Dec 06, 2021
मनोरंजन

देवयानी, विकास आणि किल्ली भाग १६

Read Later
देवयानी, विकास आणि किल्ली भाग १६

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

    देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

 

 

 

 

 

भाग १६  

भाग  १५     वरून  पुढे  वाचा ................

 

गोविंद राव काय झालं ? भगवानराव गोविंद रावांकडे बघून म्हणाले, तुम्ही असे गप्प का ? काय चाललं आहे तुमच्या मनात ?

भगवानराव अहो, आम्ही मध्यम वर्गीय माणसं. विचार तर  येणारच ना मनात. आधीच ऑपरेशन चा बेसुमार खर्च झाला आहे. आणि आता जर हॉल आणि caterer  चे पैसे त्यांनी दुसऱ्या तारखेत अॅडजस्ट केले तर ठीक नाही तर काय करायचं याच विचारात होतो. अजून काही नाही. बरं मी हा असा बेड वर पडून आहे. काय करणार आहे मी ? सुरेश ची परीक्षा अगदी तोंडावर आली आहे. त्यांनी या मामल्या मधे लक्ष्य घालून आपला अमूल्य वेळ खर्ची घालावा असंही मला वाटत नाहीये. आधीच माझ्या मुळे त्याचा बराच वेळ वाया गेला आहे.

भगवानरावांनी गोविंदरावांचे हात आपल्या हातात घेतले. हलकेच दाबले, थोडं थोपटलं हातावर आणि म्हणाले –

गोविंद राव, या गोष्टीची काळजी तुम्ही का करता आहात ? आम्ही आहोत ना. तुम्ही आम्हाला सर्व डिटेल्स द्या, आम्ही बेळगाव ला जातो आणि सर्व ठीक करून येतो. मग तर झालं ? सुरेश ला involve करूच नका. आम्हीच करू सगळं. त्याचा एक मिनिटही वाया जाऊ देणार नाही. अहो सोय जाणेल तो सोयरा, अशी म्हणच आहे ना ! मग आता फार विचार नका करू. लवकर बरे व्हा.

हे ऐकल्यावर गोविंदरावांचे डोळे पाणावले.

कावेरीबाईंना पण भावना आवरता आल्या नाहीत. त्यांनी पण डोळे पुसले. देवयानी पण भारावून गेली होती. विकास आणि सुरेश बघत होते. त्यांना या सिचुएशन मधे काय बोलावं तेच कळत नव्हतं. ते नुसतेच एकमेकांकडे बघत राहिले. गोविंदराव गदगदलेल्या स्वरात म्हणाले –

भगवानराव, लाख मोलाची  गोष्ट बोललात तुम्ही ! फार मोठ्या मनाची माणसं आहात तुम्ही सर्व. आमचा खूप मोठा गैरसमज झाला होता सुरवातीला. आम्हाला माफ करा. आमच्या देवयानीचं भाग्य थोर म्हणून तुमच्या सारखं सासर  मिळतंय  

तिला. पुढे त्यांना बोलवेना. म्हणून ते गप्प झाले. विकास पुढे झाला.

बाबा, अहो असं का बोलता ? मला तुम्ही मुला सारखाच मानता न ! मग मुळीच काळजी करू नका. लवकर बरे व्हा. आमच्या साठी आत्ता या घडीला तेच सर्वात महत्वाचं आहे. काय सुरेश मी बरोबर बोलतोय ना ?

सुरेशने मान हलवली. त्याला पण आता बोलणं कठीण झालं होतं. या लोकांचा जिव्हाळा पाहून त्याचेही मन भरून आलं होतं. देवयानी या घरात सुखात राहील याची त्याला आता पूर्णच खात्री पटली होती.

मी काय म्हणतो गोविंदराव, एक सुचवावसं वाटतंय, सुचवू का ?

भगवानराव अहो हे काय विचारणं झालं ? बोला नं.

मी काय म्हणतो, आपण लग्नाची तारीख पुढे ढकलू आणि लग्न नागपूरलाच करू म्हणजे तुमच्या वर कामाचा बोजा पडणार नाही. नागपूरला आमचा कारभार सगळा  सेट झालेला आहे. भरपूर माणुसबळ आहे. तुम्ही फक्त यायचं आणि वधू वरांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या. बस.

अहो पण आमची बेळगावची किती तरी लोक बोलवायची राहून जातील ना !

अहो त्यात काय ? नंतर तुमच्या सोयीने एक रिसेप्शन देऊन टाका. झालं.

हो बाबा असच करू. पण मला वाटतं की लग्न थोडं पुढे करू, पण बेळगावलाच करू. - सुरेश

अरे बेळगाव ला करायचं म्हणजे तुमची खूप दमछाक होईल. नागपूरला केलं तर आम्हाला तिथे खूप सपोर्ट आहे. काही प्रॉब्लेम नाही. भगवानराव म्हणाले.

अहो आमच्या कडे  लग्न मुलीच्याच मांडवात होतं. म्हणून.

अरे सगळी कडेच ही रीत आहे. नवीन काही नाही त्यात. पण परिस्थितीनुरूप आपली सोय पाहून आपण निर्णय करायचा असतो.

हो, पण बाबा, आता पुढची तारीख म्हणजे जवळ जवळ मे उजाडणार तो पर्यन्त बाबा ठीक होतील आणि माझी परीक्षा होऊन रिजल्ट पण लागलेला असेल. तेंव्हा टेंशन घेण्याचे काहीच कारण उरणार नाही. आता फक्त हॉल आणि caterer ला विचारून बघू, काय म्हणतोय ते. मी आणि विकास दोघंही जातो बेळगाव ला आणि बघतो काय करायचं ते.

ठीक आहे तुम्ही म्हणता तसं करून बघू. आधी तुम्ही जाऊन या. उशीर करू नका.

हो, उद्याच रात्री निघतो.

ठीक.

चालू असलेल्या घडामोडींवर देवयानी आणि विकासला दोघांनाही एकमेकांशी बोलायला वेळच मिळाला नव्हता. म्हणून त्या दिवशी देवयानी आणि विकास थोडं फेर फटका मारायला निघाले.

रात्र झाली होती म्हणून भगवानराव म्हणाले की लवकर या. जास्त दूर जाऊ नका. त्यावर विकास म्हणाला की पायीच जातो आहे जरा पाय मोकळे करून येतो.

थोडं बोलणं झाल्यावर देवयानी म्हणाली की

विकास आपण जरा पत्रिका दाखवायची का कोणाला तरी ?

का ग ? असं अचानक काय झालं ? अग रस्त्यावर अपघात कोणालाही होऊ शकतो. त्यातही आपलीच चूक असली पाहिजे असं काही नाहीये.

नाही, मी अपघाताबद्दल बोलत नाहीये. मी म्हणते आहे की आपल्या लग्नात सारखी विघ्न येताहेत म्हणून. आधी डिसेंबर आणि आता मे. अजून पुढे काय वाढून ठेवलं आहे कोण जाणे. मध्येच ते राजूचं प्रकरण झालं. काय चाललं काय आहे हे ? आणि आपल्याच बाबतीत का ?

तू म्हणते आहेस ते बरोबर आहे. पण या बाबतीत आपला कुठलाच रोल नव्हता. हां, त्याचा परिणाम आपल्यावर झाला पण त्याला आपण काय करू शकतो ?

म्हणूनच म्हणते आहे की एखाद्या चांगल्या ज्योतिष्याला पत्रिका दाखवू. कळेल तरी आपल्याला की काय उपाय करायचा  आहे तो.

हूं, तू म्हणतेस त्यात तथ्य आहे खरं. ठीक आहे आम्ही बेळगाव वरून आल्यावर आपण यावर विचार करू.

मला नं आज काल खूप भीती वाटायला लागली आहे की काही तरी विपरीत घडेल, आणि आपली जन्माची ताटा तूट तर होणार नाही ना, अशी सतत भीती वाटत असते. अरे सतत काही ना काही घडतच आहे. काय करावं तेच उमगत नाहीये. विकास मी कशी राहू, तुझ्या शिवाय ? तू मला जर सोडून गेलास तर माझं काय होईल ?

देवयानी असं काहीही घडलेलं नाहीये की ज्याच्या मुळे तू असा निराशेचा सुर लावावा. Be positive.

हो रे मी आपल्या मनाला खूप समजावते नेहमी पण तरी काळजी वाटतेच.

नको काळजी करू. सब ठीक हो जाएगा. मी आहे ना. मग. माझ्यावर सोड सगळं.

ओके प्रयत्न करते. जमेल की नाही माहीत नाही.

दुसऱ्या दिवशी रात्रीच्या बस ने विकास आणि सुरेश दोघेही बेळगाव ला निघाले.

तिथे पोचल्यावर आंघोळी आणि ब्रेक फास्ट करून दोघेही हॉल वर गेले. सगळी कामं संपे पर्यन्त अख्खा दिवस मोडला पण काम झालं होतं. त्यामुळे समाधान वाटलं. रात्री विकासने भगवानरावांना फोन केला.

हॅलो, बाबा विकास बोलतो आहे.

हं. बोल विकास काम झालं का ?

हो बाबा, बाबा स्पीकर वर टाका म्हणजे सगळ्यांना ऐकता येईल.

भगवान राव गोविंदरावांच्या खोलीत गेले. तिथेच कावेरी बाई आणि देवयानी पण बसल्या होत्या. पाठोपाठ यमुनाबाई पण आल्याच. त्यांनाही उत्सुकता होतीच.

हं. सांग आता. सगळेच आहेत इथे आता.

आम्ही हॉल च्या ऑफिस मधे गेलो त्या वेळेला तिथे कोणीच नव्हते, मग आम्ही फोन करून त्यांना बोलावून घेतलं. साधारण तासाभराने  दोघंही आले. आम्ही त्यांना परिस्थितीची कल्पना दिली आणि पुढची तारीख मिळू शकते का असं विचारलं.

तर ते म्हणाले की “ तुम्ही लकी आहात कालच एक पार्टी आली होती त्यांना  तुम्ही ज्या तारखेला बूकिंग केलं होतं  तीच तारीख हवी होती. काल तर आम्ही त्यांना नाही म्हणून सांगितलं पण थोडं थांबा त्यांना फोन करतो, जर कुठे बूक केला नसेल तर तुम्हाला chances आहेत.” मग त्यांनी फोन केला आणि ती पार्टी  लगेच हो म्हणाली. एक प्रश्न सुटला.

एवढं झाल्यावर त्यांनी आम्हाला विचारलं की कोणच्या तारखा हव्यात म्हणून. मे महिन्यातल्या दोन तारखा available होत्या. सुरेश ने मग गुरुजींना फोन लावला आणि विचारलं की यापैकी कोणची तारीख चालेल म्हणून. तर त्यांनी सांगितलं की दोन्ही तारखा लाभताहेत. पण हॉल चे मॅनेजर  म्हणाले की घरी विचारा की कोणची तारीख चालेल म्हणून. आणि उद्या सांगा मग बूक करून टाकू. आम्ही दोन्ही तारखा उद्या पर्यन्त मोकळ्या ठेवतो. तर आता तुम्ही आपसात विचार करून सांगा. मी ठेवतो आता.

मग देवयानी आणि तिच्या आईचं थोडं बोलणं झालं आणि देवयानी म्हणाली की दोन्ही तारखांना कुठलीच अडचण नाहीये. कोणचीही तारीख चालेल. मग तसं विकास ला फोन करून कळवलं.

दुसऱ्या दिवशी विकासने तारखा फायनल केल्या आणि रात्रीच्या बस मधे बसला.

सुरेश बेळगावलाच थांबला. सगळं कसं सुरळीत झालं होतं. देवयानीच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधानाची छटा आली होती. मळभ निघून गेलं होतं.

विकासच्या ऑफिस मधे त्यांच्या एका सहकाऱ्याला एका ज्योतिष्याचा चांगला अनुभव आला होता, त्याचं नाव,पत्ता आणि फोन नंबर घेऊन विकास घरी आला.

सगळ्यांची समोर त्यांनी हा प्रस्ताव ठेवला. भगवानरावांना काही आवडलं नाही पण त्यांनी विरोध केला नाही.

दुसऱ्या दिवशी शनिवार होता, दुपारी पांच वाजता देवयानी आणि विकास दोघेही दिलेल्या पत्त्यावर पोचले.

गृहस्थ जरा धार्मिक, आध्यात्मिक वळणाचे वाटत होते. देवयानीने त्यांना प्रॉब्लेम सांगीतला. त्यांनी दोघांच्या पत्रिका तयार केल्या आणि त्याचा अभ्यास केला. देवयानी आणि विकास हे सर्व होई पर्यन्त अर्धा तास चूप चाप बसून होते. गुरुजी काय सांगतील ह्याचा मनावर ताण होता.

 

कुंडलीचे डिटेल्स सांगू की सरळ अनुमान सांगू ? गुरुजींनी विचारलं.

म्हणजे  काय ?

म्हणजे असं की कुठला ग्रह कोणच्या घरात आहे आणि त्याची  दृष्टी कुठे आहे, कोणचा वक्री आहे आणि कोणच्या ग्रहांची दशा, महा दशा चालू  आहे वगैरे. तसंही या  सगळ्या बाबी तुम्हा कळणार  नाहीत. पण तुमची इच्छा  असेल तर  सांगतो.

विकास ने देवयानी कडे पाहीलं आणि म्हणाला

न नको. ज्या गोष्टी कळणार नाहीत त्या ऐकून  काय करणार  ? आम्हाला  जे कळेल तेवढंच सांगा.

ठीक आहे. पत्रिके वरून जे दिसतंय त्यावरून पुढची दीड ते दोन वर्ष तरी लग्नाचा योग दिसत  नाहीये. अडचणी काय येतील हे सांगता येणार  नाही पण लग्नाचा योग नाही.

देवयानीच बोलली –

माझ्या लग्नाचा योग नाही की आमच्या  लग्नाचा योग नाही ?

तुमचं लग्न हे होणारच. पण कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे दीड दोन वर्ष लांबणीवर पडणार  अशी चिन्ह आहेत. दोघांचही बाशिंग बळ जरा जडच दिसतंय. पण दोन वर्षांनंतर लग्न झाल्यावर विकासचा भाग्योदय आहे. तुम्हाला कल्पना  येणार नाही एवढी तुमची भरभराट  होणार आहे.

अजून किती धक्के बसणार आहेत ? विकासने विचारले. कारण या लग्नाला दोन्ही कुटुंबाचा होकार आहे. त्या फ्रंट वर काहीच  problem नाहीयेत.

नाही, नाही धक्का म्हणू असं काही दिसत नाहीये पण लग्न लांबणार एवढं पक्कं.

देवयानी विकासला म्हणाली की बघ विकास माझी भीती सार्थ होती. आता लग्न लांबणार म्हणजे ते काही तरी संकट असणार म्हणूनच. उगाच काही घडत नसतं.

गुरुजी यावर काहीच बोलले नाहीत.,

गुरुजी, देवयानी बोलली –

गुरुजी, काही विघ्न येऊ नये या साठी काही उपाय आहे का ?

हे बघा, मला जाणवलं असतं तर नक्कीच सांगीतलं असतं. पण एक गोष्ट आहे ती ही की नशीबात असेल ते चुकत नाही. पण त्यांची तीव्रता कमी होऊ शकते. तुमची तयारी आणि विश्वास असेल तर सांगतो.

सांगा न, आम्ही करू.

विकास कडे पाहून गुरुजी म्हणाले की तुमच्या कुलदेवतेतचं  दर महिन्यात जाऊन दर्शन घ्या आणि सर्व ठीक होऊ दे म्हणून प्रार्थना करा. बस. तीव्रता थोडी कमी होईल.

बस, एवढंच ? विकास बोलला. हे मी करेन. पण गुरुजी आमचं कुलदैवत तिरूपतीचा  बालाजी आहे आणि आम्ही साधारण वर्षातून एकदा दर्शनाला जात असतो.

आता दर महिन्यात जा. संकट निवारणासाठी थोडे कष्ट तर घ्यावेच लागतील. पण फळ नक्कीच मिळेल. या आता.

गुरुजी एका महिन्यात विकास आणि दुसऱ्या महिन्यात मी गेले तर चालेल का ?

तुमचं कुलदैवत बालाजी आहे का ?

नाही.

मग ? आणि तसंही देवा कडे याचना विकासरावांना करायची आहे. तुम्हाला त्याचं फळ आपोआप मिळणार आहे.

गुरुजी, प्रत्येक वेळेला तिरूपतीला जाऊन यायला किमान तीन दिवस तरी लागतील. जर माझा भाऊ किंवा वडील अधून मधून जाऊन आले तर चालेल का ? -विकास

हे पहा, अडचणी तुमच्या लग्नात येताहेत, त्यांच्या नव्हे. पेपर कोण सोडवतो ? विद्यार्थी की आई वडील ?

गुरुजींनी असं म्हंटल्यांवर, मग पुढे काही न बोलता देवयानी आणि विकास बाहेर पडले.

घरी आल्यावर सगळ्यांना विकासने काय गुरुजी म्हणाले ते सांगितलं. सर्वांच्या साठी हा आणखी एक धक्काच होता. यावर बरीच चर्चा झाली. पण निष्पन्न काहीच निघाल नाही.

भगवान रावांच कुलदैवत तिरूपति चा बालाजी होतं. आता दर महिन्यात तिथे जायचं म्हणजे सोपं काम नव्हतं. पण इलाज नव्हता. प्रश्न हा होता की दर महिन्यात सुट्टी मिळेल का ? कारण रविवारच्या एका दिवसांत जाऊन येणं शक्य नव्हतं.

भगवानराव म्हणाले की तू गुरुजींना विचारायला पाहिजे होतं की एकदा तू, एकदा भैय्या आणि एकदा मी गेलो दर्शनाला तर चालेल का म्हणून. हरकत नाही उद्या फोन करून विचार.

हे पण विचारलं होतं, पण बाबा, त्यांनी clear cut सांगितलं की हे मलाच करायचं आहे म्हणून. मी करेन. थोडा बॉस चीड चीड करेल पण अडवणार नाही असं वाटतं आहे. माझं काम चोख  आहे त्यामुळे मी बोलेन त्यांच्याशी. बघू काय होतं ते. बालाजीच्या मनात असेल तर तिरूपतीला जायला अडवण्याची बुद्धी कोणाला होणार नाही.

 

 

 

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

[email protected]

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired