ध्यासपर्व - एक प्रवास ध्येयवेड्या मुलाचा

Dhyasparv ek pravas dheyvedya mulacha


 

ध्यासपर्व.. एक प्रवास…

ध्यासपर्व..हा एक प्रवास.. ध्येयाने झपाटलेल्या ध्येयवेड्या  मुलाचा.. खडतर वाटेवरचा रक्तबंबाळ प्रवास.. ही कथा.. एका सूर्याचा ध्यास मनात बाळगून वाटचाल करणाऱ्या स्वयंप्रकाशित काजव्याची.. शून्यातून विश्वनिर्मिती करू पाहण्याऱ्या एका झंझावाताची.. ही कथा एका पर्वाची.. प्रतिकूल परिस्थितीत जराही न डगमगता संकटांवर धीराने मात करणाऱ्या एका प्रकाशवाटेची.. 

ही कथा आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाची.. लोहाचं सोनं करणाऱ्या परिसाची.. नुसत्या त्यांच्या सानिध्याच्या परिमळाने अवघं आयुष्य सुगंधित व्हावं अशा एका ध्यासवेड्या पर्वाची.. खरंतर प्रत्येक माणसाला आपला प्रवास अधिक रक्तबंबाळ वाटत असतो.. पण त्या वेदनेला कुरवाळत न बसता त्या दुःखावर मात करून पुढे जाणाराच आपल्या ध्येयापर्यत पोहचू शकतो.. वेदनेतूनच सृजनतेची निर्मिती होत असते.. यावर ठाम विश्वास असणाऱ्या माझ्या प्रेरणास्थानी असलेल्या गुरुवर्यांची..ज्यांच्यामुळे मी जगायला शिकले.. ज्यांना पाहून मी संकटाशी लढायला शिकले.. अशा एका उद्योजकाची.. तू  हे करू शकते हा विश्वास निर्माण करणाऱ्या माझ्या प्रेरणास्रोताची..

काही माणसं असामान्य व्यक्तिमत्त्व घेऊनच जन्माला येतात जणू..!!  संघर्षाची अग्निफुले वाटेवर पसरलेली असतानाही ते ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात.. आणि हाच त्यांचा संघर्ष आपल्याला जगण्याचं बळ देतो.. आपल्याला जगण्याची नवी ऊर्मी मिळते.. त्यांच्याकडे पाहताना आपली जीवन जगण्याची परिभाषाच बदलून जाते.. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने एक नवा आदर्श समाजापुढे अधोरेखित होत असतो.. त्याच एका ध्यासवेड्या मुलाची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे.. खरंतर हा प्रवास मी वर्णिण्याचा उद्देश इतकाच की.. त्यानिमित्तानं  त्यांना अधिक जवळून जाणून घेण्याचा एक अल्पसा प्रयास..

ही कथा आहे भारतातील पुणे शहरातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या सर्वात अग्रेसर असलेल्या  एका मोठ्या कंपनीच्या उद्योजकाची.. दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये अवघ्या सात आठ कामगारांना घेऊन सुरू झालेला हा उद्योग आज संपूर्ण भारतात किंबहूना साऱ्या जगभर पोहचुन आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतोय.. 'हा माझा मार्ग एकला' म्हणत सुरू केलेला हा प्रवास या उद्योगाचे शिल्पकार  सेरमेट रेसिस्ट्रॉनिक्स प्रा. लिमिटेड कंपनीचे मालक श्री. प्रदीप नारायण खाडिलकर यांनी कसा ध्येयापर्यंत  आणून ठेवला.. त्या प्रवासाची गाथा आज मी आपणास सांगणार आहे.. 

ही  गोष्ट आहे साधारण १९६२ या सालातली..  कोण आहेत हे श्री. प्रदीप नारायण खाडिलकर..पाहूया पुढच्या भागात..

क्रमशः

निशा थोरे..

नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या मागील 'सावत्र आई'  या कथेला भरभरून प्रेम दिलंत, स्नेह दिलात माझ्या बाळबोध लिखाणावरही कौतुकाचा वर्षाव करून तुम्ही मला सन्मानित केलंत खरंच मनापासून खूप खूप आभार.. मी कायम माझ्या वाचक मित्रमैत्रिणींच्या ऋणात.. हा स्नेह असाच राहो हीच सदिच्छा.. 

पुन्हा एकदा  एका नवीन कथेसह एक नवीन ऊर्जा घेऊन   मी आपली शब्दसखी निशा थोरे आपल्या भेटीला आलेय.. ही कथा कशी वाटली जरूर कळवा… आपल्या  प्रतिक्रिया माझे लेखन प्रगल्भ करतील यात शंकाच नाही..

धन्यवाद

आपली शब्दसखी

निशा थोरे..

🎭 Series Post

View all