दिशा भाग 19

Sharayu Got Panicked When Aaditya Was Not Opening his Room's Door
दिशा:- भाग 19

ब्लॅक कॉफीचे घोट तर घशाखाली उतरत होते पण ती पिल्याचे समाधान मात्र मिळत नव्हते. तिने परत मोबाईल हातात घेतला आणि त्याला कॉल केला पण समोरून कॉल उचलला नाही गेला.
शेवटी न राहवून ती आदित्य च्या रूम च्या दिशेने गेली. तिने दरवाजा वाजवला पण समोरून काहीच रिस्पॉन्स आला नाही. तिने पुन्हा दोन, तीन वेळा दार वाजवले पण आतून काहीच हालचाल जाणवली नाही तसे वैतागत ती पुन्हा खाली लॉन च्या दिशेने आली.

आपल्याच नादात चालत चालत ती पुढे येत होती. होटेल च्या गेट पाशी ती येऊन उभी राहिली. समोर रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या तिला काही टवाळ मुले आणि त्यांचा गोंधळ ऐकायला येत होता.

तिथे उभे असताना अचानक पायाला काहीतरी गार असा वळवळणारा लिबलिबित स्पर्श झाला तशी दचकून तिने खाली बघितले आणि मोठ्याने किंचाळली. ती इतक्या जोरात किंचाळत होती की तिचा आवाज ऐकून पटापट काही रूमस चे लाईट लागले आणि हॉटेल स्टाफ ची काही लोक सुद्धा धावत बाहेर आली.

अनेक लोक धावत आले त्यात प्रीती सुद्धा होती.. तिने सुद्धा तिचा आवाज ऐकला होता आणि धावत खाली आली होती.
तिला भितीपोटी बोलताही येत नव्हते, इतक्या थंडीतही तिला दरदरून घाम सुटका होता.
प्रीती ने तिला दंडाला धरत हलवले आणि विचारले "काय झालं शरयू?"
तसे ती आता मोठ्याने पुन्हा ओरडली , "साप!"
तोवर एकजण तिच्यासाठी पाणी घेऊन आला, पाण्याचे दोन घोट पीत तिला खुर्चीवर बसवले.
"नक्की काय झालंय?" प्रितीने विचारले
"एक मोठा साप इथे माझ्या पायावरून गेला."
"कुठल्या दिशेने?" कोणीतरी विचारले तसे तिने लॉन कडे बोट दाखवले. हॉटेल स्टाफ ची 2 लोक टॉर्च घेऊन शोधायला गेली तर काही स्थानिक लोक साप आहे कळल्यावर आपल्या रूम कडे परतली.

थोड्या वेळाने ती पण शांत झाली. या इतक्या गोंधळातसुद्धा आदित्य काही तिला कुठे दिसला नाही. प्रीती तिच्या बाजूलाच बसली होती.

"प्रीती आदित्य नाही दिसला कुठे!"
"का? त्याने यायला हवे होते का?"
"नाही तसे नाही, म्हणजे हो! मला म्हणायचे तो आज दिवसभर बोलला नाही माझ्यासोबत"
"का बोलावे त्याने?" तू त्याला कानाखाली लगावून दिलीस आणि वर अपेक्षा करतेस की त्याने बोलावे?"

"अग मी कॉल केला त्याला पण त्याने नाही उचलला"

"तुला बोलायचे आहे का त्याच्याशी?"

"हो".
"सकाळी बोलूयात!चल आता झोपायला"

"नाही मला आताच बोलायचे आहे" लहान मुलीसारखी ती हट्टून बसली. तिला मनातून प्रचंड गिल्ट वाटत होते, आजचे आदित्य शी न बोलणे त्याचे तिला हात जोडून टाळणे तिला खूप अस्वस्थ करत होते.

प्रीती ने सुदधा त्याला कॉल केला पण समोरून काहीच रिस्पॉन्स आला नाही तशा त्या दोघी त्याच्या रूम कडे गेल्या.

प्रीती ने दरवाजा वाजवला पण कोणी उघडले नाही, आवाज दिले तरीही काही उत्तर नाही. शेवटी दोघीही घाबरल्या, शरयू धावत रिसेप्शन ला गेली आणि तिथून त्या रूम ची दुसरी किल्ली घेऊन आली आणि दरवाजा उघडला.

आतले दृश्य बघून दोघीही हादरल्या.

आदित्य जमिनीवर अस्ताव्यस्त उपडा पडला होता, त्याच्या कापळातून रक्त वाहिलेले दिसत होते. प्रीती त्याला उठवायला गेली तर तो बेशुद्ध आहे हे जाणवले तसे दोघींनी स्टाफ च्या मदतीने एक हॉस्पिटल ला कॉल करून अंब्युलन्स मागवली.

शरयू, प्रीती अम्ब्युलन्स मध्ये बसले आणि त्याला आत झोपवले होते. युनिट चे काही लोक मागून इनोव्हा ने सोबत निघाले.

हॉस्पिटलमध्ये गेल्यावर लगेच डॉक्टर ने त्याला तपासले, जखम साफ करून बँडेज बांधले आणि बाहेर आले.
"डॉक्टर काय झालंय त्याला?" शरयू नेपुढे होत विचारले.

"त्यांनी भरपूर ड्रिंक्स घेतलेत आणि खाली पडले आहेत. पडताना कशाचे तरी टोक कपाळाला लागून जखम झाली आहे त्यामुळे बेशुद्ध आहेत. काळजी करण्यासारखे काही नाहीय सकाळपर्यंत येतील शुद्धीवर"

सगळे ठीक आहे कळल्यावर ऑफिस स्टाफ ची बाकी लोक गेली. आता प्रीती आणि शरयू तेवढ्या तिथेच थांबल्या.

त्याला एक प्रायव्हेट रूम मिळाली होती. त्या रूम मधील सोफ्यावर त्या दोघी तशाच बसून राहिल्या.
रात्री दोघींना कधी झोप लागली हे त्यांनाच कळले नाही.

सकाळ झाली पण औषधाच्या गुंगी ने तो अजूनही झोपेत होता तशी तिला काळजी वाटायला लागली. तिने नर्स ला बोलावले, नर्स ने त्याला तपासले आणि सगळं ठीक आहे उठतील म्हणत ती निघून गेली.

"प्रीती तू जा हॉटेल ला, मी थांबते इथे थोडा वेळ. हा शुद्धीवर आला की येईल मी " शरयू म्हणाली तसे प्रीती हॉटेलमध्ये परतली.

त्याच्या उशाशी बसलेली ती दमल्याने तिला डोळा लागला. आदित्य शुद्धीवर आला आणि आजूबाजूला बघतो तर त्याला काहीच कळत नव्हते. शरयू त्याच्या जवळ बसलेली त्याला दिसली तसे तो उठायला गेला. तसा त्याचा धक्का लागून शरयू जागी झाली.

"अरे...मी इथे?का आणले मला इथे?"

"त्याचे काय ना मला तुझी परतफेड करायची होती ना म्हणून मीच आणले तुला इथे" त्याला चिडवत हसत ती बोलली.

"म्हणजे?" न कळून तो बोलला.

"म्हणजे असे की मला आज कळले की तू ड्रिंक करतोस"

"हो करतो... कधीतरी" तो हळूच म्हणाला.

"का?"

"मला बेचैन झाले की घेतो, मनातील विचार बंद करायला"

"असे काय विचार करत होतास तू?"

"जाऊ दे तुला नाही कळणार!"

"का नाही कळणार?"

आता मात्र गंभीर चेहरा करत तो बोलला " रात्री बेरात्रीं कोणाची मदत केल्याबद्दल मार खावा लागला की असे होते"

यावर ती काहीच बोलली नाही, "काळजी घे..." एवढेच बोलून ती निघाली. येताना तिच्या डोळ्यात पाणी होते.

हॉटेलमध्ये येऊन तिने स्वतःचे आवरले आणि शूटिंग चे लोकेशन ठरले होते तिथे पोचली. ती येईस्तोवर सेटअप तयार झालेच होते. आवश्यक त्या सूचना देऊन तिने काम सुरू केले.

आज तिचे कामात अजिबात लक्ष नव्हते. बऱ्याच चुका तिच्या हातून घडत होत्या.
शेवटी तिथून ती निघाली आणि मार्केट मध्ये जाऊन शूटिंग साठी हवे असलेले काही सामान आणायला ती एका टीम मेंबर सोबत गेली.

थोड्या वेळात परत येऊन बघते तर डोक्याला बेंडेज बांधलेला आदित्य तिला पाठमोरा उभा दिसला.

"आदित्य, तू इथे काय करतो आहेस?" ती थोडीशी किंचाळत म्हणाली.

"काम..." तो शांतपणे म्हणाला.

"पण डॉक्टरांनी तुला आज आराम करायला सांगितले होते ना?"

"काही एवढे झाले नाही आहे की पडून राहावे.मी ठीक आहे" म्हणत तो तिथून पुढे जायला निघाला तसे तिने त्याच्या हाताला धरून त्याला मागे ओढत थांबवले.

"तुला कळत नाही आहे का आदित्य तुझी जखम अजून भरली नाही आहे. तू जा आराम कर,मी बघते इथले सगळे"

"कपाळावरची जखम भरेल जी दिसते पण मनाचे काय? ती जखम थोडीच कोणाला दिसते" असे बोलत तो पुढे निघून गेला.

शरयू मात्र स्तब्ध उभी राहत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली.

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all