धाडसी माया

About Girl's Life


"आई , तुला बरे नाही ना, मगं  तुझी कामे मी करून येते. तसेही 2,3 दिवस मला सुट्टीच आहे."
माया आपल्या आईला म्हणाली.

" नको गं बाळा,तू फक्त अभ्यास कर, नोकरी कर ...तू नको माझ्यासारखी कामे करू." आई मायाला म्हणाली.


" अगं , मी तर चांगले शिक्षण घेऊन नोकरी करणारच आहे. मी नोकरीला लागल्यावर तुला ही कामे नाही करू देणार..तू फक्त घरी बसून आराम करायचा...माझी लाडकी आई ..समजले का?
पण आता तू आजारी आहेस. 2,3 दिवसापासून कामावर नाही गेलीस. त्या लोकांचेही फोन यायला लागले आहेत,
\"कधी कामावर येते म्हणून ..\"

आणि तू जिथे काम करते ते सर्व लोक मलाही चांगले ओळखतात ना ?
सर्व चांगले आहेत गं. ते ही आपल्या अडीअडचणीला मदत करतात ना ? मग आपणही आपले काम व्यवस्थित केले पाहिजे ना.. कोणीही तक्रार करायला नको ना."  माया


"पण तू तरुण मुलगी,माझी हिंमत नाही होत तुला एकटी पाठवायला .." आई

" नको घाबरू गं आई,मी खंबीर आहे. काही नाही होणार मला. सर्व जण चांगले आहेत. "  माया


"बरं बाई, जा पण ,काळजी घे आणि लवकर घरी ये."   आई

अति व्यसनाने नवरा मेला. सासरच्यांनी पाठ फिरवली. माहेच्यांनी आधार देण्यास नकार दिला.

कुसुमला वाटले जीव द्यावा आणि व्हावे अडचणीतून मोकळे..पण पोटची मुलगी माया ...तिला अनाथ करायचे..
आपल्यासाठी नाही पण तिच्या साठी तरी जगलं पाहिजे.
यामुळे कुसुम कष्ट करून मायाला वाढवित होती. लोकांकडे घरकाम करत होती..
मायाला चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करत होती. जेणेकरून तिला चांगली नोकरी मिळेल आणि आपल्या सारखे काम करण्याची तिच्यावर वेळ येवू नये. तिच्या साठी पैसे जमा करत होती. खूप मेहनत करत होती. कधी जास्त कामे राहिली, गरज वाटली तर मायाही आपल्या आईच्या मदतीला जात होती. त्यामुळे सर्व जण मायालाही ओळखत होते.


आईने परवानगी दिल्यावर माया पवार ताईंकडे कामाला गेली. आणि तेथून पुढच्या कामांवर जाणार होती. पवार ताईंकडे आल्यावर कळाले की , त्यांचे कोणी जवळचे नातेवाईक वारल्याचा फोन आला त्यामुळे ताई आणि त्यांचे मिस्टर दोघेही तिकडेच गेले. घरात सर्व कामे तशीच पडली होती. कुसुम येवून सर्व करून घेईल असे त्यांना वाटले होते. घरी त्यांचा मुलगा रितेश होता. त्यालाही सुट्टी होती म्हणून तो घरीच होता.
माया आणि रितेश एकमेकांना ओळखत होते. एकदोनदा बोलणेही झाले होते. त्यामुळे मायाला काही वेगळे वाटले नाही. ती न घाबरता सर्व कामे करत होती.

रितेश , तारुण्यात पदार्पण केलेला,कॉलेज,पार्ट्या, मित्र यांचा आनंद घेणारा.
वडिलांच्या श्रीमंतीचा पुरेपुर उपभोग घेणारा.
काय चांगले? काय वाईट? याचा विचार न करता फक्त \"आनंद घेणे\" एवढेचं माहित असलेला.

मायाला त्याने आपल्या घरी अनेकदा पाहिलेले होते. तिचे बहरते तारुण्य आपल्या नजरेतून टिपले होते.
मायाला आज एकटी पाहून त्याच्यातील वाईट इच्छा जागृत झाल्या आणि तिच्या वर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
मायाने सर्व शक्तीनिशी बचाव करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याच्या मजबूत पकडीतून तिला आपली सुटका करता आली नाही. त्याच्या घाणेरड्या वासनेची ती शिकार झाली.


या प्रसंगानंतर
मायाला तर वाटले , घरी जाऊच नये. कोठेतरी जाऊन जीव द्यावा. आईला काय उत्तर देवू? \"

तिने खूप विचार केला  \"आपण जीव दिल्यास रितेशसारख्या व्यक्तींना तर फायदाच होईल. त्यांच्या  वाईट कर्मांची,पापांची शिक्षा त्यांना कोण देणार? \"

मगं तिने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे ठरविले.

घरी आल्यानंतर आईला तिने सर्व काही सांगितले. आई घाबरली, खूप रडली.
पण मायाने आपला निर्णय सांगून तिलाही हिंमत दिली.

पोलिसांनी तिची रितसर तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला.तिचे स्टेटमेंट घेतले, मेडीकल टेस्ट करून घेतली.

रितेशचे वडील शहरातील एक नामांकित श्रीमंत व्यक्ती होते.अनेक मोठमोठ्या ठिकाणी ओळखी होत्या. पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो. असे त्यांनी यापूर्वी अनुभवले होते. त्यामुळे यावेळी माया व तिची आई आपले काही ही करू शकणार नाही या भ्रमात ते होते.

पोलिस जेव्हा रितेशला पकडायला त्यांच्या घरी आले तेव्हा रितेशच्या वडिलांनी पोलिसांना अनेक वेगवेगळे मार्ग दाखवून  रितेशला काही शिक्षा होणार नाही याची काळजी घेत होते.
पण पोलीस ऑफिसर आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ होते . त्यांनी त्यांचे म्हणणे न ऐकता रितेशला अटक केली आणि मायाला न्याय मिळवून द्यायचे ठरविले.

रितेशच्या वडिलांनी आपल्या ओळखींचा वापर करून रितेशला सोडविण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही ही फायदा झाला नाही.

शेवटी मायाला तिच्या आईला विकत घेण्याचा प्रयत्न केला.
त्यांना विनवणी करून ,धमकी देवून सांगितले ,"तुम्हांला मी भरपूर पैसा देतो,आयुष्यभर तुम्हांला काही काम करावे लागणार नाही यासाठी एखाद्या गावात घरदार, शेती, एखादा व्यवसाय सुरू करून देतो. पण माझ्या मुलावरची केस परत घ्या."

माया व कुसुम स्वाभिमानी होत्या. \"आपली इज्जत यांच्या हरामाच्या पैशापेक्षा जास्त महत्त्वाची आहे\".
या विचाराने   मायाने त्यांना कडक शब्दांत उत्तर दिले,"ना मला तुमचा पैसा पाहिजे ना तुमची मालमत्ता . मला माझी इज्जत प्रिय आहे. गरीब असलो तरी स्वाभिमानी आहोत. यापुढे कोणत्याही मुलीवर अत्याचार करण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. अशी कठोर शिक्षा रितेशला मिळावी . अशीच माझी इच्छा आहे."



मायाचा धाडसी निर्णय, कुसुमने दिलेला तिला भक्कम पाठिंबा,रितेशविरुद्ध  मिळालेले सर्व पुरावे आणि एका कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसरने आपले केलेले चोख काम यामुळे रितेशला शिक्षा झाली.

आणि मायाला न्याय मिळाला.


समाप्त


नलिनी बहाळकर