Feb 23, 2024
नारीवादी

देवकी गाते अंगाई (भाग बावीस)

Read Later
देवकी गाते अंगाई (भाग बावीस)

मिहिका वरच्या फॅनकडे बघत होती आत्ता या क्षणी तो फॅन डोक्यावर पडावा आणि संपावं सगळं असंच तिला वाटत होतं.

'माझ्याच वाट्याला का हे दुःख आलं, मी कुणाचं काय घोडं मारलंय ज्याची एवढी मोठी शिक्षा मला मिळालीय, कर्मा रिटर्न्स म्हणतात मग माझ्या नशिबी हे का?... का?...'
मिहिकाच्या मनातील भावनांचा उद्रेक आणि डोळ्यातील अश्रूचा पूर याला सीमाचं नव्हती काही.

चूक तिचीच होती ना, का गेली ती त्याच्या मागे? तिला माहिती होतं तो टाळतोय तरी...पण एक सॉफ्ट कॉर्नर असतोच ना, एक मित्र, चांगला मित्र अचानक असा का वागतोय हे माहिती करून घ्यायचे होते तिला.
एक डॉक्टर असलेला तो, तो असा विचार करत असेल हे कुठे माहिती होतं तिला.
कधीतरी तिचा मित्र असलेला व्यक्ती एव्हढ्या खालच्या थराला जाईल असं तिला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं.
शिकलेले असले, डॉक्टर असले म्हणून काय झालं तिच्या ओळखीत एक डॉक्टर होते ज्यांना तीन मुलींनंतर मुलगा झाला होता.
एक काका होते, डॉक्टर असूनही, दुसरी मुलगी झाली म्हणून काकूंना मारझोड करणारे. मग भावेश असा वागतोय त्यात काय वावगं होतं?...

हा पुरुषप्रधान समाज, इथे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकतं नाही मग पुरुष काय समजून घेणार? ते तर बसले असतात आपलं पुरुषत्व सिद्ध करत. बायकोला धाकात ठेवणं स्वतःचा अहंकार मिरवणं हेच त्यांचं पुरुषत्व. स्त्रीला अपमानित केलं की स्वर्गसूख मिळतं जणू त्यांच्या जीवाला पण याच पुरुषाने स्त्रीला समजून घेतलं तिच्या बरोबरीने उभा राहिला तरं समाज त्याला बायकोचा गुलाम ठरवून मोकळा होतो.

अवनी तर आता इथे आल्यापासून तिला ओळखत होती पण भावेश तर अकरावीपासून सोबत होता.

त्याचे शब्द तिला जास्त बोचले, कालच्यापेक्षा आज तिचं हृदय खूप रक्तबंबाळ झालं होतं, कालचा वार करणारा अनोळखी होता पण आजचा, आजचा तर पाठीत सुरा घोपणारा होता.

तिच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या ज्याला काही अंत नव्हता काही वेळात अवनी वापस आली.

तिने मिहिकाचे बंद डोळे पुसले.
"त्याने एवढं इग्नोर केलं तरी का अट्टाहास केलास उत्तरं मिळवायचा, सूरी फळावर पडली काय की फळ सुरीवर कापल्या जातं ते फळचं."
मिहिकाने भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं.
"पण बरं झालं तू प्रश्न विचारलास, मला त्याचं खरं रुप तर कळलं. तू आई होऊ शकत नाहीस म्हणून तो तूझ्याशी लग्न करू शकत नाही एवढंच माहिती होतं मला, तुला फेस करायची भीती वाटते हेच, त्याचं प्रेम कबूल केल्यावर तुला ऑड वाटेल म्हणून मी दूरदूर राहत होते तुझ्या पण तो असं धमकी देईल असं नव्हतं वाटलं मला, स्त्री म्हणजे काय समजतो तो, त्याचं हे रुप पहिल्यांदा बघितलं मी, मीच प्रेमात आंधळी झाले होते, आय एम सॉरी मिहिका,खरंच खूप खूप सॉरी." अवनी तिचा हात पकडून रडत होती.
"सलाईन संपलं अवनी, मला घरी जायचंय."मिहिका थंडपणे म्हणाली.
अवनीने सलाईन काढलं, मिहिका हळुवार उठली.
"जावू शकशील ना?"अवनीने काळजीने विचारलं
"जावंच लागेल" म्हणून मिहिका चालायला लागली. दारापर्यंत गेल्यावर पलटून बघत म्हणाली,

"सॉरी माझ्यामुळे तुमच्या रिलेशन मध्ये प्रॉब्लेम झाले."
"नाही मिहिका, उलट लवकर सावरले मी तुझ्यामुळे, वहावत जाण्यापेक्षा."अवनी तिच्याकडे जायला लागली तसं मिहिका म्हणाली.
"इट्स ओके, मी ठीक आहे."
अवनीने असाहायपने तिच्याकडे बघितल.
मिहिका पलटून निघून गेली, स्वतःच स्वतःला समजावत. तिचा फोन वाजला, आईचं नाव बघून तिला भरून आलं.
'नाही आईसमोर मला कमजोर नाही पडायचं,' ती तशीच बाहेर आली गाडी काढली. कुठेतरी शांतता शोधत अंधार पडेपर्यंत भटकत राहिली.
त्यानंतर एका पार्कमध्ये जाऊन बसली एकटीच...
डोक्यात काही येत नव्हतं, मन काहीच बोलत नव्हतं, सगळं सुन्न पडलं होतं. आजूबाजूला खेळणारी मुलं बघून तिला आठवत होती फुलपाखरामागे पळणारी लहानपणीची मिहिका. तिला कधीच फुलपाखरू पकडता येत नव्हतं, जसं आज त्यातलं मुल...
'का जगावं मी, आईबाबांना त्रास द्यायला? तीळतीळ त्यांचा जीव तुटत असेल, त्यांच्या बाहुलीच लग्न ते नाही करु शकत, त्यांची बाहुली खरंच शोभेची बाहुली बनलीय' ती बराच वेळ तशीच बसून राहिली.

रात्री पार्क बंद करायची वेळ झाली तसं वॉचमनने तिला जायला सांगितले. ती उठून बाहेर आली, घरी जावं वाटतं नव्हतं, असं वाटत होतं कुठल्या वाहनाखाली...
तिने गाडी काढली,

'मी का वाचले त्यादिवशी, तेव्हाच गेले असते तर...' ती जंगलाच्या रोडने दूर तळ्याच्या कठड्यावर जाऊन बसली.
तिने फोन बाहेर काढला, आईच्या नंबरवर एक मेसेज लिहिला.

"माझी वाट बघू नकोस, कालचा प्रकार कळला असेलच तुला आज. टेन्शन घेऊ नकोस तुझी बाहुली सक्षम आहे तुम्हाला सावरायला. बॅटरी नाहीय फोन ऑफ होईल, काळजी करू नकोस, अजिबात काळजी करू नकोस"
आज अंधार, झुडुप कसलीच भीती वाटत नव्हती. जणू तिला आजूबाजूचं काही दिसतच नव्हतं. त्या अथांग पाण्यात तिला स्वतःला झोकून द्यावं वाटत होतं.
अर्धसत्य... असं म्हणतात कधीकधी पुर्ण खोटं बोलता आलं नाही तर अर्ध सत्य बोलावं, आज तिने आईसोबत तेच केलं होतं.

'माझी वाट बघू नकोस ' कारण आता ती घरी जाणारच नव्हती.
बराच वेळ तसंच बसून राहिल्यावर ती उठली आणि आता स्वतःला झोकायचं तोच कुणीतरी तिला ओढलं. "कोण होता तो ते तिला त्या अंधारात कळलंच नाही फक्त्त त्याचे शब्द तिला भानावर घेवून आले.

किती चवताळली होती ती.
"कोण आहात तुम्ही का वाचवलेत मला, किती हिम्मत करून आले होते मी, जीव द्यायला पण हिम्मत लागते आणि तुम्ही असं..."
त्याने तिचे दोन्ही दंड घट्ट धरून ठेवले होते, न जाणो हात सुटला आणि तिने उडी मारली तर म्हणून...
"ये हिम्मत करायची असेल तर ना, चार हात करत आयुष्यात जगायची करा, आलेत मोठे जीवावर उदार होणारे.
मायबाप जन्म देतात ते काय असं मरायला? "
तो बोलत होता, त्या अंधारात ना त्याला तिचा चेहरा दिसत होता ना त्याचा.
"म्हणणं सोपं असतं करून बघा, शाप बनतं ना जगणं तेव्हा कसं वाटतं रोज मरणं ते, जन्म दिला त्याच मायबापाचा त्रास वाचवायला संपवतेय स्वतःला."
"आणि तुम्ही मेल्यावर ते जगतील आनंदाने, स्वतः मरून सुटाल हो आणि त्या बिचाऱ्यांनी कुणाकडे बघायचं, तुम्हाला मोठं केलं शिकवलं ते सारं क्षणात बरबाद झाल्यावर त्यांनीही रोज मारायचं कां?

त्याचे ते शब्द तिला जागे करून गेले. तिने तडक गाडी काढली, तो कोण हे न बघता ती निघून गेली सरळ घरी पोहोचली. रात्रीचा एक वाजला होता, कल्पनाला झोपच लागली नव्हती. त्यांना मिहिकाच्या ऍक्सीडेन्टचा प्रसंग आठवत होता, राहून राहून त्या तिचा मेसेज वाचत होत्या.
आज क्लबमध्ये पांडे बाईंनी सगळ्यांसमोर मिहिकाचं सत्य सांगितलं होतं. अमेयने फक्त्त मिहिकाची चूक सांगितली होती स्वतःची नाही. ती गोष्ट ऐकल्यापासून त्यांचा जीव आधीच कासावीस झाला होता.
रात्री एक वाजता मिहिकाने दार ठोकलं त्यांनी लगेच दार उघडलं, त्यांना बघताच मिहिकाने घट्ट मिठी मारली.
"आई मी चुकले आई, " म्हणत ती धाय मोकलून रडायला लागली.
कल्पनाने तिला घरात घेतले सोफ्यावर बसवले तिचं डोकं मांडीवर घेतलं आणि आज तिला मनसोक्त रडू दिलं. दाराच्या आवाजाने उठलेले अजय मिहिकाला असं बघून शॉक झाले त्यांनीही तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फेरला.
"माझी स्ट्रॉंग माही आहेस तू, आज मनसोक्त रडून घे, मनातलं सगळं काढून घे आणि यापुढे अशी खंबीर बन की कुठेच मन डगमागायला नको. आयुष्य खूप परीक्षा घेत बाळा, दुःख आणि सुख म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ असतो. उन्हानंतर सावली आणि सावलीनंतर ऊन असतोच."
अजय तिला समजावत होते.क्रमश:

रडायला येतं हो खूप लिहिताना, त्या मिहिकापेक्षा तुम्ही व्यक्त होतं नाहीत ते बघून माझं दुःख वाढतं.....


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//