Login

धागे मनाचे (भाग - २)

अनुश्री आणि सार्थकच्या प्रेमाची गोष्ट
"अनु, ए अनु वाजले बघ किती. तुला शाळेत जायचं नाही का?" अलकाताईंनी किचनमधूनच तिला आवाज दिला आणि पुन्हा कामाला लागल्या.

"गुड मॉर्निंग आई!" अनुश्रीने मागून त्यांच्या कंबरेला हातांचा विळखा घातला.

"घाबरले ना मी आणि एवढे आवाज दिले तुला, होतीस कुठे तू?" अलका ताई

"अग देवघरात होते मी." अनुश्री

"देवघरात. काय ग शहाणे, (तिचा कान पकडून) रोज जवळपासच असतेस, पण शंभरदा मला हाका मारायला लावतेस. वरून हाकेला ओ सुद्धा देतं नाहीस." अलका ताई तिला रागवत बोलल्या

"आई ग! कान सोड. (कळवळत) अग तुझ्या हाकांशिवाय मला सकाळ झाल्यासारखी वाटतच नाही." अनुश्री अलका ताईंना लाडीगोडी लावत म्हणाली.

"बर, मग झाली ना आता तुझी सकाळ. मग पळा आता. तुझी लाडकी मैत्रिण आणि मुलं वाट पाहत असतील." अलका ताई म्हणाल्या आणि बाहेरून टू व्हिलरचा हॉर्न ऐकू आला. तशी अनुश्री घाईघाईत  बॅगेत पुस्तकं भरू लागली

"झाली नेहमीप्रमाणे घाई सुरू. अग नाश्ता तरी कर." अलका ताई

"डब्यात भरून दे." अनुश्री

अलका ताईंनी एका डब्यात उपमा भरून दिला.  अनुश्री त्यांच्या हातातून डबा घेणार तेवढ्यात,

"अनु, आज तुला मुलगा पाहायला येणार आहे. लक्षात आहे ना. आज नेहमीपेक्षा जरा लवकरच ये." अलका ताईंनी तिला आठवण केली, तशी अनुश्री काहीक्षण अलका ताईंकडे बघू लागली. तिच्या छातीत धडधडू लागलं आणि ती धडधड तिच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसू लागली. तेवढ्यात, हॉर्नच्या आवाजाने ती भानावर आली आणि "हो" मध्ये मान हलवत पटापट पावलं उचलत बाहेर आली, तर टू व्हिलरवर बसून अनुश्रीची वाट पाहत असलेली नेहा तिला घड्याळातली वेळ दाखवू लागली. ते बघताच अनुश्रीने इवलस तोंड करून कान पकडले आणि डबल सीट बसली

"नौटंकी!" नेहाने हसतच टू व्हिलर स्टार्ट केली.

****

"नितीन, अरे कुठेय तुझी मैत्रिण? जिला तू पुस्तकं देणार होतास." सार्थकने आजूबाजूला बघत विचारलं

"अरे तिची शाळा इथेच आहे. मी फोन केलेला तिला, येईलच ईतक्यात." नितीन म्हणाला

"बर, ती येईल तेव्हा येईल. तोपर्यंत, मी साईट व्हिजिट करून येतो." सार्थक गाडीतून खाली उतरला आणि काम चालू असलेल्या बिल्डिंगच्या दिशेने गेला. तो तिथे जाताच काम करणारे कामगार हातातल काम ठेवून त्याच्याजवळ आले, तसं त्याने सगळ्यांना कितपत काम बाकी आहे, ह्याची चौकशी केली.

****

पंधरा मिनिटांनी दोघीही नेहमीच्या ठिकाणी पोहचल्या. एका बाजूला बिल्डींगच काम चालू होतं आणि तिथून थोड्या अंतरावर एका झाडाखाली अनुश्री आणि नेहा बिल्डिंग बांधणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिकवायच्या. आजही मुले हातात एक वही आणि पेन घेऊन ऊभी राहून ह्या दोघींची वाट पाहत होती. अनुश्रीने पटकन ब्लॅकबोर्ड असलेला स्टँड ऊभा केला आणि ब्लॅक बोर्डवरती श्री लिहून दोघींनी हात जोडले. नेहा तिला सांगून पुस्तकं आणायला निघून गेली. अनुश्रीने मुलांना शिकवायला सुरूवात केली.

"मुलांनो, काल दिलेला गृहपाठ कोणी कोणी केला? चला, पटापट वह्या घेऊन या." अनुश्री सगळ्या मुलांना म्हणाली, तशी सगळी मुले तिला वह्या दाखवायला उठली.

****

इथे नेहा पुस्तकं घेण्यासाठी गाडीजवळ आली. तेव्हा तिच्या शिक्षक मित्र नितीनने तिला पुस्तकं दिली, तसे नेहाने त्याचे आभार मानले.

****

बिल्डिंगच काम पाहून सार्थक तिथून निघणार तेवढ्यात, त्याच्या कानांवर एका मुलीचा आवाज आला.

"भावेश, तू ह्या कवितेचा भावार्थ का नाही लिहिलास?" अनुश्री

"ताई, मला ह्या ओळीचा अर्थ कळला नाही." भावेश नाराजीने म्हणाला

"एवढच ना, मी सांगते. हे बघ, बांधल्या जातात गाठी वरती, नसत कोणी असच भेटतं. असतो कधीकधी योगायोग तर कधी असते विधिलिखित. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला रोज जी माणसे भेटतात त्या माणसांच्या भेटण्यामागे काहीतरी कारण निश्चित असतं. हा ती माणसे कधीकधी योगायोगाने भेटतात तर कधी ते विधिलिखित असतं. समजलं?" अनुश्री

"हो, ताई." भावेश आनंदाने म्हणाला

सार्थक त्या आवाजाच्या दिशेने आला. तसं त्याला पाठमोरी बसलेली दहा बारा मुले दिसली आणि त्या मुलांना शिकवत असलेली अनुश्री! तो तिचं निरीक्षण करू लागला. ती मुलांच्या वह्या तपासत होती. एखाद्या प्रश्नाचं उत्तर येतं नसेल, तर ती मुलांना समजावून सांगत होती आणि हे सगळं करताना तिच्या गालावर काही अवखळ बटा येतं होत्या, ज्या ती हलकेच कानामागे सारत होती आणि ते करतांना ती कमालीची सुंदर दिसत होती. सार्थक तिला पाहण्यात गुंग होता तेवढ्यात, त्याचा फोन वाजला.

"बोल." काहीश्या त्रासिक सुरात सार्थक म्हणाला.

"काम पाहायला गेलास ना की, काकुंसाठी सून शोधायला?" नितीन असं म्हणताच, सार्थकने एक नजर अनुश्रीकडे पाहिलं

"झालं तुझं बोलून. आता कामाचं बोलशील?" सार्थक

"मित्रा आज काकूंनी तुला लवकर घरी यायला सांगितलय तुला मुलगी बघायला जायचय. लक्षांत नसेलच, तिचं आठवून करून देण्यासाठी मी फोन केलाय." नितीन

"हम्म्म." सार्थक काहीसा नाराजीने हुंकारला.

"काय रे मगाचपासून उत्साही असलेल्या तुझ्या मुडला अचानक काय झालं?" नितीन

"काही नाही झालं. येतो, पाच मिनिटांत." सार्थकने फोन कट करतच एक नजर अनुश्रीकडे पाहिले आणि तिथून निघाला.

****

अनुश्रीने मुलांना आजचा अभ्यास दिला आणि शाळा सोडली.

सार्थक गाडीजवळ पोहचताच गप्पा मारत असलेले नेहा आणि नितीन त्याला दिसले. नितीनने सार्थक आणि नेहाशी एकमेकांशी ओळख करून दिली. तेव्हा नितीनने सार्थकला आज मुलगी बघायला जायचं असल्याचं सांगितलं, तसं नेहाने त्याला बेस्ट विषेस दिल्या. तसे ते दोघं निघून गेले. नेहा अनुश्रीजवळ आली.

"अनु, काय ग आज अर्धा तास आधीच शाळा सोडलीस?" नेहाने तिच्या हातात पुस्तकं देतं विचारले

"अग आज आईने लवकर घरी बोलवलंय. मुलाकडचे पाहायला येणारेत." अनुश्री काहीसं लाजत म्हणाली

"काय! खरचं, आणि हे तू मला सांगतेस. (काहीसा विचार करत) कसला कॉइंसीडन्स आहे. आज सार्थक सुद्धा मुलगी बघायला जाणार आहे." नेहा उत्साहाने म्हणाली

"सार्थक.. कोण सार्थक?" अनुश्रीने प्रश्नार्थक नजरेने विचारलं

"अग तो नितीनचा मित्र.. ते सोड ना, आता काय बाबा कोणाचतरी लग्न होणार. अनु, तुझं लग्न झाल्यावर आपण अशीच शिकवणी घेऊ शकू का? म्हणजे तुझ्या नवऱ्याला चालेल का?" नेहाने शंका व्यक्त केली, तशी अनुश्री सुद्धा विचारात पडली.

"खरय ग तुझं! आपण चांगली जागा शोधतोय ना, पण मनासारखी जागा मिळत नाहीय आणि जी जागा आवडतेय ती बजेटच्या बाहेर आहे. तू काळजी करू नकोस. काहीही झालतरी मीही शाळा बंद करणार नाही." अनुश्रीने नेहाचे हात हातात घेत तिला दिलासा दिला.

"बर, चला आता घरी जाऊया. नाहीतर आमचे भाऊजी येऊन पोहचायचे घरी आणि नवरी मुलगीच घरी नसायची." नेहा स्कुटी चालू करत म्हणाली, तसे अनुश्रीने तिच्याकडे डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिलं.

****

संध्याकाळी पाच वाजता दाराची बेल वाजली, तसं टेंशनमध्ये किचनमध्ये येरझाऱ्या घालणाऱ्या अनुश्रीच्या हृदयाची धडधड वाढली. अलका ताईंनी तिला चहाचा ट्रे घेऊन यायला सांगितल, तशी नाजूक पावलांनी अनुश्री चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. ती बाहेर येताच हवेची झुळूक येऊन सार्थकला आल्हाददायक वाटल, पण असं का होतंय हे त्याला कळत नव्हतं. सगळ्यांना चहा देऊन ती सार्थकजवळ आली, तसा तो कपाच्या दांड्याऐवजी कपाला हात लावणार तेवढ्यात,

"चहा गरम आहे, कपाच्या दांड्याला पकडा." एक ओळखीचा आवाज कानात शिरल्याने त्याने सहज वर पाहिलं आणि पाहतच राहिला.

क्रमशः

✍️नम्रता जांभवडेकर

(सार्थक कुठल्या मुलीला पाहायला आला असेल? समोरच्या मुलीला पाहून तो आश्चर्यचकित का झाला? वाचूया पुढील भागात)

🎭 Series Post

View all