Nov 30, 2020
General

dhuk

Read Later
dhuk

Rakhi Bhandekar <[email protected]>

7:23 PM (4 minutes ago)

 

to me

                          धुकं
    
                           धुकं हा शब्द उच्चारल्या बरोबर मनात निर्माण होते संदिग्धता, धूसरता, अस्पष्टता आणि  अस्वस्थता.
                  तसं पाहिलं तर धुकं हा जणू निसर्गाचा एक कलाविष्कार, पाऊस पडून गेल्याच्या पाऊलखुणा सांगणारा, शिशिर अथवा हेमंता च आगमन अधोरेखित करणारा, एक वेगळाच निसर्ग अनुभव. हुर हुर लावणारा, जिवाची घालमेल करणारा, चित्ताची काहिली वाढवणारा एक निसर्गचक्राचा भाग.
                     एखादी वस्तू अगदी नजरेसमोर आहे पण तरीही तिचं अस्तित्व लपवणारा जादूगार म्हणजे धुकं.
                    रात्रीचा गारठा वाढवणारा साऱ्या अशांत जीवांना निशेच्या कुशीत चार-दोन घटका विश्रांती घेण्यासाठी बाध्य करणारा एक दृश्य हुकूमशहा म्हणजे धुकं.
                           रात्रीची धुंदी आणि दिवसाचा नवेपणा यांच्या मधलं काहीतरी. असूनही न उमगणार आणि आहे त्याबद्दल हुरहूर वाटायला लावणारं असं काहीतरी म्हणजे धुकं.
                            पहाटेला उठून रविकिरणांच्या बरोबर साऱ्या संसाराचा रथ हाकणाऱ्या, समस्त मातृ वर्गाला अलगद इतर जगाला न सांगताही मूकपणे रात्रीला पडून गेलेल्या- पर्जन्य राजा ची अलगुज सांगणाऱ्या आणि नवं सुजनाची, नवतेजया ची नांदी करणारा एक अदृश्य किमयागार म्हणजेही धुकंच.
                  धुकं -म्हणजे एखादी गोष्ट नाही तरीही तिचा आभास निर्माण करणं आणि असणाऱ्या गोष्टी विषयीचा संभ्रम वाढवणं.
                        एखाद्या  व्यक्ती विषयी वाटणारी ओढ का वाटते? हा प्रश्न मनात सतत सलत असताना त्याच क्षणी ती ओढ म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर नसून तुझ्या मनाचेच ते प्रतिबिंब आहे असं वाटायला लावणारं काहीतरी म्हणजे धुकं.
                         मनात आहे हृदयात तर भरभरून साठवून ठेवलं पण ओठातुन फुटत नाही, नजरेतून सांडत नाही. शब्दांनी पुरता असहकार केलेला आहे आणि तरीही, समोरच्याला त्याची लागलेली नुसतीच चाहूल किंवा कुणकुण असंच काहीतरी म्हणजे धुकं.
                           दोन व्यक्तींच्या भावभावनांची होणारी आंदोलन इतरांना न कळू देण्यासाठी सृष्टी निर्मिती एक सुंदर नाजूक झिरझिरीत अलवार पडदा म्हणजे ही कदाचित धुकंच.
                           दोन मनांचं एकत्र असण्याला दिलेला दुजोरा आणि त्याच वेळी त्यांचं अस्तित्व परस्पर राहून वेगळं आहे असं ठामपणे सांगणार, प्रत्येक सजीवाच्या स्वतंत्र असण्याला मान्यता देणार निसर्गचक्र म्हणजे ही कदाचित धुकं च.
                          आजूबाजूला कुणाच्यातरी असण्याच्या खाणा-खुणा, त्या अदृश्य व्यक्तिमत्वाचे होणारे आभास, आणि त्याचवेळी निर्माण होणारी संदिग्धता. एखाद्याची चाहूल लागावी, आणि कंपन निर्माण व्हावे, त्या होणाऱ्या कंपन्यांसाठी आणि येणाऱ्या तरंगां सह लई - या सर्वांमुळे निर्माण होणाऱ्या संगीतासाठी जीव बेभान व्हावा. आणि  नंतर कळावं की , अरे ही  आभासा ची मैफिल अजून सुरूच व्हायची आहे, ते वाटणं म्हणजे ही धुकंच.
                            प्रयत्नांची पराकाष्ठा करून, जिवाच रान करून, देहभान हरपून केलेल्या अथक परिश्रमाचे मोल होईल की नाही,? साध्य असलेलं ध्येय गाठता येईल की नाही? ही जी जीवाची चलबिचल असते तेच म्हणजे धुकं.
                     धुकं म्हणजे केवळ मृगजळ अतृप्त इच्छांचं प्रतिबिंब. धुक म्हणजे  नश्वर तेच अस्थिरतेचे अशाश्वत जगाचं प्रतिनिधित्व.
                धुकं म्हणजे इच्छा-आकांक्षा, मनीषा, स्पृहा आणि वंचना यांचा दृश्य अविष्कार. ज्या आहेत आपल्या मनात अवतीभवती पण दिसत मात्र नाही पकडायला गेलो तर हाती ही काहीच येत नाही आणि ह्यांच्या शिवाय आयुष्याला अर्थही पुरत नाही अशी विचित्र मनाची स्थिती.     
                     धुकं म्हणजे धूसरता एखाद्या नात्याची बंधाची नाजूक अलवार रेशीमगाठ जी सोडवतही ही नाही आणि मनात घट्ट धरून ठेवता येत नाही.
                        अबोल, अव्यक्त ,अस्वस्थ, नियती- शरणता आणि जीवाची होणारी तगमग म्हणजेच कदाचित धुकं असावं.

Circle Image

Rakhi Bhavsar Bhandekar

housewife

having 5 years experience on all india radio Akola.worked as assistant in LOKMAT SAKHI MANCH FROM 2003 TO 2005