Feb 23, 2024
नारीवादी

देवकी गाते अंगाई (भाग सव्वीस )

Read Later
देवकी गाते अंगाई (भाग सव्वीस )

 महिने असेच निघून गेले आणि आईच्या एका हेल्थ इशूमुळे निश्चिलने उल्काच्या विरोधाला न जुमानता भारतात परतायचं ठरवलं.


उल्काने त्याला नाईलाजाने होकार दिला पण कधीकधी माणूस दूर गेल्यावर त्याची किंमत कळते तसंच काही उल्काच्या बाबतीत झालं. निश्चल गेल्यावर तिला त्याच्या दूर राहणं अशक्य असल्याची जाणीव झाली आणि तिने भारतात यायचं ठरवलं. निमित्त होतं सावीचं लग्न.


 निश्चलची इथेच चूक झाली. त्याला वाटलं उल्का त्याच्या प्रेमापोटी तिथे येतेय पण ती सावीच्या लग्नासाठी आली होती. ती अशी मुलगी होती जिला करिअर समोर सगळंच व्यर्थ वाटायचं.


उल्का इथे आली ते सावीचं लग्न झाल्यावर निश्चलला परत न्यायला पण इथलं वातावरण, इथला तामझाम, नोकरांकडून मिळणारा आदर, निश्चलचं बाहेर असलेलं नाव, त्याची स्वतःची मोठी कंपनी हे सगळं बघून तिने थांबायचं ठरवलं. कारण करिअर म्हणून तिच्याकडे तिकडे फक्त्त एक जॉब होता आणि इथे करोडोची संपत्ती.

  सारिकाने फुल सपोर्ट देत त्यांचं लग्न लावून दिलं सावीला मात्र उल्का अजिबात आवडली नव्हती. तिचं डिवोर्सी असणं, तिच्या आई बाबांचं वेगळं राहणं यावरून सावीला वाटत होतं की ती निश्चलला साथ देणार नाही पण सारिकाच्या मते त्या दोघांचं पटतं ना मग बघतील त्यांचं ते. सावीचं फटकळ बोलणं या मायलेकांना पटायचंच नाही. शेवटी सावीने आपला बंगला भाड्याने दिला आणि नवऱ्यासोबत लंडनला निघून गेली.


निश्चलचे बाबा गेले तेव्हा बंगल्याचं काम जेमतेम झालं होतं पण त्याचे बाबा मध्येच अचानक निघून गेले आणि सारिकाची त्या बंगल्यावर यायची इच्छा होईना. त्यानंतर सारिका नवीन सून आणि जावई आल्यावर दोन्ही बंगल्याचे गृहप्रवेश करणार होत्या नवीन जोडप्यांच्या हस्ते पण...

निश्चलच्या लग्नाला सावीने कडाडून विरोध केला, सावीच्या आक्रमकपणामुळे आणि निश्चलच्या लग्नाच्या विरोधामुळे दोन्ही बहीण भावात जरा भांडणं झाली आणि सावी निघून गेली.


सारिकाला वाटलं, होईल सावीचा राग शांत. 

उल्का लग्नाला तयार झाली बघून निश्चल सातव्या आसमानात तरंगत होता. या दोघांच्या लग्नानंतर सारिका निश्चिंत झाल्या. सगळा भार त्यांनी निश्चलवर टाकला आणि सोबत उल्का मदतीला होतीच.


दोघेही मस्त कंपनीचा विस्तार करत होते, निश्चलची मेहनत आणि उल्काच्या आयडिया एक नवी उंची गाठत होत्या.

काही दिवसांनी उल्काने तिचा एक मित्र रजतला इथे बोलावून घेतले.

त्याची ओळख मित्र म्हणून करून दिली होती.

उल्काचा सगळा डोळा होता निश्चलच्या प्रॉपर्टीवर, तिला त्या कंपनीतून सावीचे शेअर हटवून स्वतःचे शेअर हवे होते पण गोड बोलून.

सारिकाला ती असं दाखवायची जणू ती तिची आईच... या मायलेकांना वाटायचं तिने घर, परिवार पहिला नाहीय त्यात एकदा धोका मिळालाय त्यामुळे दोघेही तिला भरभरून प्रेम द्यायचे.


त्यातच एक दिवस निश्चलला कळले ती आई होणार आहे. त्याला सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटलं कारण उल्काला बाळ नकोच होतं कधी... पण आपण बाप होणार ही भावना काहीतरी वेगळीच. लग्नावर जिचा विश्वास नव्हता ती त्याच्या बाळाची आई होणार होती.


तसं सारिका त्याला नेहमी समजवायच्या की हळूहळू तिलाही आई व्हावं वाटेल, ती एक स्त्रीसुलभ भावना असते, लग्नानंतर एक वर्षातच तिला दिवस गेलेले बघून निश्चलला आईचं म्हणणं पटलं. सारिकाला वाटायचं निशूचे बाबाच तिच्यापोटी जन्म घेणार.

पण उल्काच्या डोक्यात काय शिजत होतं हे तिचं तिलाच माहिती होतं. सावीलाही ती प्रेग्नन्ट असल्याच कळल्यावर आनंद झाला. दोघे बहीणभाऊ पून्हा बोलायला लागले.


आगलावे इंडस्ट्रीला मोठं करण्यात सारिका एवढ्या गुंतल्या की कधी कुणाच्या मनात असं काळं असू शकत याचा विचारच केला नाही. त्या उल्काचे डोहाळे पुरवण्यात बिझी झाल्या, निश्चल आता तिचा कामाचा भार कमी करायला लागला.

उल्काच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची झळाळी येत होती, तिचं गोरंपान रुप अजूनच उजळून निघालं होतं.

सारिका म्हणायच्या मुलगीच होणार,निश्चलला पण मुलगीच हवी होती, उल्काला मात्र मुलगा हवा होता.

मग यावरून हास्यकल्लोळ माजायचा, सावीचं अजूनच काही नवीन चालायचं, तिचं म्हणणं होतं मुलगी झाली तर सून करून घेणार म्हणजे दोन्ही बंगले अबाधित राहतील नेहमीसाठी.


सारिकाच्या मते बाळ पोटात असताना आईच्या चेहऱ्यावर खूप तेज येतं तेव्हा मुलगी होते आणि चेहरा निस्तेज होतो तेव्हा मुलगा.

उल्का हसत म्हणायची, "काहीही... मला मुलगाच होणार."


सात महिने सगळं सुरळीत चालू होतं. डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ठरला आणि ठिणगी पडली.


उल्काला कुठे ठेवू आणि कुठे नाही करणारा निश्चल तिच्यामागे लागला होता काय गिफ्ट हवं म्हणून?

ती काहीच सांगत नव्हती. सावी डोहाळजेवणासाठी माहेरी आली होती. तिला घेवून निश्चल डोहाळ जेवणाच्या आदल्या दिवशी खरेदीला गेला.दोघा भावंडांनी हौशीने खूप काही गिफ्ट आणले उल्कासाठी आणि उशिरा घरी आले.

उल्का अंधारात झोपून होती.

निश्चिलने आश्चर्याने विचारलं,

 "काय ग काय झालं, अशी का बसलीस, त्रास होतोय का?"

"हो होतोय त्रास, तुझ वागणं बघून खूप त्रास होतोय?"

निश्चलला कळेना, असं काय झालं? त्याने तिला प्रेमाने जवळ घेतलं.

"सांग ना राणी काय झालं, कसला त्रास होतोय तुला?"

"आपल्या बाळासाठी काय आहे या घरात?"

तिच्या प्रश्नावर तो चमकलाच, "अगं असं काय विचारतेयस, हे सगळं त्या बाळाचंच तर आहे."

"म्हणण्यात आणि असण्यात फरक असतो निशू "

"म्हणजे?" त्याने न राहवून विचारले, उल्का अशी रुसून बसणाऱ्यातली नव्हती मग आज असं अचानक काय झालं हेच त्याला कळेना. दुपारी तरं दोघांनी ऑफिसमध्ये मस्त कॉफी घेत नवीन प्रोजेक्ट प्लॅनबाबत मनसोक्त गप्पा मारल्या होत्या, तेव्हा तर ती नॉर्मल होती.


"तुला असंच तरं काही कळतं नाही, अरे आगलावे इंडस्ट्री चालवतं कोण तर उल्का आणि निश्चल आगलावे पण त्यात शेअर्स कुणाचे तर सारिका आणि सावी आगलावे यांचे...अरे जिथे उल्का आगलावेचं नावंच नाहीय तिथे हे सगळं तिच्या बाळाचं कसं होणार?"


"अगं नाव असल्याने थोडेच काही होतं, कंपनी आम्हा तिघांची आहे इक्वल शेअर्स असणारच आणि तुझ माझं काय वेगळं आहे?" निश्चल तिचं हे रुप पहिल्यांदा बघत होता.


"हेच तरं तुला नाही कळत, मस्त आपलं सुरळीत चालत होतं पण तुला लागले भिकेचे डोहाळे, इथे येवून काय करतोयस तरं स्वतः राबराब मेहनत त्यात मी आहेच सोबतीला आणि त्या दोघी घरी बसून आराम, तुझा विचार करतंय कुणी?"

"हे बघ उल्का, असं काही नाहीये... बाबांचं स्वप्न..."

"बी प्रॅक्टिकल निशू, व्यवहारात भावना वगैरे नसते बघायची. तू फिफ्टी पर्सेंट शेअर आपल्या बाळाच्या नावावर कर हवं तर हे गिफ्ट समज माझ्या डोहाळजेवणाचं."म्हणत उल्का रूमबाहेर निघून गेली.

या दोघांसाठी जेवन घेवून आलेल्या सारिका दरातच थिजून उभ्या होत्या. त्यांना विश्वासच बसत नव्हता उल्काच्या मनात असंही काही असेल यावर.


तिला जातांना सारिका दिसल्या तसं ती अजूनच चिडून त्यांच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाली, "या घरात स्वतःच्या नवऱ्याशी बोलायलाही एकांत मिळू शकत नाही."

निश्चल हतबलपने आईकडे बघत होता. सारिकाही तिचं हे रूप आजच बघत होत्या.


त्या आत आल्या, निश्चिलंच डोकं मांडीवर घेवून समजावत म्हणाल्या. "काळजी नको करुस, सगळं ठीक होईल, गरोदरपणात चिडचिड, असं असुरक्षितता वाटतेच, शरीरात एकदम खूपसारे बदल होतात ना त्यामुळे असेल. आपली उल्का अशी नाहीय..."

का कोण जाणे पण यावेळी त्याला आईचं बोलणं पटल नव्हतं.

'जे सारं वैभव बाबांनी सुरु केलं ते सारं माझं एकट्याचंच कसं असू शकतं 

निसर्ग जसा आपल्याला सर्व देतो ते सर्व एकाचंच नसतं ना,

हे मुल माझंही आहे ना...'

 उल्काशी बोलून बघावं एकदा पून्हा म्हणून तो टेरेसवर जायला निघाला आणि जोरात ओरडला.

"उल्काsss..."



क्रमश:

पुढला टर्न खूप वेगळा आहे.










ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//