दिशा भाग 18

Incident Happens Which Became Reason For Non Communication


दिशा:- भाग 18

त्याच्या चेहऱ्यावर आलेली स्ट्रॉबेरी क्रीम ची मिशी पाहताना शरयू दिलखुलास हसत होती. एकंदरीत तिचा काल संध्याकाळपर्यंत चा आलेला वैताग लांब पळून गेला होता आणि नव्या जोमाने, उत्साहाने ती पुन्हा कामाला लागली होती. तिच्यातली खेळकर वृत्ती परत वर डोकावू लागली होती हे बघून प्रीतीला मनापासून हायसे वाटत होते.

"ए, मला पिझ्झा हवाय" प्रीती मध्येच बोलली तसे आदित्य पिझ्झा आणायला गेला.
"तुझं डोकं ठिकाणावर आहे का प्रीती?" थोडसं रागावत शरयू बोलली.
"मी काय केले आहे आता?" निरागसपणे प्रीती बोलली.
"पोट आहे की काय तुझं? एवढं जेवलीस, त्यावर स्ट्रॉबेरी क्रिम आणि आता पिझ्झा? उद्या काय आराम करायचा आहे का?" तिला चिडवत शरयू बोलली तसे प्रीती ने लटक्या रागाने तिला वाकडे तोंड करून मान फिरवली...
त्यांचे अजून काही बोलणे सुरू होतेच तितक्यात आदित्य पिझ्झा घेऊन आलाच.

तिघात एक असे शेअर करत त्यांनी तो पिझ्झा संपवला आणि परतीला होटेल च्या दिशेने निघाले.
तो हवेतील बोलणारा पण तरीही हवाहवासा वाटणारा गारवा बेधुंदपणे पित शरयू, इनोव्हाच्या बाहेर डोकं काढून बसली होती. ती शांतता, तो काळाकुट्ट अंधार सगळे कसे नविन होते पण आवडत होते. आपल्याच विचारात ती बाहेर बघत होती तर प्रीती डुलक्या काढत होती. आदित्य मात्र मध्येच शरयू कडे नजर फिरवत, कधी बाहेर बघत बसला होता.

त्यांच्या हॉटेल वर पोचल्यावर आदित्य ने आवाज दिला तेव्हा कुठे शरयुची तंद्री तुटली मग तिने जरा एक धक्का देत प्रीतीला उठवले.

"कुठे आहोत आपण?"प्रीती वेड्यासारखा बोललीच.
" अजून आहोत जमिनीवर, आणि चला आता रूम वर" म्हणत तिने प्रीतीला हाताला धरून इनोव्हा बाहेर काढले तसे आदित्य ने हसतच त्यांना "गुड नाईट" म्हणत तो वर त्याच्या रूम च्या दिशेने निघाला.

या रूम वर पोचताच प्रीती ने कपडे ही न बदलता धाडकन स्वतःला बेडवर झोकून दिले तसे शरयू ने तिला हटकले की कपडे तर बदल.
पण ऐकणार ती प्रीती कुठली..ती तसेच म्हणाली, " मला जाम दमायला झाले आहे, मी अशीच झोपणार" म्हणत लहान मुलीसारखी हट्ट करत तिने पायातले सॅंडल फेकले आणि ब्लॅंकेट अंगावर ओढले.

एकंदर प्रीती कडे पाहून शरयू ला जाम हसायला येत होते,ती बाथरूम मध्ये गेली फ्रेश होऊन ती नाईट ड्रेस घालून बाहेर आली. पण तिची झोप कुठेतरी पळून गेली होती. बेडवर अंग टाकले आणि चळवळ सुरू झालीच, शेवटी ती उठून बसली आणि बाहेर गॅलरी मध्ये येऊन उभी राहिली.

बाहेर काळाकुट्ट अंधार होता. रातकिड्यांचा तो आवाज थोडी भीती वाटेल असाच जाणवत होता पण का कोण जाणे तिला खूप फ्रेश वाटत होते. खूप दिवसांनी तिला असे प्रसन्न वाटत होते, बाहेर दूरवर नजर फिरवत ती गॅलरीत तसेच बसली.

त्या गॅलरीत तिला खूप निवांत शांतता त्यावेळेस अनुभवता येत होती. मुंबई पासून लांब ही अशीच शांतता तिला अपेक्षित होती. सुशांत च्या प्रसंगा नंतर तिला स्वतः करता वेळ कुठे मिळाला होता. आज ती शांतता तिला हवी हवी वाटत होती.

किती वेळ ती अशीच बसली काही माहिती पण अचानक तिच्या शांततेला तडा गेला. नको होता तिला कुठलाही आवाज पण तिला खाली लॉन जवळ काहीतरी हालचाल आणि करकर असा आवाज जाणवला.
पहिल्यांदा तिने दुर्लक्ष केले पण तो आवाज तसाच येत राहिला तसे ती उठली आणि त्या आवाजाच्या दिशेने जायला निघाली.
आवाज खालच्या हिरवळीच्या बाजूला असलेल्या पोर्च मधून येत होता. पायऱ्या उतरून ती खाली आली आणि समोर बघते तर जरा आश्चर्य वाटले.

त्या पोर्च मधल्या रॉकिंग चेअर वर आदित्य बसला होता आणि सिगरेट पित होता. अंधारात त्या सिगारेतचे लाल लाल टोक उठून दिसत होते. तो आपल्याच विचारात होता, आपल्या जवळ कोणी आले आहे याचे त्याला भानही नव्हते.
ती हळूच त्याच्या पाशी जाऊन उभी राहिली आणि शांतपणे काही वेळ त्याचे निरीक्षण करत उभी होती.

काय मनात आले कोण जाणे पण तिने अचानक "आदित्य!" असा जोरात आवाज दिला तसे तो खूप दचकला आणि गडबडीत उठून उभा राहिला.
उठताना त्याच्या हातातली सिगारेट उडाली आणि त्याचे जळते टोक शरयू च्या हातावर आले तसे "आई आई !" करत तिने हात झटकला. तिला ओझरता चटका बसला हे लक्षात येताच तो जवळ जायला गेला तर त्याचा तोल गेला आणि तो पडणार पण स्वतःला सावरत त्याने शरयू च्या खांद्याचा आधार घेतला. या नादात त्याच्या नकळत शरयू चा नाईट ड्रेस चा टॉप खांद्यावरून ओढला गेला तसे ती दचकली आणि त्याच्याकडे पाहिले तर तो अगदी निर्विकार होता. शरयू चा हात हातात घेऊन
तो त्यावर फुंकर मारत होता तिला मात्र ओशाळाल्या सारखे झाले.

"चटका जोरात बसला का?" आदित्य ने विचारले तसे तिने डोळ्यानेच "हो" असे दर्शवले. तसे तो पाणी आणून त्यावर टाकावे या विचाराने मागे जायला गेला. त्याचा हात तिच्या हातावरून पुन्हा नकळत तिच्या खांद्यावर गेला आणि खांद्यावरून टॉप ला ओढल्यासारखे झाले.
जवळपास खांद्या पासून खालती बाही पर्यंत तिचा टॉप ओढला गेला.
त्याची पाठ तिच्याकडे होती त्यामुळे त्याला हे कळलेच नाही. तिला वाटले हा मुद्दाम करतोय आणि आता मात्र ती चिडली. काही कळायच्या आत तिने त्याला मागे फिरवले आणि फाडकीने त्याच्या गालावर एक लगावली आणि ताड ताड पाय आपटत वर निघुन गेली.

काय झाले हे कळायच्या आतच तो गाल चोळत होता.
त्याला कळलेच नाही काय झाले पण मनापासून वाईट वाटले. त्याला तिने का मारले हा प्रश्न अनुत्तरीत राहिला!

दुसऱ्या दिवशी हिला जर उशिराच जाग आली, बाजूला प्रीतीही नव्हती. गॅलरीत येऊन बघते तर आदित्य टीम ला काही सूचना देत होता.
हिने बाथरूम मध्ये जाऊन भराभर आटोपले आणि तयार होऊन खाली आली तर तोपर्यंत सगळी टीम ब्रेकफास्ट करायला लग्ल होती.

कालच्या रात्रीच्या प्रकाराने तिच्या मनात राग भरला होता, तिने फक्त कॉफी चा ग्लास उचलला आणि निघाली.

प्रीती ने तिच्यासाठी सँडविच सोबत घेतले पण ही आपली जाऊन ट्रॅव्हलर मध्ये जाऊन बसली.

आदित्य ला तिच्या वागण्याचा राग आला होता की विनाकारण हिने आपल्याला मारले तर त्याने रात्री आपल्या सोबत गैरवर्तन केले या समजापोटी ती त्याच्याशी अबोला धरून होती.

एकदम प्रोफेशनल पद्धतीने दिवसभर काम सुरू होते. पहिल्यांदा पाचगणी ला जाऊन पारशी पॉईंट नंतर टेबल लॅन्ड मग सिडनी पॉईंट असे काम सुरू होते,.


पुढचे स्केड्युल शिवसागर पॉइंट आणि नंतर तापोळा असे अनेक ठिकाणी आज दिवसभर शूट सुरू होते. दिवसभरात शंभर वेळा ते बाजूने गेले,समोरासमोर आले पण एक शब्दही एकमेकांशी बोलले नाहीत.

त्याचे इग्नोर करणे शरयू ला कुठेतरी खटकत होते पण जाऊन आपण बोलावे यासाठी तिचा इगो तिला पुढे जाऊ देत नव्हता.

प्रीतीला काहीतरी चुकतेय याची कुणकुण लागली होती, जेव्हा लक्षात आले की ते एकमेकांशी बोलत नाहीत तेव्हा मात्र आश्चर्य वाटले.
आज दिवसभर कामाच्या निमित्ताने खरं तर बोलण्याच्या अनेक संधी होत्या पण अख्खा दिवस तसाच गेला.

तिन्हीसांज व्हायला आली तसे तिला राहवले नाही तिने आदित्य ला हाक मारली पण त्याने ऐकून न ऐकल्यासारखे केलं तेव्हा मात्र ती आतून खवळली.

तरातरा पुढे जात तिने आदित्यच्या पाठीला हात लावत "आदित्य" म्हणत आवाज दिला. आता मात्र पर्याय नाही म्हणत तो मागे वळला पण दोन्ही गालावर हात ठेवतच!
ते हात क्षणभर त्याने गालावरून काढले आणि कोपरापासून जोडले आणि तिथून काहीच न बोलता निघून गेला तशी ती स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघतच राहिली.

लांबून हे सगळे बघणारी प्रीती मात्र चक्रावली. शरयू मात्र रागाने लाल झाली कारण आदित्य ने तिला आता समोरून नाकारल्यासारखे केले होते आणि निघून गेला होता.

"नक्की काय सुरू आहे?" शरयू जवळ येत प्रीती म्हणाली तसे चिडत कालच पूर्ण किस्सा शरयू ने तिच्या अनुषंगाने सांगितला तसे आता मात्र प्रीती चकित होत म्हणाली,
"व्हॉट? आदित्य ने तुझा टॉप खेचला असे तुला वाटते?"
"होय..."
"तुला वेड लागले का? तो कसा आहे हे माहित नाही का तुला? त्याने तुला चटका बसला म्हणून फुंकर मारली.. बरं त्याला दचकवणारीही तूच! वरून मारलेही..आणि तू म्हणतेस त्याने तुझा टॉप ओढला?"

"एकदा सांगून कळत नाही का?"

"तुलाच कळत नाही आहे! तू चुकलीस! तो असा मुलगाच नाही की जो गैरफायदा घेईल. गैरसमज तू करून घेतलास. कसे त्याने तुला उचलून आणले, धावपळ केली विसरलीस तू.. गैरफायदा घेणाऱ्यातला तो नाही असे म्हणत रागात प्रीती सुद्धा तिथून निघून गेली.

आता मात्र चूक लक्षात आल्याने तिचे मन तिला खूप अस्वस्थ करत होते.

सगळे पॅक अप झाल्यावर ती धावत पळत ईनोवा कडे गेली तर तिला कळले की आदित्य आधीच हॉटेल कडे गेला आहे. ती तशीच काही न बोलता गाडीत बसून राहिली.

हॉटेल ला डिनर रेडी होता. ती तशीच डिनर हॉल ला आली तर प्रीती आणि आदित्य एकमेकांच्या सोबत गप्पा मारत होते. ती जवळ गेली पण आदित्य ने दुर्लक्ष केलं आणि प्रीती ने सुद्धा त्यांचे बोलणे तसेच चालू ठेवले..

त्या टेबलावर ती बसली पण तिचे खाण्यात लक्ष लागेना. कसेबसे थोडे खाऊन ती लगेच वर निघून गेली. थोड्या वेळाने प्रीती वर आली आणि चेंज करून झोपायला गेली.
शरयू ला मात्र झोप येत नव्हती ना ही तिचे मन कशात लागत होते. अस्वस्थ पणे ती रुम मध्ये फेऱ्या मारत होती.

आदित्य असेल का या आशेने ती पुन्हा गॅलरीत जाऊन बघून आली पण काही दिसले नाही.

तिने अंगावर जॅकेट घातले आणि तिची पावले जिन्याच्या दिशेने वळली.आज आदित्य काही बाहेर दिसत नव्हता.
ती हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये आली. तिथले कॉफी शॉप 24 तास ओपन असायचे.
तिने 1 ब्लॅक कॉफी अशी ऑर्डर दिली आणि तशीच बसून राहिली. तिने तिचा फोन उचलला आणि आदित्य चा फोन लावला. बऱ्याच वेळ झाला तरी फोन काही घेतला गेला नाही तसे वैतागून तिने फोन ठेवला. आजचा दिवस आदित्य सोबत न बोलता जाणार होता हे नक्की!

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all