"अनु, सार्थकच्या घरी असं का म्हणालीस? सुधा काकूंनी खरचं सार्थकच दुसऱ्या मुलीशी लग्न लावून दिलं तर!" नेहाने चिडत विचारलं
"तर मला आनंदच होईल." डोळ्यातले अश्रू लपवत हसत अनुश्री म्हणाली
"हो, मग हे माझ्या डोळ्यांत बघून बोल." नेहाने अनुश्रीची व्हीलचेअर स्वतःकडे वळवली, तसे अनुश्रीने पटकन डोळे पुसले
"का लपवतेयस अश्रू? अनु, सुधा काकूंनी सार्थकसाठी दुसऱ्या मुलीचा विचार केला, तर तुला एवढा त्रास होतोय. उद्या खरचं त्यांनी सार्थकच दुसर लग्न लावलं, तर तू जगू शकणार आहेस का त्याच्याशिवाय?" नेहाने विचारलं
"मी पुढचा विचार केला नाहीय अजून." अनुश्री बोलणं टाळत म्हणाली
"मग कर. त्या सुधा काकूंना काय झालंय? लग्न ठरल्यापासून तू लाडकी सून झालेलीस ना त्यांची, मग तुझ्या ऍक्सीडेंटमुळे अचानक सगळं बदललं." नेहा रागाने बोलली
"काय चुकल त्यांचं! सार्थक, एकुलता एक मुलगा आहे त्यांचा. होणाऱ्या सूनेकडून त्यांच्याही अपेक्षा असतील आणि मी त्या कितपत पूर्ण करू शकेन मला माहिती नाही किंवा पूर्ण करू शकेन का हेही माहिती नाही. असं असताना त्यांनी सार्थकचं दुसर लग्न करण्याचा निर्णय घेतला, तर बिघडलं कुठे? नेहा कुठलीच आई आपल्या मुलांबाबतीत चुकीचा निर्णय घेतं नाही." अनुश्री बोलली
"येऊ का?" मागून आवाज आला, तसं नेहा आणि अनुश्रीने मागे वळून पाहिलं. सुधा ताई, सार्थक आणि श्यामराव आलेले.
"काका-काकू याना.(नेहाकडे बघत)पाणी आण." अनुश्री व्हील चेअरवरची चाकं पुढे ढकलत त्यांच्या जवळ गेली
"काही नाही, सार्थकच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलेले. ही घे." सुधा ताईंनी अनुश्रीसमोर पत्रिका धरली, तसं थरथरत्या हाताने अनुश्रीने पत्रिका हातात घेतली आणि एक नजर सार्थककडे पाहिलं. त्याचा चेहरा निर्विकार होता.
"काकू कधी आहे लग्न?" नेहाने विचारलं
"पत्रिकेत सगळं सविस्तर दिलंय." सुधा ताई म्हणाल्या, तसं अनुश्रीने धडधडत्या हृदयाने पत्रिका उघडली.
"चि. सार्थक आणि चि. सौ. का. अनुश्री." तिला मुलीच्या जागी तिचंच नाव दिसलं. नेहा तिच्या हातातून पत्रिका घेतं बघू लागली.
"पत्रिकेवरच नाव चुकलंय का?" अनुश्रीने चाचरत विचारलं
"नाही ग, ज्या मुलीशी लग्न ठरलंय तिचंच नाव आहे." सुधा ताई
"काकू, पत्रिकेवरती माझं नाव आहे." अनुश्री गोंधळून बोलली, तश्या सुधा ताई जागेवरून उठल्या आणि अनुश्रीजवळ आल्या.
"अनुश्री, मला माफ कर. त्यादिवशी रागाच्या भरात तुझ्या अधू झालेल्या पायांविषयी मी खूप वाईट बोलले, पण हे तू स्वतःहून ओढून घेतलेलं नाहीयेस. मी दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन चुकीचा निर्णय घेत होते, पण ह्यात माझ्या मुलाचा आनंद आहे का? ह्याचा विचारच केला नाही. आज सगळ्यांसमोर मी तुला माझ्या मुलासाठी लग्नाची मागणी घालतेय. माझ्या मुलाशी लग्न करशील?" सुधा ताईंनी अपेक्षेने विचारलं, तशी अनुश्री त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागली. एक नजर तिने सार्थककडे पाहिलं. तो हसून तिच्याकडे पाहत होता. तशी अनुश्री रडायला लागताच सुधा ताईंनी पुढे येऊन तिला मिठीत घेतलं.
"चला, तोंड गोड करा." अलका ताईंनी खोबऱ्याच्या वड्यांनी सगळ्यांचं तोंड केलं
"म्हणजे तुम्हां सगळ्यांना आधीपासूनच हे सगळं माहिती होतं?" अनुश्रीने आश्चर्याने विचारलं, तसे सगळे हसू लागले.
****
अनुश्री पूर्ण रिकव्हर झाल्यावर महिन्याभराने दोघांचं लग्न होऊन अनुश्रीने तिच्या सासरच्या घरात गृहप्रवेश केला. तिच्या प्रेमाने ती पुन्हा एकदा सुधा ताईंची लाडकी सून झाली.
****
वर्तमानकाळ..
अनुश्री भूतकाळातल्या आठवणींत रमलेली असतानाच हॉर्नच्या आवाजाने भानावर आली आणि आजूबाजूला व मागे बघू लागली.
"आई, उतरली केव्हाच पण तू एवढी कशात हरवलेलीस?" सार्थकने विचारलं
"भूतकाळातल्या आठवणींना उजाळा देतं होते." अनुश्री
"अच्छा, मग आता वर्तमानात येऊन वटपौर्णिमेची पूजा करायला चला." सार्थक सीट बेल्ट काढत म्हणाला, सार्थक गाडीतून उतरला आणि गाडीच्या डिक्कीतून अनुश्रीची व्हिलचेअर बाहेर काढली आणि तिला गाडीतून उतरवून व्हिलचेअरवर बसवलं आणि देवळांत घेऊन गेला.
तिथे सुधा ताई दोघांची वाट पाहत होत्या. दोघांनी दर्शन घेतलं आणि बाहेर आले. अनुश्रीने एक नजर वडाच्या झाडाभोवती खाली बघितलं, खालची जमीन खडबडीत असल्याने तिथे व्हिलचेअर घेऊन जाणं शक्य नव्हतं. अनुश्रीने वाणाच सूप सार्थकच्या हातात देतं उठायचा प्रयत्न केला पण व्यर्थ ठरला.
"तुझे सगळे प्रयत्न करून झाले की, मला सांग. मी आहे ऊभा इथेच." एवढ्या वेळापासून तिची चाललेली धडपड बघत असलेला सार्थक हाताची घडी घालून म्हणाला, तसं अनुश्रीने ईवलस तोंड करून त्याच्याकडे पाहिलं आणि स्वस्थ बसून राहिली. सुधा ताईंनी गालात हसत वाणाचं सूप अनुश्रीच्या हातात दिलं आणि त्या पूजा करायला निघून गेल्या. सार्थकने तिला दोन्ही हातांवर उचललं आणि वडाच्या झाडाच्या दिशेने चालू लागला, तशी अनुश्री आधी आश्चर्याने व नंतर प्रेमाने त्याच्याकडे बघू लागली.
तो वडाच्या झाडाजवळ पोहचताच सगळ्या बायका दोघांकडे बघू लागल्या. काहींच्या चेहऱ्यावर हसू होतं, तर काहींच्या चेहऱ्यावर हा काय फाजिलपणा चालवलाय असे भाव होते. तर काही बायका दोघांचं कौतुक करत होत्या. सगळ्या बायका आपल्याकडेच पाहतायत, हे पाहून अनुश्रीला लाज वाटत होती.
सार्थक एकाजागी थांबला, तसं अनुश्रीने पूजा केली आणि वडाभोवती धागा गुंडाळून सार्थकच्या साथीने फेऱ्या मारल्या. सुधा ताई लेक आणि सुनेकडे कौतुकाने पाहत होत्या. फेऱ्या मारून झाल्यावर सार्थकने अनुश्रीला पुन्हा व्हिल चेअरवर बसवलं, तसं अनुश्रीने सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावून वाण दिलं.
"भाग्यवान आहेस हो. जो असा नवरा मिळाला." वाण घेताना एक वयस्कर आजी म्हणाल्या, तशी अनुश्री कौतुकाने सार्थककडे बघू लागली. दोघींचं सगळ्यांना वाण देऊन झाल्यावर तिघेजण घरी परतले. दोघींना घरी सोडून सार्थक साईट व्हिजीटसाठी गेला आणि लगेच घरी आला. रात्री बारानंतर अनुश्रीने सार्थकच्या हातून पाणी पिऊन उपवास सोडला.
"अनुश्री, तू सुद्धा त्याला पाणी पाज. जन्मोजन्मी तुच बायको मिळावी म्हणून त्यानेही आज निर्जळी उपवास केलाय." सुधा ताई हसत म्हणाल्या, तसं अनुश्रीने लाजतच त्याला पाणी पाजलं.
****
"अहो, कुठे घेऊन जाताय मला? तेही असं डोळे बंद करून." डोळ्यांवरच्या पट्टीवर हात ठेवून अनुश्री म्हणाली
"कळेलच काहीवेळात!" सार्थकने असं म्हणून त्याने एका ठिकाणी गाडी थांबवली आणि अनुश्रीला उचलून घेतलं.
"अहो, पडेन ना मी." डोळ्यांवर पट्टी असल्याने अनुश्री घाबरत म्हणाली
"मी बर तुला पडू देईन." अनुश्रीला मिठीत घेत सार्थक म्हणाला, तशी अनुश्री लाजली. त्याने तिला व्हिल चेअरवर बसवलं आणि तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढली, तसं तिने समोर पाहिलं.
"सरप्राईज!" नितीन आणि नेहा एकसाथ म्हणाले आणि बाजूला झाले आणि तिला समोरचा बोर्ड दिसला. 'नेहश्री शिकवणी वर्ग' तसं तिने सार्थककडे पाहिलं.
"तुला मुलांच्या शिकवणीसाठी जागेची गरज होती ना." सार्थक तिच्या हातात चावी देतं म्हणाला
अनुश्रीने एक नजर आजूबाजूला पाहिलं. तिने जसं सांगितलेलं, अगदी तसाच आजूबाजूचा परिसर होता. अंगणात रंगीबेरंगी फुलांची झाडं, मोकळी हवा आणि सुटसुटीत जागा ते सगळं पाहून अनुश्री भारावून गेली. नेहाने तिला संपूर्ण शिकवणी वर्ग दाखवला.
"थँक्यू सो मच! खूप छान आहे शिकवणी वर्ग आणि नाव सुद्धा" अनुश्री
"नावाची आयडिया नितीनची होती." सार्थक म्हणाला, तसं अनुश्रीने त्याच्याकडे हसून पाहिले. नेहा आणि नितीन दुसरीकडे गेले.
"सार्थक, खाली वाका ना." अनुश्री
"का? गालाला काही लागलय का?" सार्थक गाल पुसत विचारलं
"वाका तर..," अनुश्रीने असं म्हणताच सार्थक खाली वाकला, तसं अनुश्रीने त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि त्याला मिठी मारली
"बायको, मिठी अशी नाहीतर तर अशी मारायची असते." सार्थकने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं, तशी ती त्याच्या मिठीत विसावली.
समाप्त_
✍️नम्रता जांभवडेकर
(कथा कशी वाटली नक्की कळवा)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा