दिशा भाग 16

Sharayu Gets Frustrated Due To Non Cooperation For Work


दिशा:- भाग 16

महाबळेश्वर-तापोळा रोड वर असलेले एक पॉश हॉटेल त्यांच्या अख्या युनिट ने बुक केलेले होते. हॉटेल चे लोकेशन फारच अप्रतिम होते. तिथून दिसणारी दरी आणि बाजूला असणारे विस्तीर्ण पटांगण मोहात पाडणारे होते. हॉटेल ची लॉन फारच सुंदर होती. सकाळी सकाळी सूर्योदयाचे काही शॉट्स युनिट ने घेतले होते. आता मुंबई हून ॲक्टरस् आले की त्यांच्या सोबत पुढचे शूटिंग होणार होते. सकाळी सकाळी त्या लॉन मध्ये ईझी चेअर टाकून शरयू गरमा गरम कॉफी पीत बसली होती.
प्रीती तिच्या पाशी आली...

"शरू..किती मस्त ठिकाण आहे ना हे...! महाबळेश्वर ची थंडी..इथले जबरदस्त वातावरण आणि त्याहून भारी हे हॉटेल...तुला आवडले ना सगळे..?"

"खूप आवडले.."

"तुला नाही वाटत की या अश्या ठिकाणी कोणीतरी एक खास कंपनी असावी ज्याच्या सोबत आपण महाबळेश्वर फिरावे...आपला वेळ अजून रोमँटिक गेला असता.."

"तू आजकाल फारच रोमँटिक होत आहेस प्रीती..."

"होना पडता है जनाब!" स्टाईल मारत प्रीती म्हणाली तसे शरयू ने डोक्याला हात लावला.

शरयू ने लोकेशन डायरेक्टर ला दोन तीन कॉल केले पण तिचे कॉल कनेक्ट होत नव्हते, ती जाम वैतागली.

तिची ऑन साईट लोकेशन टीम अजूनही झोपली होती. हिने सगळ्यांना उठवले आणि जागेचा आढावा घ्यायचा आहे लेक पाशी जाऊन असे सांगितले पण कोणीही वेळेवर आले नाही.
त्या लोकांच्या नादी न लागता शेवटी ती एकटीच निघाली आणि सरकारी ऑफिस मध्ये शूटिंग ची परमिशन घ्यायला गेली पण आज तिथले साहेबच आले नव्हते. तिने त्यांना फोन करायचे खूप प्रयत्न केले पण ते काही फळाला येत नव्हते.

इकडे शूटिंग वाल्या युनिट च्या लोकांचे नखरे काही वेगळेच सुरू होते. त्यांच्यातली मॉडेल काय तर म्हणे तिला हवे ते कॉशच्यूम मिळाले नाही म्हणून अडून बसली होती आणि हिरो अजून पोचायचा होता

हे सगळे शरयू ला नविन होते. ती स्वतः कामात खूप पार्टिक्युलर असल्याने तिला हे झेपत नव्हते.
तिच्या युनिट मधील 4 लोक आले तसे ती वेण्णा लेक लोकेशन ला जाऊन उभी राहिली आणि एका बाजूला असलेल्या जागेच्या इथे तिच्या शूटिंग ला हवेतसे सेट अप करवून घेत होती. पण ती लोक ढेपाळल्यासारखे काम करत होते जेवढे सांगितले तेवढेच.

तेव्हढ्यात प्रीती येताना दिसली तसे ही वैतागून म्हणाली "प्रीती किती मूर्खासारखे वागत आहेत हे लोक" ती चिडली होती.

तिला शांत करत प्रीती म्हणाली " शरयू शांत हो,हे ऑफिस चे काम आहे. तू घाई करू नकोस, थोडं दमाने घ्यावेच लागेल"

तेवढ्यात तिथे काही लोक आले आणि त्यांनी शूटिंग करायला नाही आहे असे म्हणले. तिने का विचारलें तर तुमच्याकडे परमिशन लेटर नाही आहे असे सांगितले. तिने खूप समजवायचा प्रयत्न केला की तिथे ती गेली होती पण साहेब नव्हते आले म्हणून राहिले पण ते लोक काही ऐकेना. शेवटी शरयू च्या टीम ला पॅक अप करावे लागले. उन्हात दिवसभर थांबून ती लालेलाल झाली होती जणू तिथले आल्हाद दायक वातावरणही तिला सोसत नव्हते.

सगळे परत बांधाबांध करून ते लोक हॉटेल ला पोचले. ती सोडली तर कोणालाही फरक पडलाय असे वाटत नव्हते. प्रत्येक जण आपल्याच नादात वावरत होते, कोणाला फिरायचे होते तर कोणाला खाणेपिणे यात रस होता.

ती तणतणत रुम वर आली तर ती येण्याच्या आधी प्रीती आपली फोन वर चिकटलेली!

"प्रीती!" ती जरा रागातच बोलली.
"काय झाले?"
"तुला काही वाटत नाही आहे का?"
"कशाबद्दल?" प्रीती आपल्याच नादात मोबाईल कडे बघत बोलत होती, शरयु च्या चेहऱ्यावर असलेले चिडलेले हावभाव तिला दिसत नव्हते.

शरयू ने धाडकन बेडवर अंग टाकले आणि रडायला लागली. तसे प्रीती तिच्यापाशी धावत गेली पण तिचे रडणे सुरूच होते.

प्रीती तिला हलवत होती पण तिचे रडणे सुरु होते. प्रीती ने तिला गदगदा हलवले तसे ती उठून बसली आणि तिने सरळ मोठ्या सरांना फोन लावला.

"एवढ्या रात्री फोन शरयू..?"
"सॉरी सर..पण मला काही गोष्टी तुम्हाला सांगणे गरजेचे आहे.."
"बोल..काय झाले..?"
तसे घडलेले सगळे तिने त्यांच्या कानावर घातले. तिची कामाबद्दल ची तडफड त्यांना तिच्या अवेशातून जाणवत होती.

शेवटी ती तडकून म्हणाली,
"सर मला ही टीम नकोय, प्लिज माझी मदत करा नाहीतर काहीही काम न करता परत यावे लागेल"

"शरयू शांत राहा..मी बघतो काय ते. आराम कर आज सकाळी बघूयात" असे म्हणत त्यांनी फोन कट केला.

शरयू न जेवताच झोपी गेली, प्रीतीने खुप प्रयत्न केले तिला उठवायचे पण सगळे व्यर्थ गेले!

लवकर झोपल्याने तिला पहाटेच 5 वाजताच जाग आली. तिने आपले थोडे आवरले आणि बाहेर लॉन वर जाऊन बसली. पहाटेच ते वातावरण जरा थंडगार वाटत होते पण हिच्या मनातील खळबळ काही तिला ते वातावरण अनुभवू देत नव्हती.

हातात गरम कॉफी चा मग घेऊन ती त्या लॉन वर चालत होती तेवढ्यात समोरून एक टेम्पो ट्रॅव्हलर येताना दिसली. गाडी चे हेड लाईट चालू होते, ते सरळ तिला टार्गेट करत आहेत असे तिला वाटले त्यामुळे ती रागाने तिकडे बघत होती.

काही क्षण लाईट्स तसेच चालू राहिले तसे ही जोरात ओरडली.." आता बंद करतो का मी येऊन बंद करू..?"

तसे गाडीचे इंजिन आणि लाईटस् बंद झाले, समोर ड्रायवर जवळ बसलेली एक व्यक्ती दरवाजा उघडून बाहेर आली. प्रवासाने थोडा अवतार बिघडला होता त्या व्यक्तीचा. पण त्याला पाहताच चिडलेल्या शरयू चे भाव मात्र एका क्षणात बदलले आणि आतापर्यंत असलेल्या वैतागाच्या चेहऱ्यावर क्षणात गोड हसू उमटले.
ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तो आदित्य होता.
त्याची टीम घेऊन तो सकाळी सकाळी महाबळेश्वर ला पोचला होता.

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all