धार्जिणं.. भाग २

कथा बदलत्या नात्यांची


धार्जिणं.. भाग २



मागील भागात आपण पाहिले की लग्न करून शहरात आलेल्या सुमेधाकडे शोभाताईंनी आपुलकीचा हात केला. आता बघू पुढे काय होते ते.


" सुमेधा, आज मी वेगळ्या प्रकारची भाजी केली आहे. येतेस का चव बघायला?" काकूंनी फोनवर विचारले.

" हो चालेल ना.." उत्साहात सुमेधा बोलून गेली. तिथेच असलेल्या मालतीताई ऐकत होत्या. फोन ठेवल्यावर सुमेधाने मालतीताईंना विचारले,

" त्या शोभाकाकूंनी बोलावले आहे. मी गेले तर चालेल का?"

" तुला जायचे आहे तर मी कशाला नको म्हणू? पण मला एक समजत नाही की ती आजकाल कशी बोलायला येते?" सुमेधा ऐकून घेत होती. मालतीताई बोलत होत्या.

" इतके वर्ष राहते आहे इथे फक्त तोंडदेखले हसणे बस.. आता तुला फोन करून वगैरे बोलवते म्हणजे?"

" ते त्यापण दिवसभर एकट्याच असतात ना.." सुमेधा बोलली.

" मुलगा आहे की तिला.."

" तो सध्या नोकरीसाठी बाहेरगावी गेला आहे ना.. काका पण ऑफिसला जातात. मग त्या येतात माझ्यासोबत." सुमेधा स्पष्टीकरण देत होती.

" इतकी वर्ष इथे राहून मला माहित नाही, ते तुला बरं माहित सगळे. कोणाचे लग्न झाले किंवा कोणी गेले की फक्त रखमाकडून समजते तेवढेच.." मालतीताई थोड्या कडवटपणेच बोलल्या. तरिही मगाशी जा म्हटलेलं सुमेधाच्या लक्षात होते. ती पटकन घरातून बाहेर पडली. काकूंनी तिच्यासाठी भाजी काढून ठेवली होती.

" कशी झाली आहे ग?" काकूंनी उत्सुकतेने विचारले.

" अगदी माझी आई करायची तशीच.. खूप दिवसात आईच्या हातचे खाल्ले नव्हते. त्याची आठवण झाली." सुमेधाच्या डोळ्यात पाणी आले.

" अग रडतेस काय त्यासाठी? कधीही वाटले की येत जा इथे. आणि एवढी आठवण येते तर जाऊन यायचे माहेरी."

" कशी जाणार मी? आईंना एकटीने बाबांचे आणि घरातले करायला नाही जमणार. बाबांना थोडे बरे वाटले की जाईन."

" तोपर्यंत या घरालाच तुझे माहेर समज." काकू प्रेमाने बोलल्या. सुमेधाला खूप आनंद झाला..

" ते तर मी मानतेच.. म्हणून तर येते सतत तुमच्याकडे."

सुमेधाने तिच्या आईला सुद्धा शोभाताईंबद्दल सांगितले. आपल्या मुलीला कोणाचा तरी आधार मिळतो आहे हे ऐकून त्यांना पण बरे वाटले. आशिष आणि त्याच्या आईबाबांना तर सुमेधा येताजाता सांगत असायची, काकूंनी हे केले आणि काकूंनी ते केले. सुमेधाच्या सासरी झालेल्या सगळ्या सणावारांना काकू घरच्यासारखं पुढे होत्या. त्यांची सुमेधावरील माया बघून सुमेधाच्या आईने दिवाळीला त्यांच्यासाठी सुद्धा सुमेधाकडे साडी पाठवली होती. सुमेधाचे दिवस खूप मजेत जात होते.

नेहमी आनंदात राहणारी, सतत काकूंबद्दल बोलणारी सुमेधा आजकाल गप्प गप्प असायची. बाहेर जाताना काकूंकडे डोकावणारी ती आजकाल घराबाहेर पडायलाच नकार देत होती. घरातल्यांना ते जाणवलेच. पण तिच्या आईने सुद्धा विचारले,

" काय ग आजकाल तू काकूंबद्दल काही सांगत नाहीस.. बोलतेस ना त्यांच्याशी?"

थातूरमातूर बोलून सुमेधाने फोन ठेवला. हे सगळे आशिष बघत होता. तो तिच्याजवळ गेला.

" काय झाले आहे सांगशील?" त्याने प्रेमाने विचारले. काही बोलण्याऐवजी सुमेधाने त्याच्या कुशीत शिरून रडायला सुरुवात केली. त्याने तिला मनसोक्त रडू दिले. रडू ओसरल्यावर सुमेधाने स्वतःच बोलायला सुरुवात केली.

" काकू मला नेहमी म्हणायच्या, हे घर तुझे माहेर समज म्हणून.. मलाही आपुलकीने वागवायच्या. पण आजकाल त्या माझ्याशी बोलतच नाही. मी दिसले तरी मान वळवतात. मी बोलायला गेले तर कारण काढून तिथून निघून जातात. खूप अपमानित वाटतं रे.. त्याहूनही जास्त काळजात कळ येते रे.. मी खूप आपलं मानले होते त्यांना.. आणि त्या अश्या वागू लागल्या आहेत.." सुमेधाने परत हुंदके द्यायला सुरुवात केली.


काकूंच्या वागण्यातून दुखावलेल्या सुमेधाला काढू शकेल का आशिष बाहेर? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all