दीपावली -उत्सव नात्यांचा
दीपावली सण मोठा
नाही आनंदा तोटा
दीपावलीचा सण म्हटला की प्रत्येकाच्या मनात एक वेगळाच उत्साह. अगदी पंधरा दिवसांपासून घराची साफसफाई, नवीन वस्तूंची खरेदी आणि दिवाळीच्या चार-पाच दिवसांपासूनच स्त्रियांची फराळाचे विविध पदार्थ बनवण्याची लगबग.
दीपावलीचा सण सुरू होतो रमा एकादशीपासून. दुसऱ्या दिवशी म्हणजेच वसुबारस. विशेषतः खेड्यांमध्ये प्रत्येकाच्या घरी गाय गुरांनी गोठे भरलेले. आजही खेड्यांमध्ये सकाळी उठून आंघोळ करून गाय वासराची पूजा केली जाते. तिला नैवेद्य चारला जातो. त्याच दिवशी शेणाने सारविलेल्या अंगणात मध्यभागी रांगोळी काढून त्यावर गोधन(शेण) टाकले जाते. त्यावर लव्हाळ्याच्या गवताचा दिवा बनवून ठेवला जातो. नंतर नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन. समुद्रमंथनातून चे पहिले रत्न निघाले ते म्हणजे लक्ष्मी सायंकाळी घरोघरी लक्ष्मीची पूजा केली जाते. सर्वत्र दीपोत्सव केला जातो. बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा. दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून अंगणाच्या मध्यभागी जे गोधन टाकले जाते त्याचा मोठा महिषासुर (म्हसोबा) बनविला जातो त्यावर मग गाईंना खेळवलं जातं. त्यावर फटाके फोडले जातात. मग गवळण निघते. अगदी पूर्ण दिवस आनंदाला उधाण. आजही खेड्यांमध्ये शेतकऱ्यांची दिवाळी अशी साजरी होते. कारण गाय बैलांच्या भरोशावरच शेती. तेच जणू त्यांचे नातेवाईक. हीच त्यांची नात्यांची दिवाळी.
दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या?
लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कोणाचा?
आई बापाचा...
दे माय खोबऱ्याची वाटी...
वाघाच्या पाठीत घालीन काठी.
बालगीत
कवी अनभिज्ञ
पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. त्याच्या उदंड आयुष्याची कामना करते. त्यामुळे हे नाते आणखी दृढ होते. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळून त्याच्या उदंड आयुष्याची देवाजवळ प्रार्थना करते. असा हा दीपावलीचा सण.नात्यांचा उत्सव.
प्रत्येक दिवाळी संपूर्ण ईरा परिवार, अतिशय सुज्ञ असा वाचक वर्ग जो आम्हा सर्वांची प्रेरणा आहे.
वाचकांची दाद..
हीच आमची जायजाद
या सर्वांना दरवर्षी आनंद घेऊन येऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
सौ. रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा