देवयानी विकास आणि किल्ली.
पात्र परिचय
विकास नायक
देवयानी नायिका
सुप्रिया देवयानीची मैत्रीण
लक्ष्मी सुप्रियाची रूम पार्टनर.
राजू सुप्रियाचा मित्र
शीतोळे पोलिस इंस्पेक्टर
भय्या विकासचा मोठा भाऊ.
अश्विनी विकासची वाहिनी, भैय्याची बायको
भगवानराव विकासचे बाबा
यमुना बाई विकासची आई
गोविंदराव देवयानीचे बाबा
कावेरी बाई देवयानीची आई.
मावशी आणि काका देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर
मनीषा विकासची बहिण
अंकुश मनीषाचा नवरा.
सुरेश देवयानीचा भाऊ.
विश्राम देवयानीचा चुलत भाऊ.
विनोद विकास चा चुलत भाऊ
प्रिया विकासची चुलत बहीण.
सेजल देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.
पूर्णिमा देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.
राजेश विकासचा मित्र.
भाग २३
भाग २२ वरून पुढे वाचा ................
फोन कटला. देवयानीनी दोनदा पुन्हा प्रयत्न केला पण लागला नाही. देवयानी विचार करत होती की असं काय काम निघालं की विकास लॉक डाऊन चालू असतांना नागपूरला गेला असेल ? आणि वर मोबाइल घरी ठेवून कसा बाहेर गेला हा ? तिला हे सर्व पचायला जड जात होतं. तिने मग सेजलला सांगितलं. सेजलला सुद्धा आश्चर्य वाटलं. पण ती काही बोलली नाही. तेवढ्यात राजेश आला आणि ती त्याच्या बरोबर निघून गेली. देवयानी पुन्हा एकटीच.
दुसऱ्या दिवशी सुद्धा देवयानीच्या मनाला स्वस्थता नव्हती, विचार करकरून थकली, आणि शेवटी रात्री दहा वाजता विकासला फोन लावला.
हॅलो देवयानी, मी अश्विनी बोलते आहे. कशी आहेस तू ?
मी ठीकच आहे. पण विकास का फोन वर येत नाहीये ? त्याला बरं नाहीये का ? मला खूप काळजी वाटते आहे. विकास आला आहे न तिथे ?
आहे. विकास आला आहे नागपूरला.
तो जर नागपूरला आहे तर फोन वर का येत नाहीये ? तुमच्या जवळ का आहे त्याचा फोन ? काल आईंनी घेतला होता, आज तुम्ही, असं का ? वहिनी मला खरं खरं सांगा. माझी शप्पथ आहे तुम्हाला.
अग आता तुला काय सांगू, शपथ घालून माझी अडचण केलीस बघ. अग सर्वानुमतेच असं ठरलं होतं की तू तिकडे दूर, दहा हजार मैलांवर, आधीच तिकडे तुझी फरफट चाललेली आहे. मग अश्या परिस्थितीत तुला अजून टेंशन येईल, म्हणून सांगितलं नाही. विकास पण म्हणाला की तुला सांगू नका म्हणून.
अहो पण काय नका सांगू, असं म्हणाला ? वहिनी माझ्या पासून काही लपवू नका. त्याला माझ्याशी बोलायचं नाहीये का ? त्याच्या मनातून मी उतरली आहे का ? माझ्याशी बोलण्याचा त्याला त्रास होतो आहे का ? लग्नाचा विचार बदललाय का, वहिनी सांगा, गप्प नका राहू. इकडे माझा जीव जायची वेळ आली आहे.
देवयानी, तुझी अवस्था मी समजू शकते, अग असं काहीही नाहीये. उगाच भलते सलते विचार मनात आणू नकोस. तुमचं लग्न होणार आणि तू आमच्या घरात येणार ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. तुझी भेट होत नाहीये म्हणून विकास किती व्याकूळ झाला आहे, हे आम्हाला दिसतच आहे. नको असे भलते सलते विचार मनात आणू आणि टेंशन तर मुळीच घेऊ नकोस.
अहो पण मग झालय तरी काय ?
इथे आल्या, आल्याच त्यांच्या अंगात सडकून ताप भरला. एकदम १०२ पर्यन्त चढला, आणि खोकला पण बराच वाढला होता. थकवा पण इतका आला होता की काही विचारू नकोस.
मग ?
मग काय ? आम्ही सगळेच घाबरून गेलो होतो. विकासला कधी आम्ही आजारी पडतांना आजवर पाहिलच नव्हतं. मग डॉक्टर कडे नेलं तर ते म्हणाले की टेस्ट करून घ्या. मग टेस्ट केली, आणि जे नको होतं तेच झालं. तो पॉजिटिव निघाला. त्याला काल हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केलं आहे.
अरे बापरे. आई ग ! कोरोंना आपल्या घरापर्यंत पण येऊन पोचला का. अरे देवा. आता कशी आहे त्याची तब्येत ?
कल्पना नाही. त्याला भेटू देत नाहीत. इतकंच काय, हॉस्पिटलच्या दारात पण उभं करत नाहीत. कोरोंना चे सगळेच नियम वेगळेच आहेत. आणि अतिशय कडक आहेत.
मग आपल्याला कसं कळेल की प्रोग्रेस काय आहे तो ?
तसं ते सांगतात की सुधारणा आहे म्हणून. पण अग ५० लोक आहेत अॅडमिट, काय खरं आणि काय खोटं, काही कळायला मार्ग नाही.
अहो वहिनी, पण असं कसं चालेल ?
आम्ही पण त्याच चिंतेत आहोत. ह्यांनी कोणाची तरी ओळख काढली आहे, हॉस्पिटलमध्ये, तो उद्या सांगतो म्हणाला. ते जाऊ दे. तुझं काय, तू भारतात येण्याचा प्रयत्न करते आहेस असं विकास म्हणत होता. काय झालं ?
ते गूऱ्हाळ चालूच आहे. सरकारी काम, वेळच लागणार आहे. बरं, मी उद्या पुन्हा फोन करेन, याच वेळी. तो पर्यन्त काही कळू शकेल. चालेल ना ?
चालेल. पण तू टेंशन घेऊ नकोस. उद्या सांगते तुला सर्व. आणि हे बघ, घाबरण्या सारखं काही झालं नाहीये. तसं असतं तर इतक्या शांत पणे मी बोलू शकले असते का ? आमच्या डॉक्टरांनी त्याचा रीपोर्ट पाहीला. म्हणाले की काही विशेष नाहीये. पण सगळे precaution घेताहेत. तीन चार दिवसांत बरं वाटेल. ठीक आहे ? उद्या बोलू. बाय.
ओके. बाय.
दुसऱ्या दिवशी देवयानी बॉस शी बोलत होती.
सर, त्या दिवशी तुम्ही मला तुमच्या मित्राची गोष्ट सांगितली होती, त्यांनी कसं खोटं सर्टिफिकेट दिलं ते, आठवतंय का ?
हो आठवतंय न, आणि त्यावर तू काय म्हणाली होतीस ते पण चांगलं लक्षात आहे माझ्या. का ? काय झालं ?
सर मी ते विकासला सांगितलं. तर तो काय म्हणाला ,माहीत आहे ?
काय ?
तो म्हणाला की तो अॅडमिट आहे असं खोटं सर्टिफिकेट पाठवू का ?
बापरे, मग तू काय म्हणालीस ?
मी खूप चिडले त्याच्यावर. असं खूपच अभद्र बोलायची काय जरूर होती ? आठ दिवस बोललेच नाही, त्याच्याशी.
अग, असं नको करूस. त्यानी गंमत केली असणार नक्कीच.
पण बघा ना सर, काय झालं ते. काल कळलं की त्याला कोरोंना झाला आहे आणि तो आता अॅडमिट आहे. हॉस्पिटल ने फोन बाळगायला मना केलं, त्यामुळे त्याच्याशी बोलणं पण होत नाहीये. बघा ना सर, वाईट, साईट बोललं की लगेच खरं होतं. आता मी इथे, मला तर समजतच नाहीये की काय करू ते.
अग तू टेंशन घेऊ नकोस. डॉक्टर आहेत, तिथे त्याची काळजी घेतच असणार. तू चिंता करून काय होणार. Any way तुला कुठली डेट मिळाली आहे ?
अजून नाही, बहुधा ऑगस्ट मध्ये जायला मिळेल असं म्हणताहेत.
तो विषय तिथेच थांबला. आता कामाला सुरवात झाली होती.
रात्री देवयानीनी फोन केला. अश्विनीनीच उचलला.
काय खबर वाहिनी ?
देवयानी अधीर झाली होती. हे तिच्या कातर स्वरावरूनच अश्विनीच्या ते लक्षात आलं होतं, की तिला खूप काळजी वाटते आहे म्हणून.
अग तो माणूस, विकासच्या तब्येती बद्दल सांगणार होता, त्यांनी ह्यांना सांगितलं की दोन च्या सुमारास हॉस्पिटल ला या. संबंधित डॉक्टरांशीच गाठ घालून देतो. प्रत्यक्षच त्यांच्याशी बोला. आता दोन वाजता हे जातील. ते आल्यावरच काय परिस्थिती आहे ते कळेल.
हूं. देवयानीनी सुस्कारा सोडला. अजून अनिश्चितता आहेच. पण निदान आपल्याला कळेल तरी. काय कंडिशन आहे ती.
हो, खरंय. तो पर्यन्त keep the fingers crossed. And pray for his good health.
हो, बरोबर आहे तुमचं वाहिनी. आपल्या जवळ दूसरा पर्याय तरी कुठे आहे ?
ठीक आहे मग, मीच आता रात्री तुला फोन करेन. ओके ? उद्या शनिवार आहे न, म्हणजे मग आपल्याला सविस्तर बोलता येईल. तू आता झोप शांत पणे. काळजी करत उगाच जागू नकोस.
हो, मी वाट पाहते तुमच्या फोनची. ओके बाय.
रात्र भर देवयानी तळमळत होती. सलग अशी झोप लागतच नव्हती. जाग आली की विकास चा विचार मनात येऊन थरकांप व्हायचा. अमेरिकेत सुद्धा कोरोंना चा धुमाकूळ चाललाच होता. तिथल्या बातम्या तर अजूनच भयंकर होत्या. जाग आली की ती रामरक्षा म्हणायला सुरवात करायची. म्हणता म्हणता केंव्हातरी झोप लागायची. पुन्हा थोड्या वेळाने दचकून जागी व्हायची. असं करता करता पांच वाजले. मग तिने विचार केला की फोन लावावा का ? पण मग विचार आला की आत्ता भारतात तीन साडे तीनच वाजले असतील, म्हणजे डॉक्टर शी भेटून भैय्या भाऊजी अजून आले नसतील. मग पुन्हा एक डुलकी काढली. तिला एकदम नऊ वाजाच जाग आली. ती लगेच उठून बसली. फ्रेश झाली आणि फोन केला.
देवयानी, अग रात्रभर जागी होतीस की काय ?
नाही, नाही चांगली झोपले होते.
आवाजावरून तर तसं वाटत नाही. खरं सांग.
नको ना वहिनी, सांगा न काय सिचुएशन आहे ?
ओके सांगते. हे जाऊन आले हॉस्पिटल मध्ये. डॉक्टर शी बोलणं झालं. विकासची प्रकृती तितकीशी चांगली नाहीये. ऑक्सिजन पर्सेंटेज कमी झालं आहे म्हणून ऑक्सिजन लागला आहे. दहा बारा दिवस तरी हॉस्पिटल मध्ये राहावं लागेल असं
म्हणताहेत. क्ष-किरण फोटो काढला, त्यात छातीत पॅचेस आढळले आहेत. खोकला पण आहेच. ते कुठलं तरी remdesivir नावाचं इंजेक्शन आहे ते द्यावं लागणार आहे.
अरे देवा, देवयानी म्हणाली आणि तिला स्वत:ला आवरता आलं नाही. ती रडायलाच लागली. आणि नकळतच तिने फोन बंद केला.
सगळे जण हॉल मध्येच होते. आणि अश्विनीने फोन स्पीकर वर टाकला होता. त्यामुळे ती रडते आहे हे सर्वांनाच कळलं पण कोणीच काही करू शकत नव्हते. आधी त्यांनी ठरवलं होतं की देवयानीला सगळं ठीक आहे असच सांगायचं पण नंतर सर्वांचंच असं मत झालं की देवयानीला सगळं कळायलाच हवं. शेवटी ती त्याची होणारी बायको आहे.
पांच मिनिटांनी अश्विनीनी देवयानीला फोन लावला. या वेळी विडियो कॉल लावला. अश्विनीला अपेक्षा नव्हती की ती कॉल घेईल म्हणून पण देवयानीनी तो घेतला. देवयानीचा चेहरा बघितल्यावर सगळ्यांनाच धस्स झालं. देवयानी अजूनही रडतच होती.
अग शांत हो देवयानी, इतकी काही परिस्थिती वाईट नाहीये. काळजी करण्या सारखी आहे, पण इतकी क्रिटिकल नाही. बघ आम्ही कोणी रडतो आहे का ? शांत हो बाळा.
तुमच्या चेहर्यांवरूनच दिसतंय आहे की किती काळजीत आहात तुम्ही लोकं. असं व्हायलाच हवं होतं का हो वहिनी ? पहा न किती विघ्न येताहेत आमच्या लग्नात.
तुम्हाला सांगते वहिनी, आमचा बॉस एकदा म्हणाला होता की वडील अॅडमिट आहेत असं खोटं सर्टिफिकेट देऊन त्यांचा मित्र लवकर भारतात गेला. तू का नाही करत असं. ? मी सांगितलं त्यांना की मी असं काहीही करणार नाही म्हणून. हे विकासला सांगितलं तर तो म्हणाला की मी पाठवू का मी अॅडमिट आहे असं सर्टिफिकेट, मी इतकी चिडले त्याच्यावर की आमचं आठ दिवस बोलणंच नाही झालं. आणि आता बघाना कशी बोला फुलाला गाठ पडली आहे ते. असं बोलावं का हो त्यानी ? का हो असं अभद्र बोलला तो ? तेंव्हाच माझ्या मनात पाल चूक चुकली होती.
आणि हे बोलता बोलताच देवयानी पुन्हा रडायला लागली. आता सर्वांच्या लक्षात आलं की देवयानी एवढी हमसून हमसून का रडते आहे ते. त्यांनाही विकासचा रागच आला. पण आत्ता या क्षणी देवयानीला समजावणं आवश्यक होतं.
नेहमी हसतमुख असलेल्या देवयानीचा देखणा चेहरा आज काळवंडून गेला होता. एक प्रकारची पिळवटून टाकणारी वेदना तिच्या चेहऱ्यावर पसरली होती. तिला असं पाहून अश्विनी आणि यमुनाबाईंना सुद्धा रडायला आल. पण त्यांनी कसं बसं स्वत:ला सावरलं. थोड्या वेळाने देवयानी रडायची थांबली. उठून washroom मध्ये जाऊन फ्रेश होऊन आली. आता नेहमी सारखी नाही, पण बरीचशी पूर्व पदावर आली होती.
ते कुठलं इंजेक्शन म्हणत होता, ते दिलं का ?
नाही ते उद्या मिळणार आहे असं डॉक्टर म्हणत होते.
उद्या मिळणार आहे म्हणजे ? आपण आणू शकत नाही का ?
नाही त्याचा काळा बाजार व्हायला लागला म्हणून सरकार ने त्याचं वितरण आपल्या ताब्यात घेतलं आहे. ते डायरेक्ट हॉस्पिटललाच देतात. इथल्या कलेक्टर ऑफिस मधूनच वितरण होतं.
म्हणजे आपल्या हातात काहीच नाही ?
नाही. सध्या तरी नाही.
मग आता काय करायचं ?
वाट पाहायची. आणि डॉक्टर ने सांगितलं आहे की याच वेळेला आलात तर रोजच्या रोज तुम्हाला अपडेट देईन म्हणून. तेच करायचं. अजून काय ?
पण आता नेमकी कंडिशन काय आहे ?
तसं घाबरण्याचं काही कारण नाही, असं डॉक्टर म्हणत होते. दहा बारा दिवस राहावं लागेल पण नक्कीच बरा होईल. काळजी करण्यासारखी बाब नाहीये, every thing is under control. असं डॉक्टर म्हणत होते. भय्यानेच सांगून टाकलं. मी काय म्हणतो देवयानी, आम्ही सगळे आहोत इथे काळजी घ्यायला. तू चिंता करू नकोस. आता झोप शांत पणे. रात्रीची झोप राहिली असेल ना. उद्या तुला अपडेट देतो आम्ही.
ठीक आहे बाय.
तरीही बराच वेळ देवयानी नुसतीच बसून होती. सेजल उठली होती, तिच्याही कानावर बऱच काही पडलं होतच. तिने देवयानीला धीर दिला. सेजल ने केलेला गरम गरम चहा प्यायल्यावर देवयानीला जरा तरतरी आली. ती देवयानीला म्हणाली की-
देवयानी, जरा विचार कर, विकास जर पुण्याला असता आणि आजारी पडला असता, तर किती महागात पडलं असतं. पुण्याला त्याची काळजी घ्यायला कोणीच नाहीये. फार कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. As against तो नागपूरला गेल्यावर; आजारी पडला, त्याची सगळीच माणसं तिथे आहेत. तिथे त्यांच्या ओळखी पाळखी पण भरपूर आहेत. काही लागलं तर लगेच अरेंज होऊ शकतं. बघ. आणिss, आणि मी काय म्हणते, की जर विकास एवीतेवी अॅडमिट आहेच, तर तू त्या गोष्टीचा फायदा घेऊन लवकरची डेट का नाही घेत ? तुझं चित्त लागत नाहीये ना इथे, मग जा की लवकर. नाही तरी बॉस तुझ्या . favour मध्ये आहेच. विचार कर. तू तिथे त्याच्या डोळ्यासमोर असलीस, तर त्याची recovery पण लवकर होईल. तू जवळ आहेस ही गोष्ट त्याला लवकर उभारी देईल. बघ विचार कर.
देवयांनी विचार करत होती, सेजल च्या बोलण्यात तथ्य होतं. काय करावं ?
क्रमश:.......
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा.
https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187
धन्यवाद.