Feb 23, 2024
नारीवादी

देवकी गाते अंगाई (भाग अडतीस )

Read Later
देवकी गाते अंगाई (भाग अडतीस )


"का आली असेल ही मला भेटायला, अंशूबाबत काय बोलायचं असेल हिला, अंशुच्या सगळ्या टेस्ट केल्या हिने, अंशुला काही झालं तर नसेल ना?...दोन दिवस झाले अंशू सारखी त्यांच्याकडे असते म्हणून तर म्हणायचं नसेल ना की तुमची मुलगी तुम्ही बघा आता?...
अंशू सतत तिच्या मागेमागे फिरते त्याच्यामुळे तिला डिस्टर्ब तर होत नसेल ना कामात?...आपलं मूल सांभाळणे वेगळे आणि दुसऱ्याचं मूल सांभाळणं वेगळं, म्हणून तर ही भेटायला आली नसावी, पण मग ऑफिसमध्ये का आली?...
कदाचित असं होत असेल की घरी तिच्या आई-बाबांसमोर आणि माझ्या आईसमोर बोलायला तिला अवघडल्यासारखं झालं असेल,

की अंशुच्या रिपोर्टमध्ये काही?...

ती येतपर्यंत त्याच्या डोक्यात प्रश्नांची रांग लागली होती, त्याची बेचैनी वाढत होती.
मिहिका काय बोलायचं, कशी सुरुवात करायची याचा आपल्याच मनात विचार करत एका मुलीमागे जात होती. तिला अमेय दिसल्यावर तिचा राग उफाळून आला होता पण आता ती दुसऱ्या कामासाठी आली होती त्यामुळे तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.
'अच्छा तर हा इथे जॉब करतो.' ती मनात म्हणाली आणि निघून गेली. थर्ड फ्लोअरवर गेल्यावर डाव्या बाजूला एक केबिन होती. तिच्यासोबत येणाऱ्या मुलीनी दारावर नॉक केलं.
"येस कम इन" तिला बघून निश्चल म्हणाला.
आत गेल्यावर ती मुलगी एकटीच आहे बघून तो ओरडला,
"तुम्हाला त्यांना घेऊन यायला सांगितलं होतं ना?"
"सर त्या आल्या आहेत बाहेर थांबल्यात मी लगेच घेवून येते."
ती मुलगी बाहेर आली आणि मिहिकाला घेऊन आत गेली.
"ओके तुम्ही जाऊ शकता." निश्चल त्या मुलीला म्हणाला, आणि मिहिकाला समोरच्या चेअरकडे इशारा करत म्हणाला.
"या ना बसा."
मिहिका थोडं इकडेतिकडे बघत, अंशुच्या आईचा फोटो शोधत अवघडून चेअरवर बसली.
"बोला काय घेणार? चहा, कॉफी, की सरबत?"
"नको, काही नको. थोडं काम होतं मला, तुमचा थोडा वेळ हवा होता आणि सॉरी ते मी न सांगता आले." मिहिका अपराधी स्वरात म्हणाली.
"इट्स ओके हो, तुम्हाला कशाला परमिशन हवी."
" म्हणजे?" तिने एकदम चमकून बघितले.
"अहो परमिशन ऑफिसच्या लोकांना, आता तुम्ही माझ्या अंशुची एवढी काळजी घेतलीत मी नसताना आणि तुम्हाला मी परमिशन काढायला लावायची, एवढा वाईट नाहीय हो मी." म्हणत निश्चल हसला.
मिहिकाला कुठून सुरुवात करावी तेच कळेना, ती शब्दांची जुळवाजुळव करत होती.

तिला तसंच बसलेलं बघून निश्चलचं टेन्शन वाढत होतं शेवटी त्यानेच विचारलं,
"बोला काय काम काढलं."
"ते तुम्हाला थँक्यू म्हणायचं राहिलं होतं त्या दिवशी." मिहिका गोंधळून म्हणाली.
"अच्छा फक्त थँक्यू म्हणाण्यासाठी तुम्ही मला इथे भेटायला आल्या?" निश्चिलच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव होते.
"अहो नाही, ते मला जरा अंशू बाबत..."ती अडखळली.
"हा तेच, बोला ना काय झालं, अंशुचा काही त्रास होतेय का तुम्हाला खूप, नाही म्हणजे मी आजच आलो आणि मला कळलं सोनीचं मॅटर. काल रात्री तर अंशूने तुम्हाला थांबवून पण घेतलं वगैरे...सॉरी जरा जास्तच जिद्द करायला लागलीय ती हल्ली."

"लहान आहे ती अजून पण म्हणून मोठ्यांनी तिला समजून घेऊ नये का?"
तिच्या बोलण्याचा रोख न समजता समजून निश्चलने तिच्याकडे प्रश्नार्थक बघितले.
"सॉरी हा तुमचा पर्सनल विषय आहे पण तरी मला वाटतं तुम्ही अंशूसाठी दुसऱ्या लग्नाचा विचार करावा."
निश्चल चमकलाच.
जी मुलगी त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी आईने पसंत केली तीच मुलगी त्याला दुसऱ्या लग्नाचा विचार करायला सांगत होती. त्याला मनातच हसायला आलं

"तुम्हाला असं का वाटतं?" त्याने रोखून बघत विचारलं.
"गेले दोन तीन दिवस मी अंशूसोबत खेळतेय जरा जास्तच इन्व्हॉल्व्ह झाले असं म्हटलं तरी चालेल. ती तिच्या आईला खूप मिस करते, म्हणजे तिच्या प्रत्येक गोष्टीत, तिच्या प्रत्येक स्वप्नात तिच्यासोबत तिची आई असावी अशी तिची इच्छा आहे."मिहिका समजावून सांगत होती.
"पण ती मला कधीच काही बोलली नाही." निश्चल पेपरवेट खेळत म्हणाला.
"ती कुणालाच काही बोलत नाही पण..."
मिहिकाची चुळबुळ वाढली, ती कसं स्वतःच्या तोंडाने सांगणार होती की अंशू तिच्यात तिची आई शोधते.
"बोला ना काय झालं, का अडखळलात?" निश्चिलने अधीरतेने विचारलं.
"अंशू आपल्या आजूबाजूला तिची आई शोधते, आज तिच्या प्ले स्कूल मध्ये डान्स कॉम्पिटिशन आहे तिला असं वाटतं की तिची आई असती तर ती पार्टिसिपेट करू शकत होती. याआधी कुकिंग कॉम्पिटिशन झाली तिने घरी सांगितलंच नाही, अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या ती तुमच्याकडे नाही बोलू शकत. तुम्ही बाबा म्हणून सांभाळता तिला खूप छान सांभाळता पण तिच्या मनातली आईची पोकळी नाही पूर्ण होऊ शकत."
निश्चल विचारात पडला.
"मी एक बालरोगतज्ञ आहे. तिला आई हवी आहे, आईचं प्रेम आईच देऊ शकते मग ती सावत्र का असेना. तिच्या मनाची आईची पोकळी तुम्ही कुणीच नाही भरू शकत. खूप तळमळतेय हो ती, मनातल्या मनात आईसाठी घुटमळते, तिचं वय नाहीये एवढं सगळं समजून घ्यायचं पण ती तुम्हाला आणि काकूंना त्रास होऊ नये म्हणून तुमच्याजवळ आईचा विषय काढत नाही. मी फक्त्त एवढंच सांगतेय, ती तिच्या आईला खूप मिस करते."
"हो आई बोलली मला सकाळी आणि मी यावर विचार करतोय पण सावत्र आई तिला ते प्रेम देऊ शकेल की नाहीं याची भीती वाटते हो, एवढा काळजाचा तुकडा दुसऱ्या बाईच्या हाती सोपवायचा आणि तिने त्याला प्रेमळ हात दिला नाही, सावत्रपणा केला तर?...लग्न करून, कुणाची जबाबदारी घेऊन मला मागे हटता येणार नाही आणि माझ्या मुलीचे हाल होताना मी बघू शकणार नाही." निश्चल दूर शून्यात बघत म्हणाला.
"हो पण सध्या तिचं वय नाहीये आणि तुमची आई आहे लक्ष द्यायला त्यामुळे कोणी एवढा सावत्रपणा नाही करू शकणार, कुणी स्त्री एवढी निर्दयी असू शकत नाही लहान मुलांच्या बाबतीत." मिहिका बोलून गेली त्यावर,
"स्त्री किती निर्दयी असू शकते हे माझ्याव्यतिरिक्त कुणी काय ओळखणार?" तो पुटपुटला.
"तुम्ही काय म्हणालात, ऐकू येवूनही ऐकूच आलं नाहीं असं दाखवत पुन्हा विचारले, कारण तो जे बोलला ते वाक्य तिला वेगळंच वाटलं होतं, कदाचित तिनेच चूक ऐकलं असं?


"तुम्हाला खरं माहितीये उल्का विषयी?" निश्चिलने विचारलं.
तिने प्रश्नार्थक पाहिलं.
"उल्का म्हणजे अंशूची आई, तिचं सगळं सत्य तुम्हाला माहितीये का?"
"अहो नाही, तो तुमचा पर्सनल विषय आहे मी तुम्हाला असं नाही म्हणत की तुम्ही तुमच्या पहिल्या पत्नीला विसरावं पण अंशूसाठी सध्या तरी तुम्हाला बी प्रॅक्टिकल व्हावं लागेल."
बी प्रॅक्टिकल वर्ड येताच निश्चलचा राग अनावर झाला.
"एका स्त्रीचा एवढा वाईट अनुभव घेतला मी की पुन्हा कुठल्या स्त्रीवर विश्वास ठेवायला मन धजावत नाही हो. " निश्चल अगतिक होऊन म्हणाला.
मिहिकाने चमकून पाहिलं, त्याचा आवाज जड झाला होता.

निश्चलने तिला अंशूच्या जन्माच्या वेळची कंडीशन सांगितली ते ऐकून एक स्त्री एवढी खाली उतरू शकते यावर तिचा विश्वासच बसत नव्हता.
"हा एक अनुभव असू शकतो हो पण जगात कितीतरी स्त्रिया आहेत आई व्हायला तळमळत असतात, त्यांना जरी आई काय असते याची किंमत नसेल तरी जगात कितीतरी स्त्रियांना आई होणं काय असते आणि त्याची काय गरज असते ते चांगलंच माहितीये, अशीच कुणी शोधा तुम्ही अंशूसाठी प्लीज... "मिहिकाचा आवाज जड झाला होता.

तेवढ्यात प्युन आला, त्याने दोघांसाठी कॉफी आणली होती.
"घ्या सिरीयस होऊ नका, कॉफी घेऊया. मी करेल तुमच्या म्हणण्याचा विचार. म्हणत निश्चिलने एक स्माईल दिली.

मिहिकाने कॉफी घेतली आणि आजूबाजूला निरिक्षण करु लागली. बाजूला चेअरवर एक फोटो ठेवला होता पूजा केलेला त्यावरून त्याचे बाबा असावे याची खात्री पटली पण ऑफिसमध्येही कुठेच तिला उल्काचा फोटो दिसला नाही. अशा स्त्रियांचा काय फोटो लावणार?क्रमश:


कसं होणार यांच... तुम्हीही विचार करत कॉफी घ्या मी सांगते पुढे

पण कॉमेंट द्या रावं... आवडलं असेल तर...

नाहीतर लग्न कसं होणार....


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//