देवी रक्षति रक्षितः.. भाग १५

कथा एका असामान्य मुलीची
भाग १५

मागील भागात आपण पाहिले की कपिलच्या वडिलांचा जयंती आणि पार्थमुळे गैरसमज होतो. आता बघू पुढे काय होते ते.


"शांभवी, तुम्ही ठिक आहात ना?" बाहेरच्या झाडाला अस्थिंची पुरचुंडी बांधणाऱ्या शांभवीला कपिलने विचारले.

"आपल्या आईवडिलांचे अंत्यसंस्कार दुसर्‍याच्या घरात, दुसर्‍याच्या मदतीने करणारी मुलगी जेवढी ठिक असेल तेवढीच मी ठिक आहे." शांभवी उदासपणे म्हणाली.

"काय राव असं बोलताय? आम्ही तुम्हाला आपलं मानून हे करतोय आणि तुम्ही मात्र??" कपिल खोटी नाराजी दाखवत म्हणाला.

"मला तुमचं मन नाही दुखवायचं.. पण.. समजून घ्या ना." आत जात शांभवी म्हणाली. कपिल थोडा वेळ तिथेच विचार करत उभा राहिला.

"साहेब, थोरल्या साहेबांचा फोन आला होता. तुम्हाला अर्जंट फोन करायला सांगितला आहे." गणूदादा बाहेर येत म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून कपिलने आपला मोबाईल बघितला. आबासाहेबांचे दर अर्ध्या तासाने फोन आले होते. आता यांचे काय काम असेल हा विचार करतच त्याने फोन केला. कितीतरी वेळ आबासाहेब बोलत होते आणि तो ऐकत होता.


"शांभवी, उद्या सकाळी आठ वाजता निघू आपण." जेवताना कपिल शांभवीला म्हणाला.

"बरं.." अन्न तसंच हातात चिवडत शांभवी म्हणाली.

"कुठे जाताय विचारू का?" आबासाहेबांनी मध्येच विचारले.

"आबा, ते अस्थि..."

"अच्छा.. या मग जाऊन. पण कुठे जाणार कुठे?"

"यांना नाशिकला करायचे आहे." कपिल म्हणाला.

"नाशिक.." बोलता बोलता आबासाहेब थांबले.

"हो.. मला आतून असं वाटतंय की मी तिथे गेलं पाहिजे." शांभवी अचानक म्हणाली.

"नक्की या जाऊन.. नाशिक म्हटलं की आम्हाला आठवते वणीची सप्तशृंगी.."

"हो का?" शांभवी बोलायचं म्हणून बोलली.

"हो.. फार जागृत देवस्थान आहे ते. शक्तीपीठ आहे ते. तुम्ही जर या कामासाठी जात नसता तर मी नक्की जाऊन या असं सांगितले असते. आम्हाला सुद्धा जायचे आहे, पण या कामातून फुरसत मिळेल तर ना.." आबासाहेब म्हणाले.

"हे शक्तीपीठ म्हणजे नक्की काय आहे?" पहिल्यांदाच पार्थने संभाषणात भाग घेतला.

"तुम्हाला शक्तीपीठ माहित नाही?" आबासाहेबांनी आश्चर्याने कपिल आणि शांभवीकडे बघितले.

"आमच्या घरात देवीपूजा केली जात नाही.. म्हणजे नव्हती." शांभवीने मान खाली घालत कबुली दिली.

"त्यात एवढं वाईट वाटून काय घ्यायचं? प्रत्येक घराण्याची काही पद्धत असते. नसेल तुम्हाला माहित. काही कारण असेल ना त्यामागे?"

"असलं तरी आम्हाला आता नाही कळणार. ते सांगायच्या आधीच माझ्या आईबाबांचे निधन झाले." शांभवी म्हणाली.

"काका, आम्हाला सांगाल का त्या शक्तीपीठांबद्दल?" पार्थने परत विचारले.

"जेवून घ्या.. मग माझ्या स्टडी रूममध्ये या. तिथे बोलू.." आबासाहेब म्हणाले. जेवण झाल्या झाल्या लगेचच चौघेही आबासाहेबांच्या खोलीत गेले. त्यांची स्टडी रूम एखाद्या ग्रंथालयासारखी होती. जिथे तिथे फक्त पुस्तकंच पुस्तकं.

"बापरे.. एवढी पुस्तकं? तुम्ही वाचता का?" जयंतीच्या तोंडातून निघून गेलं. शांभवीने रागाने तिच्याकडे बघितले. जयंती मात्र या सगळ्याशी घेणंदेणं नसल्यासारखी पुस्तकं बघत होती.

"हो.. यातली बरीच पुस्तके आम्ही वाचली आहेत. आता कामाचं बोलू.. बसा इथे." आबासाहेब म्हणाले. कपिल तिकडच्या खुर्चीवर बसला तर हे तिघं समोरच्या सोफ्यावर.

"सती माहित आहे का तुम्हाला?" आबासाहेबांनी बोलायला सुरुवात केली.

"हो.. ते आधीच्या काळी नवरा गेल्यावर त्या बाईला त्याच्या चितेवर जाळलं जायचं. तेच ना?" पार्थने विचारले. आबासाहेब किंचित हसले.

"त्यालाही सतीच म्हणतात. पण मी बोलतो आहे ते वेगळ्या सतीबद्दल. ही आहे शंकरांची सती.. तुम्हाला तर माहिती आहेच की ब्रह्मदेवांनी ही सृष्टी निर्माण केली. त्या ब्रह्मदेवांच्या मानसपुत्राचे नाव होते प्रजापती दक्ष. त्याने आणि त्याच्या पत्नीने, प्रसूतीने आदिशक्तीची तपस्या केली होती. त्यांना तिने आपली मुलगी म्हणून जन्म घ्यावा असे वाटत होते. आदिशक्ती त्यांना प्रसन्न झाली. ती त्यांच्यासमोर प्रकट झाली.

"काय इच्छा आहे तुमची?" आदिशक्तीने विचारले.

"माते, तू आमच्या पुत्रीच्या रूपाने जन्म घ्यावा हीच आमची इच्छा आहे." दक्ष म्हणाला. प्रसूतीने होकार दर्शविला.

"मी तुझी ही इच्छा नक्कीच पूर्ण करेन. पण माझ्या काही अटी आहेत." आदिशक्ती म्हणाली.

"तुझ्या अटी माझ्यासाठी आज्ञाच आहेत माते." दक्ष म्हणाला.

"माझी पहिली अट.. वयात येताच मी शंकरांशी विवाह करेन."

"नक्कीच माते.."

"ज्या क्षणी तुझे पुण्य कमी होऊ लागेल आणि तुझ्याकडून माझा अनादर होईल त्याक्षणी मी तिथून निघून माझ्या लोकात परत जाईन."

"माते, तुझ्या सगळ्या अटी आम्हाला मान्य आहेत. तू आमच्या पोटी जन्म घेणार हिच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे." प्रसूती म्हणाली.

"तथास्तू.." आदिशक्ती तिथून अदृश्य झाली पण दक्ष आणि प्रसूतीच्या मनात आनंदाचे झाड लावून गेली. प्रसूती गर्भार राहिली. गर्भात असलेल्या आदिमायेचे तेज प्रसूतीच्या चेहर्‍यावर दिसून येत होते. दिवस भरताच प्रसूतीने कन्येला जन्म दिला.. कन्येचे नाव ठेवले.. सती.."

सतीचा जन्म झाला. ती तिच्या बाळलीलांनी मातापित्यांना रिझवत होती. दक्षाला अजूनही मुली होत्या. पण त्या सर्वांमध्ये सती उठून दिसायची. तिच्या गोड दिसण्याने आणि लाघवी बोलण्याने सगळेच तिच्या मागे असायचे. बघता बघता दिवस उलटले. सती आणि तिच्या बहिणी वयात आल्या. तिच्या बहिणींची दक्षाने लग्न लावून दिली. पण सतीच्या लग्नाची मात्र त्याला अजिबात घाई नव्हती. सतीसाठी त्याच्या मनात एक वेगळेच स्थळ होते.. साक्षात भगवान विष्णूंचे."

"पण काका, त्याने तर आदिशक्तीला प्रॉमीस केले होते ना की तो शंकरांशी तिचं लग्न लावून देईल." पार्थने आबासाहेब बोलता बोलता थांबले हे बघून स्वतःची शंका विचारली.

"हो.. त्याने वचन दिले होते. पण त्यानंतर अश्या काही घटना घडल्या की दक्ष शंकरांचा वैरी झाला."

"पण असं घडलं तरी काय?" पार्थने परत विचारले. पार्थ बोलत असताना कपिलने चोरून शांभवीकडे बघितले. गोष्टीत तल्लीन झालेली ती पार्थच्या बोलण्याने मध्ये आलेला व्यत्यय तिला आवडला नव्हता हे तिच्या चेहर्‍यावरून दिसत होते.

"असं म्हणतात की ब्रह्मदेवांना आधी पाच शिरे होती. त्यातली चार वेदपठण करायची तर एक नको ते बोलायचे. यासाठी शंकरांनी ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक कापून टाकले. आपल्या पित्याचा हा अपमान दक्षाला सहन झाला नाही. तेव्हापासून तो शंकरांचा रागराग करायला लागला. त्यानंतर एकदा देवांच्या सभेत प्रजापती दक्ष आल्यावर सगळ्यांनी उठून त्याला मान दिला. पण शिव मात्र तसेच बसून राहिले हा रागही त्याच्या मनात होता. हळूहळू त्या रागाची परिणीती द्वेषात होऊ लागली. त्याला शंकरांचा एवढा राग येऊ लागला की तो त्यांच्याबद्दल काहीही बोलू लागला. सगळेजण त्याला आपापल्या परीने समजवायचा प्रयत्न करत होते पण तो कोणाचं ऐकायलाच तयार नव्हता. त्याच्यासाठी शंकर म्हणजे फक्त स्मशानात बसलेला एक पाखंडी होता. ज्याला तो आपल्या डोळ्यासमोर उभाही करू इच्छित नव्हता.

"तुम्ही शंकरांचा राग करणं सोडून द्या." प्रसूती दक्षाची समजूत काढत म्हणाली.

"राग आणि त्या शंकराचा? कश्यासाठी? माझ्यासाठी तो अस्तित्वातच नाही." अहंकाराने उन्मत्त असा दक्ष म्हणाला.

"अस्तित्वात नाही.. असं कसं म्हणता तुम्ही? तुम्ही विसरला असाल पण मी नाही. शंकरांशी विवाह व्हावा ही आदिशक्तीची अट तुम्ही मान्य केली होती."

"मी तेव्हा जरी अट मान्य केली असली तरी आता खुद्द त्या आदिशक्तीलाच ते आठवत नाहीये. त्यामुळे त्या शंकराला मी तरी जावई करून घेणार नाही. मी तर तिच्यासाठी एक उत्तम जोडीदार निवडला आहे." दक्ष अभिमानाने बोलत होता.

"जावई निवडला?? कोण?" प्रसूतीने घाबरून विचारले.

"माझे आराध्य.. भगवान विष्णू. माझी खात्री आहे, ते आपल्या भक्ताला कधीही नाराज करणार नाहीत. माझी विनंती ते नक्कीच मान्य करतील."

शांभवी दक्ष आणि सतीबद्दल ऐकत होती. दक्षाचे तिच्याशी वागणे बघून तिला सुधाकररावांचे वागणे आठवले. तिची प्रत्येक गोष्ट जपण्यासाठी ते करत असलेला अट्टाहास. आणि इथे हा दक्ष साक्षात आदिशक्तीला दिलेलं वचन मोडायला निघाला होता ते ही मानापमानाच्या क्षुल्लक घटनांसाठी.. त्या आदिशक्तीचे वचन, जिने आपल्या पोटी जन्म घ्यावा म्हणून त्याने तिची प्रत्येक अट मान्य केली होती. शांभवीला मध्येच तिच्या बाबांचे शब्द आठवले.. तुझा जन्म व्हावा म्हणून आम्ही देवीची प्रार्थना केली होती.


सतीच्या कथेतून लागेल का शांभवीला काही माग? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all