Feb 22, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

धाकटी सून (भाग १२)

Read Later
धाकटी सून (भाग १२)


राज्यस्तरीय करंडक कथामालिका

विषय- कौटुंबिक कथा

धाकटी सून ( भाग १२)

एक दिवस सायली कॉलेजमधून आली. राधा छान साडी नेसून तयार झाली होती.
"सायली, आलीस होय! चल लवकर तयार हो… आपल्याला बाहेर जायचंय…" राधा

"कुठे जायचंय?" सायली

"अग त्या पलीकडच्या दळवी काकु नाहीत का… त्यांच्या सुनेचं डोहाळजेवण आहे." राधा

"तिला कशाला चल म्हणतेस? सायली तू घरीच रहा बाई… कसं आहे ना, दोन वर्षं होत आली लग्नाला अजून काही पाळणा हलला नाही… उगीच कोणी वांझोटी म्हणायचं! त्यापेक्षा तू घरीच रहा." ललिताबाई जे बोलायचं ते बरोबर बोलून गेल्या.

"हो… तसंही तिथे येऊन साड्या, दागदागिने, तुझी सून खराब, माझी सासू खराब असल्या विषयांवर चर्चा करण्यापेक्षा मी घरी राहून अभ्यास तरी करते… आणि हो…ज्यांना मी वांझोटी असेल असं वाटत असेल ना त्यांना सांगा की मी स्वतःच्या पायावर उभी राहिल्याशिवाय मूल होऊ देणार नाही…" सायली पण शेराला सव्वाशेर झाली होती.

ललिताबाईंनी नव्याने शोधून काढलेला वार फोल ठरला होता. तरी ललिताबाई सायलीला उठसूट टोमणे देत असायच्या.

सायलीच्या कॉलेजचे शेवटचे तीन महिने राहिले होते. गावाकडून पाटलांच्या मुलाची लग्नपत्रिका घरी आली होती. पाटील आणि जहागिरदारांचा आधी खूप घरोबा होता; ललिताबाईंनी सगळ्यांनी सोबतच लग्नाला जायचं फर्मान सोडलं. राधा तर खूप आनंदीत झाली होती, कितीतरी वर्षांनी तिला असं कुठेतरी बाहेर जायला मिळणार होतं. सायली मात्र शांत शांत होती.


लग्नासाठी गावाकडे जायचा दिवस जवळ येत होता. राधा ललिताबाई सांगतील तशी तयारी करत होती. ललिताबाईंनी खास ठेवणीतल्या भरजरी साड्या बाहेर काढल्या होत्या, दागदागिने काढले होते. या सगळ्यात सायली मात्र थोडी शांत होती. हेमंतने तिला विचारायचा प्रयत्न केला पण सायली काही सांगत नव्हती.

"सायली, उद्या निघायचं आहे आणि तू अजून काहीच तयारी केली नाहीस." हेमंत थोडा चिडला होता.

"हेमंत, अरे कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिशन आहे… लग्नाला आले तर प्रोजेक्ट कसा सबमिट करू? आणि आले नाही तर सासूबाईंना वाईट वाटेल… मी प्रोजेक्ट लवकर सबमिट करायचा प्रयत्न केला तर तसं जमत नाही म्हणतात कॉलेजवाले… उशीर झाला तर मार्क्स कमी होतील… काय करू? काही कळत नाहीये." सायली चिंतेत होती.

"एवढंच ना! आपण दोघे घरीच थांबू… बाकीच्या लोकांना जाऊ दे… तेवढाच आपल्याला आपला वेळ मिळेल…!" हेमंत सायलीच्या जवळ येत बोलला.

"ठीक आहे, मी तसं सांगते मग घरात…" सायली गालातल्या गालात हसतच त्याला दूर लोटत रूमच्या बाहेर गेली. हेमंतही तिच्या मागेच आला. ललिताबाईंना तिने लग्नाला न येण्याबद्दल सांगितले.

"ठीक आहे… मी थांबते तुझ्या सोबतीला… बाकीचे जातील…" ललिताबाई म्हणाल्या. सगळ्यांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं.

"त्यापेक्षा असं करा… वसंत आणि हेमंत तुम्ही दोघे जाऊन या… गावी जाणारच आहात तर थोडं शेतीचा हिशोबही बघून घ्या… राधे, तू पण थांब हो घरीच… ही काय कॉलेजमध्ये पळून जाईल… माझ्याच्याने आता घरातली कामं होत नाहीत…" ललिताबाई म्हणाल्या आणि सगळ्यांचे चेहरेच पडले.

"आई… राहू दे ना… आम्ही थांबतो घरी… तुम्ही जाऊन या सगळे." हेमंत बोलला.

"राहू दे… तसंही मला ही प्रवासाची दगदग झेपणार नाही… तुम्ही दोघे जाऊन या… आता हे ठरलं… यात कोणताच बदल नाही… कळलं?" ललिताबाई बोलल्या.

राधा बिचारी एवढूसं तोंड करून स्वयंपाकघरात निघून गेली. राधाचा चेहरा बघून सायलीला खूप अपराधी असल्यासारखं वाटलं.

"राधाताई, सॉरी माझ्यामुळे तुमचं जाणं कॅन्सल झालं…मी खूप प्रयत्न केले हो दोन्ही गोष्टी मॅनेज करायचे; पण जमलं नाही… मी अजूनही म्हणते तुम्ही, वसंत भाऊजी आणि मुलं जाऊन या… थांबा, मी सासूबाईंना म्हणते…" ती लगेच राधाची माफी मागायला तिच्या मागे गेली आणि राधाचा हात हातात घेऊन बोलू लागली.

"राहू दे सायली… तुझी परिक्षा महत्वाची आहे… मी गेले तर सासूबाई तुझ्यावर सगळं काम टाकतील… अभ्यासही व्हायचा नाही तुझा… जास्त शिकले नसले तरी परिक्षेचं महत्व कळतं मला…" राधा खिन्नपणे म्हणाली. सायली छोटंसं तोंड करून राधाला मदत करत होती.


दुसऱ्यादिवशी सकाळीच वसंत आणि हेमंत कारने निघाले. इकडे सायलीचं कॉलेजमध्ये सबमिशन होतं, तिची त्यासाठी धावपळ सुरू होती. नेहमीप्रमाणे आपल्या मनातल्या इच्छा मारून राधा हसतमुखाने घरातले सर्व कामं करत होती.


वसंत आणि हेमंत दोघे गावी पोहोचले. वाड्याचं डागडुजीचं बरंच काम करायचं होतं. त्यांनी गड्याच्या मदतीने त्या कामासाठी माणसं बघून कामाला सुरुवात करून घेतली. खूप दिवसांत शेतीकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम म्हणून की काय, त्यांच्या शेतीवर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी बांध टाकून त्यांची बरीच जमीन बळकावली होती. या सगळ्या प्रकारात कायद्याने त्या लोकांना उत्तर द्यायचं असं त्यांनी ठरवलं. नंतर त्या दोघांनी लग्नसोहळ्याला हजेरी लावली. गावातली बरीच जुनी आणि प्रतिष्ठित मंडळी भेटली. त्यांच्यासोबत बोलून, लहानपणीच्या आठवणींना उजाळा देऊन दोघे परतीच्या प्रवासाला निघाले.

दोघे निघाले तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. रात्री दहापर्यंत दोघे घरी पोहोचतील असा अंदाज होता. आठ वाजताच्या दरम्यान दोघे एका धाब्यावर जेवण्यासाठी थांबले. हेमंतने सायलीला जेवण करून येतोय म्हणून फोन केला. बाकी घरातली विचारपूस करून त्याने फोन ठेवला. दोघे भाऊ शांतपणे जेवण करून अगदी रमत-गमत घरी येण्यासाठी निघाले होते. येताना शेतीच काम कसं करायचं याबद्दल दोघांची चर्चा सुरू होती.

इकडे सायली, राधा नेहमीप्रमाणे सर्व आटोपून दोघांची वाट बघत बसल्या होत्या. राधाचे दोन्ही मुलं अभ्यास करून झोपली होती. ललिताबाई तिथेच बसून टी. व्ही. बघत होत्या. साडे दहाच्या दरम्यान सायलीने परत हेमंतला फोन केला. अर्ध्या-पाऊण तासात पोहोचतो असं त्याने सांगितलं.

सायली आणि राधा वाट बघतच होत्या. साडे अकरा होऊन गेले होते तरी दोघांचा अजून पत्ता नव्हता. आता सायलीला मात्र बेचैनी वाटत होती.

"राधाताई, अर्ध्या-पाऊण तासात येतो म्हटले होते… दोघे अजून आले नाहीत." सायलीने काळजीने राधासोबत बोलत होती.

"येतील गं… रस्ते खराब असतील म्हणून वेळ लागत असेल. सावकाश येत असतील." राधाने तिची समजूत काढली. सायलीने राधाच्या बोलण्याला होकार भरला; पण तिचं सगळं लक्ष गेटच्या आवाजाकडे होतं. बारा वाजत आले होते, सायलीने घड्याळाकडे पाहिलं.

"आता मी झोपायला जाते…" असं म्हणत ललिताबाई तिथून उठल्या, तोच सायलीचा फोन वाजला.

"हेमंतचा फोन!" सायलीने घाईघाईने फोन उचलला. ललिताबाई तिथेच थांबल्या. सायली फोनवर बोलत होती, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते, बोलता बोलता तिच्या कंठातून आवाज फुटत नव्हता, सायलीला दरदरून घाम फुटला आणि सायली मटकन सोफ्यावर बसली. राधा धावतच तिच्याजवळ गेली.

"सायली… काय झालं? भाऊजींचा फोन होता ना….? बोलशील का काही….?काय झालं…?" राधा तिला गदागदा हलवत होती, सायली मात्र एकदम स्तब्ध झाली होती, तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता…


क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर
टीम-नागपूर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//