देवयानी विकास आणि किल्ली भाग २७

देवयानी नागपूरला आली आहे विकासची काळजी घ्यायला.

      देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

  भाग   २७  

भाग  २६   वरून  पुढे  वाचा ................

आता पहिल्या सारखं रुटीन सुरू झालं होतं. पूर्णिमा ने आता कामात पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं, त्यामुळे बॉस पण खुश होता. देवयानीचे जायचे दिवस जवळ येत चालले होते, त्यामुळे तिची गडबड सुरू होती. तयारीला वेळ मिळावा म्हणून तिने रजेचा अर्ज टाकला होता आणि तो बॉस ने मंजूर पण केला होता. त्यामुळे तिचे आता कामाचे फक्त दोन दिवस उरले होते. तिला पुण्याच्या जागेवर परत जॉइन व्हायचं होतं, पण लॉक डाऊन असल्यामुळे तिला नागपूर वरून काम करता येणार होतं. देवयानी त्यामुळे खुशीत होती.

बॉस ने देवयानीला फेअरवेल म्हणून तिघी जणींना डिनर दिलं. त्या वेळी पूर्णिमा म्हणाली  की

सर, देवयानी सारखंच माझ्यासाठी पण बघा ना पुण्याच्या ऑफिस मध्ये माझी पण ट्रान्सफर होते आहे का ते.

का ग ? गेले चार सहा दिवस पाहतो आहे की तू आता full swing मध्ये कामाला सुरवात केली आहेस. सगळ्या गोंधळातून तू successfully बाहेर पडली आहेस.

I am happy with that. You have improved your performance. मग आता कशाला भारतात जायचं आहे तुला ?

सर, आता माझं मन नाही लागत इथे. आज देवयानी चालली आहे. राजेश काय एक वर्षा साठीच आला आहे. आणि त्याचं ठरलेलंच  आहे. त्याला इथे राहायचंच नाहीये. सेजल पण वापस जायला तयार आहे. उद्या सेजल त्याच्या बरोबर लग्न करून परत भारतात चालली जाईल. मी एकटी इथे राहून काय करू, बघा ना प्लीज माझ्या साठी सुद्धा. शेवटी homeland is homeland. नाही का ?

पूर्णिमा, खरं आहे तुझं म्हणणं. अमेरिका ही मोह नगरी आहे. आपल्या देशात नाही म्हंटलं तरी संस्कारांचे पाश असतात. इतक्या सहजा सहजी कोणी अडकत नाही. आजूबाजूला तुमच्या विचारांना योग्य दिशा देणारे बरेच हित संबंधी लोक असतात. खरं आहे. बघतो प्रयत्न करून, पण पूर्णिमा  लॉक डाऊन चालू आहे आणि सगळंच

अवघड होऊन बसलं आहे. आहे ती नोकरी टिकवली तरी पुष्कळ आहे. तरी  पण बघतो मी. But I don’t promise.

त्या दिवशी रात्री फोन वर देवयानी बोलत होती.

देवयानी, ऑक्सिजन मास्क काढून, २४ तास उलटून गेले आहेत आणि विकासची तब्येत उत्तम आहे. कदाचित परवा सकाळी सुट्टी देतील. तू काय म्हणतेस ?

देवयानीला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

तयारी चालू आहे आता फक्त आठच दिवस राहिले आहेत. परवा पासून मी सुट्टीवर आहे. तुमच्या साठी काय आणू इथून ?

काही नको. तू सही सलामत ये म्हणजे झालं.

अहो, असं कसं ?

देवयानी, लहानपणी आम्ही एक सिनेमा पाहीला होता, त्या मध्ये गावाला जाणारा माणूस आपल्या छोट्या मुलीला विचारतो की काय आणू तुझ्या साठी, गुडिया म्हणजे बाहुली आणू का ?

त्यावर ती मुलगी म्हणते

“ गुड़िया चाहे ना लाना, पर पप्पा जल्दी आ जाना.”

आमचं ही असच आहे. आमच्या साठी तूच गुडिया आहेस. अजून काही नको. उगाच सामान वाढवू नकोस.

मला माहीत होतं की तुम्ही सांगणार नाही, मी माझ्या मना प्रमाणे घेऊन येईन.

नंतरचे दिवस खूप घाई, गडबडीचे गेले. सगळे सोपस्कार करून झाल्यावर, security check  होऊन देवयानी, बोर्डिंग च्या announcement ची वाट पहात बसली होती.

इकडे नागपूरला विकासला हॉस्पिटल मध्ये अपेक्षेपेक्षा चार दिवस जास्त राहावं लागलं होतं. आणखीन कुठल्या कुठल्या टेस्ट करायच्या होत्या त्या साठी. त्या सर्व होऊन समाधान कारक रीपोर्ट आल्यावर विकासला डिस्चार्ज मिळाला होता. आणि तो घरी आला होता. त्याला चौदा दिवस घरीच isolation मध्ये राहावं लागणार होतं. त्याची सगळी सोय घरी केली होती. थकवा प्रचंड आला होता. एवढ्याशा प्रवासाचा सुद्धा विकासला त्रास झाला होता. आल्या आल्या तो पलंगावर आडवा झाला. विकास नी विचारलं की

देवयानी केंव्हा येणार आहे ?

अरे तिचा मेसेज आला आहे, ती एयर पोर्ट वर आहे. सगळे सोपस्कार पार पाडून निघेल आणि उद्या सकाळी मुंबई ला पोचेल. पोचल्यावर काय परिस्थिती आहे ते बघून फोन करणार आहे.

ठीक आहे. आणि मग त्यानी डोळे मिटले. थकवा इतका होता की त्याला लगेच झोप लागली.

त्याच्या देखभाली ची संपूर्ण जबाबदारी आईने घेतली होती. खालच्याच एका रूम मध्ये त्याची व्यवस्था केली होती. दुसरी गेस्ट रूम  देवयानी साठी राखून ठेवली होती. आणि यमुना बाई, त्यांच्याच बेड रूम मध्ये असणार होत्या. भगवान राव वरच्या गेस्ट रूम मध्ये शिफ्ट झाले होते. पुढचे चौदा दिवस विकास आणि देवयानीची देखभाल यमुना बाईंनाच करायची होती. त्यामुळे त्या सुद्धा घरात वावरणार नव्हत्या. विकास आणि देवयानी ला  कोणाच्याही संपर्कात येऊ द्यायचं  नव्हतं. अवघड होतं पण यमुना बाई ती रिस्क घेणार होत्या. त्याच्या संपर्कात त्या असणार होत्या. म्हणून त्यांच्या साठी भगवानरावांनी त्यांची बेड रूम मोकळी केली होती. त्या घरात वावरणार नव्हत्या.

लॉक डाऊन असल्या मुळे घरात कोणीही कामाला नव्हतं. यमुना बाई विकास साठी अडकल्या होत्या. सगळा भार केवळ अश्विनीवर पडला होता. एक बरं होतं की भैय्या सुद्धा लॉक डाऊन मुळे दुकान बंद असल्याने घरीच होता. तो आता अश्विनीला मदत करत होता. वरची सगळी कामं तो करत होता.

दुसऱ्या दिवशी देवयानीचा फोन आला की

हॅलो, वहिनी, मी मुंबईला पोचली आहे. आता इथे पण टेस्ट करावी लागणार आहे. सगळं आटोपल्यावर मग पुन्हा फोन करेन. किती वेळ लागेल हे सांगता येत नाही, पण आता मी आपल्या देशात आहे याचाच खूप आनंद होतो आहे. त्या मुळे किती वेळ लागेल याची चिंता नाहीये.

विकासला सांगितल्यावर त्याचा चेहरा फुलला. तो आईला म्हणाला

अग तिला पण quarantine मध्ये राहावं लागेल ना ? मग कसं करणार ?

हो होम quarantine मध्ये राहावं लागणार आहे तिला. पण अरे तिच्या साठी पण एक खोली तयार करून ठेवली आहे. आणि मी तुम्हा दोघांची सेवा करायला आहेच इथे.

तिला असं काय झालं आहे की तिची सेवा करावी लागणार आहे ?

अरे, तिला काही झालं नाहीये पण जर तिला  खोलीत बंद अवस्थेत राहावं लागणार असेल तर तिला काय हवं काय नको पहावं लागणार नाही का ? माझ्या शिवाय कोणीच तुम्हा दोघांच्या संपर्कात येणार नाहीये.

हं. आहे खरं. पण आई, लग्न व्हायच्या आधीच तिला इथे येण्याची परवानगी कशी

दिली तिच्या आई वडीलांनी ?

अरे फार नशीबवान आहेस तू. अशी, नवऱ्या साठी तीळ तीळ जीव तुटणारी बायको मिळायला भाग्य लागतं बरं. आयुष्य भर फुला सारखं जप तिला. आम्ही खूप सांगून पाहीलं, पण ती हट्टच धरून बसली की तू पूर्ण बरा होई पर्यन्त तीच, तुझं सगळं काही बघणार म्हणून. तिला खूप काळजी आहे तुझी. आम्हाला तर किती कौतुक वाटतं तीचं. मग आम्हीही जास्त ताणून धरलं नाही, पण तिला म्हंटलं की एकदा तुझ्या घरी विचार आणि मग काय ते ठरव.

मग ?

अरे तिच्या घरचे, काका, मावशी सगळेच आपल्या घरी हप्ता भर राहून गेले आहेत. आणि आनंदात वापस बेळगाव ला गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात कसलाच किंतु, परंतु येणार नाही याची खात्री होती.  आणि सगळं ठरल्या प्रमाणे झालं असतं तर तुमचं लग्न होऊन आता वर्ष झालं असतं. म्हणून कदाचित त्या लोकांनी देखील तिच्या हट्टा पुढे मान तुकावली असेल. असो पण झालं ते चांगलच झालं. ती डोळ्या समोर, असल्यामुळे तुझी पण तब्येत लवकरच सुधारेल, काय ?

ह्या, आई तू पण ना ! असं काही नाहीये. तुम्ही सर्व लोकं आहातच की, माझी काळजी घ्यायला.

असं म्हणतोस ? ठीक आहे, सांगते तिला. विकासला तुझं इथे येणं काही आवडलं नाही म्हणून.

अरे, कायss आई, असं कधी होतं का, आता ती आलीच आहे तर राहू दे. मला काय त्याचं. तुम्हालाच मदत होईल. राहू दे तिला. आणि, विकास अगदी क्षीण पणे हसला. तेवढ्या बोलण्याने सुद्धा त्याला धाप लागली.

बरं तू म्हणतोस तसं. पण आता तू आराम कर जास्त बोलू नकोस. बोलण्याने सुद्धा थकवा येतो.

विकास नी मान हलवली आणि डोळे मिटले. आई हळूच रूम च्या बाहेर पडली.

संध्याकाळी सात च्या फ्लाइट ने देवयानी नागपूर ला आली. बाहेर पडे पर्यन्त साडे आठ, पावणे नऊ  वाजले होते. भैय्याच  गेला होता तिला आणायला. घरी सगळे जणं तिची वाटच बघत होते.

२४-२५ तासांच्या प्रवासाचा शीण  तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

देवयानी, वेल्कम होम. अश्विनी म्हणाली. चहा इथेच घेणार की खोलीत पाठवू ?

वहिनी मला कसं तरीच होतेय, तुम्हाला माझ्यासाठी खटावं लागतंय. काय करणार हो, हा स्टॅम्प मारला आहे ना हातावर.

हरकत नाही. चौदा दिवस आराम कर, त्यानंतर म्हणशील, काम करून  दमले ग बाई, तिच्या ह्या बोलण्यावर सगळेच हसले. वातावरणात जरा मोकळे पणा आला. मग देवयानी तिच्या खोलीत फ्रेश व्हायला गेली.

यमुना बाई तिच्या खोलीत चहा घेऊन गेल्या तेंव्हा देवयानी म्हणाली की आई, तुम्ही कुठे होत्या ? मी आले तेंव्हा तुम्ही दिसल्या नाही.

अग तू आणि विकासच्या बरोबरीने मी पण isolation मध्ये आहे. मी पण सगळ्यांच्या मध्ये मिसळत नाहीये. जे हवं असेल ते अश्विनी इथे या टेबलावर आणून ठेवणार  आणि मी ते तुमच्या पर्यन्त पोचवणार अशी व्यवस्था केली आहे.

ही तुझी खोली, ती विकासची आणि पलीकडची आमची बेडरूम. तिथे सध्या मी एकटीच. हे वरच्या रूम मध्ये तात्पुरते शिफ्ट झाले आहेत.

अरे बापरे, म्हणजे सगळं कसं अगदी strictly नियमानुसार चाललं आहे म्हणायचं.

हो अग. आमचे दोघांचे vaccine चे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. म्हणून काळजी नाही. भय्या आणि अश्विनीचे एक एक घेऊन झाले आहेत. पण तरी डॉक्टर म्हणाले की जितकी जास्त काळजी घेता येईल तितकी चांगली. केवळ १०-१५ दिवसांचाच तर प्रश्न आहे. बरं तू प्रवासामुळे थकली असशील, थोडा आराम कर. अर्ध्या तासाने जेवण घेऊन येईन. काही लागलं तर मला मोबाइल वर फोन कर.

मी बाहेर येऊ का हो ? तसं मला काहीच झालेलं नाहीये.

छे,छे मुळीच नाही. तुला काही झालेलं नसलं तरी एक पेशंट आधीच घरात आहे, दूसरा नको. १०-१५ दिवसच फक्त, कळणार सुद्धा नाही, कसे निघू जातील, ते बघशील तू.

देवयानीची आणि विकासची प्रत्यक्ष भेट झालीच नाही. जेवण झाल्यावर विडियो कॉल करूनच त्यांना एकमेकांशी बोलावं लागलं. जवळ जवळ २०-२५ दिवसांनी दोघं एकमेकांना पहात  होते. कोणीच काही बोलत नव्हतं. विकासची ती कृश मूर्ती आणि थकलेली चर्या पाहून तिला भडभडून आलं. तिला काही सुचत नव्हतं. गळा भरून आला होता. तोंडातून शब्द फुटत नव्हता. देवयानीच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. ती नुसतीच अश्रु भरल्या डोळ्यांनी विकासला बघत राहिली. विकासची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती. तो रडत नव्हता पण बोलूही शकत नव्हता. तेवढ्यांनी सुद्धा विकास थकला आणि त्यानी डोळे मिटले. त्याला झोप लागली आणि मोबाइल हातातून गळून पडला. देवयानीला काही कळलंच नाही, तिने ताबडतोब यमुना बाईंना फोन केला.

अहो आई, विकासला फोन केला होता, माझ्याकडे बघता बघता न बोलताच फोन टाकून दिला त्यानी, बघा ना काय झालय ते.

अरे, काय झालं ? बघते आता.

पांच मिनिटांनी त्यांनी देवयानीला फोन केला.

अग काही नाही. थकला आणि डोळे मिटले त्यानी, फोन त्याच्या हातातून गळून पडला. आता पुन्हा जागा झालाय तो. अग असच आहे. कल्पनेच्या बाहेर  थकवा आला आहे. डॉक्टर म्हणाले होतेच की कोरोंना चा थकवा असाच असतो म्हणून.

बापरे, अहो मी विकासला इतकं अशक्त कधीच पाहीलं नव्हतं. कठीण  आहे.

अग आम्हाला सुद्धा हा अनुभव नवाच आहे. याच्यातून  त्याला बाहेर काढायच आहे. बघ तूच, केवढी मोठी जबाबदारी अंगावर घेतली आहेस तू.

हो आई, आलं माझ्या लक्षात. मी माझी जबाबदारी नक्कीच नीट पार पाडीन. काळजी नका करू.

आवश्यक ती सर्व औषधं चालूच होती. यमुना बाई वेळच्या वेळी औषधं देत होत्या. अशक्त पणा हळू हळू भरून येत होता. देवयानीचा प्रश्नच नव्हता. ती बसून बसून कंटाळली होती. रोज ती यमुनाबाईंना म्हणायची मी जाऊ का बाहेर, आणि त्या नाही म्हणायच्या.

आई आज आठ दिवस झाले, एवढं कोणी बघत नाही हो. आता मला भीती वाटायला लागली आहे की मला पालवी फुटेल बसून बसून, किंवा वारूळ बनेल अंगावर. जाऊ द्या न बाहेर.

ठीक आहे भैय्याला विचारते. त्याचं काय म्हणण आहे ते बघू. मग ठरवू. आणि देवयानी, बाहेर येऊन तरी काय करणार आहेस.?

तुम्हाला मोकळं करेन. विकास कडे बघण्या साठीच आले आहे ना मी इथे ?

अग हो, पण विकास बरोबर तुला पण isolation आहेच की चौदा दिवस. मग सांग, असं काय किंवा तसं काय, काय फरक आहे ?

देवयानीने नाईलाज असल्या सारखे खांदे उडवले. आणि गप्प बसली.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all