Login

धागे मनाचे (भाग - १)

अनुश्री आणि सार्थकच्या प्रेमाची गोष्ट
सुधा ताईंनी अनुश्रीला साडी नेसवली आणि वाणाच सूप तयार करण्यासाठी बाहेर गेल्या.

अनुश्री बाकीची तयारी करत होती. तेवढ्यात, दरवाजात सार्थक येऊन ऊभे राहून अनुश्रीला न्याहाळू लागला. सगळी तयारी झाल्यावर अनुश्री आरश्यात बघू लागली, तसं तिचं लक्ष दारात उभ्या असलेल्या सार्थककडे गेलं आणि तिने भुवई उंचावून त्यांच्याकडे पाहिलं. तसा सार्थकने हातांचा मोर नाचवत "सुंदर" असा इशारा केला. त्यावर अनुश्री हलकी लाजली.

"फक्त एक कमी आहे." सार्थकने असं म्हणताच अनुश्री आरश्यात स्वतःला बघू लागली. नथ घातलीय, कानात झुमके घातलेत, गळ्यात मोठं मंगळसूत्र घातलय, कपाळावर चंद्रकोर लावलीय. तिची उडालेली धांदल पाहून सार्थक गालात हसला आणि तिच्याजवळ आला, तसं तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं.

"ह्याची कमी होती." सार्थकने उजव्या हातात मागे लपवलेला सोनचाफ्याचा गजरा तिच्यासमोर धरला. गजरा पाहून अनुश्री गालात हसली. सार्थकने गजरा अनुश्रीच्या केसांत माळून गजऱ्याचा सुगंध श्वासांत भरून घेतला. त्याचा उष्ण श्वास मानेला जाणवताच अनुश्री शहारली.

"सार्थक, आई बाहेर वाट पाहतायत माझी." अनुश्री त्याचा इरादा ओळखून म्हणाली

"ती वाट पाहत असती, तर आतापर्यंत आवाज दिला असता तिने." सार्थक म्हणाला

तेवढ्यात, हॉलमधून सुधा ताईंचा आवाज आला, "अनुश्री, आवरलं का ग?"

तशी अनुश्री हसू लागली, तर सार्थकने डोक्यावर हात मारून घेतला.

"खूप हसू येतंय ना तुला. पूजा करून ये तू, मग बघतो तुला. यार! ही आई पण ना, ऐनवेळेला हाक मारून पूर्ण रोमान्सची वाट लावते." सार्थक काहीसा चिडक्या स्वरात म्हणाला.

"सार्थक, काही काय बोलताय तुम्ही!" अनुश्रीने त्याच्याकडे डोळे वटारून पाहिले.

"मग काय तर! चल, बाहेर जाऊ नाहीतर आई ईथे येईल." सार्थक बोलला आणि तिच्या व्हीलचेअरच हॅण्डल पकडून तिला बाहेर घेऊन गेला.

****

सार्थकने अनुश्रीची व्हिलचेअर त्याच्या खुर्चीशेजारी ठेवली आणि बाजूच्या खुर्चीवर बसला. सुधा ताईंनी सार्थकला उपमा वाढला. समोरचं त्याचे वडील श्यामराव नाश्ता करत होते. सार्थकने एक नजर सुधा ताईंकडे पाहिलं त्या आणि अनुश्री नुसत्याच बसून होत्या.

"आई, तू आणि अनु नाश्ता नाही करणार का?" सार्थकने एक नजर अनुश्रीकडे पाहत सुधा ताईंना विचारलं

"अरे, आज वट पौर्णिमेचा उपवास आहे ना आमचा. सुधा ताई

"हो, पण तुम्ही फळ तर खाऊच शकता ना." सार्थक

"हो, खाऊ शकतो पण पूजा झाल्यावर. तोपर्यंत, काहीचं खायचं प्यायच नसतं." सुधा ताई

"आई, हे उपवास करणं खरचं गरजेचं आहे का? आधीच तुला लो बीपीच्या गोळ्या चालू आहेत." सार्थक बोलला

"सांगा बाबा तूच तुझ्या आईला. मी तर समजावून थकलो." एवढा वेळ शांत असणारे श्यामराव सुस्कारा सोडत म्हणाले, तसं सुधा ताईंनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

"सार्थक, तू दरवर्षी मला विचारतोस आणि मी दरवर्षी तुला तेचं सांगते. आम्ही बायका दरवर्षी वटपौर्णिमेचा उपवास करतो; कारण त्यामागे आपल्या नवऱ्याला निरोगी दिर्घायुष्य लाभावं आणि जन्मोजन्मी हाचं पती मिळावा, ही आम्हा बायकांची हळवी भावना असते आणि हा उपवास मी तुझ्या जन्मा आधीपासून करतेय. हा आता गरोदरपणात मला लो बीपीचा त्रास सुरू झाला, पण वटपौर्णिमेचा उपवास केल्याने मला काहीचं त्रास होतं नाही." सुधा ताईंनी त्याला नेहमीप्रमाणे समजावलं

"म्हणजे तू माझं ऐकणारच नाहीस ना?" सार्थक

"अनु, तू सुद्धा उपवास धरलाच असशील ना. घे, तू फळं खा." सार्थक तिच्यापुढे सफरचंद ठेवत म्हणाला, तशी अनुश्री सुधा ताईंकडे बघू लागली

"सार्थक, लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेला निर्जळी उपवास करायचा असतो. अगदी पाणीही प्यायच नसतं. रात्री बारानंतर नवऱ्याच्या हातून पाणी पिऊन हा उपवास सोडायचा असतो आणि अनुश्रीची तुमच्या लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आहे ना. मी तिला काही बोलले नाही. काल सगळी तयारी करताना तिने मला ह्याचे विधी आणि उपवासाबद्दल विचारलं, म्हणून मी तिला सांगितलं." सुधा ताई म्हणाल्या

"निर्जळी.." सार्थक अनुश्रीकडे बघू लागला.

"सार्थक, जशी प्रत्येक बायकोची ईच्छा असते. तशी माझी सुद्धा हिचं ईच्छा आहे की, की तुम्हांला दिर्घायुष्य मिळावं. जगातली सगळी सुख तुम्हाला मिळावी. तुम्ही माझ्यासारख्या मुलीशी लग्न केलं, तर मी तुमच्यासाठी हा उपवास तर नक्कीचं करू शकते." अनुश्री त्याला समजावत म्हणाली

"सासू-सूना अगदी सारख्याच भेटल्यात एकमेकींना." श्यामराव हसत म्हणाले, तश्या सुधा ताई आणि अनुश्री हसू लागल्या

"अनु, तुझ्यासारख्या मुलीशी म्हणजे मी तुझ्याशी लग्न करून तुझ्यावर कुठलेही उपकार केले नाहीयेत. माझं तुझ्यावर प्रेम होतं, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं." सार्थकच्या मनात आपल्याविषयी एवढ प्रेम पाहून अनुश्री मनोमन सुखावली.

"बर, गप्पा पुरे झाल्या आता. सार्थक तू नाश्ता करून घे. साईटवर नाही जायचं का?" सुधा ताई

"आई, अग मलाही फारशी भूक नाहीय." सार्थक नाश्त्याची प्लेट सरकवत म्हणाला

"बर, तुम्हाला वड पुजायला जायचं नाहीय का?" श्यामराव

"हो.. हो... चल ग अनु, आज गर्दी असेल विठू रखुमाईच्या देवळाजवळ." सुधा ताईंनी दोघींची वाणाची सूप घेतली.

"अम्म.. आई, थांबा मी सुद्धा येतोय." सार्थक काहीसा विचार करत म्हणाला

"अरे, पण तुझं काम?" सुधा ताई

"तुमची पूजा झाल्यावर तुम्हाला घरी सोडून जाईन मी." सार्थक एक नजर अनुश्रीकडे बघत म्हणाला

"ओ.. हो... क्या बात है! आज बायकोचा उपवास म्हणून नवरा सुद्धा तिच्यासोबत वड पुजायला जाणार." श्यामराव म्हणाले, तशी अनुश्री लाजली

"शिका जरा लेकाकडून. नाहीतर तुम्ही लग्नाच्या पहिल्याच वटपौर्णिमेला ऑफीसमधून रात्री दहा वाजता आला होतात आणि मी मात्र संध्याकाळपासून तुमची वाट पाहत बसलेले." सुधा ताईंनी त्यांना टोमणा मारला

"अग तेव्हा पावसामुळे ट्रेन उशिरा होत्या म्हणून उशीर झालेला मला आणि काय ग दरवर्षी तू मला कुठल्याही गोष्टीवरून हाच टोमणा मारतेस." श्यामरावांनी स्पष्टीकरण दिलं.

दोघांचा भांडणाचा सूर लागतोय, हे पाहून अनुश्रीने घाबरून सार्थकला इशारा केला. त्याने इशाऱ्यानेच "थांब" असा इशारा केला.

"आई, तुला खरचं जन्मोजन्मी बाबा नवरा म्हणून हवेत?" सार्थकने सुधा ताईंच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं

"तिचं माहिती नाही, पण मला मात्र जन्मोजन्मी हिचं बायको हवीय. कसय, हिच्याशी भांडण्यात जी मज्जा आहे ती दुसरीसोबत येणार नाही ना." श्यामराव सुधा ताईंना डोळा मारत म्हणाले

"अहो, काय तुम्ही पण! मुलं आहेत समोर." सुधा ताई डोळ्यांनीच त्यांना दटावत छानपैकी लाजल्या.

"आई, बाकीचं लाजण आपण घरी आल्यावर कंटीन्यू करूयात. आता निघूया" सार्थक म्हणाला आणि अनुश्रीच्या व्हिलचेअरच हॅण्डल पकडून तिला बाहेर घेऊन गेला. त्यांच्याच मागोमाग सुधा ताई सुद्धा बाहेर गेल्या.

सार्थकने सुधा ताईंच्या हातातली सुप घेतली आणि सीटवर ठेवली. सुधा ताई गाडीत मागच्या सीटवर बसल्या, तसं सार्थकने अनुश्रीला दोन्ही हातांवर उचललं आणि फ्रंट सीटवर बसवलं आणि तिची व्हिलचेअर गाडीच्या डिक्कीत ठेवली. स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी सुरू केली.

काही अंतर पुढे गेल्यावर तिला रस्त्यात एक मुलगी काही मुलांना शिकवताना दिसली, ते दृश्य पाहून अनुश्री भूतकाळात गेली.

क्रमशः

✍️नम्रता जांभवडेकर

(काय वाटतं अनुश्री असं का म्हणाली असेल? वाचूया पुढील भागात)

🎭 Series Post

View all