दिल दोस्ती दुनियादारी

मैत्री - आयुष्याचा बहुमोल ठेवा.

मैत्री ही अशीच असते होना??? कधी हसवणारी तर कधी रडवणारी. कधी रुसवा भरुन काढणारी तर कधी रुसून बसणारी. जीच्या शिवाय एक दिवस ही करमत नाही अशी मैत्री सर्वांनाचा भाग्याने लाभते. ती शेवटपर्यंत टिकवून ठेवणे प्रत्येकाचीच जबाबदारी आहे.


न दिसता समोर
जीव कासावीस होतो
शोध घेण्या मैत्रीचा
चहुकडे नजर भिरभीरतो

स्वभाव जुळला की मैत्री हवीहवीशी वाटते. आवडीनिवडी एकरुप होवू लागतात. मग आपल्या सारखच आवडणारी व्यक्तीचा सहवास आवडू लागतो. ती मैत्री सतत बरोबर असावी अस वाटते. शाळेत असताना असचं वाटायचं हो ना.....??

शाळेतल्या मैत्रीणींशी ओळख झाल्यावर एकमेकींच्या घरी जाणे-येणं चालू झालं की त्या मैत्रिणीने आपल्याकडच राहावं अस वाटायचं. तीच्याशी रात्रभर मनसोक्त गप्पा माराव्याश्या वाटायच्या पण तस काही घडायचं नाही.

ही हौस मात्र काॅलेज जीवनात पूर्ण झाली. मैत्रिणींबरोबर सहलीला जाणे, चित्रपट, खरेदी करता सतत बरोबर असायच्या. एकमेकींच्या घरी प्रोजेक्ट पूर्ण करण्या करता राहायला देखील जायचो.

मैत्रीच रूपांतर कुटूंबात झालं. अगदी आपली बहिण दुसरी वाटायला लागलं. घरचे तर...." तू कुठे मामाकडे राहायला गेली ना..... आम्हांला करमले नाही तर आम्ही हि ला बोलावून घेतो"...., वेगळचं नात म्हणावं लागेन. रक्ताचं नाही तरी आपलेपणाने निभावणार. नि:स्वार्थी होवून अडचणीच्या वेळी खंबीरपणे पाठीशी उभ राहणारं.

न बोलताच डोळ्यांची भाषा समजून मनाचा कौल कुठ झुकतो आहे हे अचूक ओळखणारी मैत्री ज्याला गवसते त्याच्या आयुष्यात कितीही वादळे आली तर तो कोलमडणार नाही. मैत्रीच्या घट्ट विश्वासाच्या दुनियेत स्वत:ला सुरक्षित ठेवलेलं असते.

मैत्री हि अनमोल आहे. ना वयाचे, ना वेळेचे,ना नियमाचे बंधन. फक्त एक मनापासून आवाज द्या आपल्या मैत्रीला दुस-या क्षणात ते हजर असतात. ही तर जादू आहे, मैत्रीची.

       

आपल्या डोळ्यात अश्रू तरंगले की, मैत्रीचा जीव कसावीस होतो. आपल्या चेह-यावर एक हास्याची रेष उमटवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्नांची बाजू ही चालू असते. आपल्या चेह-यावर निख्खळ हसू केवळ हि मैत्रीच आणू शकते नाही का????

ह्या मैत्रीला जितकी घट्ट मीठी माराल तितके समाधानी आयुष्याचे भागीदार बनाल. पण एक मात्र खर गैरसमजूतीने कोणतेही पाऊल उचलण्या आधी कोण्या तिस-याच्या सांगण्यावरुन आपल्या मैत्रीच्या नात्याला परकं करु नये. योग्य शहानिशा करुन निर्णय घ्यावा. त्या सोबत ती भेटल्यापासून ते आत्तापर्यंतच्या काळाचा पडताळा करावा. खरच अस करु शकेल का??? असा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारुन पहा. वेळ लागला तरी चालेल. पण अनेक वर्षाची मैत्री एका क्षणात तोडू नका.

मैत्री तुटल्याचा आवाज तर होत नाही. पण मन मात्र आतल्या आत स्व:ताला त्या अमूल्य मैत्री करता सतत हाक मारत असतं.

परंतु......, एकदा विश्वास उडला की ती हाका त्या मैत्री पर्यंत कधी पोहचू शकत नाही.

होणारे गैरसमज समजूतीने सोडवता येतात. एकदा का मैत्री केली, त्याची साथ कायम स्वरुपी निभवावी.

             मैत्री केव्हाही, कुठेही अगदी सहज होते. मैत्रीत विविध ज्ञान संपादन करता येते. आयुष्याच्या वळणावर जर.., आपली कोणी साथ देईल तर ती मैत्री असेल. ओळख नसतानाही मदतीचा हात पुढे करुन आपल्याशी जोडली जाणारी निर्मळ मनाची मैत्री. आपल भल व्हाव हाच उद्देश डोळ्या समोर असणारी आपली मैत्री. 


हक्काने घरी येवून चल आज आपल्याला इकडे जायचे. आईची परवानगी घेवून आपल्याला सोबत नेणारी. मैत्रीची विविध रुपे पाहायला मिळतात. ही मैत्री कधी आई, बहिण, काका, मावशी, आत्मा, मामा, मामी, भाऊ, बाबा. अश्या विविध नात्यात देखील गुंफली गेली आहे. कारण, मैत्रीची अशी व्याख्या आहे :- जिथे डोळे झाकून विश्वास ठेवून, तो जे बोलतो ते खर आणि आपल्या भल्याचं असणार. अश्यावेळी मित्रत्वाचं नातं आपोआप जोडले जातं.


हे वेड लागे जरी
ओढ तूझ्या येण्याची
तू नसता जवळी
मैत्रीच्या विश्वासाची

©® प्रज्ञा पवन बो-हाडे