देव,मला मुलाचीच आई बनव.

Story of prear mother own boy baby.

देवा,मला मुलाचीच आई ...

हॅलो... "सुखदा बेटा आई बोलतेय"
बोल आई ,काय म्हणतेस,"
जरा कोरड्या लाल मिरच्या घेऊन ठेवशील का ग? चटणी भाकरी खाऊन कसेबस दिवस निघतील.यंदा पावसा ने ऐन वेळेवर दडीच मारलीे.पुरेस पीक काही हाती आलं नाही बघ. थोडी काही मानी ज्वारी निघालीये यंदा..तेवढाच काय तो पोटासाठी आधार.
"हो आई, घेऊन ठेवते ,सध्या घराजवळच मिरच्यांचा बाजार बसतोय.बाबा आले तर त्यांच्याकडे पाठविते. काळजी करू नकोस.
"बरं बेटा ठेवते फोन,शेजारच्या काकांच्या फोनवरून बोलतेय ,जास्त पैसे जायला नको"

सासूचे कान सुखदाच्या फोन कडे होतेच.मनाची खुटखुट शेवटी काढलीच त्यांनी."काय म्हणत होती तुझी आई? "काही नाही कोरड्या लाल मिरच्या हव्या आहेत तिला, घेऊन ठेव म्हटली."

"अग बाई भाव सांगितला ना ?हल्ली भाव पण गगनाला भिडले आहेत,नुसती महागाई,दुसरं काय..सध्या २१४ रुपये किलो आहेत मिरच्या.... आईला सांग पैसे पाठवायला. मग आणू बाजारातून मिरच्या.
तोच त्यांचा फोन वाजला अगबाई लेकीच्या फोन ...    
 हा बोल...छकुली..
अग आई इकडे आमच्याकडे गावरान वाळलेल्या लाल मिरच्या मिळतच नाही आणि तुला तर माहीतच आहे ह्यांना निसत्याची ओली चटणी कित्ती आवडते. तु जरा घेऊन ठेवशील का?आणि भाव पण सांग,पैसे पाठवते."

"भावाचं काय घेऊन बसली ग? आणि पैसे कशाला पाठवते... घेऊन ठेवते हं.आणि एक किलो जास्तीच्या घेऊन पाठवते."

 हे बोलणे ऐकून मात्र मिरचीचा तिखटपणा सुखदाला चांगलाच झोंबला...का बरं असावा असा भेदभाव.म्हणूनच गरजवंतांच्या ओंजळीत कण नसतो आणि बिगर- गरजवंतांच्या ढेऱ्या अशामुळेच फुगतच जात असतील. 


तिच्या बाबांचा संघर्ष डोळ्यासमोर आला.सुखदा आणि आकांक्षा दोघी बहिणीच..मुली असल्या तरी बाबांनी योग्य संगोपन केले, ऐपत नसताना दोघींना उच्च शिक्षण दिले.तेच पाहून लोक म्हणायचे देखील बाबांना कशाला पोरीच्या जातीला एवढे शिक्षण हवे?शेवटी त्या परक्याच्या घरी जाणार तेव्हा त्यांचा पगार थोडीच तुला मिळणार आहे.?
"तेव्हा बाबा छान हसून उत्तर द्यायचे त्या पोरी असल्या तरी माझ्यासाठी माझा अभिमान आहेत. तुम्ही बघाच त्याच माझा आधार बनतील.माझ्या ईच्छा पुर्ण करतील,आम्हाला सुख देतील.म्हणूनच त्यांची नावे आम्ही आकांक्षा आणि सुखदा ठेवलेय.


दोन एकर शेत विकून दोघी मुलींची यथासांग देणे-घेणे करून भरल्या घरात लग्न लावून दिली. स्वतःसाठी फक्त एक एकर चा तुकडा ठेवला.

तीन-चार वर्षापासून निसर्गाचा लहरीपणाने पोटापुरते धान्य येणे ही अवघड झाले,वाढत्या वयामुळे श्रमही
 झेपेनासे होऊ लागले.परिस्थिती जास्तच खालावत गेली. आई-वडिलांचे चे हाल पाहून दोघी लेकिंचा जीव तीळ तीळ तुटत असे.घरात सुबत्ता असूनहीे घरातील लोकांच्या विचारसरणीने दोघींचे हात बांधले गेले होते.


"अहो मी काय म्हणते या दिवाळीत मला आई-बाबांसाठी नवीन कपडे ,थोडं फराळाचे सामान घ्यायचा आहे, जुनेच कपडे कधीपासून शिवून शिवून ,रफू करून वापरताय ते. जास्त महाग नाही पण वापरण्यासारखे कपडे घेईन म्हणते म्हणून खरेदी साठी थोडे जास्त पैसे द्याल."

का?तूच काय ठेका घेतलाय का त्यांचा?एकएक पैसा कमवण्यासाठी कष्ट करावे लागतात इथे .तुझ्या बहिणीला सांग.ती तर नोकरी करते.घेईन स्वतःच्या पगारातून." नवराच बोलणं ऐकून सुखदा निशब्द झालीे. 

मनातच म्हणाली ती नोकरी करत असली तरी पगारातील प्रत्येक रुपयाचा हिशोब दयावा लागतो घरी तिला.मुळात पगार जमा होतोच भाऊजींच्या सामायिक खात्यावर.तेही तुमच्यासारखेच...ते काय घेणार? मी नोकरी करायचं म्हणते तर आपल्याला काही कमी नाही,घर कोण सांभाळेल ?अशी हजारो कुजकी कारणे देऊन घरी बसवलतं,त्या जन्मदात्याने हाडाची काडं करून वाढवले, हातचं काहीही न राखता शिक्षण दिले आम्हा दोघी बहिणींना ते काय हे दिवस पाहण्यासाठी?सुखदा चे डोळे उष्ण अश्रुनी भरले.


भाऊबीजेला बाबा आले.पाच रुपयाचा पार्ले बिस्कीट पुडा सुखदा च्या हाती देत केविलवाणे म्हणाले,
"पोरी सध्या एवढेच देऊ शकतो तुझा बाप"
 "असं काय हो बाबा हे बिस्किट लहानपणापासून माझ्या खूप खूप आवडीच आहे.माझ्यासाठी ही भेट जगातली सर्वात सुंदर आणि आकाशाएवढी मोठी आहे ".

निघताना नेहमीसारखाच सुखदाने घरात असलेल्या किरण्यातील दोन,तीन साबण,थोडी साखर-चहा पावडर छोट्याशा बाटलीत तेल आणि इतर असं जे तिला देता येईल ते पिशवीत भरून दिले, स्वतःच्या खर्चातील काटकसरीने वाचवलेले थोडे पैसे बळजबरीने बाबांच्या खिशात गुपचूप कोंबले. फूल नाही पण फुलाची पाकळी तरी आपण आई बाबांना देऊ शकलो याचं समाधान तिला वाटलं तिला पण ते क्षणभरच टिकल .

जुजबी सामानाने भरलेली ती पिशवी सासूच्या नजरेस पडली.लगेच तरातरा मधल्या खोलीत जाऊन त्यांनी सुखदास बोलविले आणि त्यांच्या तोंडाचा न थांबणारा पट्टा सुरु झाला किराणा काय फुकट येतो काय? त्यास पैसा लागतो माझा नवरा आणि मुलगा घाम गाळून कमावतात तेव्हा कुठे हे वैभव दिसतेय. सुखदा असलं काही चालणार नाही.सासर्‍याने जावयास द्यायला पाहिजे की त्याना लेकीने पुरवायला पाहिजे.आपल्या अंगणात काही झाडाला पैसे येत नाही असं बरच काही सासू जोरजोरात मुक्ताफळे उधळत होती. 

बाहेरच्या खोलीत सुखदा चे बाबा खजील पणे ऐकत डोळे पुसत होते .पिशवी तिथेच पडू देऊन लेकीचा निरोप न घेता हळूच बाहेरच्या खोलीतून निसटले .ते कधी न येण्यासाठीच.
 परिस्थितीने आलेली लाचारी आणि लेकीच्या घरी झालेला अपमान जिव्हारी लागला.हलका हृदयविकाराचा झटका आला.  तात्पुरती उपचार घेऊन घरी आले .डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे हृदयाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते पण त्यासाठी आहे ते एक एकर शेत विकावे लागणार. आपल्या माघारी तेवढा शेताचा तुकडाच काय आधार राहील बायकोसाठी म्हणून कोणास आजाराबद्दल न सांगताच शरीरास होणारा त्रास लपवत त्यांनी जगाचा निरोप घेतला. 

बाबांच्या अवकाळी जाण्याने दोघी लेकींच्‍या हृदयास चांगलेच चरे पडले त्यांच्या मरणाला काही अंशी आपणच जबाबदार म्हणून दोघी धाय मोकलून रडू लागल्या.आम्ही बाबांच्या कसल्याच ईच्छा पूर्ण करू शकलो नाही,तिळमात्र सुख देऊ शकलो नाही........सुखदा च्या मनात तर आले खरेच सासु म्हणतात तसंच पैशाचं झाड असतं तर सर्वात आधी आपण आई-बाबांच्या अंगणात लावलं असत.
सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही.

 बाबांच्या पश्चात आई एकटी पडेल म्हणून दोघींनी सहा-सहा महिने स्वतःकडे न्यायचे ठरविले पण दोघे लेकींच्या घरून आईस वागण्यास नकारच मिळाला कारण काय तर जावयाच्या घरी सासू राहणे शोभेल का ?समाज काय म्हणेल?सुखदा च्या सासूने तर स्पष्ट सांगितले  जग किती सुधारले असले तरी आम्हास हे मान्य नाही.

यावर पर्याय म्हणून एखादे सोयीयुक्त वृद्धाश्रमात आईस ठेवूया असे मत दोघींनी मांडले पण पुन्हा प्रश्न आलाच आश्रमाचे पैसे कोण भरणार?दोघींच्या सासरहून एकही पैसा सुटणार नव्हता?

सुखदा गहिवरून बोलली देखील आईला "मला तर असं वाटतंय, सगळं सोडून यावं तुझ्याकडे" मी उच्चशिक्षित आहे, मी चार पैसे कमवून राहील तुझ्या सोबतच."

"नाही रे बेटा असा वेडेपणा करू नकोस.मी काय आज आहे तर उद्या नाही. तुझ्यापुढे सारे आयुष्य पडले आहे. काबाडकष्ट करून तुम्हास शिकवले,संसार थाटून दिले ते काय असा अर्ध्यावर मोडण्यासाठी नव्हे बेटा.तूच सांग लेकीचा मोडलेला संसार पाहून स्वर्गवासी बाबास चांगले वाटेल का ग ?देवास आहे काळजी. ठेविले अनंते तैसेची रहावे.

"मी गेल्यावर फक्त एक करा,जो आहे तो एक एकर चा तुकडा विकून आपल्या राहत्या घरात आमच्यासारख्या मुलगा नसलेल्या अथवा मुलांनी वाऱ्यावर सोडलेल्या आईबाबांसाठी आधाराश्रम म्हणून राहण्या-खाण्याची सोय करा ग पोरींनो."मनातली सल नकळत शेवटची इच्छा बनून आईच्या तोंडून बाहेर पडली."


आज सुखदाची चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कूस भरली होती. घरात सर्व आनंदी होते पण सुखदा मात्र देवाकडे  कळूकळून,मनापासून,आर्ततेने एकच मागणं मागत होती देवा मला मुलाचीच आई बनव........................


अजून पुरेसं अंकुरलेले ही नाही, अशा गर्भार मातेने देवास असे मागणे मागावे म्हणजे भीषण दुर्दैवच नाही का?  
आई-वडिलांना काही देणं आलं की अजूनही विवाहित कन्येस दहा वेळा विचार करणे क्रमप्राप्तच ........


©
आपल्याच परिचयाच्या,
चौधऱ्यांच्या सुनबाई (गायत्री)
गाठ भेट 
सस्नेह वाचक,
 माहेरच्या संपत्तीत मुलीला वाटा मिळावा कायद्याने अधिकार मिळाला.असाच मुलींना निदान ज्यांना मुलगा नाही अशा आई-वडिलांना वागवण्याचा अथवा परिस्थितीनुसार आर्थिक-तत्सम मदत करण्याचा कायदेशीर तथा सामाजिक अधिकार मुलींना का नसावा?
जोपर्यंत आमचे-तुमचे,सगळ्यांचे ,समाजातील प्रत्येक घटकाचे विचारसरणी या बाबतीत सकारात्मक होत नाही तोपर्यंत असा भेदभाव अटळच.
 भेटू पुन्हा 
छान छान वाचत राहा आनंदी राहा.