डिजिटल रक्षाबंधन

Celebration of Rakshabandhan digitally.

डिजिटल रक्षाबंधन 

© प्रतिक्षा माजगावकर 

(मिस्टीरिअस मेसेज चा पुढील भाग उद्या प्रकाशित होईल..... आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने हा खास लेख....) 
*************************
        करुणा आज स्वतःच्याच विचारात गुंतली होती..... दरवर्षी आवर्जून रक्षाबंधनाला न चुकता भावाच्या भेटीला जाणारी करुणा आज जरा उदास होती..... कोरोनाचं संकट काय आलं आणि भावा - बहिणीची यंदा रक्षाबंधनालाच ताटातूट झाली.... यावर्षी काही आपल्याला राखी बांधायला जाता येत नाही म्हणून तिची चिडचिड सुरु होती..... करुणा चा भाऊ शरद डॉक्टर होता त्यामुळे कोरोना वोर्रिअर म्हणून तो काम करत होता..... अश्या परिस्थितीत तर अगदी त्याच्याकडे जायला मिळालं असतं तरी त्याला भेटता आलं नसतं! म्हणून ती अजूनच उदास होती..... नितुने हे बरोबर हेरलं होतं! 
         नितु! करुणाची मुलगी.... तिलाही आज वाईट वाटत होतं, आपल्याला मामा कडे जाता येणार नाहीये.... आपल्या लाकडक्या भावांना राखी बांधता येणार नाहीये आणि राखी बांधल्यानंतर गिफ्ट साठी केलेली नौटंकी सुद्धा होणार नाहीये.... सगळी मज्जा ती सुद्धा मिस करत होती.... पण, आधीच आई चा मूड नीट नाही म्हणून ती फोन कडे बघत शांतच कसली तरी वाट बघत बसली होती.... 

"काय चाललंय नितु तुझं? काय त्या फोन कडे बघतेयेस? आणि हे नवीन कपडे का घालून बसली आहेस... जा ना अभ्यास कर...." करुणा नितु वर ओरडत म्हणाली. 

"काही नाही आई! तू इथेच बस मी दोन मिनिटात आले...." नितु म्हणाली आणि आत किचन मध्ये पळाली.

करुणाचा आधीच कशात मूड नव्हता म्हणून तिने सुद्धा काही विचारलं नाही आणि सोफ्यावर बसून राहिली... तोवर नितुने एका तबकात ओवळणीची तयारी केली आणि ते तबक घेऊन बाहेर आली.... 

"हा काय प्रकार आहे नितु? तुला माहितेय ना आज ना आपण मामा कडे जाऊ शकतो ना ते लोक आपल्याकडे येऊ शकत...." करुणा जरा नाराजीच्या सुरात म्हणाली. 

"कोण म्हणलं असं? दोन मिनिटं थांब! तुझ्यासाठी सरप्राईज आहे.... तोवर जा तू छान तयार होऊन ये...." नितु ने तिला बेडरूम मध्ये तयार होण्यासाठी ढकलत सांगितलं. 

करुणा मस्त जांभळ्या रंगाची सोनेरी रंगाच्या बुट्ट्या असणारी काठा पदराची साडी नेसून बाहेर आली.... तोवर नितु च सरप्राईज तयार होतं! तिने सगळ्यांना व्हिडिओ कॉल लावला होता.... त्यात तिचा शरद मामा, नितेश दादा, पिंट्या आणि मावश्या सुद्धा होत्या... सगळ्यांना एकमेकांना असं भेटून फार बरं वाटत होतं! शरद तर पी.पी.ई. किट मधेच होता... करुणाच्या डोळ्यातून तर आनंदाश्रू वाहत होते... 

"चला चला आता आपण आपला डिजिटल रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरु करूया...." नितु म्हणाली. 

सगळे हसले आणि वातावरण थोडं हलकं झालं. करुणा ने सुरुवात केली.... तिने शरद ला ओवळलं.... आणि हॉस्पिटल मधल्या एका नर्स ने करुणाच्या वतीने आणि त्याच्या दुसऱ्या बहिणींच्या वतीने त्याला राख्या बांधल्या..... फोटो म्हणून एक स्क्रीनशॉट घेतला.... आणि शरद पुन्हा आपल्या कामासाठी गेला.... आता नितु ने तिच्या भावांना ओवाळलं आणि तिच्या वतीने नितुच्या मावस बहिणींनी नितेश आणि पिंट्या ला राख्या बांधल्या.... त्यांचं प्रत्यक्ष रक्षाबंधनाचं सेलिब्रेशन या दोघींनी लाईव्ह बघितलं.... आणि स्वतः डिजिटली सगळं एन्जॉय केलं..... सगळ्या क्षणांचे फोटो रुपी स्क्रीनशॉट घेण्यात आले आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे झाले.... सगळे स्क्रीनशॉट डिजिटल रक्षाबंधन या हॅशटॅग सह सोशल मीडिया वर पोस्ट झाले.... 
           सकाळ पासून उदास दिसणारी करुणा आता आनंदी होती..... अगदी प्रत्यक्ष भेटण्याची फीलिंग जरी यात नसली तरी आपण लांब राहून का होईना आपल्या भावाला राखी बांधली याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं..... 

"थँक्यू सो मच बाळा..... तुझ्या या कल्पनेने आपण आज अश्या परिस्थितीत सुद्धा रक्षाबंधन साजरे केले...." करुणा नितुला जवळ घेत म्हणाली. 

"मग! आहे की नाही मी स्मार्ट! आम्ही सगळ्यांनी कालच हा प्लॅन बनवला होता.... शरद मामा ला फक्त हि दोन मिनिटंच वेळ होता म्हणून यात सगळं बसवलं...." नितु म्हणाली. 

"हो बाळा हो! एरवी मी तुला ओरडत असते काय सारखं मोबाईल मध्ये असतं पण, आज त्याच मोबाईल च्या मदतीने आपण मस्त एन्जॉय केलं...." करुणा नितुला घट्ट मिठी मारून तिच्या डोक्यातून हात फिरवत म्हणाली.
समाप्त.
*************************
कसा वाटला हा आगळा वेगळा रक्षाबंधन सोहळा? कमेंट करून नक्की सांगा..... तुम्ही या वर्षी रक्षाबंधन कसे साजरे केले हे सुद्धा नक्की सांगा...