Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

धाकटी सून (भाग ६)

Read Later
धाकटी सून (भाग ६)


राज्यस्तरीय करंडक कथामालिका
विषय-कौटुंबिक कथा

धाकटी सून (भाग ६)

पिक्चरला जाण्यावरून घरात झालेल्या धिंगाण्यानंतर सायली हेमंतने कुठे जाऊ म्हटलं की स्वतःहूनच नकार देत होती. या गोष्टींमुळे हेमंत आणि सायलीत बरेचदा खटके उडायला सुरुवात झाली होती. त्यामुळे सायली आजकाल जास्तच उदास रहायला लागली होती.


"आयुष्यात पुढे खूप शिकायचं, स्वतःचं नाव कमवायचं, छानपैकी नोकरी करून पैसे कमावयचे, स्वतःच्या पायावर उभं रहायचं… एक नाही कितीतरी स्वप्न! मोठी नाही… छोटी छोटीच स्वप्न!… तीसुद्धा पूर्ण होऊ नयेत…!" सायली स्वतःशीच बोलायची. स्वतःच्या स्वप्नांची अशी राख रांगोळी झालेली बघून सायलीचा जीव अक्षरशः गुदमरायला लागला होता. महिन्यातले ते चार दिवस तर तिला अगदी नको वाटायचे… त्या चार दिवसांत नुसतं रुममध्ये कोंडून रहाणं तिला अगदी नकोसं होत होतं. सणवार असले की ललिताबाईंचे सोवळे-ओवळे अगदी जोमात असायचे. राधाच्या मदतीने सायली सर्व शिकत होती. राधा मात्र सायलीची खूप काळजी घेत होती… एखाद्या मोठ्या बहिणीपेक्षाही जास्त तिला समजून घेत होती. राधा आणि हेमंत यांच्यामुळे सायली तिथे तग धरून होती.

असेच दिवस सरत होते. बघता बघता सायलीच्या लग्नाला सहा महीने झाले.

"आई, कसं होईल गं सगळं…? मला तर भिती वाटते… खरं सांगू, माझा ना इथे जीव घुसमटतोय… ! कधी कधी वाटतं, श्वास घ्यायलाही परवानगी घ्यावी लागणार नाही ना? घरात अगदी भाजी कोणती करायची, हे सुद्धा विचारून करावं लागतं… आपल्या आवडीची साधी भाजीही आपण खाऊ शकत नाहीत. किती स्वप्न पाहिली होती; पण इथे नवऱ्यासोबत साधं बाहेरही जाणं होत नाही. माझ्या सगळ्या मैत्रिणी आपापल्या कुटुंबासोबत मस्त हिंडतात, फिरतात, बाहेर जेवायला जातात, सिनेमाला जातात… इथे सिनेमा-नाटकाला जाणं तर सोडंच… टीव्ही वर आपल्या आवडीची मालिका बघण्याची परमिशन नाहीये." डोक्यात विचारांचा कल्लोळ घेऊन सायलीने तिच्या आईला फोन लावला होता, फोनची रिंग जात होती, पण सायलीची आई फोन उचलत नव्हती. सायलीने चार-पाच वेळा फोन केला होता पण तिकडून काही प्रतिसाद आला नव्हता. सायली थोडी काळजीतच आपल्या रुममध्ये बसली होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला.


"आईचा फोन!" सायलीने लगेच मोबाईल उचलला. आपल्या मनातली घुसमट आईसोबत बोलायची असं तिने मनाशी पक्कं ठरवलं होतं.

"आई, अगं कुठे होतीस? किती वेळची फोन करतेय… फोन का उचलत नव्हती?" सायली

" डॉक्टरांकडे गेलो होतो गं." सायलीची आई

"का गं? काय झालं? बाबांना बरंय ना?" सायलीची काळजी अजून वाढली.

"हो… त्यांना घाबरल्यासारखं होत होतं… म्हणून मग डॉक्टरांकडे जाऊन आलो." सायलीची आई

"काय म्हणाले डॉक्टर?" सायली

"बी. पी. वाढलंय… बी.पी.साठी अजून एक गोळी सुरु केली आहे. बाबांना कोणत्याच प्रकारचा ताण देऊ नका असं बोलले डॉक्टर." सायलीची आई सांगत होती. सायलीला त्यांच्या बोलण्यात थोडंसं टेंशन जाणवलं.

"आई काळजी घे गं…" सायलीने बोलून फोन ठेवला. आपल्या मनातली घुसमट तिने परत मनातच दाबून टाकली.

घरातल्या गोष्टींत सायली मन रमवायचा प्रयत्न करत होती. रोज सोनू-मनुचा अभ्यास घेऊ लागली होती. विज्ञान या विषयावर सायलीची खूप चांगली पकड होतीच. विज्ञान विषय शिकवताना सायली मात्र सगळं अधाशासारखं वाचून घ्यायची. कॉलेजमध्ये केलेली प्रॅक्टिकल्स तिच्या डोळ्यांसमोर अगदी जशीच्या तशी उभी रहायची. एक दिवस तिने हेमंतसोबत परत याच विषयावर बोलायचं असं ठरवलं कारण कितीही काही केलं तरी तिची अभ्यासाची भूक काही शमत नव्हती.

एक दिवस हेमंत संध्याकाळी ऑफिसमधून घरी आला. सायली त्याच्यासोबत एक चिकार शब्दही बोलली नाही. घरात काही झालं असेल म्हणून हेमंतनेही फारसे लक्ष दिले नाही. रात्रीची जेवणं आटोपली. राधासोबत राहिलेली आवराआवर करून सायली रुममध्ये आली. हेमंत लॅपटॉपमध्ये डोकं खूपसून बसला होता. सायली खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. खिडकीतून दिसणाऱ्या काळ्याकुट्ट अंधाराकडे सायली एकटक बघत होती. हेमंतने तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती एकदम दचकली.

"कोणी आहे का बाहेर?" हेमंत चेष्टेने बोलत होता.

"कोण असणार? जो घरात आहे, त्यालाच बोलायला वेळ नाहीये." सायली लटके रागवत बोलली.

"बोला राणीसरकार! काय म्हणता? काय आज्ञा आहे?" हेमंत

"आज्ञा! आणि जसं मी काही म्हटलं तर तू ते करणारंच आहेस…! आणि एखाद्या वेळेस तू काही करायची तयारी दाखवलीस तर जसं काही घरातून तुला त्यासाठी काही विरोधच होणार नाही!" सायली

"बोल तर तू… आपण काहीतरी मार्ग काढू…" हेमंत

"हेमंत, तुला माहितीये ना मला पुढे शिकायचं आहे… मला ना नेहमीच असं वाटतं की हे सगळं जग पुढे निघून जाईल आणि मी अशीच मागे मागे जात राहिल… मला वेळेसोबत रहायचंय… वेळेच्या मागेही नाही आणि वेळेच्या समोरही नाही जायचं." सायली

" ठीक आहे… थोडा वेळ दे… आपण काहीतरी मार्ग काढू… फक्त एक सांगेन थोडी वाट वाकडी करावी लागली तर त्याची तयारी ठेव…" हेमंत थोडं कोड्यात बोलला.
हेमंतला नेमकं काय म्हणायचंय, हे सायलीला कळलं नाही… तिने प्रश्नार्थक नजरेने हेमंतकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक तिला दिसली.

बघता बघता जून महिना लागला… धगधगत्या जमिनीला पावसाच्या सरींचा स्पर्श झाला… मातीचा हवा हवासा सुगंध सर्वत्र पसरला… खिडकीपाशी उभी राहून सायली मातीचा तो सुगंध साठवून घ्यायचा प्रयत्न करत होती… मातीच्या या सुगंधाबरोबरच तिला आठवला तो नव्या पुस्तकांचा गंध!

"हेमंत म्हणाला होता की तो काहीतरी मार्ग काढेल… पंधरा-वीस दिवस झाले त्या गोष्टीला… पण त्याविषयावर अजून हेमंत पुढे काहीच बोलला नाही… नेहमीप्रमाणे हेमंत यावेळीही वेळ तर मारून नेणार नाही ना…?" सायलीच्या मनात विचार सुरू होते.

संध्याकाळी हेमंत घरी आला. त्याने सायलीच्या हातात काही कागदपत्रे दिली.

"एन्ट्रन्स परिक्षेचा फॉर्म!" सायली कागदं चाळत बोलली.

"हो…" हेमंत

"पण हा तर एम्. बी. ए. एन्ट्रन्ससाठी आहे आणि मला मायक्रोबॉयलॉजीत एम.एस.सी. करायचंय ना…" सायली

"हो… तू सध्या या परिक्षेची तयारी कर… आणि हो… आईला यातलं काही बोलू नकोस… नाही तर ती तुझ्या अभ्यासात विघ्न आणेल उगीच!" हेमंत


"पण असं लपवून का करायचं सगळं?" सायली

"माझी आई आहे ती… आणि ती कशी आहे हे मला चांगल्याप्रकारे माहितीये… फक्त ही परिक्षा होईपर्यंतच सांगायचं नाहिये… नंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे बघू पुढचं पुढे काय आणि कसं होईल ते…" हेमंत म्हणाला.

घरात असं न विचारता, न सांगता काही करावं की नाही सायली हातात फॉर्म घेऊन याचा विचार करत बसली होती.


क्रमशः

© ® डॉ. किमया मुळावकर
टीम- नागपूर


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//