देवी रक्षति रक्षितः.. भाग १९

कथा एका असामान्य मुलीची
भाग १९

मागील भागात आपण पाहिले की सगळेजण नाशिकला आले आहेत. आता बघू पुढे काय होते ते.


"जयंती, तो खडूस आहे का??" घाटावर उभ्या असलेल्या शांभवीने जयंतीला विचारले.

"सर, कशाला इथे येतील? त्यांना काय माहित आपण इथे आहोत ते." जयंती शांभवीला उडवून लावत म्हणाली.

"मला वाटलं.." शांभवी परत त्या दिशेने बघत म्हणाली. मगाशी दिसलेला बैराग्यांचा जथा आत्ता दिसत नव्हता.
'मी पण मूर्खच आहे.. सर, बैराग्याचा वेश का धारण करतील?' तिच्या डोळ्यासमोर रूद्र आला.. नेहमी अप टू डेट कपडे घालणारा.. एखाद्या हिरोसारखा नाही व्हिलनसारखा राहणारा. समोर काही बैरागी बसले होते. भगवी कफनी, गळ्यात, हातात रुद्राक्षमाळा.. रुद्र आणि असा?? शांभवी स्वतःशीच हसली. तिने समोर बघितले. थोड्याच अंतरावर पार्थ गुरूजींसोबत बसून सगळे विधी करत होता. आबासाहेब त्याच्या बाजूला बसले होते. कपिल हाताची घडी घालून कसलातरी विचार करत होता. शांभवीने नजर परत समोर वळवली. आबासाहेबांनी गुरूजींना सांगून दहाव्या, बाराव्या दिवसाचे विधी पण करायला सांगितले होते. तिथे ते चालू होते. शांभवीला परत आईबाबा आठवले.. हसरे बाबा, तिला सतत जपणारी आई..आदल्या दिवसापर्यंत किती आनंदात चालले होते आपले आयुष्य.. आणि आता हे सगळं अचानक. आता पुढे काय? ते पोलिस का लागले असतील आपल्या पाठी? आबासाहेब म्हणतात की पोलिसांच्या स्वाधीन होऊ नकोस? मग काय करायचे? हातात पुरेसा पैसाही नाही. आईबाबांचे पैसे आपल्याला कसे मिळवता येतील? ते मिळवता येतील का? की आपल्याला आहेत ते दागिने मोडावे लागतील? ते करता येईल.. पण मग पुढे काय? बाबांनी सांगितले होते, की ते कोण लोकं आहेत ते आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. तसं असेल तर आत्तापर्यंत ते का नाही समोर आले? की आले आहेत? तिचं लक्ष परत समोर बसलेल्या आबासाहेबांकडे गेले. काल ते सांगत असलेली देवीची माहिती, आपली घेत असलेली काळजी.. कपिल.. त्याने तर काल किती मदत केली. तोच असेल का माझा सहाय्यकर्ता?

"शांभवी, गुरूजी बोलावत आहेत." जयंतीने शांभवीला हलवले. सर्व विधी तिथेच पार पाडून सगळे परत बंगल्यावर आले. गणूदादाने आधीच जेवणाची ऑर्डर देऊन ठेवली होती. सगळे जेवायला बसले. कोणाचीही बोलायची इच्छा दिसत नव्हती. मध्येच पार्थने अचानक विचारले,

"काका, त्या सतीचं मग महादेवांशी लग्न झालं का?"

"काय म्हणालास?" अचानक आलेल्या प्रश्नाने आबासाहेब गांगरले.

"ते.. तुम्ही गोष्ट सांगत होता ना? मग पुढे काय झाले?"

"जेवल्यावर सांगू? मला जेवताना जास्त बोलता येत नाही."

"नक्की सांगाल ना?" पार्थने खात्री करून घेतली.

"हो रे.." जेवणं झाल्यावर पार्थच नाही तर सगळेच आबासाहेबांची वाट बघत होते. आबासाहेबांनी बोलायला सुरुवात केली.

"तर, कुठे होतो आपण?"

"ते सतीला कमळांवर विष्णूंचे नाव लिहिण्याची शिक्षा मिळते तिथे." जयंतीने उत्तर दिले.

"हो.. दक्षाला असं वाटत होतं की यामुळे सतीच्या मनात विष्णूंबद्दल भावना निर्माण होतील.. पण नाही.. ते लिहिताना सुद्धा सतीच्या मनात शंकरांचाच विचार होता. सतीने मनोमन शंकरांचा पती म्हणून स्वीकार केला होता. घटना घडत होत्या. दक्षाला सतीच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज येत होता. त्यातूनच त्याने तडकाफडकी एक निर्णय घेतला.. सतीच्या स्वयंवराचा."

"स्वयंवर?? पण सतीने तर आपला वर निवडला होता ना?" शांभवीने विचारले.

"हो.. पण दक्षाला ते मान्य नव्हते. साक्षात ब्रह्मदेवांनी समजावून देखील तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी दुःखी मनाने सती स्वयंवरासाठी तयार झाली.

"सती, मला तुझा अभिमान वाटतो आहे. माझं ऐकून तू त्या अघोरीचा विचार सोडलास. तुझ्या स्वयंवरासाठी देव, ऋषी सर्व येणार आहेत. तू योग्य त्या वराला निवडशील, अशी आशा करतो." दक्ष आनंदाने बोलत होता. सती मात्र मान खाली घालून उभी होती. तो बोलत असतानाच एक सेवक अदबीने आत आला.

"प्रजापती, तुम्ही सांगितलेली मूर्ती आली आहे."

"छानच.. सती, चल.. तुला एक गोष्ट दाखवायची आहे." दक्ष सतीला आग्रह करत म्हणाला. इच्छा नसतानासुद्धा सती पित्यासोबत बाहेर आली. समोरच शंकरांची उभी मूर्ती होती. सती ते बघून दचकली. आपले वडिल आणि शंकर? तिचा क्षणभर विश्वासच बसेना. आपलं स्वयंवर तर ठेवलं आहे पण मग त्यांनी आता विचार बदलला आहे का? देतील का ते आपल्या लग्नाला मान्यता? सतीच्या मनात आशेचे धुमारे फुटू लागले. दक्षाच्या पुढील वाक्याने ती जमिनीवर आली.

"ही मूर्ती सभागृहाच्या द्वारापाशी उभी करा.. द्वारपाल म्हणून. त्याला समजले पाहिजे दक्षाच्या राज्यात त्याची काय किंमत आहे ते." दक्षाचा एकेक शब्द सतीचे ह्रदय विदीर्ण करून जात होता.

"मी आत जाते.. मगाशी मातेने एक काम सांगितलं होतं." डोळ्यातले अश्रू लपवत सती तिथून निघाली. ते बघून दक्षाच्या चेहर्‍यावर क्रूर हसू उमटले.

"काहीही झाले तरी तुझा विवाह मी या असंस्कृत माणसाशी होऊ देणार नाही सती.." दक्ष स्वतःशीच पुटपुटला. सती मात्र आत जाऊन रडू लागली. आपल्या प्रिय व्यक्तीचा आपले वडिल करत असलेला अपमान तिला सहन झाला नाही. या क्षणी तिला फार हतबल वाटत होते. पण तिला तर शंकरांच्या मनात तिच्याविषयी काही भावना आहेत का, हे ही माहित नव्हतं. काय करू शकत होती ती? आणि स्वयंवराचा दिवस उगवला. प्रसूतीने आणि सतीच्या बहिणींनी मिळून सतीला छान सजवले. पण तिच्या चेहर्‍यावरच्या उदासीनता ते सगळं झाकोळून टाकत होती. सतीला समजवावे असे प्रसूतीला कितीही वाटत असले तरी काय समजवावे हा ही प्रश्नच होता. त्यामुळे तिने गप्प राहणेच सोयीस्कर समजले. सतीला घेऊन त्या सभागृहात आल्या. सतीच्या सौंदर्याची किर्ती सगळीकडे पसरल्यामुळे सभागृह खचाखच भरले होते. सतीने दरवाजाकडे बघितले. शंकरांची द्वारपालासारखी मूर्ती बघून तिच्या ह्रदयात कळ आली. सती आलेली बघून दक्षाने बोलायला सुरुवात केली.

"माझ्या मुलीच्या, सतीच्या स्वयंवरासाठी इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी माझे पिता ब्रह्मदेव आणि माझे आराध्य भगवान विष्णू तसेच तुम्हा सर्वांचे आभार मानतो. या स्वयंवरासाठी काहीच पण नाही हे तर तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. माझ्या पुत्रीची पसंती हाच या स्वयंवराचा पण आहे." दक्ष सूचकपणे सतीकडे बघत म्हणाला. सती अजूनही मलूलपणे मान खाली घालून उभी होती. रोहिणीने तिच्या हातात पुष्पमाला आणून दिली. सगळेजण ती कोणाच्या गळ्यात माळ घालते हे बघत होते. सतीने पुष्पहार हातात घेतला. डोळे मिटून घेतले. मनोमन तिने शंकरांची प्रार्थना केली.

"मी तुम्हाला मनोमन वरले आहे.. माझे प्रेम खरे असेल तर ही पुष्पमाला तुमच्या गळ्यात येऊन पडेल." तिचे वाक्य पूर्ण होताच तो पुष्पहार तरंगत दरवाजाशी उभ्या असलेल्या शंकरांच्या गळ्यात जाऊन पडला.

"अश्या प्रकारे देवी सतीचा महादेवांसोबत विवाह संपन्न झाला आहे." महर्षी दधिचींचा आवाज सभागृहात घुमला.

"नाही.. हा विवाह नाही.. मी त्या अघोरीला स्वयंवराचे आमंत्रण दिले नव्हते. तो आमंत्रितच नव्हता.. मग हा विवाह अयोग्य ठरतो." दक्ष रागारागाने म्हणाला.

"प्रजापती, महादेवांची मूर्ती जेव्हा तुम्ही इथे आणलीत तेव्हाच ते आमंत्रित झाले होते. जे महादेव एका बिल्वपत्रावर भक्तांच्या हाकेला ओ देतात, इथे तर तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्या मूर्तीची स्थापना केली होती." दधिचींनी दक्षाचे बोलणे खोडून काढले.

"मला हे मान्य नाही.." दक्ष परत एकदा रागाने गरजला.

"तुला हे मान्य करावे लागेल पुत्रा. तूच म्हटल्याप्रमाणे हे सतीचे स्वयंवर आहे. सतीची इच्छा नसती तर ती वरमाला भगवान शिवांच्या मूर्तीकडे गेलीच नसती. तरीही तुझी खात्री पटत नसेल तर आपण सतीला विचारू. सती, तुला हा विवाह मान्य आहे का?" ब्रह्मदेवांनी दक्षाची कानउघडणी करून थेट सतीला विचारले. सतीचे मगाचे मरगळलेले रुप जाऊन तिथे आता लाजेचे गुलाब फुलले होते. ब्रह्मदेवांच्या प्रश्नावर तिने लाजून मान खाली घातली. यावर दक्ष परत काही बोलणार तोच विष्णू उभे राहिले.

"साक्षात ब्रह्मदेवांनीच या विवाहाला मान्यता दिली आहे. त्यामुळे मी भगवान शंकरांना इथे येण्याचे आवाहन करून सतीचे पाणिग्रहण करण्याची विनंती करतो." आपल्या आराध्याच्या विरूद्ध काहीच बोलता येत नसल्याने दातओठ खात दक्ष गप्प बसला. विष्णूंचे आवाहन पूर्ण होताच परत एकदा डमरूचा आवाज येऊ लागला. आणि यावेळेस आपल्या गणांसह महादेव प्रकट झाले.


"काका, मग सतीचे लग्न दक्षाने महादेवांशी लावून दिले का??" पार्थने विचारले.


शांभवीला नदीकाठी खरंच रुद्र दिसला असेल का? तो रुद्रच असेल तर मग बैराग्यांमध्ये तो काय करत असेल? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all