Dec 06, 2021
मनोरंजन

देवयानी, विकास आणि किल्ली भाग 3

Read Later
देवयानी, विकास आणि किल्ली भाग 3

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मानिषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

भाग   3......

भाग 2 वरून पुढे  वाचा ...........

मेस मध्ये जेवून घरी परतल्यावर उशिरा रात्री पुन्हा तिचा कॉल आला. या वेळेस मात्र त्यानी तत्परतेने उचलला.

हॅलो

काय करताय ?

काही नाही.

जेवणं झालं ?

झालं ! असले निरर्थक प्रश्न का विचारते आहेस ? कुठे आहेस ? मुंबईला ?

हो. आज सकाळीच पोचले. तुला फोन करणार होते पण अरे, लगेचच ऑफिस ला जावं लागलं. संध्याकाळी तुला फोन केला होता पण तेवढ्यात कॉल आला मग घ्यावा लागला.

कोणाचा कॉल आला ?

बॉसचा, अजून कोणाचा ? खडूस आहे. घरी जायच्या वेळेसच काही तरी कारण काढून बोलावतो.

अग खडूस माणसंच बॉस बनतात. ते qualification आहे. तू मनावर घेऊ नको.

उशीर झाला आहे, घरी सोडू का असं विचारात होता.- देवयानी

स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. पोरगी पटली  तर उत्तमच.

तू पण असच करतो ?

छे, मी मुलींच्या वाऱ्याला पण उभा राहत नाही. तुझा अनुभव काय सांगतो ?

ते दिसलंच मला त्या दिवशी, म्हणून तर मला तू आवडलास.

काय म्हणालीस ? अहाहा ! पुन्हा एकदा म्हण न.

आकाशवाणी एकदाच होते. असं म्हणून दिलखुलास हसली.

तिच्या हसण्यात विकास बुडाला. शेवटी म्हणाला-

आता काय करावं ?

म्हणजे ?

तू पुण्याला असतीस तर धावत आलो असतो हे ऐकायला. आय मिस यू.

Me too. माझी खूप इच्छा होती अजून एक दोन दिवस पुण्याला राहण्याची. तुझ्या सहवासात. पण नाही शक्य झालं.

एक कर, तुम्हाला शनिवार रविवार सुट्टी असते. तू ये या शनिवारी पुण्याला.

या शनिवारी नाही जमणार. मोठा धोबी घाट आहे. कपडे धुतले नाही तर सोमवारी ऑफिस ला जायला सुद्धा असणार नाहीत. पुढच्या शनिवारी येते. चालेल ?

एक आठवडा भर वाट पहावी लागेल, पण चालेल. बरं ते जाऊ दे. काल फोन का कट केलास ? किती वेळ मला झोप आली नाही.

हेच तर मला ऐकायचं  होतं. मजा आली ऐकून.

तुझी थट्टा झाली पण माझा इकडे जीव जात होता त्याचं काय ?

मला पहायचं होतं की तुम्ही मला मिस करता की नाही ते.

झालं समाधान ?

हो sss आणि मग तिला हसू आवरेना.

मग रोजच रात्री फोन कॉल्स सुरू झाले. दोघांनाही एकमेकांशी बोलल्या शिवाय राहवत नव्हतं. गुरूवारी  रात्री तिचा फोन आला तेंव्हा विकास म्हणाला.-

परवा  केंव्हा येते आहेस ? मी अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकतो. मस्त फिरू, बाहेरच जेवू मजा करू. तुझ्या सहवासात फूल दिवस घालवायची किती दिवस आतुरतेने  वाट पहातो आहे. स्टेशन वर येऊ का घ्यायला ?

ऐक ना, एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे. पहिले काय सांगू ?

आधी बॅड  न्यूज. मग गुड न्यूज. स्वीट डिश नंतर.

ओके. मी या शनिवारी पुण्याला  येऊ शकणार नाही.

औँ, का ? तुझी इच्छा नाहीये का , मला भेटायची ? ठीकच आहे.

त्याचा स्वर एकदम बदलला. हिरमुसला तो. गप्प बसला.

अरे असा चिडू नकोस रे माझ्यावर. मला रडायला येईल तू असा रागावलास तर.

मग काय करू ? काय काय ठरवलं होतं करायचं, तू आल्यावर. पण तू बोळा फिरवलास. आता कळलं की असं करण्यात तुला मजा येते. तू एंजॉय करते मला त्रास देऊन.

नाही रे. पण  ऐक न, आता गुड न्यूज देते.

नको. तू येणार नाहीस म्हंटल्यांवर, मग कुठलीच बातमी गुड असणार नाही माझ्या करिता

अरे ऐक तर. मग उद्या मी येणार नाही, हे  तू विसरून जाशील.

बरं सांग. ऐकतोय  मी.

मी कायमचीच पुण्याला येणार आहे, असं म्हंटलं तर तू काय म्हणशील ?

वेल्कम म्हणेन. पण  एकदम अचानक ? मुंबईची नोकरी सोडणार आहेस  का ?

अरे पुण्याच्या कंपनीत माझी निवड झाली आहे. मी उद्या जाऊन एक महिन्याची नोटिस देणार आहे. म्हणून आता महिनाभर येता  येणार नाही.

असं कसं ? चेष्टा करतेस का माझी ? एकाच इंटरव्ह्यु मध्ये ऑफर मिळाली ?

नाही, जवळ जवळ दोन महीने ऑन लाइन चालू होतं. फायनल साठी पुण्याला बोलावलं होतं. त्या दिवशी तू जर माझ्या सुटके साठी धावुन आला नसतास तर मात्र ही नोकरी हातची गेली असती.

या नोकरीवर इतकी आशा लावून बसली होतीस ?

आधी नव्हती. पण  आता परिस्थिती वेगळी आहे.

आता काय वेगळं आहे ?

तू.

मी ?

तू आहेस ना. तू पुण्याला आहेस मग मी मुंबईला राहून काय करू ?

ए, this is too much.

आता याच्यात too much काय आहे. ?

विडियो कॉल करू दे आणि मग पुन्हा म्हण की मी मुंबईला राहून काय करू. मला बघू दे की जरा माझ्या मैत्रिणीचा लाजरा चेहरा.

देवयानी अजूनच लाजली पण हे विडियो नसल्यामुळे विकासला दिसलं नाही. बिचारा.

हे बघ आता मी सांगीतलं तुला की काय वेगळी परिस्थिती झाली आहे ते. आता तुझी पाळी. आता तू सांग.

मी काय सांगायचय ?

आठव. आणि आठवल्यावर सांग. आता मी ठेवते. गुड नाइट

 

विकास विचारच करत होता, त्याला समजेना की काय आठवायला सांगते आहे ते. आणि तेवढ्यात तिने फोन ठेवूनच दिला. ही अशीच करते. अर्धवट बोलून फोन कट करते आणि मग भुंगा छळत राहतो रात्रभर. काय म्हणावं या पोरीला ? exploit करते. माहीत आहे न की मी तिच्यावर जीव लावून बसलो आहे ते. आता उद्या फोन करेल तेंव्हा अर्धवट  फोन कापणार नाही, याचा सोक्ष मोक्ष लावूनच टाकू. तिच्याकडून कबूल करूनच घेऊ. हे मनाशी ठरवल्यावर मग जरा तो शांत झाला.

दुसऱ्या दिवशी रात्री फोन आल्यावर आधी त्यांनी तिच्याकडून कबुली घेतली की अर्ध्यातच फोन कापणार नाही म्हणून.

पण ही वाईट सवय तुला लागलीच कशी ?

तूच लावली.

मी ? आणि ती कशी काय ?

मी फोन कापला की तुझा चेहरा कसा  झाला असेल याची मी कल्पना करत झोपते. मस्त मजा येते.

हात जोडले तुझ्या पुढे.

अरे गंमत म्हणून. पण आता प्रॉमिस करते. नाही करणार असं. मग तर झालं. ? ए तू मला माझ्या नवीन नोकरी बद्दल काहीच कसं नाही विचारलं ?

अग तू फोन चालू ठेवला तर मी काही विचारीन ना. तुला तर सॉलिड घाई असते कापायची.

आता नाही कापणार. तू विचार न.

हां आता कसं. आता सांग सर्व डीटेल मध्ये. पण काय आहे न प्रत्यक्ष तू समोर असतांना ऐकण्यात जास्त मजा आली असती.

ओके. असं म्हणून तिने कॉल बंद केला.

आता मात्र विकास ला खरंच राग आला. आत्ताच म्हणाली की फोन कापणार नाही आणि आत्ता  कापून टाकला. पण दोनच मिनिटांत रिंग वाजली आणि त्यांनी बघितलं तर विडियो कॉल होता. त्याला एकदम हर्षवायू झाला. त्यांनी फोन घेतला आणि तिची देखणी, हसरी, प्रसन्न मुद्रा बघितल्यावर त्याचा राग कुठल्या कुठे पळून गेला.

तुझा हसरा चेहरा बघितला आणि भरून पावलो. आता सांग काय डिटेल्स आहेत ते. आणि त्यांनी एक फ्लाइंग किस् फेकला. आणि देवयानी त्याच्या अॅक्शन मुळे  सुखावून गेली. लाजलीच चक्क. गालावर लालिमा आला आणि ते पाहून विकास ? विकास होताच कुठे ? तो तर पोचला होता सातवे आसमान पर.

अरे, बोल ना काही तरी. लक्ष कुठ आहे तुझं ?

लक्ष ? तुझ्याकडे. My god देवयानी, माझाच मला हेवा वाटतोय.

असं काय घडलं ?

परी, परी मिळालीय मला. नुसतं तुला बघतच राहावसं वाटतं.

देवयानी दिलखुलास हसली.

बरं मी अशीच बसून राहते आणि तू बघत रहा. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते आहे का ?

काय ?

मला का शिक्षा देतोयस ? मला पण तुझ्याकडे बघायला लागतंय ना.

आणि देवयानी पुन्हा खळखळून हसली.

विकासनी पण तिच्या हसण्याला साथ दिली.

हं सांग, कशी आहे नोकरी ?

जे आता करते आहे थोड्या फार फरकांनी तेच  करायचं आहे. पगार वाढ आहे पण कमी आहे. पण मी ते अॅक्सेप्ट केलं.

का ?

आता पुण्याला येऊन, तुझ्या बरोबर रहायचं म्हणजे थोडा त्याग करावाच लागेल न ? मग केला.

माझ्या बरोबर राहायचं ? काय मनात काय आहे तुझ्या ? ते लिव इन वगैरे आपल्याला झेपायचं नाही हं मॅडम.

छी,छी ss, काय बोलतोस, तुझ्या जि‍भेला काही हाड ?

तुझा सुर तसाच होता. मग ?

मी म्हणत होते की अजून एक महिना आहे, एवढ्या वेळात तू तुझ्या घरी बोल, आणि मी माझ्या घरी बोलते. वेळेचा सदुपयोग करू आपण. मला आता सुप्रिया कडे रहायचं नाहीये. मी जेंव्हा पुण्याला येईन, तेंव्हा मला आता आपल्या घरी राहायचं आहे.

सुप्रिया कोण ?

अरे माझी मैत्रिण, जिच्या फ्लॅट वर मी थांबले होते, ती.

ओके. मी या शनिवाराला जोडून सुटी काढतो आणि नागपूरला जातो. तू पण या शनिवारी बेळगाव ला जाऊन ये. माझ्या कडे काही प्रॉब्लेम होणार नाही. तू तुझ्या घरचं बघ. फक्त एकच कर तुझे चार पांच फोटो मला सेंड कर. मी माझे करतो. ओके ?

ओके. पाठवते.  पण आता  विडियो चालू आहे. तुझं समाधान झालं असेल न ?

किती भाव खाल्लास विडियो साठी. एवढ्या अर्ज विनंत्या केल्या असत्या तर अमेरिकेच्या अध्यक्षांनी सुद्धा भेटीची वेळ दिली असती. पण तू कसलीss, एक नंबरची  खडूस !

ए तू मला खडूस म्हणालास ? एवढ्या मृदु भाषिणी मुलीला तू खडूस म्हणतोस ?

नाही तर काय, सारख्या धमक्या देत असतेस फोन बंद करीन म्हणून. माहीत आहे न तुला मी कासावीस होतो म्हणून. गैर फायदा घेतेस माझ्या प्रेमाचा.

देवयानी मिष्कील हसत होती. म्हणाली,

मग असच असतं. मुलींनी अडवायचं  आणि मुलांनी सहन करायचं.

म्हणजे काय ? हा काय लाइफ लॉन्ग प्रोग्राम आहे का ?

मग ? तुला काय  वाटलं ?

कुठून शिकली हे ?

शिकायचं काय असतं त्यात ? मुलींसाठी उपजतच असतं हे. मध हवा असेल तर थोडे काटे सहन करावेच लागतील.

अरे असं आहे होय ! माझ्या लक्षातच आलं नाही. मधाची  गॅरंटी आहे न ! मग काटे सहन करू. वाटेल तितके बोचव.

महाशय, आधी नागपूरला जाऊन या,  तिथे किती काटे बोचणार आहेत हे तुम्हाला माहीत नाहीये.

Don’t worry, आमच्या कडे काही प्रॉब्लेम असेल असं मला वाटत नाही. आम्ही विदर्भातले लोक साधे आणि सरळ  असतो.

हे बघ लग्नाचा विषय आला की सगळे dimensions बदलतात. अर्थात आमच्या घरी सुद्धा काही वेगळं असणार नाही म्हणा.

म्हणजे काय नेमकं म्हणायचं आहे तुला ?

नाही माहीत. पण माझा अंदाज आहे की आमच्या कडे चटकन होकार मिळणार नाही.

का ?

अरे नागपूर च नाव काढल्यावर, ते किती दूर आहे, परत विदर्भातले, कशी माणसं असतील, आपण कर्नाटकातले, असे ढीगभर प्रश्न उमटणार आहेत. त्यांचा सामना करावा लागणार आहे.

मग ?

अटी  तटीने  किल्ला लढवावा लागणार आहे. पण तू नको काळजी करू. I WILL MANAGE. बरं पण आता बराच उशीर झाला आहे गुड नाइट. आणि तिने फ्लाइंग कीस ची परतफेड केली. आणि विकास काही बोलायच्या आत कॉल बंद झाला.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

[email protected]

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired