याला मनापासून आवडला. काही न बोलता त्याने ते खाल्ले.

नंतर ते बाईक वरून त्या NGO ऑफिस कडे निघाले.
शरयू आदित्य सोबत त्या ऑफिसमध्ये आली.

ऑफिस खूप नीटनेटके होते. तो तिला घेऊन त्यातल्या एका केबिन कडे गेला.
आत एक मुलगी होती. तो एकदम आत शिरला आणि म्हणाला "अदिती, ही माझी फ्रेन्ड शरयू!" त्याने अदिती च्या केबिन मध्ये येऊन ओळख करून दिली.
"हाय अदिती!"
"हाय शरयू!"
दोघेही समोरच्या खुर्चीवर बसले. अदितीने त्यांच्यासाठी कॉफी सांगितली.

थोड्याशा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नंतर अदिती म्हणाली, "बोल शरयू तुझे काहीतरी काम होते ना?"

शरयू ने तिची शालिनी आई, ते ठिकाण तिथल्या मुली शालिनी आईची जवाबदारी असे सगळेच अदिती ला नीट सांगितले. अदिती सुद्धा नीट मन लावून ऐकत होती,काही गोष्टी नोट करून घेत होती.

अदिती ने शरयू ला विचारले " तुला काय अपेक्षित आहे?"

"मला हवे आहे की तिथल्या मुलींना जर त्यांचे आयुष्य नव्याने सुरू कारायचे असेल तर तुमच्याकडून काही मदत होऊ शकेल का? आणि असे होणार असेल तर आपल्याला काय कारावे लागेल?"

"तुला त्यांचे पुनर्वसन कारायचे आहे असेच म्हणायचे आहे ना?"

"हो असेच काही! जेणेकरून माझी आई मुक्त होईल आणि माझ्यासोबत येऊ शकेल. मला तिथल्या मुलींसाठी काही करायला नक्की आवडेल. तुमची NGO काही मदत करू शकेल का?"

"शरयू अशा अनेक कामांना आमच्या लोकांनी पुढाकार घेऊन मदत केली आहे.आपल्याला आधी तिथे किती मुली आहेत, त्यांची वय काय काय आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांची ईच्छा काय आहे हे बघावे लागेल. तो सगळा रिपोर्ट मला हवा आहे जो मी इथे सादर करेल आणि त्यावरून मला काय करता येईल याची कल्पना येईल" अदिती म्हणाली.

शरयू ने काही क्षण विचार केला आणि म्हणाली " मी पुढच्या आठवड्यात तिथे जाणार आहे. त्यानंतर मी तुला कळवू शकेल."

"ठीक आहे मी तुला तिथे जाऊन काय माहिती काढायची ते मेल करून कळवते. सगळे नीट होऊ देत म्हणजे मला ही सोपे जाईल पुढे काम करायला" अदिती म्हणाली.

त्या आश्वासक संवादाने शरयू खूप समाधानी झाली. तिने मनापासून अदिती ला "थँक्स!" असे म्हणत तिला हग करत ऑफिस मधून बाहेर पडली.

बाहेर पडल्या वर ती म्हणाली, "आदित्य तुझ्यामुळे मला हा मार्ग सुचला! थँक्स अगदी मनापासून" तसे तो हसला.

"शरयू एक विचारू?"

" विचार ना आदित्य"

"तुला हरकत नसेल तर मी आले तर चालेल का तुझ्यासोबत?"

"कुठे?" न कळून तिने विचारले.

"तुझ्या शालिनी आईकडे!"

तसे चालत चालत थांबत आश्चर्याने ती त्याच्याकडे बघतच राहिली.

"अशी काय बघतेस..? " त्याने विचारले.

"तुला खरचं यायचे आहे?"

"म्हणजे काय..मी मनापासून म्हणत आहे."

"तू आलास तर शालिनी आई ला खूप आवडेल"

"आणि तुला? त्याने सहज विचारले.

तसे एकदम हरखून ती त्याच्याकडे पहात राहिली.

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all