भाग २२
मागील भागात आपण पाहिले की शेवटी पार्थला शक्तीपीठांची निर्मिती कशी झाली याची माहिती मिळते. आता बघू पुढे काय होते ते.
"आपण जाऊयात या शक्तीपीठांच्या शोधात.. पण सुरूवात कशी करायची?" शांभवी गंभीरपणे म्हणाली.
"तुम्ही खरंच मला मदत करणार?" कपिलचा विश्वास बसत नव्हता.
"हो.. माझ्याकडे आता तसं बघायला गेलं तर गमावण्यासारखं काहीच नाहीये. मग हे नक्की काय रहस्य आहे हे बघायला आवडेल मला. जयंती, तू कधी परत जाणार आहेस?" शांभवीने विचारले.
"परत? कुठे परत? शांभवी.. मी आता फक्त तुझ्यासोबत." जयंती म्हणाली.
"जयंती, मस्करी करू नकोस. मी तर तुला लॉजवरसुद्धा येऊ नको म्हटलं होतं. तरीही तू आलीस. तिथून इथपर्यंत ठिक होतं. पण पुढे काय मलाही माहित नाही. अश्या वेळेस.." शांभवी गंभीरपणे बोलत होती.
"जास्त विचार करू नकोस. आता जिथे तू, तिथे मी. मी कालच आईशी बोलले आहे."
"काकूंनी ऐकलं हे सगळं?" शांभवीने आश्चर्याने विचारले.
"ऐकलं का म्हणजे? ऐकायलाच पाहिजे. तिने तर मला पैसेही पाठवले आहेत." जयंती बोलत होती. पैशांचा विषय निघाल्यावर शांभवीला पटकन आठवले.
"कपिल, माझा तो एक प्रॉब्लेम झाला आहे. आमच्याकडे कॅश नाहीये. आईबाबा बँकेतून पैसे काढून आणायला जातानाच त्यांचा ॲक्सिडेंट झाला. सो.." शांभवी मान खाली घालून बोलत होती.
"मुलांनो, पैशाची काळजी करू नका. तुम्हाला पैसे पुरवण्याची जबाबदारी माझी." आबासाहेब म्हणाले.
"आबा, तुमची परवानगी आहे यासाठी?" कपिलने आनंदाने विचारले.
"न देऊन सांगतो कोणाला? तुम्ही एवढं मोठं काम करायला जाताय. मग पैशाची व्यवस्था मी केली तर कुठे बिघडतंय. मी तर म्हणतो, तुम्ही आपली नवी गाडी घेऊन जा. म्हणजे प्रवास आरामात होईल."
"आबा..." कपिल म्हणाला.
"कदाचित हे कार्य तुझ्या हातून व्हावं असं देवीच्या मनात असेल. जा तुम्ही." आबासाहेब कपिलच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले.
"आणि तुम्ही आबासाहेब?" शांभवीने विचारले.
"मी झालो आता म्हातारा.. मला थोडंच तुमच्यासारखं साहस जमणार आहे. त्यापेक्षा मी घरी जातो आणि सगळी मदत करतो. आम्ही दोघेही ऑफिसला नाही हे आम्हाला परवडायला पण पाहिजे ना." हसत आबासाहेब म्हणाले.
"मग आपण चौघजण जायचं?" पार्थने विचारले.
"हो.. पण मग इथे सुरूवात कुठून करायची?" जयंतीने विचारले.
"मी एक सुचवू? म्हणजे बघा.. मला असं वाटतंय की तुम्ही तुळजापूरपासून सुरूवात करावी."
"तुळजापूर? पण का?" कपिलने विचारले.
"म्हणजे बघा हं.. तसंही त्याला आद्य शक्तीपीठ म्हणतात. सतीने जे पहिले रुप घेतले ते तुळजापूरलाच. मला वाटतं तिथेच तुम्हाला काहीतरी क्लू मिळेल." आबासाहेब म्हणाले.
"तुम्ही म्हणाल तसं.. पण आबा, मोठी गाडी नको. ही आहे तिच गाडी छान आहे. पण आम्ही जर ही गाडी घेऊन गेलो तर तुम्ही कसे परत जाणार?" कपिलने विचारले.
"ती काळजी तुम्ही नका करू. आम्ही बघतो कसं जायचं ते. तिथे जाऊन ती पोलिसांची भानगड पण मिटवून टाकतो." पोलिसांबद्दल तर शांभवी पूर्णपणे विसरलीच होती.
"पण आबा, त्यांनी तुम्हाला काही केले तर?" कपिलच्या आवाजात काळजी डोकावत होती.
"आम्हाला कोणी काही करत नाही. त्यादिवशी आम्ही तिथून निघालो कारण घटना जरा जास्तच फास्ट घडत होत्या. पण आता आम्ही जरा शांत झालो. दहा ठिकाणी आमचं बोलून झालं. त्यानंतरच आम्ही सांगतोय. तुम्ही तुमच्या कामाला निघा. फक्त कोणाच्या नजरेवर येऊ नका. पोलिस तुमच्यामागे इतके हात धुवून का पाठी लागले आहेत ते मी बघतो." आबासाहेब म्हणाले.
"थॅंक यू सो मच.. कोणत्या शब्दात तुमचे आभार मानू तेच समजत नाहीये मला." शांभवी म्हणाली.
"आभार कसले त्यात? जा तुम्ही या मोहिमेवर.. बघा काय मिळतंय तुम्हाला ते. कदाचित या सगळ्यात आमचाही झाला तर काही फायदा होईल.. काय चिरंजीव?" आबासाहेब कपिलकडे बघत म्हणाले.
"आबा, मी जातो इथून. जरा कुठून कसं जायचं ते बघतो." कपिल म्हणाला.
"मग त्यासाठी आत कशाला जायचे? मी सांगतो की.. इथून निघालात की.. दोन रस्ते आहेत तुळजापूरला जायचे. तुम्ही पाथर्डीवरूनच जाणार ना?"
"एक रस्ता शिर्डीवरून जातो आणि दुसरा पाथर्डीहून.. बरोबर ना?" जयंती म्हणाली.
"हो.. पण शिर्डीवरून जाण्यापेक्षा पाथर्डीवरूनच जा. जाताना मायंबाचे दर्शन घेऊन जा." आबासाहेब म्हणाले.
"मायंबा??" शांभवी आणि पार्थ दोघे एकत्र म्हणाले.
"हो.. तिथे मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. आणि जवळच कानिफनाथांची सुद्धा." आबासाहेब म्हणाले.
"हो आबा." कपिल म्हणाला. आपले अज्ञान अजून यांच्यासमोर उघड होऊ नये म्हणून हे गप्प बसलेले कपिलला समजले. तो फक्त गालातल्या गालात हसला आणि तो का हसतो आहे हे समजल्यावर शांभवी थोडी हिरमुसली.
"आम्ही बसतो जरा आत.." शांभवी जयंतीला आत खेचत म्हणाली.
"पार्थ, तू पण आराम करून घे. एकदा प्रवास सुरू झाला की कितपत आराम करायला मिळेल सांगता येत नाही." कपिलने सुचवले. शांभवी, जयंती आत आल्या.
"काय गं हे.. मला या गोष्टी माहितच नाही." शांभवी नाक फुगवून म्हणाली.
"तू कधी तिथे गेली नसशील म्हणून तुला माहित नसेल." जयंती खांदे उडवत म्हणाली.
"म्हणजे तुला माहित आहे?" शांभवीने आश्चर्याने विचारले.
"हो.. मी जाऊन आले आहे." जयंती म्हणाली.
"कधी??" शांभवीने जयंतीला विचारले.
"किती तरी वेळा.. आमच्या घरात नवनाथांची काठी आहे. मग आम्ही जायचो तिथे." जयंती म्हणाली.
"ओह्ह.. म्हणजे बहुतेक आम्हालाच यामधलं काहीच माहित नाही." खिन्नपणे शांभवी म्हणाली.
"शांभवी, प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतेच. कदाचित यामागेसुद्धा असेल. नको विचार करूस जास्त." जयंतीने शांभवीच्या खांद्यावर थोपटले. त्या दोघींचं बोलणं चालू असतानाच कपिल तिथे आला.
"आत येऊ का?" त्याने दरवाजातून विचारले.
"हो.. या ना.." शांभवी म्हणाली. त्याने आत येताच शांभवीच्या हातात तीन पाकिटं ठेवली.
"हे काय?"
"ही नवीन सिमकार्ड.."
"नवीन सिमकार्ड? पण कोणासाठी? आणि का?" शांभवीने विचारले. जयंतीच्या चेहर्यावरसुद्धा हा प्रश्न दिसत होता.
"हे बघा.. तुमच्या पाठी पोलिस आहेत हे नक्की.. पण ते का आहेत हे मात्र माहित नाही. मग ते तुमचा मोबाईल नंबर ट्रेस करून तुमच्या पाठीही येऊ शकतात ना.. जर नंबरच बदलला तर कसलंच टेन्शन नाही."
"पण जर कोणाचे महत्वाचे फोन आले तर?" शांभवीने विचारले.
"आत्तापर्यंत एकतरी महत्त्वाचा फोन आला का?" कपिलने विचार करत विचारले.
"नाही..." शांभवी म्हणाली.
"झालं तर मग.. आणि जयंतीमॅडम, तुम्ही तुमच्या घरी नवीन नंबर द्या आणि त्यांना तो नंबर कोणालाच देऊ नका अशी विनंती करा.." कपिल म्हणाला. "माझे तर मत होते मोबाईलच बदलायचा.." तो हे बोलताच शांभवीने आपला मोबाईल घट्ट पकडला.
"मत होतं म्हटलं.. आहे नाही म्हटलं." हसतच कपिल म्हणाला. "पार्थ दमून झोपला आहे. तो उठला की आपण खरेदी करायला जाऊ. काही हवं असेल तर.. चालेल ना?" यावर जयंती आणि शांभवी त्याच्याकडे बघतच बसल्या.
"मी आहे बाहेर.. या तुम्ही." कपिल बाहेर गेला याची जयंतीने खात्री करून घेतली. तिने खोलीचा दरवाजा लावून घेतला.
"हा कपिल जरा डेंजरच आहे ना?" जयंतीने विचारले.
"असं का म्हणते आहेस? एवढा तर चांगला आहे.."
"तो ना मला जरा जास्तच चांगला वाटतो आहे." जयंतीच्या मनात कपिलबद्दल संशय दिसत होता.
"नाही हं.. तो आहेच चांगला. कसा आला बघ ना मदतीला. नाहीतर तो.." शांभवीच्या डोळ्यात पाणी आले.
"तो कोण??" जयंतीने विचारले.
"कोणी नाही.. सध्या तरी फक्त तू आणि कपिलच आहात माझ्यासोबत.. आणि मला कोणावरही त्याच्या चांगुलपणाचा संशय घ्यायचा नाही. समजलं??" शांभवी जयंतीला गंभीरपणे म्हणाली.
मायंबा म्हणजे काय असेल? का जायला सांगितलं असेल तिथे आबासाहेबांनी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा