विषय-कौटुंबिक कथामालिका
धाकटी सून (भाग १६- अंतिम)
हेमंत आणि सायलीचं बोलणं ललिताबाईंनी ऐकलं आणि त्या हेमंतच्या रूममध्ये आल्या.
"सायली, मला माफ कर गं…!" ललिताबाई
"अहो, सासूबाई… असं काय बोलताय?" सायली
"बरोबरच बोलतेय… खरं ते मी सगळ्यांची गुन्हेगार आहे… माझ्या दोन्ही मुलांची, मुलीची, राधाची, तुझी आणि अगदी सोनू-मनूचीसुद्धा…" ललिताबाईंचा कंठ दाटून आला होता.
"आई, अगं असं का म्हणतेय? असं काहीबाही बोलू नको बरं." हेमंत बोलत होता. ललिताबाई त्याच्याजवळ पलंगावर बसल्या.
"बोलू दे हेमंत मला… सायली, मी नहाती झाले आणि माझं लग्न होऊन मी या घरात आले… काहीच कळायचं नाही ग तेव्हा… अगदीच अल्लड होते… त्यात घरात मी मोठी सून… यांच्या पाठीवर चार भाऊ होते…
घरात आज्जेसासूबाई होत्या… त्या म्हणतील तसंच घरात चालायचं… घरातल्या पुरुषांनी स्त्रीला घरात दाबून ठेवण्यापलीकडे पुरुषत्व गाजवलं नाही…पिढ्यानपिढ्या चालू असलेली शेती वाडी भरपूर होती… त्यावरच सगळं चालत होतं… या घरात आपलं वर्चस्व टिकण्यासाठी आज्जेसासूबाई माझ्या सासूबाईंना दाबून ठेवायच्या आणि सासूबाई मला आणि मी माझ्या लहान जावांना… पुढे जावा वेगळ्या झाल्या… सासूबाई माझ्याजवळ होत्या… पर्यायाने माझा सासुरवास काही संपला नाही… घरात आपल्या मनासारखं व्हावं असं नेहमी वाटायचं… पण सासूबाईंनी ते कधीच होऊ दिले नाही… हेमंतचे बाबाही त्यांचंच ऐकायचे… मग माझ्या मनाने जिद्द पकडली… सासूबाई आजारी पडल्यावर मात्र घरातली सूत्र माझ्याजवळ आली…आणि एवढ्या दिवसाचा वचपा काढल्यागत मी वागायला लागले…
मुली म्हणजे परक्याचं धन… मुली शिकून करणार तरी काय? स्त्रीची मजल ही फक्त अंगणापर्यंत… बाकी स्त्री पुरुषाशिवाय काहीच करू शकत नाही… मुळात तिने घर-दार सोडून दुसरं काहीच करू नये हेच माझ्या मनावर बिंबलं होतं… माझ्या लेकीलाही मी काही शिकू दिलं नाही… अंगावरून जबाबदारी झटकल्यासारखं मी तिचं लग्न लावून दिलं… नंतर ती सुखात आहे की नाही हे कधी विचारलं देखील नाही… वसंतच लग्न मुद्दाम कमी शिकलेल्या मुलीसोबत लावलं आणि राधा मिळलीही तशीच… गरीब गाय एकदम…! हेमंतच लग्नही मला असंच कमी शिकलेल्या मुलीसोबत लावायचं होतं… पण नशिबाने तू या घरात आलीस…
तू माझ्यावर वरचढ होऊ नये म्हणून किंबहुना तुझा आनंद तुला मिळू नये कारण मला माझा आनंद मला मिळाला नाही, माझ्या मनाप्रमाणे जगायला मिळालंच नव्हतं.. म्हणून मी किती त्रास दिला तुला… पण तू किती ग शांत आणि संयमी…!
तू शिकलेली होतीस… घराबाहेर पडून तू दुनियादारीचे खाच-खळगे ओळखले होतेस… म्हणून एवढं मोठं संकट येऊनही तू खंबीरपणे सगळं निभावलंस… खरंच स्त्रीने चूल-मूल, रांधा वाढा, उष्टी काढा या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे आणि ती असा विचार करत असेल तर तिच्या घरच्यांनी तिला नक्कीच मदत केली पाहिजे… माझ्यासारखे कुणाचे पाय नाही ओढले पाहिजे…
सायली तू होतीस म्हणून आज माझे दोन्ही मुलं मला डोळ्यांनी दिसत आहेत… तू नसती तर मी आणि राधा तर काहीच करू शकलो नसतो… किती लोकं धावून आली मदतीला… केवळ तुझ्यामुळे… जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळतो ना तेव्हा अशी साथ देणारे असले की लढायला बळ मिळतं…राधाच्या या अवस्थेला खरंतर मीच कारणीभूत आहे… तिचा प्रत्येक आनंदाचा मी गळा घोटला आणि तिच्या प्रत्येक दुःखाला मी पायदळी तुडवलं… इतकं की व्यक्त होणंच विसरली…
सर्व माझ्या कर्माची फळ आहेत; पण त्याची झळ सर्वांनाच बसतेय… देवाला फक्त एकच मागणं आहे आता… जी काही शिक्षा द्यायची ती मला दे… माझं कुटुंब मात्र सुखात ठेव…" ललिताबाई बोलता बोलता रडायला लागल्या. त्यांचं बोलणं ऐकून सायलीला देखील रडू आलं… सायली ललिताबाईंच्या जवळच उभी होती…
"माय माऊली सारखं सगळं सांभाळून घेतलंस… तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर हे सगळं सोडून कधीच गेली असती… आम्ही नुसत्या या घरातल्या सुना झालो… सासवा झालो… पण खऱ्या अर्थाने तू कर्तव्य निभावलंस… तूच आहेस या घरची \"धाकटी सून\"... " ललिताबाईंनी तिच्या कमरेला विळखा घातला.
"सासूबाई… अशीच एक मायेची मिठी राधाताईंना द्या… आणि मग बघा त्या लवकर बऱ्या होतात की नाही ते… आणि वसंत भाऊजींची काळजी करू नका… मला माहितीये ते लवकरच ठणठणीत होतील… आणि बरं का हेमंतराव लवकर बरं व्हायचंय… वर्क फ्रॉम होम करू शकतो तू… डॉक्टरने परवानगी दिलीये आणि कंपनी पण तुझी वाट बघतेय… सो लॅपटॉप घ्यायचा आणि कामाला लागायचं… खूप झाले लाड तुझे…!"सायलीच्या बोलण्याने सगळ्यांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा संचारली.
राधाचे मानसोपचाराचे सेशन्स सुरू होतेच. ती ट्रीटमेंटला अगदी चांगला प्रतिसाद देत होती. इकडे वसंतच्या तब्येतही सुधारणा होत होती. एक महिन्यानंतर तो कोमातून बाहेर आला. मेंदूला गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे त्याच्या स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम झाला होता… पण बाकी तो ठणठणीत बरा होऊन घरी आला होता. हेमंतच वर्क फ्रॉम होम सुरू होतं. त्याच्या पायाचे प्लास्टर देखील निघाले होते. आता तो बऱ्यापैकी हिंडू-फिरू शकत होता.
सायलीचा दुसऱ्यावर्षाचा निकालही उत्तम लागला होता. सगळं घर परत पूर्वपदावर येत होतं. ललिताबाई आपल्या सुनांसोबत आता अगदी खेळीमेळीने रहात होत्या. बघता बघता तीन महिने निघून गेले.
एक दिवस दुपारी सायलीच्या नावाने स्पीडपोस्ट आले. सायलीने सही करून ते घेतले, पाकीट उघडलं आणि ती त्यातलं लेटर वाचत होती.
"काय ग सायली? काय झालं? एवढा उदास का चेहरा झालाय तुझा?" ललिताबाई
"सासूबाई… ते परीक्षेच्या वेळी मी कंपनीत इंटरव्ह्यू दिला होता… एवढे दिवस त्यांच काही उत्तर नाही आलं तर मला वाटलं की माझं सिलेक्शन नसेल झालं… पण आता त्यांचं पत्र आलंय… माझं सिलेक्शन झालं आहे…" सायली
"अग, मग त्यात उदास होण्यासारखं काय आहे? चांगलंच झालं की." ललिताबाई
"सासूबाई, पण मला मुंबईच्या ऑफिसमध्ये जॉईन करायला सांगितलं आहे…" सायली
"अच्छा… असं होय…! आधी एक गोष्ट लक्षात ठेव… राधे तुही लक्षात ठेव… आता ही शेवटची चूक…! यानंतर मी खपवून घेणार नाही…! आता सासूबाई म्हटलं ते म्हटलं… यानंतर आई म्हणायचं… आणि अहो आई वगैरे नाही हां… नुसतं आई म्हणायचं… आणि सायली तू बिनधास्त मुंबईला जा… अन् जाताना या ठोकळ्यालासुद्धा घेऊन जा… मस्त राजा राणी संसार करा… म्हणजे आम्ही सगळे येऊच मध्ये त्रास द्यायला…" ललिताबाईंच्या या वाक्यावर सगळे खळखळून हसले.
"सायली… पंखात खूप बळ आहे तुझ्या… तू उंच भरारी घे.. आम्ही आहोतच सोबत…" ललिताबाईंनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
"हो आई…" सायलीपण मायेने त्यांच्या जवळ गेली.
वर्षभरानंतर-
"काय झालं आई? कोणाचा फोन होता?" सायली रूममधूनच ओरडली.
"राधाचा फोन होता, तिची परीक्षा आहे पुढच्या महिन्यात… घरी जावं लागेल मला." ललिताबाई
"हे काय! आठच तर दिवस झाले इथे येऊन!" सायली
"हो ग… पण मी तिथं असले की वसंताला दुकानाकडे लक्ष द्यायलाही मदत होते ग…आता एकदा राधा स्वतःच्या पायावर उभी राहिली ना की भरून पावलं सगळं…" ललिताबाई बोलत होत्या, तेवढ्यात सायली तिथे आली.
"हे काय गं? काय घातलं हे असलं?" ललिताबाई
"आई ते आज ट्रॅडिशनल डे आहे कंपनीत म्हणून मग सगळ्या साडी नेसून जाणार आहोत आणि मला आवडते अशी कधीतरी साडी नेसायला." सायली
"तू ना जीन्स मध्येच जास्त छान दिसतेस आणि कधी कधी तो फिट्ट स्कर्ट घालतेस ना… काय म्हणतात बाई त्याला मला माहिती नाही.. तो पण खूप छान दिसतो तुझ्यावर…" दोघी सासासुना बोलत लिफ्टमधून खाली आल्या.
"डब्बा घेतला ना? वेळेवर जेवून घे… पाणी पीत जा ग… त्या ए. सी. त कळत नाही तहान लागलेली… आणि संध्याकाळी बाहेर जायचंय जेवायला लक्षात आहे ना…" ललिताबाई
"हो आई… सगळं लक्षात आहे.. आता येते मी.. उशीर होईल… बाय…" सायली निरोप घेऊन निघाली.
"काय.. मुलगी आहे वाटतं…?" आजूबाजूच्या बायका ललिताबाईंना विचारत होत्या.
"हो मुलगीच आहे… पण तुमच्या भाषेत सांगू का… धाकटी सून…!"
पूर्णविराम!
©डॉ.किमया मुळावकर
टीम-नागपूर
टीम-नागपूर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा