©®शितल ठोंबरे ( हळवा कोपरा )
दिसतं तसं नसतं
सुमनच्या सुनेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच दुसरी चूल मांडली… ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण राधेश्याम सोसायटीत पसरली… सुमन, रमेश आणि त्यांचा एकुलता एक मुलगा सुयश गेली 27वर्ष या राधेश्याम सोसायटीत राहत होते… सुयशच्या जन्माआधी पासून…
राधेश्याम सोसायटीतील प्रत्येक घर या तिघांना ही चांगलेच ओळखत होते… तिघांचाही स्वभाव अत्यंत शांत, सगळ्यांशी मिळून मिसळून घेणारा… इतक्या वर्षात कधी कोणाशी वाद नाही की कश्यावरुन वाकडं नाही… त्यामुळे सुयशची बायको या घरात खूप सुखात नांदेल… जी मुलगी या घरात सून म्हणून येईल ती खरंच भाग्यवान असेल अशीच चर्चा राधेश्याम सोसायटीतील महिलामंडळात सुरु असे…
सुयश आणि रियाच्या लग्नानंतर दीड महिना सगळ्यांना तेच वाटत होतं… पण कोणास ठाऊक कुठे माशी शिंकली आणि हसत्या खेळत्या घराचे दोन तुकडे झाले… सुयश सॉफ्टवेअर इंजिनियर होता तर रिया एका खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होती…
नोकरीवाली सून म्हटल्यावर कसं घेणारं सासूशी जुळवून… की सुमन लाच रिया खटकत होती…
कामाला जात होती.. घरी यायला म्हणे रात्रीचे नऊ वाजत….पुन्हा सकाळी नऊ ला स्वारी कामावर जायला निघे… सगळं आपलं सासूच्या जीवावर चालत असेल… सुमन तरी काय करणार आयुष्य भर कष्ट केले आता सून आल्यावरही तेच करावं लागतंय… म्हटल्यावर सुनेला वेगळीच चूल मांडायला लावली…. बघ आता तुझं तू हो की नाही…. अश्या एक ना अनेक चर्चा राधेश्याम सोसायटीत रोज रंगू लागल्या…
सुमनची खास जिवलग सखी अलका तिच्या कानावर ही बातमी आली… तसं तिने आपल्या मैत्रिणीला फोन केला… खरं खोटं काय ते जाणून घ्यायला… सोसायटीत सुरु असणारी चर्चा तिच्या कानावरही आलीच होती…
हॅलो सुमन कशी आहॆस गं?.... अलका
मी मस्त मजेत… काय म्हणतेस तूच बरेच दिवस बाहेर दिसली नाहीस…आहॆस कुठे तू??.... सुमन
मी कुठे जातेय तेव्हा…. अगं गुडघेदुखी धरली आहे… त्यामुळे सध्या घरातून बाहेर पडणं काही होतं नाही… त्यामुळे तुझी खबरबातही घेता आली नाही… एवढं सगळं घडलं आणि तू एका शब्दानेही मला काही बोलली नाहीस… मैत्रिणी ना गं आपण…. अलका
अगं हो हो मैत्रिणी आहोत आपण… पण मी तुझ्या पासून काय लपवलं मला काही समजत नाही आहे… हे बघ काय आहे ते स्पष्ट बोल बरं… सुमन
ठीक आहे स्पष्टच विचारते… रिया आणि सुयश ने दुसरी चूल मांडली म्हणे… माझ्या कानावर बातमी आली आणि धक्काच बसला बघ… तुझ्या सारखी सासू मिळायला भाग्य लागतं… आणि तुझी सून अशी कशी घर सोडून जाऊ शकते…. चेहऱ्यावरून तर फार भोळी गरीब वाटत होती बघ… पण एखाद्याच्या मनात काय सुरु असेल आपल्याला नाही सांगता येतं ना…. तिचं जाऊ दे ती कितीही झालं तरी परकी पण सुयश ला नको समजायला… म्हातारपणात आपल्या आईवडिलांचा आधार व्हायचं की त्यांना असं वाऱ्यावर सोडून द्यायचं…
तुझं चुकलंच बघ… तूच सुनेला आधी लाडावून ठेवलीस… पाहिलेस त्याचे परिणाम काय झाले …. अलका
बापरे ! अगं किती बोलशील… दम लागला असेल तर पानी घे…. शांत हो आधी…. इतका वेळ दाबून ठेवलेल हसू सुमनकाकूंच्या तोंडातून बाहेर पडलं तसं अलका ला आश्चर्य वाटलं…
अगं मी एवढ्या गंभीर विषयावर बोलत आहे आणि तू हसतेस काय??.... अलका
अगं हसू नको तर काय करू… मला सांग तुला हे सांगितलं कोणी… माझ्या लेकाने आणि सुनेने दुसरा संसार थाटला ते…. सुमन
सांगायला काय पाहिजे अख्या सोसायटीत चर्चा सुरु आहे…. मला ही आजच समजलं… तुझ्या शेजारी राहणाऱ्या त्या शारदा वहीनी त्या आल्या होत्या आज घरी त्यांनीच मला सगळं सांगितलं… तू तर काय मला परकच करून टाकलंस… अलका
अच्छा असं आहे होय… बरं अलका मी काय म्हणतेय या रविवारी माझ्या घरी भेटूयात का??... असंच आपलं छोटंसं गेट टुगेदर ठेवायचं म्हणते… सोसायटीतल्या सगळ्या महिला मंडळाला आमंत्रण देते… आणि हो तू ही अगदी ना विसरता यायचं बरं… एवढं बोलून सुमन आणि अलका ने एकमेकींचा निरोप घेतला…
रविवार साठी सुमन ने खास बेत आखला होता… शनिवारीच तिने सोसायटीतल्या सगळ्या मैत्रिणींना फोनवरून घरी खास येण्याचं आमंत्रण दिलं… आणि न विसरता यायचं नाहीतर मी रागवेन अशी प्रेमळ धमकीवजा ताकीद ही दिली…
रविवारी सकाळीच लवकर उठून घर आवरलं… नवऱ्याला आज मित्रांबरोबर एकदिवसीय सहलीला पाठवण्याची सोय ही केली… आज सुमनला घरात फक्त ती आणि तिच्या मैत्रिणी या व्यतिरिक्त कोणीच नको होतं… म्हणून नवऱ्यासाठी सहलीची योजना ही तिनेच आखली होती…
घर आवरून मैत्रिणींसाठी चहा नाष्ट्याची सगळी सोय करून ती हॉल मध्ये निवांत टीव्ही पाहत बसली…
ठरलेल्या वेळेवर सगळ्या मैत्रिणी हजर झाल्या… खूप दिवसांनी असं गेटटुगेदर भरवल्या बद्दल सगळ्यांनीच सुमन चे आभार मानले… अलका ही होतीच सगळ्या मैत्रिणींच्या घोळक्यात… तेवढ्यात कोणीतरी म्हटलंच बरे झाले तू आजचा कार्यक्रम आखलास… शेवटी तुझं दुःखी मन रमवण्यासाठी तू योग्यच मार्ग निवडला आहॆस ..आम्ही सगळ्या जणी आहोत तुझ्या सोबतीला…
तेवढ्यात दुसरी एकजण म्हणाली…. पण काही म्हण तुझ्यासारखी इतकी प्रेमळ सासू असताना तुझ्या सुनेने तुझ्या लेकाला तुझ्या पासून तोडलचं कसं… चेहऱ्यावरून तर नव्हती वाटत गं तशी….
सुमन ने तिचं बोलणं मधेच तोडलं आणि म्हणाली… हो हो सगळं सविस्तर बोलू आपण आधी जरा चहा नाश्ता करूयात का??.... मग निवांत गप्पा मारत बसू…
हो चालेल की तसंही आज सगळ्याजणी निवांत वेळ काढून आलो आहोत हो की नाही गं… अलका म्हणाली
सुमन ने बसल्या जागेवरूनच आवाज दिला… रिया चहा नाश्ता घेऊन ये गं… सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत माझ्या….
सगळ्याजणी अवाक होऊन सुमन कडे पाहतच राहिल्या… तेवढ्यात रिया ट्रे मध्ये चहा नाश्ता घेऊन आली… रियाला असं अचानक समोर पाहून सगळ्याचं महिला अवाक झाल्या… इतका वेळ आपण रियाबद्दल काही बाही बोलत होतं… तिने सारं ऐकलं असणार असा विचार करून सगळ्यांचे चेहरे खार्रकन उतरले…. वातावरण गंभीर झालं… कारण रिया अशी अचानक समोर येईल याची कोणी अपेक्षाच नव्हती केली….
शेवटी न राहवून अलका म्हणाली…. हे सगळं काय आहे सुमन…. काय प्रकार आहे हा???....
सांगते सगळं सांगते….रिया आधी सगळ्यांना चहा नाश्ता दे पाहू… रिया ने सगळ्यांना नाश्ता आणि चहा दिला… सुमनने रिया ला आपल्या बाजूला बसवलं… आणि बोलायला सुरुवात केली… खरं तर सोसायटीत माझ्या घराबद्दल चर्चा सुरु आहे याची कुणकुण मला लागलीच होती…. त्यावर अलका ने फोन करून शिक्कामोर्तब केलं… आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी एकत्र बोलावलं…
रियालाही काल ऑफिस वरून सरळ इकडेच यायला सांगितलं… तिनेही काही चौकशी न करता सरळ निघून आली…. सकाळपासून तुमच्या स्वागतासाठी लागणारी सगळी तयारी मला करू लागली… तुमच्या येण्याचं प्रयोजन मी तिला आधीच सांगितलं होतं… त्यामुळे मघाशी तुम्ही जी काही चर्चा केली त्याचं ना तिला वाईट वाटलं ना मला…
तुम्हा सगळ्यांचाच खूप मोठा गैरसमज झाला आहे… रिया आणि सूयश ने दुसरं घर घेतलं ते आम्हां दोघांच्या आग्रहाखातर…. रिया ने आम्हाला आमच्या मुलापासून मुळीच दूर केलं नाही… त्या दोघांचीही हे घर सोडून जाण्याची इच्छा नव्हती…. पण मीच हट्ट केला आणि घर घ्यायला लावले…
काय तूच या दोघांना घराबाहेर काढलंस वेडी झालीस का सुमन म्हातारपणाचा आधार असा कोणी दूर लोटतं का…. अलका म्हणाली
बरोबर आहे तुझं रिया आणि सुयश आमच्या म्हातारपणाचे आधार आहेत… पण सध्या मी आणि सुयश चे बाबा अगदी धडधाकट आहोत…. स्वतःची कामे स्वतः करू शकतो… जेव्हा आम्हाला सुयश आणि रियाची गरज असेल तेव्हाच हक्काने त्यांच्याकडे जाऊ…
पण सध्या त्या दोघांना त्यांची स्पेस देणं आम्हाला जास्त महत्वाच वाटलं….दोघेही सकाळी बाहेर पडतात ते रात्री उशिरा घरी येतात… दिवसभर फोनवर काय बोलणे होतं असेल तेवढेच… घरी आल्यावरही रिया मला घरातल्या कामात मदत करते… तिला झेपेल तशी सकाळी ही कामं आटपूनच ऑफिस गाठते…
रविवारचा एक दिवस काय तो मिळतो दोघांना पण तो ही आपण आठवडाभर काही कामं करत नाही सासूलाच करावी लागतात या विचाराने बिचारीच मन स्वतःलाच खातं आणि रविवारी सगळ्या घराची जबाबदारी ती स्वतः वर घेते… मला काही कामं करू देत नाही…
इथून ऑफिस ही दूर आहे जाता येता दोघेही दमून जातात… सुयश एकटा होता तेव्हा ठीक होतं… . पण आता त्याच्यावर रियाची जबाबदारी आहे… सून म्हणून जरी ती या घरात आली असली तरी आम्ही तिला आपली लेक मानली आहे… मग लेकीच्या सुखाचा विचार नको का करायला… आणि काही अडचण आलीच तर एका हाकेला धावून येतील अशी आहे माझी सून आणि मुलगा…
सुमनचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला पण तो आनंदाचा धक्का होता.. रियाचे डोळे भरून आले.. सुमनच्या खांद्यावर डोके टेकवून तिने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली…
नेहमीच दिसतं तसं नसतं… त्यापलीकडेही एक विश्व असतं…. ????
(कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा पण लेखिकेच्या नावासहित... साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे… )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा