देवी रक्षति रक्षितः.. भाग १३

कथा एका असामान्य मुलीची
भाग १३

मागील भागात आपण पाहिले की शांभवी आईबाबांचे अंत्यसंस्कार न करता तिथून निघाली आहे. आता बघू पुढे काय होते ते.


"पुढे काय आणि कसं? मला काहीच माहित नाही.. आईबाबा सुद्धा काहीच न सांगता कायमचे निघून गेले आहेत. समोर फक्त आणि फक्त अंधार आहे. तिथून रस्ता शोधायचा आहे." शांभवी हताशपणे बोलत होती.

"शांभवी, हे जे काही झालं ते माझ्यामुळेच. त्यामुळे या सगळ्याची जबाबदारी माझ्यावर येते. मी आहे सगळीकडे तुमच्या मदतीला." कपिल आश्वासकपणे म्हणाला.

"हे दोन दिवसांपूर्वी भेटलेले जर तुझ्यासोबत राहून तुला मदत करू शकतात.. मग मी तर तुझी मैत्रीणच आहे. मी आहे तुझ्यासोबत.." जयंती म्हणाली. "पण मला एक कळत नाहीये.. पोलिसांकडे जायचे सोडून तू त्यांच्यापासून दूर का पळते आहेस?"
जयंतीचा प्रश्न ऐकून कपिल शांभवीकडे बघू लागला. तिने मान खाली घातली.

"मागे माझं आणि यांचं बोलणं झालं होतं. त्यांचे शब्द माझ्या लक्षात होते.. कोण कुठपर्यंत पोहोचलं आहे, आपल्याला कसं समजणार? तसंही जर पोलिसांकडेच जायचं होतं तर बाबा का नाही गेले? आणि मी पोलिसांना सांगू तरी काय? मला ना आतून असं वाटतंय की मी इथे राहू नये, अडकू नये अशी बाबांची इच्छा होती. मग.. " शांभवी बोलता बोलता थांबली.

"तुमचं पटतंय मला.. पण.." कपिल बोलू लागला.

"पण आपण राहणार कुठे? करणार काय? माझ्याकडे तर कपडे पण नाहीत." कपिलचे बोलणे थांबवून जयंती बोलू लागली.

"मी बोलू?" कपिलने रागाने तिच्याकडे बघितले.

"बोला.." जीभ चावत जयंती म्हणाली.

"आपण इथून आधी माझ्या घरी जाऊ. तिथे जाऊन शांतपणे ठरवू पुढे काय करायचे ते.. आणि नंतर वाटल्यास पार्थला घरी ठेवून आपण दोघे तुम्हाला जे हवं आहे त्याचा शोध घेऊ." कपिल म्हणाला.

"मी आईबाबांना गमावले आहे. आता ताईला एक क्षणभरही डोळ्यासमोरून हलू देणार नाही." इतका वेळ शांतपणे यांचं बोलणं ऐकत असलेला पार्थ पटकन म्हणाला. ते ऐकून शांभवीचे डोळे पाणावले.

"मी पण तुला नजरेआड होऊ देणार नाही." शांभवी म्हणाली.

"ठरलं तर मग.. आपण यांच्या घरी जायचे आणि मग पुढचे पाऊल उचलायचे." जयंती म्हणाली. या पुढचा प्रवास न बोलताच झाला. शांभवीच्या मनात येऊन येऊन तिच्या आईबाबांच्या अंत्यसंस्काराचा विचार येत होता. ती जर पार्थला घेऊन तिथे गेली आणि त्याला काही झालं तर? आणि नाही गेली तर त्यांचं काय?? तिच्या डोळ्यातून अश्रू घरंगळला.

"मी शोधतो उपाय.." फक्त शांभवीलाच ऐकू येईल अश्या आवाजात कपिल म्हणाला.

"काय म्हणालात??"

"आपण जाऊ परत तिथे.. सगळं मी करतो मॅनेज." कपिलने शांभवीला धीर दिला.

"कसं??" शांभवीने विचारले. काहीच न बोलता कपिल आश्वासक हसला. कपिलने एका बंगल्यासमोर गाडी थांबवली.

"हे तुमचं घर??" जयंतीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले.

"आमचं वडिलोपार्जित आहे. तुम्ही व्हा आत. मी गाडी पार्क करून येतो."

"मुंबईच्या उपनगरात का होईना.. याचा बंगला आहे इथे.." जयंती कौतुकाने बोलत होती. शांभवी आणि पार्थ असेच उभे होते.

"अरे, आत जायचं ना.. इथेच उभं राहण्यापेक्षा." कपिल गाडी पार्क करून आला होता.

"ते..." शांभवी गप्प झाली.
कपिलने दरवाजा उघडला. आवाज ऐकून आतून एक माणूस आला.

"साहेब तुम्ही? आत्ता?"

"हे आपल्याकडे पाहुणे आले आहेत. जरा चहापाण्याचे बघा. आणि दोन गेस्टरूम तयार करून ठेवा." कपिलने सांगितले.

"साहेब, ते मोठे साहेबांना?"

"गणूदादा, मी बोलतो त्यांच्याशी.. आता हे सगळं करायची वेळ नाहीये." कपिल म्हणाला.

"बरं.." थोड्या नाराजीनेच गणू पाठी वळला. ते बघून शांभवीला कसंतरी झालं.

"कपिल, काही अडचण असेल तर आम्ही जाऊ का इथून?" तिने विचारले.

"मी आहे ना इथे? बघतो मी.." कपिल म्हणाला.

"तुम्हाला खोली दाखवतो.." गणू तोपर्यंत परत आला.

"शांभवी, तुम्ही तयार रहा. आपण तुमच्या आईबाबांच्या इथे जाऊन येऊ." आत जाणाऱ्या शांभवीला कपिल म्हणाला.

"आणि मी??" पार्थने विचारले.

"पार्थ, तिथे काय असेल आपल्याला माहीत नाही." शांभवी अजून पुढे बोलणार होती. तोच कपिल मध्ये बोलला.

"पार्थ, तसेही तुझी ताई तिथे येऊन लांबच उभी राहणार आहे. फक्त सगळं व्यवस्थित होतं आहे की नाही हे बघायला मी तिला घेऊन जातो आहे. प्लीज परिस्थिती समजून घे." पाणावलेल्या डोळ्यांनी पार्थने मान हलवून होकार दिला.

"तुम्ही या जाऊन.. मी आहे याच्यासोबत.." समंजसपणे जयंती म्हणाली. फ्रेश होऊन शांभवी बाहेर आली तेव्हा कपिल कोणाशी तरी फोनवर बोलत होता. शांभवीला बघून त्याने फोन ठेवला.

"तुम्ही हे कपडे बदलून याल का?" त्याने विचारले.

"का?? खराब झाले आहेत का कपडे?" शांभवीने ड्रेस चाचपत विचारलं.

"असं नाही.. ते मगाशी हे कपडे त्या पोलिसांनी बघितले होते ना. म्हणून म्हटलं. आणि जमलं तर तुमचा मास्क वापरा."

"मास्क??" शांभवीने आश्चर्याने विचारले.

"स्कार्फ.. तुमचा पूर्ण चेहरा लपवणारा." कपिल म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून कालपासून पहिल्यांदाच शांभवीच्या चेहर्‍यावर हसू उमटले.

"आलेच.." शांभवी आत जात म्हणाली. शांभवी आवरून येताच कपिल बाहेर गेला. पार्थ आणि जयंतीही तिच्यासोबत होते. शांभवीने पार्थच्या हातावर थोपटले आणि ती पटकन बाहेर पडली. तेवढ्यात कपिल बाईक घेऊन आला.

"आपण बाईकवर जायचे?" तिला वाटत होते की तो परत कार काढेल.

"हो.. आपण जेवढ्या पटापट जाऊ. तेवढं लवकर काम होईल. अर्थात तुम्हाला चालणार असेल तरच." कपिल म्हणाला.

"चला.." शांभवी गाडीवर बसत म्हणाली. हॉस्पिटलच्या जवळ येताच कपिलने एका कोपर्‍यात बाईक थांबवली. तिथून हॉस्पिटलचे गेट दिसत होते.

"तुम्ही इथेच थांबा. मी आत जाऊन प्रोसेस पूर्ण करून येतो. तुम्हाला बाईक चालवता येते?"

"हो.."

"मग.. मी ॲम्ब्युलन्ससोबत गेलो की तुम्ही पाठून या. तिथे जर कोणी नसेल तर अंत्यसंस्कार तुम्हीच करा. नाहीतर मग मला करावे लागतील." कपिलचे बोलणे ऐकून शांभवीला भरून आले. 'कोण कोणाचा कोण हा कपिल.. आणि आपल्या आईबाबांसाठी एवढं करतो आहे. आता हा जे म्हणेल त्यासाठी याला मदत करायची..' शांभवीने स्वतःशी ठरवले. सांगितल्याप्रमाणे कपिल आत गेला. तिथे जाऊन तो कोणाशी काय बोलला हे शांभवीला समजले नाही. पण तो म्हटल्याप्रमाणे दोन स्ट्रेचर ॲम्बयुलन्समध्ये चढवताना तिला तो दिसला. नशीबाने तिथे कोणीच पोलिस नव्हते. कपिलही ॲम्ब्युलन्समध्ये बसला. ती चालू होताच सुरक्षित अंतर राखून शांभवीने पण बाईक चालवायला सुरुवात केली. क्षणभर तिला आपला कोणी पाठलाग करत असल्यासारखे वाटले. तिने मागे वळून पाहताच पाठीमागून एक गाडी भरधाव पुढे निघून गेली. ती रूद्रची गाडी होती का? पण तो जर असता तर थांबला तरी असता किंवा पोलिसाला तरी बोलावलं असतं. ती कडवटपणे हसली. ॲम्ब्युलन्स स्मशानाजवळ थांबली. कपिलसोबत अजून दोघेजण उतरले. 'काय वेळ आली आहे आपल्यावर? आपल्याच आईबाबांचे अंत्यसंस्कार असे लपूनछपून करावे लागत आहेत.. डोक्यावर टांगती तलवार ठेवून.' विचारात असतानाच तिचा फोन वाजला. कपिलचा फोन होता.

"शांभवी, इथे कोणीच नाहीये. तुम्ही येऊ शकता." फोन ठेवून शांभवी पाय ओढतच पुढे जाऊ लागली. ती तिथे पोहचताच तिकडच्या गुरूजींनी विधी सुरू केले. कपिलने तिच्या फोनवरून पार्थला व्हिडिओ कॉल लावला. तोसुद्धा निर्जीवपणे ते सगळं बघत होता. थरथरत्या हाताने शांभवीने आईबाबांना अग्नी दिला.

'आज तुमच्या या परिस्थितीतीसाठी मी जबाबदार आहे. पण मी नक्कीच याचा बदला घेईन.' आईबाबांच्या धडधडणाऱ्या चितेकडे एकटक बघत तिने मनोमन प्रतिज्ञा केली. ती करताना सतत तिच्यासमोर रूद्रचा चेहरा येत होता. कपिलने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तो स्पर्श जाणवताच सकाळपासून आणलेला धीरोदात्तपणाचा आव झिडकारून ती त्याच्या कुशीत शिरून रडू लागली. आणि तो तिला थोपटू लागला.


कशी घेईल शांभवी या सगळ्याचा बदला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all