Feb 26, 2024
नारीवादी

देवकी गाते अंगाई (भाग एकवीस )

Read Later
देवकी गाते अंगाई (भाग एकवीस )कल्पना साशंक मनाने बाहेर येऊन अजयला म्हणाल्या,
"काहीतरी बिनसल्यासारखं वाटतंय का हो?" अजय बाहेरून सगळं ऐकत होते कारण त्यांचाही जीव मानत नव्हता.
अजय प्रसन्न हसले आणि म्हणाले, "नाही,माझी मुलगी खूप स्ट्रॉंग आहे, ती खचली तरी स्वतःला नक्की सावरेल पण तू पुन्हा असा काही घोळ घालू नकोस कदाचित तिला त्रास होत असेल."
"हो ते ही आहे म्हणा, माझंच चुकलं मी घाई केली. वेळ आणि परिस्थिती सगळं विसरून समोर चालायला शिकवतेच."
मिहिका त्यांचं बोलणं ऐकून गहिवरली.

'किती धडपडताहेत हे दोघे माझ्या सुखासाठी? खरंच म्हणतात ना, आईबाप आपल्याला मुलांसाठी काहीही करू शकतात.'

तिला खूप रडू कोसळत होतं पण किती रडणार? डोळे कोरडे पडले तरी न संपणारं दुःख नियतीने तिच्या ताटात वाढलं होतं.
तिने स्वतःला शांत केलं, तिच्या उशीच्या साथीने. सकाळी पून्हा नव्या उमेदीने उठली,

'मला हरून चालणार नाही मी माझ्या आईबाबांना दुःखात नाही लोटू शकत.' नेहमीप्रमाणे ती सगळं आवरून लवकरच निघाली आज हॉस्पिटलमध्ये.
तिकडे वाचत बसावं म्हणून लायब्ररीत गेली. दोन-तीन तास गेले असतील भावेश तिथे आला, मिहिकाचं लक्ष नव्हतं.
"काय सर पार्टी कधी देताय एंगेजमेंटची?" एका जुनिअरने विचारलं.
भावेशचं मिहिकाकडे अजिबात लक्ष नव्हतं, ना मिहिकाचं भावेशकडे.
"देतो की, उद्या एंगेजमेंट झाल्यावर बॅचलर पार्टी करू." भावेशचा आवाज ऐकून मिहिकाने मागे वळून बघितलं, तिला बघताच तो बावरला आणि

"मी आलोच" म्हणून निघाला.

भावेशचं तुटक वागणं जरी मिहिकाला त्रासदायक होत होतं तरी तिने ते स्वीकारलं होतं. हळूहळू भावेश आणि अवनीमध्ये जवळीक वाढायला लागलीय हे ही तिच्या लक्षात येत होतं.
हल्ली अवनीही मिहिकाला टाळायची. मित्र म्हणून भावेशने पाठ दाखवली तसं मैत्रीण म्हणून अवनीनेही पाठ फेरली होती.
पण भावेशची एंगेजमेंट आहे हे ऐकून तिला मनापासून आनंद झाला.
आज त्याच्याशी बोलायचंच ठरवून मिहिका त्याच्यामागे गेली.
भावेश गायनिक वॉर्डात गेला तसं मिहिकाही त्याच्या मागे आत शिरली, सुदैवाने तिथे कुणी नव्हतं.
"भावेश काँग्रट्स, मला तुझ्याशी थोड बोलायचं होतं."
"काय बोलायचंय, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीय."तो अवनीच्या केबिनमध्ये जात म्हणाला.
मिहिकाही आत जात म्हणाली,

"एकाच प्रश्नाचं उत्तर हवंय, जी मैत्री तुझ्या मनात प्रेम जगवून गेली ती क्षणात का विरली?" तिच्या प्रश्नाने तो बावरला आणि उठून जायला दरवाजा उघडणार तोच मिहिका दाराला आडवी होतं म्हणाली,

"आज उत्तर मिळाल्याशिवाय नाही जातात येणार, एक चांगला मित्र अचानक असा का बदलला हे मला कळायला हवं, प्रेम केलं होतंस ना माझ्यावर मग आज मैत्री तर सोड साधं बोलण्यानेही तुला माझा त्रास का होतोय?"
"मला उत्तर देण जरुरी वाटतं नाही."
"पण मला वाटतं, असं काय झालं की एवढा जीवघेणा एक्सीडेन्ट होऊनही माझा चांगला मित्र एकदाही माझ्याकडे फिरकला नाही, त्याला एकदाही मी मेली की जिवंत आहे बघावं वाटलं नाही. का?
जो माझ्याशिवाय जगू शकणार नव्हता तो आज मला टाळत का फिरतोय?" मिहिका चिडून म्हणाली.
"कारण मी प्रेम करत होतो ती मिहिका एक पुर्ण स्त्री होती जी त्या अपघातात गेली."
"मिहिकाच्या डोळ्यासमोर दिवसा तारे चमकले. तेच वाक्य जे काल अमेयच्या तोंडून ऐकलं होतं, तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरत होता, पायात त्राणच उरले नव्हते, काहीतरी होतं होतं काय?...

तिने डोळे उघडले तेव्हा ती चेअरवर बसून होती अवनी आणि भावेश समोर उभे होते,

"सॉरी" म्हणत ती उठायला गेली, तिच्यात त्राण नव्हतेच जणू पून्हा अंधारी पसरली.
अवनीने तिला बेडवर झोपवले, सलाईन लावले आणि तिचे हात चोळायला लागली. भावेश बाजूला उभा होता.
मिहिकाने मोठ्या प्रयत्नाने डोळे उघडले, तिच्या दोन्ही डोळ्यातून पाणी ओघळत होते.
"मिहिका, सावर स्वतःला.भावेश तुम्हीतरी बोला ना एकदा तिच्याशी, मला तिची अवस्था बघवत नाहीय हो."अवनी मिहिकाचे डोळे पुसत म्हणाली.
भावेशने दीर्घ श्वास घेतला, तिच्या बाजूला बसत तिचा हात हातात घेत त्याने अवनीकडे बघितलं,

" माझं प्रेम होतं गं तुझ्यावर पण तेव्हा जस तुला घरच्यांच्या विरोधात जायचं नव्हतं तसं मलाही आता जाता येणार नाही. त्यादिवशी तू बेपत्ता असल्याचं कळलं तेव्हा मी घरी होतो रात्रभर अस्वस्थ होतो, सकाळी आईला सांगितलं सगळं आपल्याबद्दल, तिने विरोध केला खूप त्यात तू बेपत्ता आहे कळल्यावर तर तांडवच.
मी दुसऱ्या दिवशीच नाशिकला पोहोचलो, तुझे आईबाबा पुढे आणि मी मागे एकाच वेळी. डॉक्टर तुझ्या आई बाबांना सत्य सांगत होते आणि ते ऐकून मी हादरलोच.
आईला मी कसंही पटवलं असतं लग्नासाठी, पण हे सत्य, हे कधी मान्य झालंच नसतं मी आल्या पावली परत गेलो पून्हा कधीही न परतण्यासाठी." भावेश जड आवाजात म्हणाला. थोडावेळ शांतता पसरली.
मिहिकाने एकवार त्याच्याकडे बघितलं, दीर्घ श्वास घेत म्हणाली,

"मी कधीच तुझ्या मार्गात आले नसते पण नातं तोडावं असं काहीच नव्हतं, प्रेम तुझ्याकडून होतं माझ्यासाठी तर ती फक्त्त मैत्रीच होती ना?"
"हो, पण मी बावरलो होतो, तू जर म्हणाली असतीस तर तुला स्वीकरायची हिम्मत नव्हती गं माझ्यात." भावेश आपल्या चेहऱ्यावरून हात फेरत म्हणाला.
मिहिका सुन्नपणे हसली, त्याने प्रश्नार्थक बघितलं
"मी कधीच काही मागितलं नव्हतं मैत्रीशिवाय, एक निखळ मैत्री. एक डॉक्टर असून तू असा विचार करतोस ऐकूनच हास्यास्पद वाटलं." भावेशने खाली मान घातली.
"एक त्रयस्थ म्हणून विचारतेय, जर तुझं प्रेम स्वीकारल्यानंतर, वा लग्नानंतर असं झालं असतं तरं?"
भावेश चमकला, तो उठून जायला लागला तसं अवनीने त्याचा हात पकडला.

"उत्तर देऊन जा, तिच्या मनाला तो प्रश्न पोखरत राहिलं नाहीतर. "
भावेशने तिच्याकडे बघितलं आणि पून्हा मिहिकाच्या बाजूला बसत म्हणाला.
"बी प्रॅक्टिकल मिहिका, तुझं दुःख मोठं असले तरी जी आई होऊ शकतं नाही तिच्याशी कोण लग्न करणार ही रिऍलिटी आहे, तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी प्रत्येकाला आपलं मूल हवं असतं, आणि स्पष्टच सांगायचं तर मी तरी एवढा दिलदार नाही. रुप नसेल तरी चालेल पण स्त्री ही पुर्ण असावी, वंश वाढवणारी. मला लग्न करायचंय ते फक्त्त माझ्या सुखासाठी नाही माझ्या घरात मूलं खेळवण्यासाठी."
"भावेश,"मिहिका कळवळून ओरडली.
"अर्थ काय होतो तुझ्या बोलण्याचा हे तुला तरी कळतंय का?"
"कळतंय मिस मिहिका, तू सत्य स्वीकारत का नाही, तू फक्त्त एक शोभेची बाहुली आहेस आता, शोकेसमध्ये ठेवणारी, जी फक्त्त शरीरासूख देऊ शकते, बाकी काहीच नाही आणि तुझ्यासारख्या मुलींना काय म्हणतात ते तुलाही चांगलंच ठाऊक असेल."
मिहिकालां ते शब्द चिरून गेले, हरून तिने अवनीकडे बघितलं.
"तिला सर्व सांगूनच हा निर्णय घेतलाय आम्ही, तू कुठेच मध्ये येऊ नयेस असं मला वाटतं आणि आलीसच तर..."भावेश बोट दाखवत म्हणाला.
"तर?...तसही इच्छा तर नाहीय माझी पण आता एवढं ऐकलं तरं ते ही सांगून दे."मिहिका हिम्मत करून म्हणाली.
"तर जे सत्य सर्वांपासून लपून आहे ते जगजाहीर होईल, अवनीला कळूनही जे सत्य तिने फक्त्त तिच्याकडेच दाबून ठेवलं ते बाहेर आणायला मी कमी करणार नाही, मला तेव्हढं खाली उतरायला लावू नकोस, यानंतर तुझा माझाच काय, तुझा आणि अवनीचाही संबंध संपला."म्हणत तो निघून गेला. अवनीही त्याच्यामागेच निघून गेली.
मिहिका पून्हा शून्यात हरवली, असच एक हॉस्पिटल तिथे तिचं गर्भाशय काढून टाकलं गेलं, असच एक हॉस्पिटल जिथे तिला पहिल्यांदा गर्भाशय नसल्याचं कळलं आणि आज असच एक हॉस्पिटल तिला ओरडून सांगत होतं, 'कुणी कुणाचं नसतं.'

एक कालचा अनुभव ज्यातून ती सावरल्याचं भासवत होती, अमेय तरं परका होता पण आज तोच अनुभव कधीतरी तिच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींनी दिला होता.
...

क्रमश:ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//