Feb 23, 2024
नारीवादी

देवकी गाते अंगाई (भाग चौतीस )

Read Later
देवकी गाते अंगाई (भाग चौतीस )

फोन ठेवल्यावर मिहिका तिच्याकडे रोखून बघत होती.

ते बघून मिहिकाला काय म्हणायचंय ते अंशूला लगेच कळलं.

"आता तू रागवणार ना मला, मी खोटं बोलले बाबाशी म्हणून." अंशू गाल फुगवत तोंड आक्रसून म्हणाली.
"पण काय करणार, बाबाला खरं सांगता येत नव्हतं." ती छोटासा चेहरा करून डोक्यावर हात मारत म्हणाली. तिचा चेहरा आणि ते फुगलेले गाल बघून मिहिकाने तिला जवळ घेऊन तिची पप्पी घेतली.
" हुशार गं, माझं बाळ ते. "
"ये, तुला मी काय म्हणू?...राजकुमारी?"

"मी काय सांगायचं बाबा."मिहिकाने गाल फुगवले.
"सांगा ना मला, मी हिला काय म्हणू ते, म्हणजे जसं बाबा म्हणाला हिला आजी म्हणायचं, (कल्पनाकडे बोटं दाखवून ) ही म्हणाली यांना आजोबा म्हणायचं, तसं आता तुला काय म्हणायचं?" अंशू गहण विचारात बुडाली.
तिचे एक्सप्रेशन बघून सगळे एकमेकांकडे बघत होते.
"आई म्हणू मी तुला?"
अंशू घाबरतच हळू आवाजात म्हणाली.

सगळेच चमकले.
मिहिका तर थिजूनच गेली. तो शब्द मिहिकासाठी किती महत्वाचा होता हे तिच्या व्यतिरिक्त कुणीच समजू शकतं नव्हतं कदाचित तिथे.

कल्पना-अजय आता आपल्या मुलीचं काय होणार आणि तिच्या डोक्यावर किती टेन्शन येणार याचा विचार करून काळजीत पडले.

"ए राजकुमारी सांग ना ग, काय बोलू मी तुला?"
"मिहिका म्हण." तिने निग्रहाणे स्वतःच्या भावनांना आवर घातला, कारण तिला पुन्हा कोसळायचं नव्हतं.
" शी...मिहिका म्हणायला कसं वाटतं, तुला माहिती नाही मोठ्यांना असं नावाने हाक मारायची नसते." अंशू तिच्या कानात म्हणाली.
"जाऊदे बाबा, मी तुला परीराणी म्हणणार"
" बर बाबा, आता आराम कर मी आलेच. " म्हणत मिहिका बाहेर निघाली. तिच्या मनाची अवस्था काय झाली होती तिचं तिलाच माहिती. अलीकडे रोज ती जे स्वप्न बघत होती ते आणि आता घडलेली घटना दोन्ही तिला डिस्टर्ब करत होतं.

'काही संबंध असावा का या दोन्ही घटनांचा, ही मुलगी डायरेक्ट मला आई कशी काय म्हणू शकते? म्हणजे त्या मुलीच्या आईची पोकळी ती माझ्यात का बघतेय? मी आयुष्यात आई होऊ शकत नाही हे त्रिकाल सत्य आहे पण म्हणून तिने मला आई का म्हटलं असेल?
असं काय आहे की फक्त्त दोन भेटीत ती माझ्यात तिची आई शोधते आहे.'
तिला बाहेर गेलेलं बघून तिच्या मागेच आलेल्या कल्पना तिची अवस्था समजू शकत होत्या. त्या एक आई होत्या, त्यांच्या मुलीच्या वेदना त्यांना बरोबर कळणारंच होत्या.
"कसला विचार करतेय मिहिका?"
"काही नाही गं." मिहिका डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली.
"तुला आज ओळखते होय मी, अंशुच्या बोलण्याने डिस्टर्ब झालीस ना, लहान लेकरू आहे गं ते, आई नसलेलं. आम्हा दोघांचेही असेच झाले होते पहिल्यांदा तिला भेटलो तेव्हा."
मिहिकाने आईकडे बघितलं.

"तू गेलीस त्याच्या आदल्या दिवशी ती भेटली, खूप भांडली, आमच्या आत्तुच्या बंगल्यात का राहता म्हणून? दुसऱ्या दिवशी घरी घेवून आले तिला तेव्हा आजोबा म्हणून ती बाबांच्या गळ्यात पडली ग, आणि घरी गेल्यावर आपल्या घरी आजोबा का नाही म्हणून तिने एवढा टाहो फोडला, रडून रडून गोंधळ घातला नुसता.
मग कळलंच नाही की आम्ही कसं गुंतलो तिच्यात. आता रोज येते ती आपल्या घरी. बाबांशी छान खेळते, बाबांना खूप छान वाटतं ग, म्हणजे ती असते तोवर घर कसं तिच्या किलबिलाटाने गजबजून जातं. काय नाते आहे तिचे आपले कोण जाणे पण आपण ठरवतो ना तसं होतच नाही बघ.
म्हणजे बघ ना, आपण किती ठरवलं होतं की या गोष्टीचा विचार कधीच करायचा नाही पण आता बघ ना, हे लोक इथे येऊन आठ दिवस झाले काय आणि त्या मुलीनी आम्हाला तिचा लळा लावला काय? जशी ती आमची स्वतःची नात असावी असा."
मिहिकाने आईच्या डोळ्यांकडे बघितलं.

"अगं तिच नाही, मी सगळ्यांच्या दूर राहणारी पण या सारिकाताई रोज सोबत येतात, कधी कुणाचं उट्ट काढत नाहीत, कुणाला नावं ठेवत नाहीत की कधी खोदून घरगुती प्रश्न विचारत नाहीत.
अंशुचे बाबा निश्चल, त्या दिवशी बाबांना बरं नव्हतं तेव्हा रात्रभर थांबला ग बाबाजवळ, हात पाय चोळत बसला आणि आज ही मुलगी.

कधीकधी वाटतं आपण इन्व्हॉल्व्ह होतोय पण मग तुसडेपणा करून त्या खेळत्या छोट्या मुलीचं मन मोडायचं का?"कल्पना बाहेर बघत म्हणाल्या.

" ह्म्म्म.... कधी कधी चालतं तसं चालू द्यायचं असतं, नाहीं का? " म्हणत मिहिका हसली.

अजय या दोघींना बघायला बाहेर आले आणि यांना हसतांना बघून सर्व नॉर्मल आहे याची त्यांना खात्री पटली.

सगळे घरी गेले, सारिका अंशुजवळ थांबल्या होत्या. मिहिकाचं काळजी करणं बघून त्यांना राहुनराहून वाटतं होतं,
'माझ्या अंशूला हिच्यासारखीच प्रेमळ आई मिळावी.'

दुसऱ्या दिवशी सगळे घरी आले. अंशूचे सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. काहीही झालं नव्हतं. अंशूने घरी येताच बाबांना व्हिडिओ कॉल केला.

दोघंही बापलेकांची बरीच नौटंकी झाली,

"तुला माझ्याशी बोलायला वेळ नव्हता, तुला खेळायचं होतं" म्हणत निश्चल रुसून बसला होता आणि

"तू कामात असतोस तर मी करते का तुला डिस्टर्ब." म्हणत अंशू रुसून बसली होती.
थोडावेळात त्यांची नौटंकी संपून नेहमीची दंगामस्ती सुरु झाली.
"आज रात्री येणार ना तू?" म्हणून अंशूने विचारलं.
तसं निश्चिलचा चेहरा पडला. सारिकाने

"काय झाले" म्हणून विचारले.
"आई डील पूर्ण झालंय, प्रोजेक्ट आपल्यालाच मिळेल पण त्यासाठी मला अजून दोन दिवस थांबावे लागेल. तिकडे सगळं ठीक आहे ना?"
"तसं सगळं ठीक आहे पण कुणीतरी गालात लाडू भरलेत बाबा." सारिका अंशुचे गाल ओढत सांगत होत्या.
"अरे बाळा काम आहे ना रे, कसा येऊ मी निघून." निश्चल आगतिक होऊन म्हणाला. अंशूला सोडून तो ही पहिल्यांदाच बाहेर गेला होता, त्याचाही नाईलाज होता. आई नाही आणि बाबाही नसेल तर ते लेकरू तरी काय करणार हा विचार येऊन त्याचंही मन भरून आलं होतं.

"राहू दे तू असाच करतोस, आता मी परीराणी सोबतच खेळणार." निश्चलने आश्चर्याने "कोण परीराणी?" म्हणून विचारले.

"हट्ट बाबा, तुला ना सगळंच सांगावं लागतं." म्हणत अंशूने डोक्याला हात लावला.
"ये आजीबाई सांग ना, मला नाहीं कळतं ना, मी कुठे तुझ्यासारखा हुशार आहे?" निश्चल तोंड पडून म्हणाला ते बघून अंशुची कळी खुलली.

"अरे परीराणी, ती आत्तूच्या बंगल्यात राहते ती, ती, ती, जिने मला पार्कमध्ये वाचवलं होतं गाडीसमोरून." अंशू ऍक्टिन्ग करून सांगत होती.

"अरे त्या कल्पनाताईंची मुलगी, डॉक्टर आहे, तिच्याशी मस्त गट्टी जमलीय मॅडमची, आता तिला आजोबांपेक्षा परीराणी जास्त आवडते."
सारिकाच बोलणं ऐकून निश्चल पुन्हा विचारात पडला.
'पुन्हा हिच यार, असं काय होतंय, जागोजागी हीच का येते माझ्या जीवनात?'
"बरं राजा तू दोन दिवस तुझ्या परीराणी सोबत खेळ, त्यानंतर बाबा येणार मग आपण खुपसारी मस्ती करू."
"ह्म्म्म...पण माझे खेळणे विसरलास तर बघ हा?..." अंशू डोळे मटकवत म्हणाली.
"अरे म्हणजे काय, माझ्या अंशुची लिस्ट पाठ झालीय आता मला."
"चल बाय, मी चालले आजोबांकडे खेळायला." म्हणत अंशू पळाली.
त्यानंतर सारिका आणि निश्चलमध्ये कामाविषयी थोडं बोलणं झालं. सारिकाने मुद्दाम सोनीचा विषय टाळला. फोन ठेवल्यावर निश्चल पुन्हा विचारात पडला,
"काय योगायोग असावा, ही मुलगी मला थोड्याथोड्या दिवसात पून्हा पून्हा भेटते, ही मुलगी माझ्या शेजारी राहते, हिचं मला वाचवणारी आणि आता अंशुला वाचवणारीही हिचं. नक्की काही तरी संकेत असेल का हा? एवढे सगळे योगायोग एकाएकी का घडताहेत माझ्या जीवनात.

'काही सुचवताहेत का या घटना?'
क्रमश:निश्चल पडला विचारात पण तुम्हाला कळतंय सगळं... पण वाचताय ना?

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//