पूर्वाध:- 'ध्यासपर्व एक प्रवास..' ही कथा आहे' श्री. प्रदीप नारायण खाडीलकर'यांची.. कठीण परिस्थितीतही ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या एका ध्येयवेड्या मुलाची.. हा प्रवास सोप्पा नव्हताच कधी..!! खरंतर यशापर्यंत पोहचण्याचा मार्ग खाचखळग्यांचा, रक्तबंबाळ करणाराच असतो.. संघर्षांची वाट तुडवल्याशिवाय यश मिळणं अशक्यच.. आयुष्याच्या या खडतर वाटेवर प्रवास करत असताना त्यांच्या या दैदिप्यमान यशात ज्यांचा अनमोल वाटा आहे तो म्हणजे कायम त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नीचा आणि त्यांच्या आईबाबांचा.. त्यांच्याच साथीमूळे, त्यांच्या आशीर्वादामूळे आजचं हे वैभव उभं राहू शकलं.. आपल्या आईवडिलांच्या कष्टप्रद प्रवासातून त्यांना कायम प्रेरणा मिळत गेली. आणि ते घडत गेले..'नारायण खाडीलकर आणि मंगला खाडीलकर' या महान मातापित्यांचा ध्येयाच्या दिशेने झालेला प्रेरणादायी प्रवास जर उल्लेखला नाही तर या यशोगाथेला पूर्णत्व प्राप्त शकणार नाही.. म्हणूनच त्यांची कथा मी सांगणार आहे..
भाग- २
ही गोष्ट साधारण स्वातंत्र्यपूर्व काळातली..एका गरीब होतकरू मुलाची ही कथा. त्या मुलाचं नाव होतं 'नारायण खाडीलकर'.. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी एक दुर्घटना घडली आणि त्या घटनेचा त्याच्या कोवळ्या मनावर फार मोठा आघात झाला. पण तरीही आभाळाएवढ्या दुःखातूनही पुन्हा उभी राहण्याची त्याची जिद्द खरंच वाखाणण्याजोगी होती..
महाराष्ट्रातल्या 'कोपरगाव' या खेडेगावात 'खाडीलकर' नामक एक दाम्पत्य आपल्या कुटुंबासमवेत सुखा समाधानाने,गुण्यागोविंदाने राहत होते.. तीन मूलगे आणि एक मुलगी असा त्यांचा छोटासा परिवार..गरिबीचे चटके सोसूनही आनंदाने जीवन व्यतीत करणारं कुटुंब.. कधी कोणती तक्रार नाही.. नशिबाला दोष नाही.. पण एक दिवस नशिबाचे चक्र फिरले. एक दुर्घटना घटली.. आणि त्या घटनेमुळे कुटुंबाची बसवलेली घडी विस्कळीत झाली.सारं कुटुंब विखरलं गेलं..
एक दिवस नारायणाचे बाबा मशीन दुरुस्त करत होते.. नारायण तिथेच आजूबाजूला खेळत होता.. अचानक काय झालं कोणास ठाऊक..!! मशीन दुरुस्त करत असताना मशीनचा शाफ्ट तुटून जोरात उडाला आणि बाबांच्या गळ्याला लागला.. बाबा रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण..!! नारायणला काय झालं? काहीच समजेना.. आपल्याच डोळ्यांसमोर आपल्या बाबांचा तडफडणारा जीव पाहून तो घाबरून गेला.. "बाबा..बाबा..!!" तो आक्रोश करू लागला..आईला मोठमोठ्याने आवाज देऊ लागला.. सगळे धावत आले..पण तोपर्यंत उशीर झाला होता.. नारायणाच्या डोळ्यांदेखत त्याच्या बाबांनी प्राण सोडला होता.. घरचा कर्ता पुरुष सर्वांना सोडून गेला होता.. साऱ्या कुटुंबाला निराधार करून.. मागे आई आणि तीन भावंडाना सोडून.. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी नारायणाचे पितृछत्र हरपलं होतं.. इतक्या लहान वयात कोवळ्या मनावर झालेल्या आघाताने तो पुरता ढासळला होता.. पुढे कित्येक दिवस तो बाबांची आठवण काढून तो आईच्या कुशीत शिरून रडत राहायचा.. आई आपल्या पिल्लांना कुशीत घेऊन आसवं टिपत राहायची..
म्हणतात ना..!! 'काळ हे प्रत्येक दुखावरचं जालीम औषध आहे'. अगदी तसंच झालं.. कालपरत्वे दुःखाची तीव्रता कमी होत होती.. चारी भावंडं थोडी स्थिरावली होती.. वडिलांचं असं अनपेक्षितपणे सोडून जाणं आता त्यांनी स्वीकारलं होतं.. पतीच्या निधनानंतर नारायणाच्या आईने मुलांसाठी स्वतःला सावरायचं ठरवलं.. आजवर कधीही घराच्या बाहेर न पडलेली आणि चूल आणि मूल' इतकंच ज्ञात असलेली स्त्री समाजात टिकून राहण्याचं बळ कुठून आणणार होती..? एकटी स्त्री आपल्या मुलांना घेऊन कशी उभी राहणार..? कोण संगोपण करणार?' न संपणाऱ्या प्रश्नांचा ससेमिरा सुरू झाला.. पण आई या जगातला सर्वोत्तम योद्धा असते.. ती आपल्या मुलांसाठी कोणत्याही दिव्यांतून जायला तयार असते.. आईनेही विचार केला.. "दुःख उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाही.. नवऱ्याच्या जाण्याचं दुःख खूप मोठं.. पण ते दुःख उराशी बाळगून खंबीरपणे उभं राहायला हवं.. मुलांसाठी, त्यांच्या भवितव्यासाठी मला जगायला हवं" स्वतःच्याच मनाशी संवाद सुरू होता.. "पुढे काय करायचं??" हा प्रश्न 'आ' वासून उभा होता.. डोळ्यातली आसवं कोरडी होईपर्यंत रडून घेतलं.. डोळे पुसले आणि शेवटी तिने एक निर्णय घेतला..आपल्या भावाच्या घरी जाण्याचा..
नारायणाचे मामा मदतीला धावून आले.. आपल्या बहिणीला आणि भाच्यांना घेऊन आपल्या घरी म्हणजे 'सातारा' येथे आले..नारायणाचे मामा-मामी दोघेही स्वभावाने चांगले होते.. त्यांचा परिवार आणि आता बहिणीच्या कुटुंबाची जवाबदारी मामांवर आली होती.. त्यांचीही आर्थिक परिस्थिती बेताचीच होती..पैशाची चणचण कायम भासत राहायची..तरीही आई, नारायण आणि त्यांची भावंडं मामा मामींना कामात मदत करत असत.. मुलांचं बालपण कुठेतरी हरवून गेलं होतं.. मुलं पडेल ते काम करत होती.. आपपल्या परीनं हातभार लावण्याचा इवलासा प्रयत्न.. आई पापड, लोणची, मेतकूट, वाळवणं, मसाले करायला मामीला मदत करायची.. स्वयंपाकघरातली सगळी कामे मामीने आईकडे सोपवली होती.. मामानंही कधी मुलांना पोरकेपणाची जाणीव होऊ दिली नाही.. पण तरीही एका पित्याची सर कशी येऊ शकणार? मामांनी चारही मुलांना शाळेत घातलं… चौघे मुलं अभ्यासात हुशार होती.. चांगल्या गुणांनी पास होत ती वरच्या वर्गात जात होती..
दिवस सरत होते.. वडिलांचे छत्र हरपलेली ही भावंडं अजाणत्या वयातच मोठी झाली होती..,जबाबदार झाली होती.. लहान असूनही नारायणने आपल्या आईची आणि भावंडाची जबाबदारी स्वीकारली होती.. नारायण मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाला.. शालेय शिक्षणाचा एक टप्पा पार केला होता.. खूप आनंद झाला होता.. जणू दुःखाच्या आभाळाला सुखाची नाजूकशी छटा उमटली होती.. पुढे शिकण्याची खूप इच्छा होती.. पण परिस्थितीपुढे तो हतबल होता.. आपल्या भावंडाना शिकायला मिळायला हवं आणि आईला थोडाफार आर्थिक हातभार लावला पाहिजे मनाने उचल घेतली.. आणि नारायणने मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शाळेला राम राम ठोकला..
पुढे काय होतं पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©® निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा