तीची डायरी

Her Diary


“तीची डायरी”

घरांना अडगळीची खोली असावीच का?? आणि त्यात नेमकं जास्तीचे असलेलं सामान असतं की बिनकामी सामान?? हो पण इथे तर माणसांनाही अडगळीच्या खोलीत ठेवलं जातं तर वस्तूंची काय बात... अडगळीच्या खोलीतीलं डाव्या बाजूच्या कोपर्यातील त्या बंद पेटीने माझं पूर्ण लक्ष वेधुन घेतलं.. स्वतःकडे आकर्षित करित ती होती मला.. जणू ती मला आवाजच देत होती.. माझीच वाट पाहत होती.. मलाही मोह आवरेना.. अखेर घातलेच दगडाचे घाव आणि तोडली कुलूप .. त्यात मला एक डायरी सापडली .. बोलकी बोलकी वाटत होती ती माणसागतं जिवंत र्निजीव होती ती.. दगडाचे घाव तिच्यावरचं पडल्यागत वाटलं मला .. स्पष्टपणे दिसत होत्या वेदना तिच्या.. हो पण, आनंदही उन्मळत होता.. कित्येक दशकांनी तीला बोलायची संधी मिळाली असेन.. त्या पेटीवरची धूळ साक्षीदार होती याला.. मग तीचं न एेकण्याइतंक कठोर कशी होऊ शकेन मी... उलगडण्यार्या प्रत्येक पानावर एक नवीन रहस्य होतं.. स्वप्नवत सत्य होतं.. सत्यवत स्वप्न होतं.. व्यथा,संघर्ष असं बरंच काहीस.. कित्येक पूर्ण-अपूर्ण,चांगल्या-वाईट कथांची साक्षीदार होती ती.. शिकण्यासारखं बरंच काही होतं.. मध्येच कुठेतरी तीचं निरागस खळखळून हसणं होतं.. आठवणींनी भिजलेले पावसाळे होते.. रखरखंत ऊन होतं.. मायेची ऊब होती.. माणसातलं माणूसपण होतं.. तुमच्या-आमच्यासारखी नव्हती ती ,..खुप वेगळी होती.. जगण्याच गुपित माहीत असावं तीला.. त्यात कुठेतरी मी मला शोधत होतीं.. सगळी पानं चाळली पण नाव मात्र नव्हतंच तिच्यावर कुठे.. कोण असावी ती .. मला ना हूरहूर लागली होती.. बाईग, इतकं काही शिकवलंस,तुझी कथा एेकली मी कमीत कमी नाव तरी सांगायचंस.. तीला विचारायचं होत कि कोणी छाटलं तुझे पंख..?? कोणी कैदी करून बांधून ठेवलं होतं..?? माणसं ना कधी कधी विचित्र वागता कचरा साचवुन ठेवता आणि मौल्यवान रत्न अडगळीच्या खोलीत.. अडगळीच्या खोलीतील डाव्या बाजूच्या कोपर्यातील बंद पेटीतील तीने ..या देहाच्या डाव्या बाजूच्या कोपर्यात स्थान मिळवलं होतं.. मी मुक्त केलं होतं पण आज तिला.. किती समाधान मिळालं,आनंद झाला ते शब्दात नाही व्यक्त होऊ शकतं.. काहींना कळेन मात्र सगळंच .. काहींना मात्र नाही कळणार कधीचं..

© एकज वर्णिक (शिवानी)