Login

धागे मनाचे (भाग - ४)

अनुश्री आणि सार्थकच्या प्रेमाची गोष्ट
सार्थक नितीन सोबत सिटी हॉस्पिटलमध्ये पोहचला. तिथल्या बाकड्यावर नेहा आणि अलका ताई बसलेल्या. सार्थकने त्यांच्याजवळ जाऊन अनुश्रीबद्दल विचारलं, तसं नेहाने समोरच्या स्पेशल वॉर्डकडे बोटं केलं. तसा सार्थक काचेतून आत बघू लागला.

अनुश्रीच्या एका हाताला पल्स मशीन, तर दुसऱ्या हाताला सलाईन लावलेलं. तोंडाला ऑक्सिजन मास्क लावला होता आणि दोन्ही पायांना प्लास्टर केलं होतं. तिची अशी अवस्था सार्थकला बघवली नाही. त्याचा तोल जाणार तेवढ्यात, नितीनने त्याला सावरलं आणि बाकड्यावर बसवलं.

"कसं झालं हे सगळं?" सार्थक बोलायच्या मनःस्थितीत नसल्याने नितीनने नेहाला विचारलं, तसं नेहाने दोघांना सगळं सांगितलं.

"डॉक्टर, लवकर चला. पेशंटला शुद्ध आली." वॉर्डमध्ये असलेली नर्स धावतच बाहेर येऊन म्हणाली. तसे डॉक्टर लगेच तिच्या वॉर्डमध्ये गेले, तर बाहेरच्या काचेतून सगळे पाहू लागले.

अनुश्रीला शुद्ध येताच ती उठायचं प्रयत्न करू लागली, पण काही केल्या तिला उठता येईना.

"डॉक्टर, माझे पाय हलत नाहीयेत." अनुश्री घाबरत म्हणाली, तसे डॉक्टरांनी तिचे दोन्ही पाय तपासले आणि एक क्षण अनुश्रीकडे बघून उसासा सोडला. डॉक्टर काहीचं बोलत नाही, हे पाहून अनुश्री हायपर झाली.

"डॉक्टर, सांगाना. माझ्या पायांची हालचाल का होतं नाहीय?" अनुश्री हायपर होऊन तिला दम लागला. तसे बाहेर उपस्थित असलेले सगळे घाबरले. अलका ताई आतमध्ये गेल्या. अलका ताईंनी आलेलं पाहून अनुश्री रडू लागली

"आई, मला माझ्या दोन्ही पायांची काहीचं हालचाल जाणवत नाहीय." अनुश्री रडकुंडीला येतं म्हणाली

"तुम्ही प्लिज बाहेर थांबा. (अलका ताईंकडे पाहत) सिस्टर इंजेक्शन आणा. क्विक!" डॉक्टर घाईने म्हणाले, इंजेक्शन देताच अनुश्री बेशुद्ध झाली.

****

"डॉक्टर, अनुश्रीच्या पायांची हालचाल का होतं नाहीय?" सार्थक

"मिस्टर. सार्थक, ज्याची भिती होती तेचं झालं. गाडीने अनुश्रीला जेव्हा धडक दिल्याने त्यांच्या दोन्ही पायांना जब्बर मार लागला आणि त्यामुळे त्यांचे दोन्ही पाय ढोपरापासून तळपायापर्यंत पूर्ण अधू झालेत." डॉक्टर शांतपणे म्हणाले, तसा सार्थकला धक्काच बसला.

"डॉक्टर, हे काय बोलताय तुम्ही? पुढच्या आठवड्यात लग्न आहे आमचं." सार्थक म्हणाला

"मिस्टर. सार्थक, मी तुमची अवस्था समजू शकतो. आता तुम्हाला धीट राहावं लागेल. अनुश्रीसाठी हे सगळं पचवण खूप अवघड असेल. तुम्हालाच त्यांना सावरायचय." डॉक्टरांनी सार्थकला धीर दिला

सार्थक डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडला. नितीन सोबत होताच! सार्थकने एक नजर स्पेशल वॉर्डच्या काचेतून आत पाहिलं, अनुश्री शांत झोपलेली. सार्थक तसाच बाकड्यावर बसला. नितीनने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

"नितीन, हे काय होऊन बसलं रे? (रडवेल्या स्वरात) सगळी चूक माझीच आहे. मीच तिला शाळा सुटल्यावर थांबायला सांगितलं. ती जर शाळा सुटल्यावर घरी गेली, असती तर असं काही झालच नसतं. माझ्यामुळे झालंय सगळं." सार्थक स्वतःला दोष देऊ लागला.

"सार्थक, वेडा आहेस का तू? तुला कुठे माहिती होत, हे सगळं अस होईल म्हणून आणि ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. जी गोष्ट झालीय त्यावर बोलण्यापेक्षा अनुश्रीला ह्याबद्दल कसं सांगायचं ह्याचा विचार कर." नितीन म्हणाला आणि सार्थक त्याच्याकडे बघू लागला.

तेवढ्यात, श्यामराव आणि सुधा ताई हॉस्पिटलमध्ये आल्या. श्यामरावांना बघताच सार्थकला राहवलं नाही. तो श्याम रावांच्या मिठीत रडू लागला. श्याम रावांनी त्याला शांत होऊ दिलं.

"अनुश्री, कशी आहे आता?" सुधा ताईंनी विचारलं

"ऍक्सीडेंटमध्ये अनुश्रीच्या दोन्ही पायांना जब्बर मार लागल्यामुळे तिचे दोन्ही पाय कायमचे अधू झालेत." सार्थक म्हणाला, तसा श्यामराव आणि सुधा ताईंना धक्काच बसला.

"अरे पण त्यावर काही ट्रिटमेंट असेल ना?" श्यामरावांनी विचारलं, तशी सार्थकने रडतच "नाही" मध्ये मान हलवली

त्याचवेळी सार्थकच्या सांगण्यावरून चहा पिण्यासाठी खालच्या कॅन्टीनमध्ये अलका ताईंना घेऊन गेलेली नेहा परतली, तसे तिघेही शांत झाले.

शुद्धीवर आल्यावर डॉक्टरांनी तिला खर काय ते सांगितलं, तशी अनुश्री मनातून पूर्णपणे खचली. ती कोणाशीच बोलत नव्हती. सार्थककडे तर पाहायला सुद्धा तयार नव्हती.

****

आठवड्याभराने अनुश्रीला डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जच्यावेळी सगळे उपस्थित होते, तसं सार्थकने तिच्यासाठी व्हिलचेअर आणली आणि त्यावर तिला बसवलं.

"सुधा ताई, अनुश्री पूर्ण बरी झाली की, आपण ह्या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढू." अलका ताई म्हणाल्या, तसं सुधा ताईंनी एक नजर व्हील चेअरवर स्वतःमध्ये हरवलेल्या अनुश्रीकडे पाहिलं आणि बाहेर निघून गेल्या. तसं अनुश्रीने पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं.

"मी आलोच!" श्यामराव सुद्धा त्यांच्या मागोमाग गेले.

"अनुश्री, चल. टेरेसवरची फुलझाडं वाट पाहतायत तुझी. स्पेशली गुलाबाचे झाडं!" सार्थक तिच्याकडे बघून हसत म्हणाला, पण अनुश्रीच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही.

****

"आई, अलका काकूंनी लग्नाचा विषय काढल्यावर तू तिथून निघून का गेलीस?" सार्थकने विचारलं

"हॉस्पिटलमध्ये गर्दी नको म्हणून निघून आले." सुधा ताई

"हॉस्पिटलमध्ये गर्दी नको म्हणून की, लग्नाचा विषय टाळला जावा म्हणून." सार्थकने असं म्हणताच, सुधा ताई त्याच्याकडे बघू लागल्या

"तूच विषय काढलायस म्हणून सांगते, सार्थक मला वाटतं तू हे लग्न करू नये." सुधा ताई म्हणाल्या, तसं सार्थक त्यांच्याकडे बघतच राहिला.

"सुधा, अग हे काय बोलतेस तू? पुढच्या आठवड्यात लग्न होणार होतं त्यांचं जे आपण पुढे ढकलल आणि आता तू त्याला लग्नच करू नये, असं का म्हणतेस. सार्थकच्या पाहण्याचा कार्यक्रम होण्या आधीपासून अनुश्री तुला सून म्हणून आवडलेली ना, मग आता अचानक काय झालं?" श्यामराव सुद्धा चकित झाले.

"तेचं म्हणतेय मी! आधीची गोष्ट वेगळी होती. आता तसं राहिलं नाहीय. जिथे अनुश्री स्वतः दोन पायांवर धड उभी राहू शकत नाही, तिथे ती माझ्या मुलाचा संसार काय सांभाळणार." सुधा ताई म्हणाल्या

"आणि असं कोण म्हणालं, साधना मावशी का?" सार्थकने विचारतच, सुधा ताई त्याच्याकडे बघू लागल्या.

"अनुश्रीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचं सांगण्यासाठी तू जेव्हा साधना मावशीला फोन केलेलास ना, तेव्हा तुझं फोन स्पिकरवर असल्यामुळे तुमचं सगळं बोलणं मी ऐकलं. अनुश्री नाही म्हणून काय झालं हिच्यासारख्या छप्पन मुली मिळतील त्याला लग्नासाठी असच म्हणाली ना साधना मावशी." सार्थक

"तू फोनवरच बोलण ऐकून सुद्धा तुला अनुश्रीशी लग्न करायचय. अरे खरचं तुला अनुश्रीपेक्षा चांगली मुलगी मिळेल. मी स्वतः शोधेन." सुधा ताई म्हणाल्या, तसा सार्थक उपहासात्मक हसला.

"आई, खरचं मला तुझ्या बोलण्यावर हसावं की रडाव तेचं कळत नाहीय. तू माझ्यासाठी अनुश्रीपेक्षा चांगली मुलगी शोधू शकतेस, पण अनुश्री तुला सून म्हणून नकोय. मला कीव येते ग तुझ्या विचारांची. पाय अधू झाले अनुश्रीचे पण तू तर विचारांनी अधू आहेस." सार्थक पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला

"सार्थक.." सुधा ताई मोठ्या आवाजात म्हणाल्या.

"आई, मी तुला शेवटचं सांगतोय. मी लग्न केलं तर अनुश्रीशीच करेन नाहीतर आयुष्यभर असाच राहीन." सार्थक म्हणाला आणि मागे वळला, तर मागे नेहा आणि व्हील चेअरवर बसलेली अनुश्री होती. जिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले. कधीही त्यातून अश्रू बाहेर पडतील, अशी अवस्था होती.

"अनु, तू इथे?" सार्थकने तिच्याजवळ जातं विचारलं

"माझी फाईल घ्यायला आलेले." अनुश्री डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली, तसं सार्थकने तिला फाईल आणून दिली.

"सार्थक, आपल लग्न होणार होत भूतकाळ झाला तो. आता माझ्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य बरबाद करू नका. सुधा काकू म्हणतायत, ते बरोबर आहे. एखादी चांगली मुलगी बघून तुम्ही लग्न करा आणि सुखाने संसार करा." अनुश्री हसत कंठ दाटून बोलली आणि निघून गेली, तसा सार्थक स्तब्धच झाला. सुधा ताई सुद्धा तिला जाताना बघत राहिल्या.

क्रमशः

✍️नम्रता जांभवडेकर

(सुधा ताईंना त्यांच्या चुकीची जाणीव होईल का? वाचूया पुढील भागात)

🎭 Series Post

View all