देवी रक्षति रक्षितः.. भाग २१

कथा एका असामान्य मुलीची
भाग २१

मागील भागात आपण पाहिले की सती सीतेचे रूप घेते म्हणून महादेव तिच्यावर चिडतात. आता बघू पुढे काय होते ते.


"कधी कधी समोर सगळं दिसत असतं, समजत असतं.. पण बोलता येत नाही काहीच.. बरोबर ना?" जयंतीने परस्पर शांभवीच्या प्रश्नाचे उत्तर दिले.

"मग पुढे?" पार्थने परत सगळ्यांना कथेकडे वळवले.

"तर.. सती म्हणजे आदिमायाच!! ती काय ऐकणार महादेवांचं?" आबासाहेबांनी बोलायला सुरुवात केली.


"भल्यासाठी माहेरी जाऊ नको म्हणे.. एवढंच जर माझं भलं व्हावं असं वाटत असतं तर माझ्याशी असे वागला असता का?" सती रागाने बोलत होती.

"सती, समजून घे.."

"काय समजून घेऊ? आपल्या विवाहानंतर माझ्या माहेरी पहिला यज्ञ आहे. मला घेऊन जायचं सोडून तुम्ही जायलाच नको म्हणत आहात." सती म्हणाली.

"हो.. माझी इच्छा आहे की तू तिथे न जावेस. आणि मी हे शेवटचं सांगतो आहे." ओठ घट्ट मिटून घेत शंकर म्हणाले.

"मी पण शेवटचं सांगते आहे. मी जाते आहे. तुम्ही आलात तर तुमच्यासोबत.. नाहीतर मी एकटी." सती म्हणाली.

"मी येणार नाही."

"चांगली गोष्ट आहे.. मी जाते मग.." सती फणकार्‍याने तिथून निघाली. शंकरांनी नंदीला खुणावले. त्याबरोबर तो सतीच्या मागे जायला निघाला. ते जाताच महादेवांनी परत नेत्र बंद करून घेतले. घडणाऱ्या अशुभ घटनेच्या नांदीमुळे त्यांचं ध्यानावर लक्ष केंद्रित होत नव्हतं. इथे सती उत्साहाने माहेरी आली.

"माते ऽऽऽ" आत येताच तिने आईला आवाज दिला. तिला बघून तिच्या आईच्या आणि बहिणींच्या चेहर्‍यावर आनंद दिसू लागला. पण दक्षाच्या कपाळावरची शीर रागाने थडथडू लागली.

"हिला इथे यायचे आमंत्रण कोणी दिले?" दक्षाने रागाने विचारले. सतीला हे अजिबात अपेक्षित नव्हते.

"पिताश्री, मी आहे सती.." सतीने परत एकदा आवाज दिला.

"तेच म्हणतो आहे.. तुला आमंत्रण नसताना का आलीस तू इथे?" दक्ष रागाने बोलू लागला. सतीच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तिला महादेवांचे शब्द आठवले. 'आमंत्रण नसताना जाऊ नकोस.'

"पिताश्री, इथे सगळे आले आहेत. मला असं वाटलं की तुम्ही मला बोलवायचे विसरला आहात." सती मान खाली घालून बोलू लागली.

"हेच.. लग्नानंतर त्याच्यासोबत राहून तू संस्कार विसरली आहेस. आमंत्रण नसताना कुठे जाऊ नये, ही साधी गोष्ट पण तू विसरलीस." दक्ष बोलत होता.

"तुम्हाला जे बोलायचे आहे ते मला बोला. महादेवांना का बोलत आहात?" सतीने मान वर करून विचारले.

"प्रसूती, बघितलंस.. वडिलांशी बोलायची मर्यादा पण विसरली आहे त्या मर्यादाहीन माणसासोबत राहून." दक्ष तुच्छतेने म्हणाला. सर्वांसमोर आपला आणि आपल्या पतीचा झालेला अपमान सतीला सहन झाला नाही.

"मी इथे आले होते माझ्या मातापित्याला भेटायला. पण इथे मला दिसत आहे फक्त प्रजापती दक्ष.. जे सतत माझ्या पतींचा, महादेवांचा अपमान करत आहे. मला जन्म दिला म्हणून मी हे सगळं ऐकावं अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दिलेलं हे शरीरही मला नको. आत्ताच्या आत्ता मी हे शरीर त्यागते." सती रागावली होती. सतीने आदिमायेचे रुप धारण केलं.

"दक्ष, तू तपस्या करून मला पुत्रीरुपात येण्याची विनंती केलीस.. आणि शंकरांशी मिलन व्हावे म्हणून मी हा अवतार घेतला होता. पण तू मी आदिमाया आहे हे विसरलास. सतत महादेवांचा अपमान करत राहिलास. महादेवांचा अपमान म्हणजेच माझा अपमान हे तू विसरलास. पण याची शिक्षा तुला नक्की मिळणार.."

तिचं ते विशाल रूप बघून सगळेच भयभीत झाले होते. सतीने योगमायेने अग्नी चेतवला आणि तिचं शरीर त्या अग्नीने भस्मसात करायला सुरूवात केली. सतीने अग्नी चेतवताच नंदी धावतच शंकरांजवळ आला. आपल्या अंतर्ज्ञानाने त्यांना आधीच काय झाले ते समजले होते. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू घरंगळला. काय घडले हे नंदीने सांगताच शंकर क्रोधित झाले. त्यांनी आपली एक जटा उपटली. ती धरतीवर पडताच त्यातून एक कालपुरूष निर्माण झाला. तो होता वीरभद्र. त्याला बघून शंकरांनी फक्त सती हा एकच शब्द उच्चारला.

हातात नंगे खड्ग घेऊन तो निघाला यज्ञस्थळी. जे जे त्याच्या वाटेत येत होते त्या सगळ्याचा संहार करत. यज्ञस्थळी यज्ञकुंडाच्या इथे दक्ष उभा होता. बाजूलाच सतीचे शरीर जळत होते. बेभान होऊन वीरभद्राने खड्ग दक्षाच्या मानेवर चालवले. त्याचे ते रूप बघून उपस्थित सगळे घाबरले. दक्षाचा वध होताच महादेव तिथे पोहोचले. सतीच्या जळत्या देहाला घेऊन ते तिथून निघणार तोच प्रसूतीने त्यांच्या समोर हात जोडले.

"दया करा महादेव. माझ्या पतींना जीवनदान द्या." महादेव काहीच बोलत नाहीत हे बघून ब्रह्मदेव मध्ये पडले.

"दक्षाचे अहंकारी मस्तक आता वेगळे झाले आहे. आता त्याला पुनर्जीवित करा महादेव." साक्षात ब्रह्मदेवांची विनंती ते नाकारू शकले नाहीत. त्यांनी तिथल्याच एका बकर्‍याचे मस्तक दक्षाच्या धडाला लावले. दक्ष जिवंत झाला. त्याने महादेवांना समोर बघितलं. तो लज्जित झाला.

"मला क्षमा करा महादेव. मी तुमचा अपराधी आहे." दक्षाचे पुढील बोलणे न ऐकताच सतीचे शव घेऊन महादेव तिथून निघाले. तिला घेऊन त्यांनी तांडव सुरू केलं. त्यांचे तांडव बघून देवही भयभीत झाले.

"महादेव आवरा स्वतःला." विष्णूंनी विनंती केली. महादेवांनी तांडव थांबवले आणि सतीला घेऊन ते दुसरीकडे जाऊ लागले.

"महादेव, जे झालं ते चुकीचेच झाले. पण आता सावरा स्वतःला." ब्रह्मदेव बोलू लागले.

"कसे सावरू स्वतःला? सती माझी शक्ती होती. सती शिवाय हा शिव, शिव नाही तर शव आहे... शव आहे.." शंकरांनी परत सतीला उचलले आणि ते चालू लागले.

"हे असंच चालू राहिलं तर सृष्टीचे काही खरं नाही.." विष्णू म्हणाले.

"हो.. यावर काहीतरी करायलाच हवे. आणि ते फक्त तुम्हीच करू शकता." ब्रह्मदेव सूचकपणे म्हणाले. त्यांना काय म्हणायचे आहे हे समजताच विष्णूंनी शंकरांच्या दिशेने सुदर्शनचक्र सोडले.. त्या चक्राने सतीच्या शरीराचा वेध घेत त्याचे तुकडे केले. ते तुकडे इतस्तत पडले.. जिथे जिथे ते पडले तिथे शक्तीपीठ निर्माण झाले." आबासाहेबांनी बोलणे संपवले.

"किती दुर्दैवी ना.." जयंती हळहळत म्हणाली.

"तसंच असतं गं.. माणूस समोर असला की किंमत नसते. तो गेला की.." शांभवी डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली.

"ताई, तू याच शक्तीपीठांबद्दल आईबाबांना विचारले होतेस ना?" पार्थने शांभवीला विचारले. तिने चमकून त्याच्याकडे बघितले आणि नंतर कपिलकडे.

"पार्थ, आपण नंतर बोलूयात. तू थकला असशील. थोडा आराम करतोस का?" शांभवी विषय बदलत म्हणाली.

"मी थकलो नाहीये ताई. मला याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. त्या दिवशी तू शक्तीपीठांबद्दल बोलू लागलीस..आणि मग आईबाबा.." आबासाहेब या दोघांकडे आश्चर्याने बघू लागले.

"काय चालू आहे मला समजेल का?" आबासाहेबांनी विचारले.

"आबा, मी सांगतो.." कपिल मध्ये बोलू लागला. "त्यादिवशी या मला भेटल्या. त्या पुरात्तव विभागात काम करतात म्हणून मी त्यांना शक्तीपीठांबद्दल काही माहित आहे का ते विचारले. मग लगेचच त्यांच्या आईवडिलांचा अपघात झाला.. आणि बाकीचं सगळं तर तुम्हाला माहित आहे."

"तुम्ही परत त्याच्या मागे लागलात?" आबासाहेबांनी रागाने कपिलला विचारले.

"आबा, मी त्यांना फक्त विचारले." कपिल मान खाली घालून म्हणाला.

"त्यांना विचारताच त्यांच्या आईबाबांचा जीव गेला ना.. मी म्हटलं होतं तुम्हाला नका त्या भानगडीत पडू. ती माणसे चांगली नाहीत. तुम्हाला काही झालं तर आम्ही काय करायचं?" आबासाहेब गहिवरून बोलू लागले.

"आईबाबा म्हणत होते की ताई.."

"पार्थ.." बोलणार्‍या पार्थला शांभवीने थांबवले.

"त्याला बोलू द्या.. नका अडवू त्याला." कपिल म्हणाला. शांभवीने एकदा पार्थकडे बघितले, एकदा कपिलकडे.. पार्थ परत बोलू लागला.

"मला त्या लोकांचा शोध घ्यायचा आहे. मला तो प्रोजेक्ट करायचा आहे." शांभवीकडे बघणं टाळत पार्थ म्हणाला.

"पार्थ.. तू लहान आहेस अजून. तिथे खूप धोका असू शकतो." कपिल समजावत म्हणाला.

"धोका तर कुठेही असू शकतो. नाहीतरी सध्या आम्ही असे लपतछपतच राहतो आहोत ना.. मग त्यापेक्षा ही शक्तीपीठे आणि त्याच्याबद्दल जे काही आहे ते तरी बघू. काय वाटतं ताई??"

यावर काय असेल शांभवीचे उत्तर? जातील का हे सगळे शक्तीपीठांच्या मोहिमेवर? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all