
ए अगं ए ऐकलस का!
काय हो!
एक गाणं सुचतय
ठेवा तुमच्याकडेच
कामं पडलियत
ए ऐक ना
बरं बोला
तू माझी काजूकतली
मी तुझा गुलाबजामुन
आयुष्यात रंग भरू
हातात हात गुंफून
अय्या खरंच
मग ऐका माझंपण
तू माझा झारा
मी तुझी कढई
भराभरा आवरुन
खाऊ खमंग चकली
चकली तर चकली
तू आहेसच नकटी
बघावं तेव्हा तळणाचीच
सुचतात तुला गाणी
वा रे वा
भजी कोण मागतं
जीभ हुळहुळते कुणाची
माझं काय करेन मीही
साधीसोप्पी पोळीभाजी
तसं नाही गं ते
मग कसं कसं ते
उठल्यासुटल्या रोमान्सची
खिचडी खाण्यास उतावीळ हे
नको भलते आरोप लावूस
साधा पापभिरू माणूस मी
वजन माझं जनमानसात
जरा फिरुन पहा नक्की
हो क्का
त्या शेजारच्या नटवीस सांगा
इथे नका पाल्हाळ लावू
चोहीकडे पसाऱ्यात बसलय
कसं बघा ध्यान येडबंबू
अहो, मी म्हणते
चाललात कुठे
स्नोपावडर लावून
स्वारी कुणीकडे
तुच म्हणालीस नं
पाल्हाळ सांगावयास
तुझी आज्ञा पाळतो
जाऊन येतो शेजारास
काय म्हणालात!
पाय बाहेर टाकाल
तंगड घालेन गळ्यात
गुमान बसा माकडछाप
मी माकड तू माकडीण
चल करु माकडचाळे
पोरं गेलैत आजोळाला
उट्टे फेडू वर्षभराचे