देवी रक्षति रक्षितः.. भाग १४

कथा एका असामान्य मुलीची
भाग १४


मागील भागात आपण पाहिले की शांभवी कपिलच्या मदतीने आपल्या आईवडिलांवर अंत्यसंस्कार करते. आता बघू पुढे काय होते ते.


"हे काय आहे? कोण आहेत ही लोकं? तुला मला फोन नाही का करता आला?" आबासाहेब गणूला ओरडत होते. समोर पार्थ आणि जयंती मान खाली घालून उभे होते.

"साहेब, मी धाकट्या साहेबांना बोललो होतो. पण ते.." गणू बोलता बोलता थांबला. आबासाहेबांच्या आवाजात बाहेर कपिलची बाईक कधी येऊन थांबली त्यांना कळले देखील नव्हते. कपिल आणि शांभवी दारात उभे होते.

"काय झालं आबा??" कपिलचा प्रश्न ऐकून आबा पाठी वळले. विस्कटलेले केस, लाल डोळे, मळलेले कपडे या वेशातील शांभवी आणि तिच्या शेजारी मळके कपडे घातलेला कपिल हे बघून ते चाट पडले.

"कपिल, हे काय चालू आहे? तुमची ही अवस्था? आणि या आहेत तरी कोण?" आबासाहेबांनी विचारले.

"आबा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो. पण जरा सबुरीने घ्याल का? आत्ताच यांच्या आईवडिलांचे अंत्यसंस्कार करून आलो आहोत. जरा अंघोळ करू द्या. गणूदादा, तुम्ही जरा पिठलंभात टाका. आम्ही आलोच." कपिलचं बोलणं ऐकून आबा सोफ्यावर बसले. कपिलने जयंतीला खुणावले. तसं ती शांभवीला आतमध्ये घेऊन गेली. ती आत गेली हे बघून कपिल त्याच्या खोलीकडे वळला.

"कुठे शिवू नका. थेट अंघोळीला जा. गणू देईल तुमचे कपडे." आबांचा आवाज पाठमोर्‍या कपिलच्या कानावर पडताच कपिल हसला. आपल्या आबांचा राग कसा काढायचा हे त्याला चांगलंच माहित होतं. अंघोळ करून कपिल खाली आला तरी शांभवी आणि जयंती आल्या नव्हत्या. पार्थ चुळबुळत तिथेच शिक्षा केल्यासारखा बसला होता.

"गणूदादा, स्वयंपाक झाला आहे का?" कपिलने आवाज दिला.

"भाकर्‍या होतच आल्या आहेत. ताटं करायला घ्यायची का?"

"हो.. आणि पार्थ जा, तुझ्या ताईला बोलावून आण." पडत्या फळाची आज्ञा मानून पार्थ आत गेला. ते बघून कपिलने आबांशी बोलायला सुरुवात केली.

"काय आबा, घरात आलेल्या माणसांबद्दल असं बोलतात का?"

"एवढंच वाटतं तर, तुमच्या कारभाराबद्दल आम्हाला एका शब्दाने सांगावेसे वाटले नाही?" गुळमुळीतपणे आबा म्हणाले. खरी परिस्थिती जाणून न घेता आपण जयंती आणि पार्थसमोर जे काही बोललो याची आता त्यांच्या मनाला टोचणी लागली होती. तेवढ्यात पार्थ शांभवी आणि जयंतीला घेऊन आला. अंघोळ करून आलेल्या शांभवीकडे कपिल बघतच राहिला. रडली असली, कितीही दुःखी असली तरीही ती आता गोड दिसत होती. त्याला तिने स्मशानात मारलेली मिठी आठवली. तेव्हा न उमटलेले रोमांच आता त्याच्या अंगावर उमटले.

"बसा पोरींनो.. आणि पार्थ तू ही बस.." आबांच्या आवाजाने कपिल भानावर आला. सगळे डायनिंग टेबलवर बसले होते.

"आबासाहेब, आमच्या येण्याने तुम्हाला त्रास झाला. त्याबद्दल सॉरी. आम्ही उद्या सकाळीच निघू इथून." हळू आवाजात शांभवी म्हणाली.

"पोरींनो एवढं मनाला लावून घ्यायची गरज नाही. सगळी चूक आमच्या चिरंजीवांची आणि या गणूची आहे. या शहाण्याने हा फक्त दोन मुली आणि एक मुलगा घेऊन बंगल्यावर आला आहे, असं सांगितलं. नंतर काय तर कपिल एका मुलीला गाडीवर घेऊन बाहेर गेला आहे. आता एका बापाच्या कानावर हे सगळं आल्यावर तो काय करणार सांगा बरं?" आबासाहेब प्रेमळपणे बोलू लागले.

"सॉरी ना आबासाहेब.. पण गणूदादा तुला घाई करायची काय गरज होती?" कपिल म्हणाला.

"हां म्हणजे काही बरंवाईट झालं असतं तर परत बोलणी मीच खायची. माझा ना मृदुंग झालाय.. वाजतंय दोन्हीकडून." गणूदादा भाकर्‍या वाढत म्हणाला. त्याचे बोलणं ऐकून सगळ्यांच्या चेहर्‍यावर हसू उमटले.

"मी मदत करू का?" जयंतीने विचारले.

"नको.. मला सवय आहे एकट्याने करायची. तुम्ही बसा." गणूदादा म्हणाला. जेवणं होईपर्यंत कोणी काहीच बोललं नाही. दुपारी अंगावर काढलेला ताप आता पार्थला जाणवायला लागला.

"याला बरं नाही का?" आबासाहेबांनी विचारले.

"दुपारी ताप होता त्याला." शांभवीने बघितलं तर पार्थचं अंग तापलं होतं. दुपारी झालेल्या गडबडीत औषध घ्यायचं राहिलं होतं. आता यांच्याकडे कसं मागायचं हा प्रश्न तिला पडला.

"पार्थ, ही गोळी घे आणि पाणी पिऊन झोप." शांभवीने वर बघितले तर कपिल औषधाची गोळी घेऊन उभा होता. पार्थने गोळी घेतली.

"मी याला घेऊन जातो खोलीत." कपिल म्हणाला. शांभवी कृतज्ञतेने त्याच्याकडे बघतच राहिली. कारण खरंतर ती ही खूप दमली होती. रात्रभर पार्थची देखभाल करणं आजतरी तिला जमणार नव्हतं. आबासाहेबांनी ही परिस्थिती बघून काही न बोलणं सोयीस्कर समजलं. शांभवी एवढी दमली होती की तिला वाटत होतं अंथरुणावर पडल्या पडल्या तिला झोप लागेल. पण नाही. दोघी खोलीत गेल्यावर जयंतीने विचारले,

"झालं का गं सगळं व्यवस्थित? तिथे पोलिस वगैरे होते का?"

"नाही.. नशिबाने तिथे कोणीच नव्हतं. कपिल कोणाशी काय बोलला, त्याचं त्यालाच माहित. पण अगदी पटापट झालं सगळं. आणि सॉरी हां.. माझ्यामुळे तुला बोलणी बसली."

"सोड गं ते.. तो फक्त एक गैरसमज होता. तसंही आपल्याला तुझ्या त्या खडूसची बोलणी ऐकायची सवय आहेच की.." जयंती बोलून गेली. शांभवीच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले. तिला रूद्र आठवला, हॉटेलमध्ये आलेला, त्यानंतर शक्तीपीठांपासून लांब रहा म्हणणारा आणि शेवटी हॉस्पिटलमध्ये पोलिसांसोबत दिसलेला. तोच असेल का या सगळ्यापाठी? विचार करून तिचे डोके दुखू लागले.

"तुला खूप त्रास होतो आहे का गं? सॉरी. मला ना उगाचच बडबडायची सवय लागली आहे." झोपायला जात जयंती म्हणाली. शांभवीने कूस बदलली. पण तिच्या डोळ्यासमोर फक्त दिवसभरातल्या घटना येत होत्या. दूर कुठेतरी कोणीतरी बहुतेक भजन म्हणत होतं. त्याचे शब्द ऐकण्याचा ती निष्फळ प्रयत्न करत राहिली. शेवटी कधीतरी रात्री उशिरा तिला झोप लागली.

"सुप्रभात.." पार्थ आणि जयंतीला शोधत बाहेर निघालेल्या शांभवीला कपिल म्हणाला. तिने पाठी वळून बघितले. कपिल हसतमुखाने तिथे उभा होता.

"गुड मॉर्निंग.. ते मी उठले तिथे जयंती नव्हती. म्हणून मी तिला शोधत होते." शांभवीने स्पष्टीकरण दिले.

"तुम्ही एवढं काय घाबरताय? चिल.. पार्थचा ताप उतरला आहे. तरीही काळजी घ्यावी म्हणून तुमची मैत्रिण त्याला घेऊन डॉक्टरकडे गेली आहे. इनफॅक्ट मीच त्यांना सोडून आलो. गर्दी होती म्हणून तिथे थांबलो नाही. आता थोड्या वेळाने घ्यायला जाईन." कपिल म्हणाला.

"डॉक्टर.. एवढ्या लवकर?" शांभवीने आश्चर्याने विचारले.

"लवकर? वाजले किती ते बघा? अकरा वाजले आहेत." शांभवीने आत जाऊन मोबाईल बघितला तर खरंच अकरा वाजले होते.

"सॉरी.. मी खूपच उशीरा उठले. मला समजलंच नाही. या जयंतीने तरी मला उठवायचे ना.." शांभवी तिच्यापाठी आलेल्या कपिलला म्हणाली.

"त्या उठवायला येत होत्या. मीच नको म्हणालो." कपिल म्हणाला.

"उठवू द्यायचं ना.. आबासाहेब काय म्हणतील? एकतर आधीच आम्ही इथे राहतो आहोत आणि त्यात असं उशीरा उठणं वगैरे.." शांभवी स्वतःवरच नाराज झाली.

"काही बोलायला आबासाहेब आहेत कुठे इथे? ते गेले ऑफिसला, गणूदादा बाजारात. आता या क्षणी या घरात फक्त आपण दोघंच आहोत. आणि माझा तुम्हाला काहीही बोलायचा काहीच विचार नाहीये." कपिल शांभवीच्या जवळ येत म्हणाला. शांभवी भेदरली.

"मी काही तुम्हाला खाणार नाही एवढं घाबरायला. खूप अनमोल आहात तुम्ही माझ्यासाठी.. मी तर फक्त.." हात उंचावत कपिलने शांभवीच्या गालाला लागलेली टिकली काढली. "ही टिकली तुम्हाला देत होतो."

शांभवीने कपिलच्या हातातली टिकली काढून पटकन कपाळाला लावली. आणि आपण करत असलेल्या भलत्या विचारांसाठी स्वतःला दूषणे दिली.

"आता थोडं गंभीर बोलूयात?" कपिल म्हणाला.

"हो.. बोला ना.."

"अस्थिविसर्जन कधी आणि कुठे करायचं? त्या माणसांनी अस्थि गोळा करुन ठेवल्या आहेत. तुम्ही सांगा काय करायचं ते.." कपिल म्हणाला.
आईबाबांचा विषय निघताच शांभवी परत गंभीर झाली.

"आपण आजच तिथे जाऊन घेऊन येऊ. मग उद्या नाशिकला जाऊन विसर्जन करून येते मी." आईबाबांच्या अस्थिचा उल्लेख करणंसुद्धा तिच्यासाठी त्रासदायक होतं.

"विसर्जन करून येऊ आपण.." तिचं वाक्य दुरूस्त करत कपिल म्हणाला.

"तुम्ही एवढं केलं आहेत आमच्यासाठी. मला तुम्हाला अजून त्रास नाही द्यायचा."

"हे बोलून तुम्ही मला खूप त्रास देताय बरं. आणि या सगळ्याची पुरेपूर वसुली मी करणार आहे." शांभवीकडे एकटक बघत कपिल म्हणाला.

"वसुली? कशी??" शांभवीने त्याच्याकडे बघत विचारले.

"वेळ आल्यावर समजेल. आता आवरून घ्या. पार्थला सोबत घेऊनच स्मशानात जाऊ." कपिल खोलीबाहेर जात म्हणाला.


कपिल शांभवीसाठी जे करतो आहे, ते मदत म्हणून करतो आहे की त्याचा काय हेतू आहे. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all