Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

धाकटी सून (भाग १०)

Read Later
धाकटी सून (भाग १०)


राज्यस्तरीय करंडक कथामालिका

विषय- कौटुंबिक कथामालिका

धाकटी सून (भाग १०)

ललिताबाई आणि सायलीमध्ये जणू शीत युद्ध सुरू झालं होतं. ललिताबाईंनी जाणीवपूर्वक सायलीला त्रास देणं सुरू केलं होतं. तिने कोणतंही काम केलं की त्या मुद्दाम त्यात त्रुटी शोधायच्या, उठता बसता तिला टोमणे मारणं, सतत शिकलेल्या बायका, नोकरी करणाऱ्या बायका कशा घराकडे दुर्लक्ष करतात असं काहीबाही बोलंत राहायच्या. सायलीला खूप वाईट वाटायचं; पण या सर्व गोष्टींकडे ती दुर्लक्ष करायला शिकत होती.

बघता बघता सायलीचा रिझल्ट लागला. सायली उत्तम गुण घेऊन परीक्षेत पास झाली होती.

"अभिनंदन सायली! किती चांगले मार्क्स पडले ग तुला! खरंच हुशार आहेस खूप! मला काय वाटतं सायली, महाराष्ट्रातल्या कोणत्याही चांगल्या कॉलेजमध्ये तुझा नंबर अगदी सहज लागेल. तू घरापासून दूर कुठेतरी ऍडमिशन घेऊन टाक. इथं राहून शिकणं खरंच सोपं नाहीये. तू परिक्षा देऊन आली तेव्हापासून बघतोय, आई तुला किती खराब वागणूक देतेय. माझ्यासोबत लग्न झालं आणि तुझ्या हुशारीची मातीच झाली म्हणावी लागेल… म्हणून म्हणतोय, तू या घरापासून दूरच रहा. आठवड्यातून एकदा मी येत जाईल तुला भेटायला आणि भविष्यात तुला जिथे नोकरी लागेल, मी पण तिकडेच माझी बदली करून घेईल" हेमंत बोलत होता. त्याच्या बोलण्यात काळजी, प्रेम, अपराधीपणाची भावना सगळंच दिसत होतं.

"हेमंत, ही लढाई फक्त माझीच नाहीये. ही लढाई या घरातल्या सुनेची आहे. मी काय किंवा राधाताई काय… या घरात जो सासू नावाचा बागुलबुवा तयार केलेला आहे ना, मला त्यालाच पळवून लावायचं आहे. येणाऱ्या पिढीसाठी एक खेळीमेळीचं वातावरण तयार करायचं आहे. तू बघ एक दिवस येईल आणि सासूबाईंना माझे विचार पटतील." सायलीने हेमंतचा हात हातात घेतला.

सायलीने घरापासून जवळच असलेल्या कॉलेजमध्येच ऍडमिशन घ्यायचा निर्णय घेतला. ऍडमिशन घ्यायला जायचं त्या दिवशी सकाळीच सायलीने घरात सर्वांना ही गोष्ट सांगितली. ते ऐकून ललिताबाईंच्या अंगाचा अगदी तिळपापड झाला.

"किती धूळ बसलीये डब्यांवर! चिकट लागताय हाताला! आता तर काय कोणाला डब्बे साफ करा म्हणायची सोयच राहिली नाही, आपल्यालाच सवय करून घ्यावी लागेल आता असे घाणेरडे डब्बे हाताळायची! घरातल्या बाईलाच पाय फुटले की हे असंच होणार." ललिताबाई जाणीवपूर्वक स्वयंपाकघरातले डब्बे उचकत बोलत होत्या. सायलीने कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं म्हणजे आपला पराभव हीच गोष्ट त्यांच्या डोक्यात अगदी पक्की रुजली होती आणि ती हार त्या स्वीकारायला तयार नव्हत्या. त्यांच्या मनातला त्रागा काढाण्यासाठी त्या एक एक कारण शोधून काढत होत्या.

"सासूबाई, आताच मागच्या आठवड्यात तर धुवून पुसून ठेवले होते सगळे." सायली राग गिळत बोलली.

"सगळं आवरून झालं की दुपारच्या वेळी मी पुसून घेते डब्बे." राधा सायलीचं वाक्य तोडत थोडी घाबरत बोलली.

"तुला सांगितले मी डब्बे साफ करायला…" ललिताबाई राधावर खेकसल्या.

"सासूबाई, उद्या करते मी… आज कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करून घेते… लगेच उद्यापासून कोणतं कॉलेज सुरू होणार आहे." सायली

"बघा…!बरोबर आता असेच कामं टाळणार…!" ललिताबाई अजूनच चिडल्या. राधा पुढे बोलायला जाणार तेवढ्यात सायलीने तिला अडवलं. घड्याळात पाहिलं, नऊ वाजत आले होते. तिने भराभर डब्ब्यांमधलं सामान दुसऱ्या भांड्यांमध्ये रिकामं केलं आणि पटापट डब्बे घासून घेतले. मागच्या अंगणात थोडे आडोशाला ठेवले.

"राधाताई, दुपारी परत आले की पुन्हा सामान भरून ठेवते." असं म्हणून सायली कॉलेजच्या तयारीला लागली. छानसा कॉटनचा ड्रेस घालून सायली तयार झाली आणि कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघाली.

"सायली, पटकन दोन घास खाऊन घे. अशी उपाशी पोटी जाऊ नकोस." राधा पोट तिडकीने म्हणाली.

"नको राधाताई, आधीच खूप उशीर झालाय… बँकेतही जायचंय, हेमंतने कालच डी डी काढायसाठी दिला होता, तो घेऊन कॉलेजमध्ये जाते." सायली बोलत बोलतच अंगणात आली आणि घराबाहेर पडली. जाताना तिने बँकेतून डी डी घेतला आणि कॉलेजमध्ये गेली. तिथे गेल्यावर कळलं की डी डी चुकलाय, सायली परत बँकेत गेली. डी डी साठी परत अर्ज लिहिला. बँक मॅनेजर हेमंतचा मित्र असल्याने तिचं काम थोडं लवकर झालं. सायली परत कॉलेजमध्ये गेली, या धावपळीत सायली थोडी पावसात भिजली. सकाळच्या घाईत सायली छत्री घरीच विसरली होती.

संध्याकाळी साडेपाच वाजता सायली घरी पोहोचली. दिवसभराच्या दगदगीने खरंतर दमली होती; पण ऍडमिशन झालीये हा आनंद सगळा थकवा कमी करत होता. सायली पटकन फ्रेश झाली. तिला सकाळी डब्बे घासून ठेवलेलं आठवलं आणि ती धावत मागच्या अंगणात गेली. राधाही सायलीच्या मागेच गेली.

"हे काय ग सायली, तू तर डब्बे इथे ठेवले होतेस ना. इथे… या आडोशाला पाऊस देखील लागत नाही." राधा बोलंत होती. सायलीने आडोशाला वाळू घातलेले डब्बे कोणीतरी अंगणात नेऊन ठेवले होते… पावसाच्या पाण्याने ते डब्बे ओले झाले होते त्याचबरोबर आजूबाजूचा चिख्खलही डब्यांवर उडाला होता.


"माफ कर ग सायली, दुपारी पाऊस आला तरी मी येऊन नाही पाहिलं… मला नव्हतं वाटलं की असं काही होईल… आण इकडे, मी घासते, तू धुवून घे." राधा

"राहू द्या राधाताई… मला माहितीये डब्यांना पाय कसे फुटले ते! ही अडथळ्यांची शर्यत माझी आहे आणि मीच ती पूर्ण करेल." असं म्हणत सायलीने परत डब्बे घासले, थोडे सुकल्यावर चांगल्या कोरड्या कपड्याने पुसून, त्यात सामान भरून ठेवलं. रात्रीची जेवणानंतरची आवराआवर करून सायली कॉलेजची माहिती पुस्तिका वाचत बसली. वाचता वाचता सायली एका मुद्द्यावर येऊन थांबली आणि तिचे डोळेच विस्फारले…

"कॉलेजचा युनिफॉर्म ब्ल्यू जीन्स आणि व्हाईट टी-शर्ट! देवा…! काय रे हे…! आता रोज सासूबाईंना बोलायला मुद्दा तयार मिळाला!" सायली पुढचा सगळा विचार करून अगदी स्तब्ध झाली होती.

क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर
टीम- नागपूरईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//