देवानेच तारले

A Story Of Facing Dangerous Situation

✍? सौ मंजुषा गारखेडकर

आमच्या आयुष्यात आम्ही एक भयंकर प्रसंग अनुभवला. कधी विचारही केला नव्हता....असेही प्रसंग घडू शकतात हे ही कधी द्यानी मनी नव्हते. अचानक ओढवलेल्या त्या प्रसंगातून देवानेच आम्हाला वाचविले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मी तरी हा प्रसंग कधीही विसरू शकत नाही.
साधारण 1996 ची गोष्ट आहे आमचं नुकतंच लग्न झालं होतं. माझ्या मिस्टरांची आजी आजारी असल्या कारणाने लग्नाला येऊ शकली नव्हती म्हणून तिला सांगली ला भेटायला जायचं होतं. आजी आणि लहान मावशी सांगलीला राहायच्या. आधी कोल्हापूरला जाऊन देवीचे दर्शन घ्यावं आणि नंतर सांगलीला आजीला भेटायला जायचं आणि तिचे आशीर्वाद घ्यायचे असा आम्ही प्लॅन केला. कोल्हापूरला यांची दुसरी मावशी राहायची. आम्ही बसने पुण्याहून कोल्हापूरला सकाळीच निघालो. दुपारी साडेबारा एकला आम्ही कोल्हापुरात पोचलो. कोल्हापूर स्टॅन्ड बऱ्यापैकी जुनं होतं आजूबाजूला भरपूर टांगे होते. टांग्याचे घोडे शांतपणे शेपूट हलवत रवंथ करत होते. आजूबाजूला भरपूर कचरा, घोड्यांचा चारा पडला होता. टांग्यातून जाण्याची खूप इच्छा झाली, पण आम्ही रिक्षाने मावशीकडे गेलो कारण घर फार लांब होतं. मावशी आणि काका फार प्रेमळ होते त्यांनी आमचं छान आदरातिथ्य केलं. दुपारी गप्पाटप्पा हसी मजाक करत आम्ही जेवलो. संध्याकाळी मावशीच्या मुली बरोबर देवीच्या दर्शनाला गेलो. तिने आम्हाला दर्शन झाल्यावर राजवाडा, रंकाळा तलाव, तिथली चौपाटी आणि बरच काही दाखवलं. छान वाटलं कोल्हापूर. रात्री गप्पा मारत जेवणं झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सांगलीला जायला रवाना झालो. सांगलीच्या मावशीकडे अंथरुणाला खीळलेल्या आजींची भेट झाली. मावशींचे ही लग्नात येणे न झाल्यामुळे त्यांनाही भेटणं झालं. त्या दोघींनाही भेटवस्तू देऊन संध्याकाळी आम्ही निघालो.माझ्या आईनेही मावशी आणि आजींना लग्ना निमित्त भेटवस्तू पाठवल्या होत्या. आजींची भेट झाल्याने बरे वाटले. पिकलं पान कधी गळेल काही सांगता येत नाही त्यामुळे त्यांची भेट होणे आवश्यक होतं.
संध्याकाळच्या बसने आम्ही पुण्याला जायला निघालो. बस मिळून पुण्यात पोहोचायला रात्रीचे दहा साडेदहा झाले. उतरल्यावर रिक्षाने आम्ही घराकडे जायला निघालो. घर स्टँड पासून बरेच लांब होते. रात्र बरीच झाल्याने डोळे पेंगुळले होते. रस्त्यात फारशी वर्दळ नव्हती. रस्त्यापासून जरा लांबवर झोपडपट्टी होती. रस्त्यात मात्र काळाकुट्ट अंधार होता. सगळीकडे सामसूम होती. पूर्णपणे निर्मनुष्य रस्ता होता. आमची रिक्षा त्या रस्त्याने एकटीच चालली होती.
तितक्यात एक माणूस हेलकावे खात रिक्षासमोर आला आणि आमची रिक्षा अडवली, "ए थांब, थांबवतो की नाही??" अरेरावीची आणि शिव्या मिश्रित भाषा, तरीही जीभ जड असल्यासारखा आवाज ऐकून रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली. रिक्षा थांबल्यामुळे घर आलं असं वाटलं आणि झोपमोड झाल्याने, कशाला आलं इतक्यात घर, असं नकळत वाटून गेलं. डोळे कसेतरी कीलकिले करून पाहते तो काय...??? डोळ्यावर विश्वासच बसेना. डोळ्यावरची पेंग खाडकन उतरली. समोर एक काळासावळा माणूस, मळकट विस्कटलेले कपडे, विखुरलेले केस, पायात फाटक्या वहाणा आणि हातात रक्ताने माखलेला सुरा.... रक्त रस्त्यावर टपकत होतं..... पोटात एकदम धस्स झालं. हातात सुरा आहे म्हटल्यावर करणार काय?? रिक्षेवाल्यालाही काही सुचेना... रिक्षात माझे मिस्टर त्याच्या बाजूने बसले होते त्यांच्या कडे बघून तो म्हणाला," ए S S S उतर खाली..." त्याला धड उभ पण राहता येत नव्हतं.... झोकांड्या खात, लडखडत तो उभा होता...तरीही आवाजात जरब होता. त्या अंधाऱ्या रात्री त्याला बघून अजूनच भीती वाटत होती.... दूर कुठेतरी कुत्र्यांचे आवाज येत होते त्यामुळे ती काळरात्र अजूनच भयाण वाटत होती. माझ्यातर पायातले त्राण निघून गेल्यासारखे वाटत होते. इथे उतरलो तर जवळ मदत मिळणही कठीण.....या अशा निर्जन स्थळी रिक्षा मिळणेही कठीण.... काय करावं काही सुचत नव्हतं..... क्षणार्धात असंख्य विचार मनात येऊन गेले......काय करावं काहीच कळत नव्हतं....तितक्यात तो परत ओरडला, "ए उतर म्हनलं ना...., उतर" आणि असं बोलून तो लडखडला की वाकला देव जाणे पण त्याची पाठ आमच्या समोर आली.....आणि दिसलेलं ते दृश्य एखाद्या हॉरर शो मध्ये शोभेल असं होतं.....हॉरर शो पाहायला घाबरणारी मी, मला समोर दिसलेलं दृष्य मी उघड्या डोळ्यांनी पाहत होते...मी आजतागायत म्हणजे सव्वीस वर्षानंतरही ते दृश्य विसरले नाही.... त्याच्या पाठीत काहीतरी मोठ्ठं हत्यार खुपसल होतं आणि त्यातून रक्त खाली पडत होतं..... खाली पाहिलं तर रक्ताचा सडा पडलेला होता....बहुतेक त्याची शुद्ध हरपत चालल्या मुळे त्याचा आवाज जीभ जड झाल्यासारखा येत असावा. इतकं रक्त मी या आधी कधीच पाहिलं नव्हतं. मलाच भोवळ आल्यासारखं वाटायला लागलं. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. अचानक आलेल्या प्रसंगाने काय करावे हेच सुचेनासे झाले होते. वेळ सांगून येत नाही मान्य आहे पण अशी?? अचानक किती देवांचे दरवाजे ठोठावले असतील देवच जाणे. आल्या प्रसंगाला तोंड तर द्यावाच लागणार होतं. काय करावं विचार करायलाही उसंत नव्हती खरतर. तो माणूस कोणाशीतरी मारामारी करून पळण्याच्या हेतूने रिक्षा थांबवत होता. अजूनही तो रिक्षावाल्याशी दरडावून बोलत होता," ए मला घेऊन चल..." रिक्षावाल्याला पण क्षणभर काही सुचेना काय करावं....पण तो क्षणार्धात म्हणाला,"भाऊ हे माझे नातलग हायेत, मी ह्याना सोडून लगेच येतो तुम्हाला न्यायला" आणि येवढं बोलून त्याने रिक्षा सुसाट पळवली. काही समजायच्या आत रिक्षावाल्याने आमची संकटातून सुटका केली होती. रीक्षावाल्याचे आभार कसे मानावे तेच कळत नव्हतं. अक्षरशः त्याच्या पायाशी लोटांगण घातलं तरी कमीच होतं खरतर. रस्त्याने आमच्यातल कुणीही एकही शब्द बोलत नव्हतं. डोकं एकदम सुन्न झालं होतं. नंतरही कित्येक दिवस अन्नपाणी गोड लागत नव्हतं, झोपही लागत नव्हती. डोळ्यापुढे सतत ते रक्तच थारोळं दिसायचं. आजतागायत ही घटना आम्ही घरातल्या कोणालाही कधीही सांगितली नाही. त्या रिक्षावाल्याला असं करायला सुचलं ही परमेश्वराची कृपाच म्हणायची.


सौ मंजुषा गारखेडकर ©®