Feb 26, 2024
नारीवादी

देवकी गाते अंगाई (भाग 33)

Read Later
देवकी गाते अंगाई (भाग 33)


"काकू शांत व्हा, काही होणार नाही अंशूला. तिची गुंगी उतरली की ती उठेल, आणि आपण काळजी म्हणून सगळे चेकअप करतो आहे ना, काही होणार नाही तिला. तुम्ही रडणं थांबवा बघू." मिहिका त्यांना धीर देत समजावत होती.
सारिकाने डोळे पुसले आणि आश्चर्याने मिहीकाकडे बघितलं. तसं त्या पहिल्यांदाच तिला बघत होत्या. नाकी डोळी नीट, गोरीपान, काळ्याभोर केसांची लांब वेणी, गालावर पडणारी खळी, चमकदार चेहरा आणि तिच्या चेहर्‍यावर एक वेगळं तेज होतं.

'किती सुंदर आहे ना ही?' त्यांच्या मनात येऊन गेलं.
'म्हणजे अगदी साधी, सरळ, शांत, समजदार आणि प्रसंगी काय करावं याचं भान असलेली. नाहीतर माझी सावी, बघावं तेव्हा भांडत असते. उल्का होती समजदार पण तिने दुसरेच रंग दाखवले. कधी वाटलंही नव्हतं ती अशी असेल, आज ती असती तर ही वेळ आलीच नसती. मीच हयगय केली. अंशुला मी सांभाळू शकत होते, आईचं काम आईच करते. आया ठेवून काय होणार होतं? माझं चुकलंच, पहिल्याच दिवशी आया ठेवून मी एवढी कशी बिंदास झाले की हे इवलसं कोकरू तिच्या भरवशावर सोडून दिलं. पण अंशू कशी काही बोलली नाही. तिला पण सोनीचं वागणं कधीच खटकलं नसेल का? दोन-तीन दिवसापासून ती जास्त झोपतेय लक्षात येत होतं तेव्हा का लक्ष दिलं नाही मी?

निश्चल आता कुठे कामामध्ये गुंतलाय, आधीच तीन वर्षे त्याचं बरंच नुकसान झालं. कितीतरी प्रोजेक्ट हातातून निघून गेले. आता बस्तान बसवतोय, आजचं डील झालं तर कदाचित मोठा प्रोजेक्ट मिळेल ज्याने तीन वर्षाचा त्याचा बॅकलॉग भरून निघेल, पण त्याला आता इथे काय घडलं हे सांगता येणार नाही. तो आल्यावर त्याचा जीव किती तळमळेल. आधीच आत्ता कुठे तो उल्काला विसरतोय. तिचे फोटो त्याने काढून टाकलेत आणि आजची घटना म्हणजे उल्काची कमी जाणवून देणारी.
देवा माझ्या निशूला लवकरात लवकर चांगली मुलगी मिळू दे रे. पुन्हा या लेकराची अशी दुर्दशा नको करू रे.' मनातच म्हणत त्यांनी अंशुच्या पायावरून प्रेमाने आपले हात फिरवले.
हॉस्पिटल येतात मिहिकाने तिला लगेच ॲडमिट करून घेतलं आणि नर्सला सूचना देऊन बरोबर सगळ्या टेस्ट करायला सांगितलं.

एखादा तास असाच गेला आणि अंशुला जाग आली. आपण कुठे वेगळ्याच ठिकाणी आहो हे बघून ती दचकून उठून बसली आणि बाजूला मिहिकाला बघताच ओरडली.
"अरे राजकुमारी, तू पुन्हा मला भेटलीस, पण मी इथे दवाखान्यात कशी आले?" अंशू क्युट चेहरा करून विचारात पडत म्हणाली.
"काही नाही रे बाळा, तू झोपली होतीस ना म्हणून मी तुला येथे घेऊन आले." नुकतंच डोळा लागलेली मिहिका तिच्या आवाजाने जागं होऊन म्हणाली.

"ये तू खरच परी आहेस का?" अंशूने विचारले.
"नाही रे बाळा, मी मिहीका तुला सांगितलं होतं ना मी माझं नाव." मिहिका गाल फुगवत म्हणाली.
"हो पण मी बाबाला सांगतांना तुझं नाव विसरले ना, मला तुझं नावंच आठवत नव्हतं, आठवेच ना बाबा आठवेच ना." अंशू डोकं ठोकत नौटंकी करत म्हणाली.
"अच्छा!...पण आता कळलं ना, आता सांगशील?"
"नाही ना, आता बाबा बाहेर गेलाय, दोन दिवसासाठी." ती ऍक्शन करत म्हणाली, आणि तो ना माझ्यासाठी खूप सारे खेळणे आणणार आहे. मी त्याला एवढी मोठी नाहीं एवढी मोठी लिस्ट दिलीय." ती हातांचा आकार मोठा करत दोन्ही हात पसरून म्हणाली.
"अरे वा! मग तर मज्जा आहे बाबा एका मुलीची."मिहिकाने चिडवले.
"मज्जा कसली सजा आहे, मला दिवसभर किती बोर होतं. ती सोनी ताई माझ्यासोबत खेळतच नाही चांगली. ए परी तू खेळशील माझ्यासोबत?"अंशु हात समोर करत म्हणाली.

"हो, का नाही खेळणार? पण त्यासाठी आधी चांगले ठणठणीत व्हावे लागेल."
"पण, मला झालं काय आहे?"

" काहीच नाही, हल्ली एक लाडोबा म्हणे खूप झोपतो म्हणून आजी घेवून आली तुला माझ्याकडे. "

"आजीनी आणलं मला तुझ्याकडे? पण त्यांना कसं कळलं मला तुझ्याकडे आणायचं ते?" ती आपल्याला छोट्याशा मेंदूला ताण देत म्हणाली.


"असच मध्येमध्ये एकदा डॉक्टरकडे जाऊन यायचे असते म्हणून."मिहिका समजावत म्हणाली.

"म्हणजे तू डॉक्टर आहेस? मला भिती वाटते बाबा डॉक्टरांची, इंजेक्शन देतात ते."

"अरे असं कसं? आता आपण गप्पा मारतोय तर मी काय इंजेक्शन दिलं का तुला?" मिहिका तिच्या पोटाला गुदगुल्या करत म्हणाली.


"अरे हा तुला माहिती आहे, आमच्या स्कूलमध्ये ना मिहीर आहे.
तो म्हणतो त्याच्याकडे एक जादू येणारी डॉक्टर आहे जी इंजेक्शन देते तरी काही दुखत नाही."
"अच्छा त्याला तू ओळखतेस?"
"हो का, तू पण त्याला ओळखतेस का?" तिने निरागपणे विचारलं.
"हो, कारण त्याची जादू वाली डॉक्टर मीच आहे." म्हणत मिहिकाने तिचा गाल ओढला.
" अय्या खरंच!... " अंशू दोन्ही गालांवर हात ठेवून म्हणाली.
"हो खरच!" तिच्याच स्टाईलमध्ये म्हणत तिने अंशुचं नाक ओढलं.

"पण मिहीर किती छान, देवबाप्पाने त्याला सगळं दिलं, त्याला आई-बाबा दोघेही आहेत. मला तर आईच नाहीये."
अंशू उदास होत म्हणाली.
तिच्या बोलण्याने मिहिका गलबलली, तिने तिला जवळ घेतलं आणि आपल्या छातीशी कळवळलं.

मिहिकाला काय बोलावं कळत नव्हतं. त्या कोवळ्या जीवाला कसं समजवावं, खरंच आई नसताना कसं वाटतं, आज आठ दिवस तीही आई शिवाय राहून आली होती. मला आठ दिवस आईशिवाय राहणे जमत नव्हते आणि हे बाळ कधीपासून आईविना राहिलं असेल?

बाळा तुला आई आठवते का रे?
"नाही पण माझ्या बाबाच्या रूममध्ये मोठा फोटो आहे तिचा. मी तिला फोटोतच बघितले लहानपणापासून पण त्यादिवशी आत्तू म्हणत होती.

'की ती महामाया आहे, तिला मी नकोच होते.' तरी बाबा तिचा फोटो लावतो, खूप भांडली त्यादिवशी ती बाबासोबत."
मिहिकाला कळेना नक्की काय प्रॉब्लेम असावा.

'हिची आई खरंच सोडून गेली आहे की हयातच नाहीये.'

"बर चल, आजीला भेटणार? आजी पण खूप याची वाट बघतेय तू उठायची."
मिहिकाने बेल दाबली आणि नर्स आत आली.


"आईला आणि बाकीच्यांना बोलवा"
तसं सारिका,हरी, कल्पना,अजय सगळे आत आले.
त्यांना बघून अंशू खूप खुश झाली, आधी ती "आजी " म्हणत सारिकाच्या गळ्यात पडली आणि तिथून ती "आजोबा" म्हणून अजयच्या गळ्यात पडली.

मिहीका आश्चर्याने पाहत होती. अंशू अजयच्या गळ्यात पडली आणि अजय तिला छान लाड करत होते. तेव्हा मिहिकाच्या मनात विचार आला. 'आज जर माझी मुलगी असती तर, अंशू सारखीच असती.' तिने डोळ्यात येणारे पाणी निग्रहाणे परतवले.

सारिकाच्या फोनवर फोन येत होता.
"निश्चल, आता याला काय सांगायचं?" सारीका टेन्शनमध्ये म्हणाल्या.
"अगं आजी, त्याला सांगू नको मी दवाखान्यात आहे. नाहीतर तो सगळं सोडून येऊन जाईल परत मग माझे गिफ्ट कोण आणणार?" अंशू उदास होत म्हणाली.
"बरं बाबा, नाही सांगत. पण मग सांगायचं काय त्याला?" सारिका विचारात पडल्या.
"आपण त्याचा व्हिडिओ कॉल नाही उचलायचा." म्हणत तिने फोन कट केला.
"त्याला साधा फोन करूया आणि त्याला सांगू की आम्ही पार्कमध्ये खेळतोय तू आम्हाला डिस्टर्ब करू नकोस." अंशुच्या बोलण्यावर सगळेच हसले.
अंशूने लगेच फोन लावला, "अरे बाबा, आम्हाला डिस्टरब करू नकोस, आम्ही सगळे पार्कमध्ये खेळतोय." अंशू फुल एक्साईटमेंटमध्ये बोलत होती आणि असंच बोलत होती जणू ती खरंच पार्कमध्ये आहे.

अंशुच्या बडबडीची सगळ्यांना सवय झाली होती, मिहिका आजच तिची बडबड एंजॉय करत होती. तिचं ते सारखं गाल फुगवून बोलणं, ते नाटकी एक्सप्रेशन कुणालाही मोहात पाडतील असेच होते.क्रमश:


कसं वाटतंय... सांगा जरा.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//