धाकटी सून (भाग ४)

कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आपली स्वप्नं पूर्ण करणाऱ्या सुनेची कथा


राज्यस्तरीय करंडक कथामालिका

विषय - कौटुंबिक कथामालिका

धाकटी सून (भाग४)

दुपारी राधा आणि सायली बोलत बसल्या होत्या. ललिताबाई भजनी मंडळात गेल्या होत्या, त्यामुळे दोघींना जरा निवांत वेळ मिळाला होता.

"राधाताई, मस्त कॉफी घेऊया का?" सायली

"मला नको अगं, तू घे तुला हवी असेल तर." राधा असं बोलली आणि सायली स्वयंपाकघरात कॉफी बनवायला गेली. तिने मस्तपैकी स्ट्राँग कॉफी बनवली आणि दोन कपात कॉफी घेऊन आली.

"ताई, हे घ्या." सायलीने राधासमोर कॉफीचा कप पकडला.

"अगं, मला कशाला केलीस? मी तर नको म्हटलं होतं ना." राधा

"घ्या हो… एकच कप कॉफी बनवली आणि ती दोन कपात आणलीये." सायलीने तिच्या हातात कप दिला.

"मस्त झालिये ग!" राधा कॉफीचा एक घोट घेत बोलली.

"राधाताई, मला माहितीये दूध संपेल म्हणून तुम्ही कॉफी घेतली नाही ना?" सायली बोलली आणि राधाने तिच्याकडे चमकून पाहिलं.

"राधाताई, अजून काय काय नियम आहेत हो सासूबाईंचे? खरंच मला सांगा तरी एकदा… माझ्यामुळे असं सतत तुम्हाला बोलणी पडलेली मला आवडत नाहीत." सायली बोलली आणि राधाने एक उसासा टाकला.

"सायली, या जहागिरदारांच्या घरात सासूबाई म्हणतील तिच पूर्व दिशा असते. घरात वाण सामानाचे किती सामान आणायचे त्यापासून दूध, दही, अगदी भाजीपाला किती आणायचा आणि कोणता आणायचा हे देखील सासूबाईच ठरवतात. पैशाचे व्यवहार देखील सासूबाईंना विचारूनच होतात. मनूच्या बाबांनी या घरात सगळ्या वस्तू घेतल्या ग आवडीने; पण त्या वस्तू वापरलेलं सासूबाईंना आवडत नाही. माझा हात मोडला होता ग काही वर्षांपूर्वी, मनू लहानच होती बघ तेव्हा… तेव्हाच यांनी घरात वॉशिंग मशीन, मिक्सर वगैरे आणलं होतं… सासूबाईंना न विचारता आणलं म्हणून त्यांना राग आला होता… न विचारता आणल्यापेक्षा आपल्या बायकोची काळजी केली याचं जास्त वाईट वाटलं त्यांना." राधा बोलत होती.

"तुला माहिती सायली, गावाकडे आपला जहागिरदारांचा मोठा वाडा आहे. पंचक्रोशित जहागिरदार घराण्याचं नाव खूप मोठं आहे. आजे सासूबाईंच्या सासूबाईंनी या घराला नियम घालून दिलेत आणि सगळं तसंच सुरु आहे बघ. नववारीतून सहावारीत आलो हाच काय तो बदल बघ." राधा बोलत होती, सायली आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होती.


"घराला शिस्तीत ठेवण्यासाठी नक्कीच नियम असावेत. पण कालानुरूप त्यात काही बदलही करायला हवा ना." सायली


"हो ग, अगदी बरोबर बोललीस तू. सासूबाईंच्या मते त्या मुलांसोबत इकडे शहरात रहायला आल्या, हा सगळ्यात मोठा बदल त्यांनी स्वीकारला आहे." राधा


"राधाताई, तुम्हाला न पटणाऱ्या गोष्टी तुम्ही कशा काय करता हो? त्रास नाही होत का? तुम्हाला कधी नोकरी करावीशी वाटली नाही का? कधी घराच्या बाहेर पडावं, असं वाटलं नाही?" सायली


"खूप वाटायचं, अजूनही वाटतं… नोकरी करणाऱ्या बायका पाहिल्या, स्वतःच्या पायावर उभ्या, स्वतःचे निर्णय स्वतः घेणाऱ्या स्त्रिया पाहिल्या की वाटतं आपणही असेच स्वतःचे पैसे कमवावेत, स्वतःवर, आपल्या मुलांवर खर्च करावेत… कधी आपल्या आईला आवडीने साडी घ्यावी, घरातही आपल्या आवडीने सामान घ्यावं… कधी आपला नवरा आणि लेकरं घेऊन आपणही फिरायला जावं… पण… " राधा बोलता बोलता थांबली, सायलीने तिचा हात हातात पकडला. राधा तिच्याकडे बघून मंद हसली.


"पण काय? बोला ना राधाताई." सायली

"माझ्या माहेरी अगदी गरीब परिस्थीती होती. माझे बाबा शेतकरी… घरचं सगळं शेतीवरच अवलंबून होतं. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी! त्यामुळे माझ्या वडिलांच्या डोक्यावर सतत कर्ज रहायचं आणि घरात खाणारे तोंड जास्तं…! आम्ही तीन बहिणी आणि दोन भाऊ… मी सगळ्यांत मोठी…! तरी बाबा सगळ्या अपत्यांना शिक्षण मिळावं म्हणून धडपडत होते. बारावी झाल्यावर मीच पुढे न शिकण्याचा निर्णय घेतला. काय करणार बाबांची ओढाताण बघवल्या जात नव्हती… मग मी घरात, शेतात आई बाबांना मदत करायचे… नंतर मग यांच स्थळ आलं, जहागिरदारांचं स्थळ चालून येणं म्हणजे मुलीचं भाग्यच उजळलं असं होतं. आई-वडिलांच्या आनंदात माझा आनंद…! पुढे मग लग्न झालं… नंतर कुठे मग शिक्षण वगैरे… सगळं सासूबाईंना विचारून करावं लागत ना… हिंमत करून एकदा मी विचारलंही होतं… त्यांनी \"घराचे दारं उघडे आहेत तू जाऊ शकते\" असं म्हटलं आणि मीच नंतर स्वतःला घरात बंद करून घेतलं." राधाचा बोलताना कंठ दाटून आला होता.

"हे खूप चांगले आहेत ग… यांच्याकडे पाहिलं की सगळं चांगलं वाटतं बघ…" राधा बोलत होती. सायली मात्र स्वतःच्याच विचारात हरवली होती.

"सायली, कुठे हरवली गं?" राधा

" काही नाही राधाताई… तुम्ही किती सहज सगळं ॲडजस्ट करता, हाच विचार करत होते." सायली

"हो! आणि बरं का सायली… हेमंत भावोजींना तू एकट्यात हेमंत म्हणत जा हवं तर… पण सासूबाईंसमोर अहो वगैरे म्हणत जा… आणि अजून एक… एवढं सगळं सांगितलं पण महत्वाचा नियम तर सांगयचाच राहिला." राधा

"अजून आहेच का?" सायली

"हो ना…आहे की…! दर महिन्याला चार दिवस वेगळं बसावं लागतं… स्वयंपाकघरात, घरात कुठेही शिवाशिव केलेली सासूबाईंना आवडत नाही. पाचव्या दिवशी त्या मग आपल्यावर गंगाजल, गोमूत्र शिंपडतात मग आपण घरात हिंडायला-फिरायला मोकळे!" राधा बोलत होती पण हे सगळं ऐकून सायलीच्या अंगावर भितीने काटा उभा राहिला.

"बापरे! आई मला सांगायची आधीच्या काळी बायकांना म्हणे चार दिवस घराबाहेर रहावं लागयचं. त्यांच्यासाठी एक वेगळी खोली असायची. खोली कसली ती! अडगळीचीच खोली असायची म्हणे… अंधूक… त्यात हवा कमी, प्रकाश कमी…! झोपायला फाटकी वाकळ आणि पांघरायलाही तसंच फाटकं काहीतरी… जे काही खायला दिलं तेच खावं लागायचं… आणि सहसा ते शिळंच असायचं… आराम नावालाच असायचा… करायला काम नाही या नावावर बायकांना ढीगभर कपडे धुवायला लागायचे… एवढी मोठी भांडी घासायला लागायची… रोजच्या कामांपेक्षा जास्तीचीच कामं असायची म्हणे… आणि घरात मुद्दाम जास्तीची कामं काढली जायची म्हणे…! सासूबाई आधीच जुनाट विचारांच्या आहेत… बापरे! आता विचारांनीच मला तर आता भिती वाटतेय." सायली विचारात हरवली होती.

\"पुढे काय होईल आणि कसं होईल?\" याच विचाराने सायलीच्या अंगावर काटा आला होता.


क्रमशः

© डॉ किमया मुळावकर
टीम- नागपूर




🎭 Series Post

View all