भाग १६
मागील भागात आपण पाहिले की आबासाहेब सगळ्यांना शक्तीपीठांबद्दल माहिती सांगत आहेत. आता बघू पुढे काय होते ते.
"सती, कुठे निघालीस?" प्रसूतीने बाहेर जाणाऱ्या सतीला विचारले.
"माते, भगवान विष्णूंना सहस्त्र पंकजांचा अभिषेक करायचे प्रयोजन आहे. आपल्या उद्यानात तेवढी सुमने नाहीत. म्हणून मग वनात जायचा विचार होता."
"अगं पण.." प्रसूतीने बोलायचा प्रयत्न केला. सतीने राजवाड्याबाहेर जाण्यास दक्षाची परवानगी घ्यावी लागे. तिचा कोणत्याही प्रकारे शंकरांशी संबंध येऊ नये यासाठी दक्ष तिला एकटीला बाहेरच पाठवत नसे.
"माते, आम्ही सगळ्या आहोतच की.. येऊ दे ना तिला आमच्यासोबत. " सतीच्या बहिणी आईला विनंती करत म्हणाल्या.
"पण तुमच्या पिताश्रींना हे आवडणार नाही." प्रसूती म्हणाली.
"माते, भगवान विष्णूंसाठी ते कधीच काही बोलणार नाहीत. आम्ही येतो लगेचच." प्रसूतीला बोलायची संधी न देता सगळ्या तिथून निघाल्या. त्या जाताच प्रसूतीने काही वाईट घडू नये यासाठी देवाची प्रार्थना केली. सगळ्याजणी वनात येऊन आनंदी होत्या. सती तर पहिल्यांदाच आली होती. सगळ्यात जास्त उत्साही तर तिच होती. फुले गोळा करायला म्हणून सगळ्या नदीकिनारी गेल्या. पाण्यातलं कमळ काढताना अचानक सतीच्या हातात एक रुद्राक्ष आला. तिने आधी हा कधीच बघितला नसल्याने तिला आश्चर्य वाटले.
"हे नक्की काय आहे ताई?" तिने आपल्या बहिणींना विचारले. ते बघताच तिच्या बहिणी घाबरल्या.
"तुला हे कुठे सापडले? जिथे होतं तिथे ठेवून ये.."
"मी ठेवते. पण तुम्ही एवढ्या का घाबरत आहात?" सतीने विचारले.
"कारण हा शिवाचा रुद्राक्ष आहे." रोहिणीच्या तोंडातून निघून गेले.
"शिव!!! कोण शिव?" आता मात्र सगळ्याजणी घाबरल्या. सतीच्या कानावर शंकरांबद्दल काहीच जाऊ द्यायचे नाही अशी दक्षाची सक्त ताकीद होती. त्यात आज त्या त्याला न सांगता तिला इथे वनात घेऊन आल्या होत्या, तिला रुद्राक्ष सापडला आणि शंकरांचे नावही समजले.
"सती, हे सगळं विसरून जा.. आपण पटापट पुष्प गोळा करुन घरी जाऊयात. नाहीतर पिताश्री चिडतील." अदिती गंभीरपणे म्हणाली. ते ऐकताच सगळ्याजणी कमळं गोळा करायला गेल्या. घरी गेल्यावर जर फुलं दिसली नसती तर अजून गोंधळ झाला असता. सतीनेसुद्धा फुले गोळा करायला सुरुवात केली पण मनातून मात्र शिव आणि रुद्राक्ष दोन्ही जात नव्हते. फुले गोळा करुन सगळ्या राजवाड्यात आल्या तर तिथे त्यांना खूप गर्दी दिसली. सगळ्याजणी प्रसूतीच्या दालनात गेल्या.
"माते, जाताना तर कोणीच नव्हते. अचानक एवढी माणसे?" दितीने विचारले.
"हो.. तुमच्या पिताश्रींनी भगवान विष्णूंचे एक भव्य मंदिर उभारायचे ठरवले आहे. त्याचसाठी ही सर्व माणसे आली आहेत." आनंदाने प्रसूती सांगू लागली.
"माते, आधीचे मंदिर? आणि मग तिच मूर्ती नवीन मंदिरात ठेवणार का?" सगळ्यांनाच उत्सुकता वाटू लागली होती.
"नाही.. भगवान विष्णूंची शेषशायी मूर्ती नव्याने बनवून घेणार आहेत तुमचे पिताश्री."
"हे एवढं सगळं व्हायला खूप काळ जावा लागेल ना?"
"पुत्री, प्रजापती दक्षाची इच्छा आहे.. येणाऱ्या एकादशीच्या दिवशी भगवान त्यांच्या नवीन रूपात त्यांच्या नवीन घरी विराजमान व्हावेत." पाठून दक्षाचा आवाज येताच सगळ्या मुली त्याला बिलगल्या. सती मात्र स्वतःमध्येच गुंग होती. दक्षाला ते खटकले.
"सती.. आमच्याजवळ नाही येणार?" त्याने आवाज दिला.
"हो पिताश्री.." म्हणतच सती त्याच्याजवळ गेली.
"एकदा सुयोग्य वराशी तुझा विवाह झाला की मी मोकळा." सतीला कुशीत घेत दक्ष म्हणाला. सुयोग्य वर म्हणताच सतीच्या डोळ्यासमोर रुद्राक्ष आणि कधीच न बघितलेला शिव येऊ लागले. तिच्या चेहर्यावर लाली चढू लागली. आपल्या आईवडिलांना आपली ही अवस्था समजू नये म्हणून ती तिथून निघाली. तिच्या पाठोपाठ तिच्या बहिणीसुद्धा दालनाबाहेर पडल्या.
"बघितलंस, विवाहाचा विषय काढताच सती कशी लाजली ते.. एकदा भगवान विष्णूंची स्थापना झाली की लगेचच मी त्यांना सतीशी विवाहाबद्दल विचारेन." दक्ष आनंदाने बोलत होता. प्रसूतीने मात्र यावर काहीच न बोलणे योग्य समजले.
दक्ष म्हटल्याप्रमाणे मंदिर बांधून झाले होते. शिल्पकारांनी भगवान विष्णूंची भव्य शेषशायी मूर्ती बनवली होती. शेषावर पहुडलेले विष्णू, त्यांच्या नाभीतून निघालेले कमळ, त्यावर बसलेले ब्रह्मदेव सगळ्याचे मन वेधून घेत होते. सगळेजण उत्साहात होते. जयजयकारात मूर्ती मंदिरात आणली गेली. तिथून ती गाभाऱ्यात नेण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण मूर्ती इंचभरही हलेना. क्षणार्धात सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडले. ती मूर्ती पुढे ढकलण्यासाठी अजून माणसे आली. पण तरीही मूर्ती हलेना. दक्षाच्या चेहर्यावर चिंता दिसू लागली. उपरणे सरसावून तो पुढे झाला.
"बाजूला व्हा.. मी प्रयत्न करतो." त्याने मूर्तीला नमस्कार केला आणि आपली शक्ती एकवटून त्याने मूर्तीला हात लावला. पण तरीही मूर्ती पुढे जाईना. एवढ्या मोठ्या समारंभाला गालबोट लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रसूतीने आणि तिच्या मुलींनी देवाची प्रार्थना करायला सुरुवात केली. आपल्या पित्याची अवस्था न बघवून सती बाहेर आली. बाहेर काही मूर्तीकार चर्चा करत होते. सतीला बघून ते गप्प बसले.
"काय बोलत होता तुम्ही?" सतीने विचारले.
"काही नाही कुमारी.." मूर्तीकार तिथून निघत म्हणाले. एक वृद्ध मूर्तीकार सोडून बाकी सगळे तिथून निघून गेले. त्या मूर्तीकाराने सतीकडे बघितले. मनाशी काहीतरी विचार करत त्याने तिच्या दिशेने चालायला सुरूवात केली.
"भगवान विष्णूंची मूर्ती गाभाऱ्यात जायला तयार नाही ना??" मूर्तीकाराने विचारले.
"हो.. सगळे प्रयत्न करत आहेत. पण मूर्ती हलायला तयार नाही." उदास होत सती म्हणाली.
"हलणारही नाही." मूर्तीकार म्हणाला.
"तुम्ही एवढ्या विश्वासाने कसं सांगू शकता?"
"कारण ती मूर्ती अपूर्ण आहे." मूर्तीकार दुःखाने म्हणाला.
"अपूर्ण म्हणजे? आणि अशी अपूर्ण मूर्ती तुम्ही आणलीत तरी कशी इथे?" सतीने रागाने विचारले.
"ती मूर्ती प्रजापतींनीच तशी बनवायला सांगितली होती."
"पिताश्रींनी सांगितले? अपूर्ण मूर्ती बनवायला?"
"हो.. विष्णूंसोबत शिवलिंग असावे लागते. ते ठेवले नाही म्हणून ती मूर्ती गर्भगृहात जायला तयार नाही."
"मग आता?"
"माझा विश्वास आहे की तुम्हीच हे शिवलिंग त्या मूर्तीजवळ ठेवू शकता." मूर्तीकार आपल्या सदर्यातून एक छोटं शिवलिंग बाहेर काढत म्हणाला.
"तुम्हाला नक्की वाटतं की हे मूर्तीजवळ ठेवल्यानंतर विष्णूमूर्ती हलेल?" सतीने साशंकपणे विचारले.
"खात्री आहे माझी." मूर्तीकार विश्वासाने म्हणाला. सतीने शिवलिंग आपल्या उत्तरीयात लपवले. ते घेऊन ती कोणालाही दिसणार नाही अश्या पद्धतीने घेऊन विष्णूंच्या मूर्तीपाशी आली. मूर्तीकाराने सांगितलेल्या ठिकाणी तिने ते शिवलिंग ठेवले.
"एकदा शेवटचा प्रयत्न करूयात का?" सतीने विचारले. तिच्या शब्दाला मान देऊन परत मूर्ती ओढायला सुरुवात केली. इतका वेळ न हलणारी विष्णूमूर्ती आता सहजगत्या गाभाऱ्यात गेली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला. पूजेला सुरुवात झाली. पूजा सुरू असतानाच दक्षाची नजर शिवलिंगावर गेली. झालेला आनंद कुठल्याकुठे निघून गेला. त्याची जागा रागाने घेतली.
"हे शिवलिंग इथे कुठून आले?" त्याने जोरात विचारले. दक्षाचा शंकरांवरील राग सगळ्यांना माहित होता. त्यामुळे कोणीच बोलायला धजावले नाही.
"मी विचारतो कोणी ठेवले? सांगा.. नाहीतर प्रत्येकाला दंड होईल." मजूर बिचारे दंडाच्या भितीने घाबरले. आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून सती पुढे झाली.
"मी ठेवली पिताश्री ती मूर्ती तिथे."
"तू??" दक्षाचा विश्वास बसत नव्हता.
"ते भगवानांची मूर्ती अपूर्ण होती म्हणून.."
"हे त्या मूर्तीकाराने सांगितलं असेल.. मूढ नुसता. आणि तू? आपल्या पित्यापेक्षा तुझा त्याच्यावर विश्वास बसला?" दक्ष चिडला होता.
"काका, पण सतीने जे केले ते आपल्या पित्याच्या भल्यासाठीच केले ना? मग दक्ष तिच्यावर का चिडला?" पाणी पिण्यासाठी थांबलेल्या आबासाहेबांना जयंतीने विचारले. आबासाहेबांची कथा सांगण्याची हातोटी म्हणा किंवा शब्दांची पकड.. सगळेच कथेत गुंतले होते.
"त्याच्या डोळ्यावर शिवद्वेषाची पट्टी बांधली होती ना. त्याला हे समजत नव्हते की शिव आणि शक्ती हे एकमेकांसाठी बनलेले आहेत. त्याची इच्छा असो वा नसो.. ते एक होणारच. पण प्रत्येक प्रेमकथेत जसा व्हिलन असतो तसा या कथेत दक्ष व्हिलन झाला होता." आबासाहेबांचे उत्तर ऐकताना सहजच शांभवीची नजर कपिलवर पडली. त्याचे डोळे जणू काही बोलत होते. ती नजर सहन न होऊन शांभवीने नजर फिरवली. कपिल स्वतःशीच हसला.
सतीची कथा ऐकता ऐकता इथे नवीनच प्रेमकथा सुरू होईल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा